गोंधळ

सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला वो । ज्ञान वैराग्याचा वरती फुलवरा बांधिला वो । चंद्र सूर्य दोन्ही यांचा पोत पाजळिला वो । घालुनी सिंहासन वरुते घट स्थापियेला वो ॥ १ ॥

उदो बोला उदो उदो सद्‌गुरु माउलीचा वो ॥ध्रु०॥

प्रवृत्ती निवृत्तीचें घालुनि शुद्धासन वो । ध्येय ध्याता ध्यान प्रक्षाळिलें चरण वो । कायावाचामनें एकविध अर्चन केलें वो । द्वैत अद्वैत भावें दिले आचमन वो ॥ २ ॥

भक्ति वैराग्य ज्ञान याहीं पुजियली अंबा वो । सद्रूप चिद्रूप पाहुनी प्रसन्न जगदंबा वो । एका जनार्दनीं शरण मूळकदंबा वो । त्राहे त्राहे अंबे तुझा दास आहे उभा वो ॥ ३ ॥

comments powered by Disqus