गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय

१९०९
‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ असे नाथांनी सांगितले, तेव्हा भाऊसाहेब म्हणाले पोथीचे काम झाले, पोथी पुरे.
या वर्षी गोंदवल्याच्या आसपासच्या गावांत प्लेगने धुमाकूळ घातला. गोंदवल्यास श्रीराममंदिरात सप्ताह चालू असताना एके दिवशी संध्याकाळी श्रींना सपाटून ताप भरला. रात्री गल्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या गाठी येऊन गळा खूप सुजला. गळ्याला गळपट्टा गुंडाळून दुलई पांघरुन श्री पलंगावर पडून होते. दहिवडीच्या मामलेदारास ही बातमी समजल्यावर तो श्रींना भेटायला आला.श्री खोलीतून बाहेर आले. श्रींनी फरगूळ घातला होता. मामलेदाराने श्रींना बघितले, तेव्हा गळ्याला गाठी नव्हत्या, तापही नव्हता. खाणे-पिणे, हवापाण्याच्या गप्पा झाल्यावर मामलेदार निघून गेला. श्री खोलीत आले, गळा पूर्ववत सुजला, शरीर तापाने पुन्हा फणफणले, गळपट्टा व दुलई पांघरुन श्री कण्हू लागले. रामाच्या समोर सप्ताहाचे भजन सुरुच होते. दुसरे दिवशी दुपारी १२ वाजता गणपतराव दामले यांचा पहारा चालू असता. श्रीरामयांच्या डोळ्यातून अश्रू येत असलेले त्यांना स्पष्टपणे दिसले. लगेच झांजा थांबवून गणपतराव श्रींच्या खोलीत गेले व अश्रू येत असलेले त्यांनी श्रींना सांगितले. श्रींनी लगेच सोळ्याची लंगोटी घातली व हातातल्या रुमालाने रामरायाचे गाल हळुवार पुसू लागले. २०/२५ मिनिटे रामाच्या डोळ्यांतून पाणी येत होते.दुसर्‍या दिवशी रामाला दुधाचा अभिषेक केला. केसरीमध्ये ही बातमी छापून आली होती. पुढे काही दिवसांनी श्री रामासमोर भजन करीत होते. भजन रंगात आले. रामाकडे टक लावून श्री बघत असता रामाच्या हातातील बाण उडून श्रींच्या समोर येऊन पडला. बाण कपाळाला लावून श्री म्हणाले, “ चार दिवस स्वारीच्या हात बाण देऊ नका.” इकडे कागवाडला हनुमानाची मूर्ती भंग पावली म्हणून श्रींचे भक्त गणुबुवा यांनी श्रींना कागवाडला हनुमंताची स्थापना करायला बोलावले. श्री कबूल झाले. श्री मिरजेला आले व तेथे काही दिवस राहिले. तेवढ्यात गणुबुबांनी उपोषण सुरु केले व श्रींची वाट पाहू लागले. श्रींना उशीर होत आहे म्हणून त्यांनी विषप्राशन करण्याचे ठरविले. श्रींनी अंताजीपंतांना ताबडतोब कागवाडला धाडून “ श्रीमहाराज आले” असे ओरडून सांगण्यास सांगितले. गणुबुवांनी विषाचा पेला खाली ठेवला व पंतांना मिठी मारली. श्री दुसर्‍या दिवशी कागवाडला आले. शके १८३१ (सन१९०९) सौम्यनाम संवत्सरी आषाद शुद्ध पंचमीला बुधवारी सकाळी श्रींनी मारुतीरायाची स्थापना केली. नंतर गणुबुवांच्या मंदिराभोवती झाडलोट करणार संताबाई महारीण हिने श्रींचे पाय धरले व म्हटले, “मायबाप मला सोडवा, आजपर्यंत पुष्कळ दु:ख भोगले, उरलेला भोग तीर्थप्रसादाने जाईल एवढी कृपा करा माझ्यावर.” श्रींनी तिला आपल्या हाताने तीर्थप्रसाद दिला व लवकर घरी जाण्यास सांगितले. ती घरी गेली. शेजारी पाजारी लोकांचा तिने आनंदाने निरोप घेतला. घरी पोचल्यावर”राम राम राम” असे तीन वेळा म्हणून ती अंथरुणावर कलंडली व प्राण सोडला. श्रींनी तिच्या उत्तरकार्यासाठी पैसे दिले व तिच्या नावाने अन्नदान केले. गणुबुवांच्या राममंदिरासापाशी पाण्याची विहीर अतिशय खारट पाण्याची होती. बुवांनी श्रींना हे सांगितले. लगेच दुपारी एक गोसावी श्रींचा शोध करीत आला व म्हणाला, “काशीची गंगा रामेश्वरला नेत असताना शंकराचा द्दष्टांत झाला व ही गंगा ब्रह्मचैतन्यांना देण्याचा आदेश आला.” श्रींनी बैराग्याचा मोठा आदर केला. “रामाने गंगा अनायासे पाठवून दिली. आपण ती विहिरीत टाकू” असे म्हणून सर्वांच्या अंगावर शिंपडून त्यांनी विहिरीत टाकली. विहिरीतील पाणी सर्वांना गोड वाटले. श्रींनी गोसाव्याला परत काशीस पाठवून दिले. एकदा जेवावयास अवकाश होता म्हणून श्रींनी भाऊसाहेब केतकर यांना नाथ भागवत वाचायला सांगितले. विठोबाच्या मंदिरात चार मंडळी बसली आणि भागवताचे वाचन सुरु झाले. दहा मिनिटे वाचून झाल्यावर” गुरुंची सांगितले, ते ऐकल्याबरोबर भाऊसाहेब म्हणाले, “ पोथीचे काम झले, पोथी आता पुरे.” इतक्यात श्री आले व म्हणाले, “ आजपोथीमध्ये काय निघाले ? भाऊसाहेबांनी सांगितले. “नाथांनी सांगितले की गुरुची आज्ञा पाळावी.” हे ऐकल्यावर आम्ही ती बंद केली. त्यावर श्री म्हणाले, “शाबास ही खरी पोथी, नाहीतर एखाद्याला पोथी वाचायला सांगितली म्हणजे तो पोथीची नुसती पारायणे करीत सुटतो आणि शेवटी आज्ञा केल्याबद्दल गुरुलाच पश्चात्ताप करण्याचा प्रसंग येतो. बहुसंख्य शिष्य असलेच भेटतात.”

comments powered by Disqus