वासुदेव

कर जोडोनि विनवितो तुम्हां । तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा ।

नको गुंतू विषयकामा । तुम्ही आठवा मधुसूदना ॥१॥

नरदेह दुर्लभ जाणा । शतवर्षांची गणना ।

त्यामध्ये दु:ख यातना । तुम्ही आठवा मधुसूदना ॥२॥

नलगे तीर्थांचे भ्रमण । नलगे दंडण मुंडण ।

नलगे पंचाग्नी साधन । तुम्ही आठवा मधुसूदना ॥३॥

हेचि माझी विनवणी । जोडितो कर दोन्ही ।

शरण एका जनार्दनी । तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी ॥४॥

comments powered by Disqus