पोर

ऎक रे ब्राह्मणाच्या कार्ट्या । वलवल करू नको पोरट्या ।

बोलणे अवघे वोखट्या । हित नाही ॥१॥

आपुले हित तू पाही । वेदशास्त्री काही नाही ।

पुराणे पढोनि केले काही । हित नाही ॥२॥

कामक्रोधे शरीर भरले । ज्ञान वैराग्य हारपले ।

बोलसी विषयाच्या बोले । हित नाही ॥३॥

आपुले हित करी काही । सद्‌गुरुसी शरण जाई ।

‘मी-तू’ पणा नुरे काही । हित पाही ॥४॥

एका जनार्दनी पोर । केला सारासार विचार ।

पावला सद्‌गुरद्वार । हित जाले ॥५॥

comments powered by Disqus