श्री हनुमानजन्माचे अभंग

  • देवांगना हातीं आणविला शृंगी । यज्ञ तो प्रसंगी आंरभिला ॥१॥
    विभांडका क्रोध आला असे भारी । अयोध्या भीतरीं वेगीं आला ॥२॥
    राजा दशरथ सामोरा जाऊनी । अति प्रिती करुनी सभे नेला ॥३॥
    पुत्र स्नुषा दोन्हीं देखतां नयनीं । आनंदला मनी म्हणॆ नामा ॥४॥
  • आनंदोनी म्हणे राया धन्य केलें । इच्छिलें सोहळे पुरवीन ॥१॥
    यज्ञाचा आरंभ करी लवलाह्मा । पुसोनी आचार्या वसिष्ठांसी ॥२॥
    सर्व ऋषीजन मिळाले सकळ । मंत्रांचा कल्लोळ करिताती ॥३॥
    नामा म्हणे शृंगी मुख्यत्वें शोभला । यज्ञ आरंभिला तेणें जेव्हां ॥४॥
  • आरंभिला यज्ञ सन्तोष सर्वत्र । आनंदे नगर दुमदुमीत ॥१॥
    यज्ञनारायण सन्तोष पावला । प्रत्यक्ष तो आला कुंडांतुनीं ॥२॥
    पायस तें पात्र घेऊनियां करीं । शृगीस झडकरी बोलतसे ॥३॥
    विलंब करितां विघ्न ओढवेल । सत्वर वहिले भाग करा ॥४॥
    नामा म्हणे देव येईल पोटासीं । ऎंसे गूज त्यासी अग्नी सांगे ॥५॥
  • विभाग सत्वर वसिष्ठानें केले । राया बोलाविलें सान्निधचि ॥१॥
    प्रथम तो भाग कौसल्यसी दिला । तेणें क्रोध आला कनिष्ठेसी ॥२॥
    येतांचि तो क्रोध विघ्न ओढवलें । मुखीं झडपिला पिंड घारीं ॥३॥
    आसडोनी पिंड घारीनें पै नेला । नामा म्हणे घातिला अंजनी करीं ॥४॥
  • पिंड घारीनें झडपिला । अंजनीनें तो सेविला ॥१॥
    अंजनीच्या तपासाठीं । महारुद्र आले पोटीं ॥२॥
    चैत्र शुद्ध पौर्णिमेसी । सुर्योदय समयासी ॥३॥
    महारुद्र प्रगटला । नामा म्हणे म्यां वंदिला ॥४॥

comments powered by Disqus