संत बहिणाबाईचे अभंग

कोल्हापुरीं गाय होती जे सांगाते । कांहीं तें दुग्धातें देत होती ॥ १ ॥

गाय ते बांधोनी घातकी घरांत । सोटेही मारीत तयेलागीं ॥ २ ॥

पाहों गाय तंव न दिसे पाहतां । तुकोबासी व्यथा तेचि झाली ॥ ३ ॥

पाहातोसी काय होत असे कष्टी । तीन रात्री खुंटी बांधलीसे ॥ ४ ॥

नाहीं तृण पाणी मारिलेंसें फार । धांवण्यासी थोर नाहीं दिसे ॥ ५ ॥

तुकोबा जागृत झाले तंव पाठ । सुजेली ती नीट होयेची ना ॥ ६ ॥

सोटे अंगावरी दिसती तुकोबा । आठवी विठोबा नानापरी ॥ ७ ॥

देखोनी तयासी कष्ट होती जनां । सांगितलें स्वप्नांतील सर्व ॥ ८ ॥

तुकोबा अंतरीं आठवुनी देवा । धांव रे माधवा सोड म्हणे ॥ ९ ॥

कोणें गाय कोठें बांधिली कळेना । धांव नारायणा गाय रक्षीं ॥ १० ॥

तंव अकस्मात तयाचिये गृहीं । अग्नि लागे तोही महाथोर ॥ ११ ॥

धांवोनिया लोक विझविती अग्नि । गाय ते निमग्नीं बैसलीसे ॥ १२ ॥

जे गाय पहाती आजी तीन दिवस । चांडाळें तियेस बांधिलेंसें ॥ १३ ॥

गाय सोडोनिया आणिली बाहेरी । तंव पाठिवरी मारिलेंसे ॥ १४ ॥

भ्रतार आपुला बोलावुनी पाहे । गाय सांभाळीं हें ब्राह्मणा तूं ॥ १५ ॥

तुकोबा धांवोनी करी प्रदक्षिणा । नमस्कारी गुणा धन्य तुझे ॥ १६ ॥

दाखविलें स्वप्न मज गाय तुवां । न कळेचि धांवा केला माझा ॥ १७ ॥

तुझा माझा एका आत्मा सर्वांगत । ते साक्ष निश्चित आली मज ॥ १८ ॥

ऐसा तुकोबानें केला फार धांवा । तंव माझ्या जीवा दुःख झालें ॥ १९ ॥

मजही तैसेची क्लेश झाले फार । साक्ष हें अंतर विठ्ठलाचें ॥ २० ॥

तुकोबाचे पाठी पाहाताती जन । गायही देखोन थोर कष्टी ॥ २१ ॥

बहिणी म्हणे ऐसें वर्तलें हें जाण । गायीचें निर्वाण हरी जाणे ॥ २२ ॥

comments powered by Disqus