श्रीसोपानदेवांची स्तुति - अभंग ३५३४ ते ३५३९

३५३४.

नमो अगणितगुणा देवाधिदेवा । माझ्या सोपानदेवा नमन तुज ॥१॥

संवत्सर ग्राम कर्‍हातटीं उत्तम । पुण्यपावन नाम सोपान देव ॥२॥

जग तारावया हरिलीला केली । प्रसिध्द ती झाली सोपानदेवा ॥३॥

तुमचा प्रसाद द्यावा माझे हातीं । एका जनार्दनीं विनंती करीतसे ॥४॥

३५३५.

देव आणि भक्त करिती जयजयकार । नाम घोष अंबर गर्जतसे ॥१॥

आनंदे वैष्णव हरिकथा करिती । गाती नाचताती प्रेमछंदे ॥२॥

नारद तुंबर भक्त पुंडलिक । वैष्णव आणिक नाम गाती ॥३॥

सोपान आनंदे समाधि बैसला । एका जनार्दनीं केला जयजयकार ॥४॥

३५३६.

आनंद समाधि संत भक्त देव । करिती उत्साह संवत्सरीं ॥१॥

गरुड हनुमंत भक्त ते मिळाले । जयजयकार केलें सुरवरीं ॥२॥

पुष्पांचा वर्षाव विमानांची दाटी । सोपानदेवा भेटी येती देव ॥३॥

तो सुखसोहळा वर्णावया पार । नोहेचि निर्धार माझी मती ॥४॥

एका जनार्दनीं सोपानाचरणीं । मस्तक ठेवूनि निवांत राहीन ॥५॥

३५३७.

मन माझें लागो सोपानचरणीं । मस्तक हें धणी पायांवरी ॥१॥

सोपान सोपान जपेन हें नाम । अन्य न करीं नेम दुजा कांहीं ॥२॥

वारी पां सांकडें प्रपंच काबाड । घालूनियां आड नामशास्त्र ॥३॥

जीवींच्या जीवना माझिया सोपाना । एका जनार्दनी अभय द्यावें ॥४॥

३५३८.

सोपानदेव नाम पावन परम । आणिक उत्तम जप नाहीं ॥१॥

माझ्या मना तूं करी कां रे लाहो । सोपानदेव ध्यावो ह्रदयामाजीं ॥२॥

ब्रह्मा अवतार नाम हें सोपान । केलेंसे पावन चराचर ॥३॥

एका जनार्दनीं सोपानाच्या पायीं । ठेवितसे डोई काया वाचा ॥४॥

३५३९.

मति माझी लागो सोपनाचरणीं । रात्रंदिवस चिंतनी जप सदा ॥१॥

आणीक न करीं दुजा नेम धर्म । सर्व सोपें वर्मं सोपानदेवा ॥२॥

वेदशास्त्रें भांडती ज्यालागीं कोडें । ते असे उघडे संवत्सर ग्रामीं ॥३॥

प्रत्यक्ष विष्णुमूर्ति श्रीविठ्ठल देव । समाधीचा गौरव करीतसे ॥४॥

करुनी सोहळा समाधीं बैसविला । एका जनार्दनीं राहिला पुढें मागे ॥५॥

comments powered by Disqus