संत बहिणाबाईचे अभंग

आपाजी गोसावी पुण्यांत रहात । जो अति विख्यात राजयोगी ॥ १ ॥

तयाप्रती पत्र मंबाजी पाठवी । तुकोबा गोसावी शूद्रवाणी ॥ २ ॥

कथा करितसे देऊळीं सर्वदा । द्विज त्याच्या पदा लागताती ॥ ३ ॥

रामेश्वर भट अति योगी थोर । तेही नमस्कार त्यांसी करिती ॥ ४ ॥

आम्हांसी अन्याय हाची थोर वाटे । होत असें खोटें वेदवाक्य ॥ ५ ॥

तुम्ही थोर आहां दंड करावया । बांधोनीया तया न्यावें तेथें ॥ ६ ॥

आणीक ही एक स्त्री-पुरुष आहेती । तेही म्हणविती शिष्य त्याचे ॥ ७ ॥

म्हणविती ब्राह्मण आहेती सोनार । कुळकर्णी ही फार मान्य केले ॥ ८ ॥

स्वधर्माचा लोप होतसे देखोन । धाडिलें लिहोन म्हणोनिया ॥ ९ ॥

याचा कीं अपमान न करितां जाण । राज्यही बुडोन जाय तरी ॥ १० ॥

डोंबाळें मांडून स्वधर्म लोपला । पाहिजे रक्षिला स्वामीराजें ॥ ११ ॥

बहिणी म्हणे ऐसें पत्र पाठविलें । चोरोनी लिहिलें घरामाजीं । N/A

comments powered by Disqus