आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो

१९०५
आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून वागावे म्हणजे आपल्याला कधी कमी पडत नाही
जूनमध्ये श्री काशीस जाण्यास निघाले. बरोबर शंभराच्यावर मंडळी होती. त्यांमध्ये आण्णासाहेब घाणेकर, बापूसाहेब साठे, भाऊसाहेब केतकर व त्यांची पत्नी व मुलगी (सुंदराबाई) स्वयंपाकावर देखरेख ठेवण्यासाठी गंगूबाई, भवानराव, दहिवडीच्या जानकीबाई इ. बरीच मंडळी होती. प्रयागमध्ये येऊन पोचायला श्रावणमास उजाडला. नदीकिनार्‍यापासून फार दूर नसलेल्या एका धर्मशाळेत श्री उतरले. सर्व मंडळींनी तीर्थकृत्ये केली. वेणीदान करण्याचे तेवढे शिल्लक राहिले. त्रिवेणी संगमावर २२ जोडपी श्रींच्या समवेत बोटीत बसली. राहिलेली मंडळी काठावर बसून नावेकडे पहात होती. नाव किनारा सोडून पन्नास, एक यार्ड गेली असेल, तेवढ्यात तिच्या बुडाला भोके पडून पाणी नावेत येऊ लागले. नावाड्याने भोक बुजवण्याची खूप खटपट केली पण पाणी बोटीमध्ये जोराने येऊ लागले. नावेने दिशा सोडली व नदीच्या धारेला लागली. त्यावर श्री हसून म्हणाले, “ आज गंगा आपल्यावर प्रसन्न झाल्यासारखी दिसते. आपणा सर्वांना ती पोटात घेऊन पावन करणार आहे. असे वाटते.”हे श्रींचे शब्द ऐकताच सर्व नावेतील मंडळींना आता आपण बुडणार अशी खात्री झाली व एकदम गोंधळ उडाला. काही स्त्री-पुरुष खूप घाबरले व म्हणाले,”महाराज आम्हाला वाचव.” काहींनी तर श्रींना मिठीच मारली. त्यावर श्री मोठ्याने म्हणाले, “बाळांनो, घाबरु नका, राम आपला पाठीराखा आहे, मोठ्याने आपण त्याचा धावा करु.” असे म्हणून श्रींनी आपली कफनी ज्या भोकातून पाणी येत होते त्यावर ठेवून ती दाबून धरली व “जयजय श्रीराम जयजय श्रीराम” असा घोष करुन टाळ्या वाजवण्यास प्रारंभ केला. इतक्यात किनार्‍यावरील सहकारी नावा सुटून या नावेच्या दिशेने येऊ लागल्या. एक सहकारी नाव या बुडणार्‍या नावेजवळ येऊन थांबली. श्रींनी सर्वांना या सरकारी नावेत घेतले व मग बुडणार्‍या नावेवरील पाय काढला. तीरावर हजारो मंडळी जमा होऊन उत्सुकतेने सर्व प्रकार पाहात होती; व भगवंताच्या नामाचा जयघोष करीत होती. श्रींनी व सर्व मंडळींना घेऊन नाव तीरावर आल्यावर सर्वजण श्रींच्या दर्शनास धावली. कोणी त्यांची आरती केली, नारळ ओवाळून गंगेत टाकले; कोणी फुले उधळली, कोणी त्यांना साष्टांग नमस्कार घातले. श्रींनी प्रयागमधील भिकार्‍यांना खीरपुरीचे जेवण दिले. पुढे वेणीदान समारंभ पार पाडला. श्री प्रयागहून काशीला गेले. तेथे शेकडो स्त्री-पुरुष त्यांना भेटण्यास येऊ लागले. रोज भगवंताच्या भक्तीबद्दल चर्चा चाले. सकाळसंध्याकाळ भजन - प्रवचन गंगादर्शन चालू असे. श्री म्हणाले, “विद्वत्तेचा उपयोग नामाची निष्ठा वाढविण्याकडे करावा. आधी नाम घ्यावे. नामाची चटक लागली म्हणजे इतर भानगडीत पडू नये.” खर्‍या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्ट घडवून आणतो असा माझा अनुभव आहे. आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही. श्रींनी काशीविश्वेश्वराला जिलेबीचा नैवेद्य केला. काशीहून श्री अयोध्येला आले. तेथेच दहिवडीच्या जानकीबाईंची तब्येत बिघडून त्यांनी देह ठेवला. श्रींनी आपल्या मातेच्या सोबत जानकीबाई राहिल्या असे समजून त्यांचा अंत्यसंस्कार केला. श्री अयोध्येहून पुढे नैमिषारण्यात जाऊन आले व मग सर्व मंडळींना घेऊन इंदूरला आले. पूर्वीची सर्व मंडळी त्यांच्या दर्शनास येऊ लागली. तेथे काही दिवस राहून सर्व मंडळी हर्द्यास आली. तेथे श्रींचे बरेच दिवस वास्तव्य झाले. येथेच श्री. न.चिं. केळकर श्रींना भेटले. त्यांचे वडील व मोठे बंधू श्रींचे अनुग्रहीत होते. गुलाबराव महाराजांचीही मंदिरात श्रींशी भेट झाली. श्रींचा मुक्काम हर्द्यास बरेच दिवस झाला.

comments powered by Disqus