निवडक अभंग संग्रह ६

 • तापत्रयीं तापलीं गुरुतें गिवसिती भगवे देखोनि म्हणती तारा स्वामी । तंव ते नेणोनि उपदेशाची रीती आना न उपदेशिती ठकलें निश्र्चिती तैसें जालें ॥१॥
  संत ते कोण संत ते कोण । हे जाणवि खुण केशवराज ॥२॥
  कोण्ही एक प्राणी क्षुधेनें पिडिले । म्हणोनि दोडे तोंडूं गेले । खावों बैसे तो नुसधि रुपी उडे । ठकलें बापुडें तैसें झालें ॥३॥
  कोण्ही एक प्राणी प्रवासें पीडिला । स्नेहाळु देखिला बिबवा तो । तयाचें स्नेहलावितां अंगी । सुजला सर्वांगीं तैसें जालें ॥४॥
  कोण्ही एक प्राणी पीडीला झडीं । म्हणोनि गेला पैल तो झाडी । खा खात अस्वली उठली लवडसवडीं । नाक कान तोडी तैसें झालें ॥५॥
  ऎशा सकळ कळा जाणसी । नंदरायाचा कुमर म्हणविसी । बापरखुमादेविवर विठ्ठलीं भेटी । पडलि ते न सुटे जिवेंसी ॥६॥
 • मलयानिळ शीतळु पालवी नये गाळूं । सुमनाचा परिमळु गुंफ़ितां नये ॥१॥
  तैसा जाणा सर्वेश्‍वरु म्हणों नये साना थोरु । याच्या स्वरुपाचा निर्धारु कवण जाणें ॥२॥
  मोतियाचें पाणी भरतां नये वो रांजणीं । गगनासीं गवसणी घालितां नये ॥३॥
  कापुराचें कांडण काढितां नये आड कण । साखरेचें गोडपण । पाखडतां नये ॥४॥
  डोळियांतील बाहुली करु नये वो वेगळी । सखी म्हणुनि साउली धरितां नये ॥५॥
  विठ्ठलरखुमाईचे भांडणीं कोण करी बुझवणी । निवृत्तिचे चरणीं शरण ज्ञानदेवो ॥६॥
 • सुखलागीं जरी करिसी तळमळ । तरी तूं पंढरीसी जाय एक वेळ ॥१॥
  तेथें अवघाची सुखरुप होसी । जन्मोजन्मींचें श्रम विसरसी ॥२॥
  चंद्रभागेसीं करिता स्नान । तुझें दोष पळती रानोरान ॥३॥
  लोटांगण घालोनि महाद्वारीं । कान धरोनि नाच गरुडपारीं ॥४॥
  नामा म्हणे उपमा काय द्यावी । माझ्या विठोबाची इडा पीडा घ्यावी ॥५॥
 • ज्ञानराज माझी योग्यांची माउली । जेणें निगमवल्ली प्रगट केली ॥१॥
  गीता अलंकार नाम ज्ञानेश्र्वारी । ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ॥२॥
  अध्यात्मविद्येचें दाविलेसे रुप । चैतन्याचा दीप उजळिला ॥३॥
  छप्पन्न भाषेचा केलासे गौरव । भवार्णवीं नाव उभारीली ॥४॥
  श्रवणाचें मिषें बैसावें येऊनी । साम्राज्य भुवनीं सुखी नांदे ॥५॥
  नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ॥६॥
 • नाचूं कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावुं जगीं ॥१॥
  सर्व सांडुनी माझाई । वाचे विठ्ठल रखुमाई ॥२॥
  परेहून परतें घर । तेथें राहूं निरंतर ॥३॥
  सर्वांचें जें अधिष्ठान । तेंचि माझें रुप पूर्ण ॥४॥
  अवघी सत्ता आली हाता । नामयाचा खेचरी दाता ॥५॥
 • तूं माझी माउली मी वो तुझा तान्हा । पाजीं प्रेमपान्हा पांडुरंगे ॥१॥
  तूं माझी माउली मी तुझें वासरुं । नको पान्हा चोरुं पांडुरंगे ॥२॥
  तूं माझी हरिणी मी तुझें पाडस । तोडी भवपाश पांडुरंगे ॥३॥
  तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज । चारा घाली मज पांडुरंगे ॥४॥
  नामा म्हणे होसी भक्तीचा वल्लभ । मागे पुढें उभा सांभाळिसी ॥५॥
 • देह जावो अथवा राहो । पांडुरंगीं दृढ भावो ॥१॥
  चरण न सोडी सर्वथा । तुझी आण पंढरीनाथा ॥२॥
  वदनीं तुझें मंगळनाम । ह्रुदयीं अखंडित प्रेम ॥३॥
  नामा म्हणे केशवराजा । केला नेम चालवी माझा ॥४॥
 • मनुष्य करिसी तरी भक्तीचेनि मिषे । तुझें द्वारी वसें ऎसें करी ॥१॥
  श्‍वान करिसी तरी उच्छिष्टाचेनि मिषें । तुझें द्वारी वसें ऎसें करी ॥२॥
  पक्षी करिसी तरी चारियाचेनि मिषे । तुझें द्वारी वसें ऎसें करी ॥३॥
  झाड करिसी तरी तुळसोचेनि मिषे । तुझें द्वरी वसें ऎसें करी ॥४॥
  वृक्ष करिसी तरी मंडप मेखचेनि मिषें । तुझें द्वारी वसें ऎसें करी ॥५॥
  पाषाण करिसी तरी रंग शिलेचेनि मिषें । तुझें द्वारी वसें ऎसें करी ॥६॥
  उदक करिसी तरी सडियाचेनि मिषें । तुझें द्वारी वसें ऎसें करी ॥७॥
  नामा म्हणे विठो कीर्तनाचेनि मिषें । तुझे द्वारीं वसें ऎसें करीं ॥८॥
 • मुंगी व्याली शिंगी झाली तिचें दुध किती । सतरा रांजण भरुन गेले पेले बारा हत्ती ॥१॥
  आम्ही लटिकें न बोलूं वर्तमान खोटें ॥२॥
  लटिकें गेलें कटकें तेथें गाडग्याएवढें राळें । उडत चिमणी चरत चाले तिचे वाटीएवढें डोळे ॥३॥
  शेळी करी गुसळण तेथें मांजर काढी लोणी । उंदीर गेले देशांतरा ताकें भरल्या गोणी ॥४॥
  पाण्यांत कासव गीत गाय वनांत कोल्हा नाचे । सावज मनीं संतोषला खोकड पुस्तक वाचे ॥५॥
  कांतणी घरीं लग्न लागलें सरडा कणीक कांडी । बागूल वंध्या कण्या परणी घुबड मांडे रांधी ॥६॥
  बाभूलीचें खोडीं माशानें केलें कोटें । सशाने सिंह ग्रासिला बेडुक आलें लोटें ॥७॥
  विष्णुदास नामा म्हणे ऎका त्याची ख्याती । लटिकें म्हणतील त्यांचे पूर्वज नरका जाती ॥८॥
 • सदगुरुनायकें कृपा मज केला । निजवस्तु दाविली माझी मज ॥१॥
  माझें सुख मज दाविले डोळां । दिधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा ॥२॥
  तया उतराई व्हावें कवण्या गुणें । जन्मा नाही येणें ऎसें केलें ॥३॥
  नामा म्हणॆ निकी दाविली सोय । न विसरावे पाय विठोबाचे ॥४॥
 • तुझिया सत्तेनें वेदांसी बोलणें । सूर्यासी चालणें तुझिया बळें ॥१॥
  ऎसा तूं समर्थ ब्रह्मांडाचा धनी । वर्म जाणूनि शरण आलों ॥२॥
  मेघांनी वर्षावें पर्वतीं बैसावें । वायूनें विचरावें सत्ते तुझे ॥३॥
  नामा म्हणे कांहीं न हाले साचार । प्रभू तू निर्धार पांडुरंग ॥४॥
 • पंढरीचा वास चंद्रभागे स्नान । आणिक दर्शन विठोबाचें ॥१॥
  हेंचि घडो मज जन्मजन्मांतरी । मागणें श्रीहरि नाहीं दुजें ॥२॥
  मुखीं नाम सदा संतांचें दर्शन । जनीं जनार्दन ऎसा भाव ॥३॥
  नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी । कीर्तन गजरीं सप्रेमाचें ॥४॥
 • अरे मना शोक करिसी किती । हें तंव वाया धनसंपत्ति । आयुष्य भविष्य नाहीं तुझिये हाती । हें अवघे अंती जायजणें ॥१॥
  एक अर्बुंद साठी कोटि केखा । तीस लक्ष दहा सहस्त्र लेखा । सात शर्तें नवमास मापा । तया हिरण्यकश्यपा काय झालें ॥२॥
  चौदा चौकड्या लंकानाथा । नव्याणव सहस्त्र राया दशरथा । तेही गेले स्वर्गपंथा । मागें सर्वथा नुरलेचि ॥३॥
  चौदा कल्प मार्कंडेया पडे । तैं लोमहर्षणाचा एक रोम झडे । बकदालम्याचे निमिष मोडे । गेले एवढे अरे मना ॥४॥
  बकदालम्याचे पुरे निमिषें । तें वटहंसाचे उपडे पिच्छे । तयासि होता मृत्युप्रवेश । तो एक श्‍वास भृशुंडीचा ॥५॥
  मरणांत पुरे भृशुंडीचा । तै एक दिवस कूर्माचा । नामा विनवी केशवाचा । वेगीं विठोबाचा पंथ धरा ॥६॥
 • पतीतपावन नाम ऎकुनी आलों मी द्वारा । पतीतपावन नव्हेसि म्हणुनी जातों माघारा ॥१॥
  घ्यावें तेव्हां द्यावें ऎसा आससी उदार । काय धरुनि देवा तुझें कृपणाचे द्वार ॥२॥
  सोडीं ब्रीद देवो आतां नव्हेसि अभिमानी । पतीतपावन नाम तुझें ठेवियलें कोणी ॥३॥
  झेंगट घेऊनी हातीं दवंडी पिटीन तिहीं लोकीं । पतीतपावन देवो परी तूं मोठा घातकी ॥४॥
  नामा म्हणे देवो तुझें न लगे मज कांही । प्रेम असों दे चित्ती म्हणुनी लागतसें पायीं ॥५॥
 • उदाराचा राणा म्हणविसी आपणा । सांग त्वां कवणा काय दिलें ॥१॥
  उचिता उचिता देसी पंढरीनाथा । न बोलों सर्वथा वर्में तुझीं ॥२॥
  वर्मे तुझी कांही बोलेन मी आतां । क्षमा पंढरीनाथा करी बापा ॥३॥
  न घेतां न देसी आपुलेंहि कोणा । प्रौढी नारायणा न बोलावी ॥४॥
  बाळमित्र सुदामा विपत्ती पिडला । भेटावया आला तुजलागी ॥५॥
  तीन मुष्टि पोह्यांसाठीं मन केलें हळुवट। मग तया उत्कृष्ट राज्य दिले ॥६॥
  छळावया पांडव दुर्वास पातला । दौपदीनें केला धांवा तुझा ॥७॥
  येवढिया आकांती घेऊनि भाजीपान । मग दिलें अन्न ऋषिलागी ॥८॥
  बिभीषणा दिधलें सुवर्णाची नगरी । ही कीर्ति तुझी हरी वाखाणिती ॥९॥
  वैरियाचें घर भेदें त्वां घेतलें । त्याचें त्यासीं दिधलें नवल काय ॥१०॥
  ध्रुव आणि प्रल्हाद अंबऋषि नारद । हरिश्र्चंद रुक्मांगद आदि करुनी ॥११॥
  त्याचें सेवाऋण घेऊनी अपार । मग त्या देशी वर अनिर्वाच्य ॥१२॥
  एकाचि शरीरसंपत्ति आणि वित्त । एकाचें तें चित्त हिरोनी घेसी ॥१३॥
  मग तया देशी आपुलें तुं पद । जगदानी हें ब्रीद मिरविशी ॥१४॥
  माझें सर्वस्व तूं घेई । तुझे नको काहीं । मनोरथाची नाहीं चाड मज ॥१५॥
  नामा म्हणे केशवा जन्मजन्मांतरी । करीन मी हरी सेवा ऋण ॥१६॥
 • वेदाध्ययन करिसी तरी वैदिकचि होसी । परि वष्णव न होसी अरे जना ॥१॥
  पुराण सांगसी तरी पुराणीकचि होसी । परि वैष्णव न होसी अरे जना ॥२॥
  गाय़न करिसी तरी गुणीजन होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥३॥
  कर्म आचरसी तरी कर्मठचि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥४॥
  यज्ञ करिसी तरी याज्ञिकचि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥५॥
  तीर्थ करिसी तरी कापडी
  च होसी । परि वैष्णव न होसी अरे जना ॥६॥
  नामा म्हणे नाम केशवाचें घेसी । तरीच वैष्णव होसी अरे जना ॥७॥
 • संतभार पंढरींत । कीर्तनाचा गजर होत ॥१॥
  तेथें असे देव उभा । जैसी समचरणांची शोभा ॥२॥
  रंग भरें कीर्तनांत । प्रेमे हरिदास नाचत ॥३॥
  सखा विरळा ज्ञानेश्र्वर । नामयाचें जो जिव्हार ॥४॥
  ऎशा संतां शरण जावें । जनी म्हणे त्याला घ्यावें ॥५॥
 • गंगा गेली सिधूपासीं । त्यानें अव्हेरिलें तिसीं ॥१॥
  तरी ते सांगावें कवणाला । ऎसें बोलें बा विठ्ठला ॥२॥
  जळ कोपे जळचरा । माता अव्हेरी लेंकुरा ॥३॥
  जनी म्हणे शरण आलें । अव्हेरितां ब्रीद गेलें ॥४॥
 • विठो माझा लेकुरवाळा । संगें लेकुरांचा मेळा ॥१॥
  निवृत्ति हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी ॥२॥
  पुढें चाले ज्ञानेश्‍वर । मागें मुक्ताई सुंदर ॥३॥
  गोरा कुंभार मांडीवरी । चोखा जीवा बरोबरी ॥४॥
  वंका कडियेवरी । नामा करांगुळीं धरी ॥५॥
  जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा ॥६॥
 • पुण्यवंत पाताळ लोकीं नेला । दरिद्री तो भाग्यवंत केला । चोरट्याचा बहुमान वाढविला । कीर्तिवानाचा अपमान केला ॥१॥
  धुंद झाला तुझा दरबार ॥धृ॥
  वैरियासी दिधली मोक्षसिद्धि । कपटिया दिधली महानिधी । सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंधी । चाळकासी त्रेलोक्य भावें बंदी ॥२॥
  पतिव्रता ती वृथा गुंतविली । विश्या गणिका ती सत्यलोका नेली । कळी स्वकुळा लावियेली । यादववृंदा ही गोष्ट बरी नाहीं केली ॥३॥
  सत्ववानाचा बहु केला छळ । कीर्तिवानाचें मारियेलें बाळ । सखा म्हणविसी त्याचे नासी बळ । जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ ॥४॥
 • धरिला पंढरीचा चोर । गळां बांधोनियां दोर ॥१॥
  ह्रुदय बंदिखाना केला । आंत विठ्ठल कोंडिला ॥२॥
  शब्दें केली जुडाजुडी । विठ्ठलपायीं घातली बेडी ॥३॥
  सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुळती आला ॥४॥
  जनी म्हणे बा विठ्ठला । जीवें न सोडी मी तुला ॥५॥
 • एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी । माझा ज्ञानराज गोपळांशी लाह्या वाटी ॥१॥
  नामदेव कीर्तन करी पुढें नाचे पांडुरंग । जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग ॥२॥
  अभंग बोलतां रंग कीर्तनीं भरला । प्रेमाचेनि छंदे विठ्ठल नाचूं लागला ॥३॥
  नाचतां नाचतां देवाचा गळला पितांबर । सावध होई देवा ऎसा बोले कबीर ॥४॥
  साधु या संतांनीं देवाला धरिला मनगटीं । काय झालें म्हणुनी दचकले जगजेठी ॥५॥
  ऎसा कीर्तन महिमा सर्वांमाजीं वरिष्ठ । जड मूढ भाविका सोपी केली पायवाट ॥६॥
  नामयाची जनी लोळे संतांच्या पायीं । कीर्तन प्रेमरस अखंड देई गे विठोई ॥७॥
 • कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥१॥
  लसुण मिरची कोथिंबरी । अवघा झाला माझा हरि ॥२॥
  मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ॥३॥
  सांवतां म्हणे केला मळा । विठ्ठलपायीं गोविला गळा॥४॥

comments powered by Disqus