मंगलाचरण पहिले

जय जय रामकृष्णहरि

  • रुप पाहतां लोचनीं । सुख झालें वो साजणी ॥१॥
    तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥
    बहुता सुकृताची जोडी । म्हणोनि विठ्ठलीं आवडी ॥३॥
    सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवर ॥४॥
  • वचन ऎका कमळापती । माझी रंकाची विनंती ॥१॥
    कर जोडितों कथेकाळीं । आपण असावें जवळीं ॥२॥
    घ्यावी घ्यावी माझी भाक । जरीं कां मागेन आणिक ॥३॥
    तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुकाची राखावा ॥४॥
  • राहो आतां हेंचि ध्यान । डोळां मन लंपट ॥१॥
    कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें पूजीन ॥२॥
    होईल येणें कळसा आलें । स्थिरावलें अंतरीं ॥३॥
    तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पायां पडो द्या ॥४॥
  • तुज पाहतां सामोरी । दृष्टि न फिरे माघारी ॥१॥
    माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडली पंढरीराया ॥२॥
    नव्हे सारितां निराळें । लवण मेळवितां जळें ॥३॥
    तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळीं ॥४॥
  • तुम्ही सनकादिक संत । म्हणवितां कृतावंत ॥१॥
    एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥२॥
    माझी भाकावी करुणा । विनवा पंढरीचा राणा ॥३॥
    तुका म्हणे मज आठवा । मुळ लवकरी पाठवा ॥४॥
  • आतां तुम्ही कृपावंत । साधुसंत जिवलग ॥१॥
    गोमटें तें करा माझें । भार ओझें तुम्हांसी ॥२॥
    वंचिलें तें पायांपाशीं । नाहीं यासी वेगळें ॥३॥
    तुका म्हणे सोडिल्या गांठी। दिली मिठी पायांसी ॥४॥
  • लेकुराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥१॥
    ऎसी कवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीति ॥२॥
    पोटीं भार वाहे । त्याचें सर्वस्वही साहे ॥३॥
    तुका म्हणे माझें । तुम्हां संतांवरी ओझे ॥४॥
  • करुनि उचित । प्रेम घाली ह्र्दयांत ॥१॥
    आलों दान मागायास । थोर करुनियां आस ॥२॥
    चिंतन समयीं । सेवा आपुलीच घेई ॥३॥
    तुकयाबंधु म्हणे भावा । मज निरवावे देवा ॥४॥
  • न धरी उदास । माझी पुरवावी आस ॥१॥
    ऎका ऎका नारायणा । माझी परिसा विज्ञापना ॥२॥
    मायबाप बंधुजन । तुंचि सोयरा सज्जन ॥३॥
    तुका म्हणे तुजविरहित । कोण करील माझें हित ॥४॥
  • गरुडाचे पायीं । ठेवी वेळोवेळां डोई ॥१॥
    वेगीं आणावा तो हरी । मज दीनातें उद्धरी ॥२॥
    पाय लक्ष्मीच्या हातीं । तिसीं यावे काकुळती ॥३॥
    तुका म्हणे शेषा । जागे करा ह्रषीकेशा ॥४॥
  • येग येग विठाबाई । माझे पंढरींचे आई ॥१॥
    भिमा आणि चंद्रभागा । तुझ्या चरणींची गंगा ॥२॥
    इतुक्यासहित त्वां बा यावें । माझें रंगणीं नाचावें॥३॥
    माझा रंग तुझे गुणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

comments powered by Disqus