पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे.

१८६८
“पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे.”
येहळेगावळा श्रींनी तुकामाईंचे दर्शन घेतले व बरोबर एक वर्षानी गोंदवल्यास परत आले. संध्याकाळची वेळ होती. आपल्या घरासमोर जाऊन श्रींनी “जयजय रघुवीर समर्थ “ म्हटले, ते ऐकून गीताबाई भिक्षा घेऊन बाहेर आल्या. त्यांनी श्रींना त्यावेळी ओळखले नाही, पण आपल्या मुलाबद्दल विचारले, त्यावर गोसावीबुवा म्हणाले,”माय, तुमचा मुलगा उद्या तुम्हाला भेटेल.” त्या रात्री श्रींनी आपला मुक्काम मारुतीमंदिरात केला. दुसर्‍या दिवशी पहाटे बहिर्दशेस निघालेल्या चिंतुबुवांना श्रींनी नावाने हाक मारली. चिंतुबुवा चपापले. पुढे श्री आपल्या घरासमोर आले व “जय जय रघुवीर समर्थ म्हणाले, गीताबाईंनी काहीतरी भिक्षा घालायला आणली त्यावर श्री म्हणाले. “माय, ही भिक्षा मला नको, कोपर्‍याच्या उतरंडीला घटट दह्याची दगडी आहे ती आणून दे “ ( श्रींना लहानपणी घटट दही फार आवडे, म्हणून त्यांच्यासाठी गीताबाई रोज दही लावून ठेवीत असत ) गीताबाई चटदिशी घरात गेली व दह्याची दगडी बाहेर आणली व श्रींच्या समोर केली, पण ती न घेता श्री आपल्या आईकडे पाहून नुसते हसले, त्याबरोबर तिने एकदम श्रींना ओळखले आणि त्यांच्या गळ्याला कडकडून मिठी मारली “माझा गणू मला भेटला “ असे म्हणून आईच्या डोळ्यांना धारा लागल्या. आणि माझी आई मला भेटली “ म्हणून श्रींच्या डोळ्यांना पाणी आले. तेवढयात रावजी तेथे आले, श्रींनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. अनेक वर्षांनी श्री घरी आल्याने सर्वांनी त्यांच्याभोवती राहून त्यांना प्रश्रांनी भंडावून सोडले. “पंतांचा नातू साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे “ ही वार्ता सगळीकडे पसरली. आजूबाजूच्या गावाहून शेकडो लोक श्रींच्या दर्शनाला येऊ लागले. भगवंताच्या नामाचे महत्त्व सांगून श्री प्रत्येकाच्या अंतःकरणाला अमाधान देत. श्री आपल्या वडिलांशी फार मर्यादेने वागत. राहत्या घराच्या समोरच्या विठठलमंदिरात श्रींनी आपला मुक्काम हलवल; मंदिरासमोर मोठा ओटा बांधून त्यावर श्री बसू लागले. खातवळहून श्रींचे सासरे त्यांना भेटायला आले. श्री त्यांना म्हणाले, “मी लवकरच तिकडे येणार आहे, त्यावेळी परत येताना माझ्याबरोबर बायकोला घेऊन येईन.” आल्यापासून श्री बैराग्याच्या वेषातच होते. काही दिवसांनी शास्त्रोक्त पद्धतीने जटाभार उतरवल्यावर होमहवन व अन्नदान झाले. श्रींचे सासरेही आमंत्रणावरून त्यासाठी गोंदवल्यास आले होते. त्यानंतर गीताबाईंनी सूनबाईला घेऊन येण्याविषयी श्रींपाशी गोष्ट काढली. श्री स्वतः सासर्‍यांबरोबर खातवळला गेले. तेथील मंडळींना खूप आनंद झाला. तेथे चार दिवस राहून श्री येताना कुटुंबाला घेऊन गोंदवल्यास परत आले. श्रींचा गृहस्थाश्रम सुरू झाला. श्रींसारखा पति धन्यता वाटे. प्रापंचिक गोष्टींबरोबर देवाची भक्ती कशी करावी, नामस्मरण कसे टिकवावे, निंदा कशी गिळावी, देवासाठी हार कसा करावा इ. अनेकविध गोष्टी श्रींनी तिला शिकविल्या. श्री मोठे साधू आहेत अशी तिची बालंबाल खात्री होती म्हणून ती त्यांचा शब्द कधीही खाली पडू देत नसे. अन्नदान करण्यात, परोपकार करण्यात, सासू-सार्‍यांपासून गडी माणसांपर्यंत प्रेमाने वागण्यात ती श्रींच्या पसंतीस उतरू लागली.

comments powered by Disqus