बेटकुळी

ऐका बेटकुळीचे महिमान । सांगे सकळ लोकां जना । संतमहंताच्या खुणा । ऐका वाचून त्या ॥ १ ॥

टराव टराव टराव । मृगवट जाण गा ॥ ध्रु० ॥

इचे ग्रामीं आहे कोण । दंभ अहंकाराची खूण । शब्द करी नाना विंदान । इचे स्थानीं बैसविले जाण ॥ २ ॥

रवीमंडळापासोन । सात विकाराचा मान । एकवीस स्वर्गाचिये ध्यान । साधु सज्जन करिती गायन ॥ ३ ॥

दश अवतारीण । राखी भृगूचा सन्मान । भक्तासाठीं झाला श्वान । पाहे विटेवरी मौन्य ॥ ४ ॥

एका जनार्दनीं कुळीचें वर्म दिनीं । तळीं पाताळी वितळा जनीं वनीं । सद्‌गुरुपायी मिठी घालूनी । लाधेल प्रासादिक वाणी ॥ ५ ॥

comments powered by Disqus