संतसंगमहिमा

संतसंगे हरे पाप । संतसंगे निरसे ताप । संतसंगे निर्विकल्प । होय मानस निश्र्चळ ॥१॥
संतसंगे वैराग्य घडे । संतसंगे विरक्ती जोडे । संतसंगे निजशांति वाढे । साधन ह्रदयी अखंडीत ॥२॥
संत संगे हरिची भक्ति । संतसंगे ज्ञान विरक्ती । संतसंगे भुक्ती मुक्ती । साधका वरिती अनायसे ॥३॥
निळा म्हणे साधु संत। महाभाग्याचे हे भाग्य । सेविती ते स्वरुप चांग । पार्वती आत्मया श्रीहरिचे ॥४॥

 • ऎसी प्रात्पी कै लाहीन । संत संगती राहीन । त्यांचे संगती मी ध्याईन । नामा गाईन अहर्निशी ॥१॥
  भावे धरलिया संतसंग । सकळ संगा होय भंग । अभ्यासिता आकळे योग । पळे भवरोग आपभये ॥२॥
  सेविलीया संतचरण तीर्था । तीर्थे पायवणी वोढविती माथा । सुर नर असुर वंदिती तत्वतां । ब्रह्म सायुज्यता
  घर रिघे ॥३॥
  संत चरणरज मस्तकी पडे । देह संदेह समूळ उडे । उघडिली मुक्तिचि कवाडे । कोंदाटे पुढे परब्रह्म ॥४॥
  दृढ धरलिया सत्संगती । अलभ्य लाभ आतुडे हाती । चारी पुरुषार्थ चारी मुक्ति । पायां लागती निजदास्य ॥५॥
  जै कृपा कारिती संत । जन विजन होय जनार्दन । एका जनार्दनी शरण । ब्रह्म परिपूर्ण तो लाहे ॥६॥
 • ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले । उद्धरावया आले दीन जनां ॥१॥
  ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी । नाम घेता वदनी दोष जाती ॥२॥
  हो कां दुराचारी विषयी आसक्त । संत कृपे त्वरित उद्धरती ॥३॥
  अखंडित नामा त्यांचा वास पाहे । निशिदिनी ध्याये सत्संगती ॥४॥

comments powered by Disqus