विनंतीचे अभंग

कृपाळु सज्जन तुम्ही सन्तजन । हेंचि कृपादान तुमचें मज ॥१॥
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा । कींव माझी सांगा काकुळती ॥२॥
अनाथ अपराधी पतित आगळा । परि पाया वेगळा नका करुं ॥३॥
तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी । मग मजहरी उपेक्षिना ॥४॥

  • सन्ताचिया पायीं हा मझा विश्‍वास । सर्वभावें दास झालों त्यांचा ॥१॥
    तेचि माझें हित करिती सकळ । जेणॆं हा गोपाळ कृपा करी ॥२॥
    भागलिया मज वाहतील कडे । त्यांचियानें जोडे सर्व सुख ॥३॥
    तुका म्हणे शेष घेईन आवडी । वचन न मोडी बोलिलें तें ॥४॥
  • लेकुंराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥१॥
    ऎसी कळवळ्याची जाती । करी लाभाविणा प्रीती ॥२॥
    पोटीं भार वाहे । त्याचें सर्वस्वही साहे ॥३॥
    तुका म्हणे माझें तुम्हां सन्तावरी ओझे ॥४॥
  • शेवटींची विनवणी । सन्तजनीं परिसावी ॥१॥
    विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥२॥
    आतां फ़ार बोलों कायी । अवघे पायीं विदित ॥३॥
    तुका म्हणॆ पडिलो पाया । करा छाया कपेची ॥४॥
  • पायाच्या प्रसादें । कांहीं बोलिलों विनोदें ॥१॥
    मज क्षमा करणें सन्ती । नव्हे अंगभूत युक्ति ॥२॥
    नव्हे हा उपदेश । तुमचे बडबडिलों शेष ॥३॥
    तुमचें कृपेचें पोसणें । जन्मोजन्मीं तुका म्हणॆ ॥४॥

comments powered by Disqus