सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते

१८८१
“सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते, म्हणून
त्याच्या चित्ताला अस्वस्थता येते. सरकारने बैराग्याच्या विरक्त वृत्तीने वागले पाहिजे.”
श्री महाराज इंदूरला असतानाच जीजीबाईंच्या कुटुंबाशी निकट स्नेह असलेले मोडक या नावाचे एक श्रींमत घराणे होते. ते त्या काळी सरकारी अधिकारी वर्गाशी त्यांची परिचय असे. मोडकांना हरी नावाचा तरुण हुषार मुलगा होता, त्याला सर्वजण भैय्यासहेब म्हणत. श्रीवर त्याचे इतके प्रेम बसले की, तो सारखा श्रीं बरोबर राहू लागला. त्यानेच श्रींना आपल्या घरी राहायला बोलावले. एके दिवशी श्री त्याला म्हणाले, “भैय्यासाहेब, तुम्हाला प्रपंच पाहिजे की परमार्थ पाहिजे ?” भैय्यासाहेब म्हणाले, “महाराज मला परमार्थ पाहिजे.” त्यावर श्री म्हणाले, ‘पहा नीट विचार करा, परमार्थ पाहिजे असेल तर प्रसंग आल्यास हाती चौपदरी घ्यावी लागेल, आहे का तयारी ?” त्यावर भैय्यासाहेब म्हणाले, “होय महाराज, आहे माझी तयारी.” त्यावर श्री म्हणाले, “बरे तर, राम तसेच करील.” भैय्यासाहेबांच्या ओळखीचे त्यावेळ्चे इंदूरचे दिवाणसाहेब पळशीकर यांचे श्रींच्याकडे येणेजाणए सुरू झाले. श्रींच्या दर्शनाने व बोलण्याने पळशीकरांचे फार समाधान झाले. पळशीकरांनी ही गोष्ट त्यावेळच्या इंदूरच्या राजाच्या कानावर घातली. तुकोजीराव होळकर ( इंदूरचे राजे ) त्यावेळी अस्वस्थ मनःस्थितीत होते. श्रींची खरी योग्यता समजल्याशिवाय आपण त्यांना मानणार नाही, याकरिता राजाने साध्या पोशाखांत पळशीकरांबरोबर श्रींना भेटायवास जावे; श्रींनी त्यांना ओळखले तर ते ‘खरे साधू ‘ असे तुकोजीराव म्हणाले. त्याप्रमाणे एके दिवशी रात्री १० च्या सुमाराम मोडकांच्या घरी राजा एकटया पळशीकरांना घेऊन गेला. भैय्यासाहेबांनी त्या दोघांना श्रींच्या खोलीत नेल्याबरोबर श्रींनी तुकोजीरावांचा हात धरला व त्यांना आपल्याजवळ बसवले. पळशीकर म्हणाले, “हे माझे एक स्नेही आहेत. त्यांचे सरकारात काही काम आहे. ते होण्याची कृपा व्हावी म्हणून हे आपल्या दर्शनाला आले आहेत.” त्यावर श्री हसून राजाकडे वळून म्हणाले, “सरकारातले काम व्हायला सरकारने उठून दुसरीकडे जाण्याचे कारण नसते. पण सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारचा सरकार जो भगवंत त्याला विसरते, म्हणून त्याच्या चित्ताला अस्वस्थता येते. सरकारने बैराग्याच्या निःस्पृह वृत्तीने वागले पाहिजे. आपले काम होईल. आपल्या अब्रूला धक्का पोचणार नाही, तुम्ही मनापासून नामस्मरण करा, राम तुमचे रक्षण करील, हा माझा आशीर्वाद आहे.” राजाने हे सर्व ऐकल्यावर, आपल्याला श्रींनी ओळखले याबद्दल त्याला खात्री झाली. त्याने उठून श्रींना साष्टांग नमस्कार घातला. आपण कोण्व असे का आलो हे त्याने श्रींना सांगितले. नंतर दोन तास गुप्त संभाषण होऊन मोठया प्रसन्न अंतःकरणाने राजा घरी परतला. तुकोजीराव नामस्मरण करू लागला. श्रींना २/३ वेळा भेटायला आला व श्रींना राजवाडयातच राहायला येण्याची विनंती केली. श्री म्हणाले, “तुम्हाला पाहिजे तेव्हा मी येणार नाही, मला पाहिजे तेव्हा मी वाडयात येईन आणि मला योग्य वाटेल तेव्हा मी निघून जाईन.” राजाने श्रींना तीन गावांची इनाम सनद तयार केली व श्रींना बोलावणे पाठविले. श्री आलेच नाहीत. २/३ दिवसांनी “आपले दर्शन झाल्याशिवाय अन्न घेणार नाही “ असा राजाने निरोप पाठविला. नंतर श्री राजवाडयात आले. राजाने साष्टांग नमस्कार घालून गादीवर बसवले व सनदेचा कागद श्रींच्या हातात ठेवला. श्रींनी थोडा वाचला व लगेच फाडून टाकला. श्री म्हणाले, “माझा परमार्थ असा मिंधा नाही. मला देणारा राम समर्थ आहे.” सर्व लोक चकित होऊन गेले. पुढे काही दिवसांनी श्रींचे व राजाचे तासभर बोलण झाले. राजाची वृत्ती प्रसन्न झाली. श्रींनी राजाचा प्रेमाने निरोप घेतला.

comments powered by Disqus