भूत जबर मोठे गं बाई

भूत जबर मोठे गं बाई ।
झाली झडपड करूं गत काई ॥ १ ॥
झाली झडपड करूं गत काई ।
सूप चाटूचे केले देवऋषी ॥
या भूताने धरिली केशी ॥ २ ॥
लिंबू नारळ कोंबडा उतारा ।
त्या भूताने धरिला थारा ॥ ३ ॥
भूत लागले नारदाला ।
साठ पोरे झाली त्याला ॥ ४ ॥
भूत लागले ध्रुव बाळाला ।
उभा अरण्यात ठेला ॥ ५ ॥
एका जनार्दनी भूत ।
सर्वांठायी सदोदित ॥ ६ ॥

comments powered by Disqus