श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्‍ति चारी साधियेल्या ॥ १॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ २॥
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥ ३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवां घरीं ॥ ४॥

चहूं वेदीं जाण षट्‌शास्त्रीं कारण । अठराहीं पुराणें हरीसी गाती ॥ १॥
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥ २॥
एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां दुर्गमी न घालीं मन ॥ ३॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥ ४॥

त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥ १॥
सगुण निर्गुण गुणांचें अगुण । हरिविणें मत व्यर्थ जाय ॥ २॥
अव्यक्‍त निराकार राहीं ज्या आकार । जेथुनी चराचर त्यासी भजें ॥ ३॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनीं पुण्य होय ॥ ४

भावेंवीण भक्‍ति भक्‍तिवीण मुक्‍ति । बळेंवीण शक्‍ति बोलूं नये ॥ १॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥ १॥
सायासें करिसी प्रपञ्च दिननिशीं । हरिसी न भजसी कोण्या गुणे ॥ ३॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥ ४॥

योग याग विधी येणें नोहे सिद्धि । वायांचि उपाधि दंभधर्म ॥ १॥
भावेंवीण देव न कळे निःसंदेह । गुरुवीण अनुभव कैसा कळे ॥ २॥
तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त । गुजेवीण हित कोण सांगे ॥ ३॥
ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात । साधूचे संगती तरुणोपाय ॥ ४॥

साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥ १॥
कापुराची वाती उजळली ज्योती । ठायींच समाप्ती झाली जैसी ॥ २॥
मोक्षरेखें आला भाग्ये विनटला । साधूचा अंकिला हरिभक्‍त ॥ ३॥
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्त्वीं ॥ ४॥

पर्वताप्रमाणें पातक करणें । वज्रलेप होणें अभक्‍तांसी ॥ १॥
नाहीं ज्यांसी भक्‍ति ते पतित अभक्‍त । हरीसी न भजत दैवहत ॥ २॥
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैंचा दयाळ पावे हरी ॥ ३॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥ ४॥

संतांचे संगती मनोमार्गगती । आकळावा श्रीपति येणें पंथें ॥ १॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा राम जप ॥ २॥
एकतत्त्वी नाम साधिती साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥ ३॥
नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥ ४॥
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥ ५॥
ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥ ६॥

विष्णुविणें जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचे ॥ १॥
उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । रामकृष्णीं पैठा कैसा होय ॥ २॥
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । त्या कैंचें कीर्तन घडे नामीं ॥ ३॥
ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचें ॥ ४॥
१०
त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थें भ्रमीं । चित्त नाहीं नामीं तरी ते व्यर्थ ॥ १॥
नामासी विन्मुख तो नर पापिया । हरीविण धांवया न पावे कोणी ॥ २॥
पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक । नामें तिन्ही लोक उद्धरती ॥ ३॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥ ४॥
११
हरिउच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रें ॥ १॥
तृण अग्निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपता हरी ॥ २॥
हरिउच्चारण मंत्र पैं अगाध । पळे भूतबाधा भय याचें ॥ ३॥
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥ ४॥
१२
तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी । वायांची उपाधी करिसी जनां ॥ १॥
भावबळें आकळे येरवी नाकळे । करतळीं आंवळे तैसा हरी ॥ २॥
पारियाचा रवा घेतां भूमीवरी । यत्न परोपरी साधन तैसें ॥ ३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥ ४॥
१३
समाधि हरीची सम सुखेंवीण । न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥ १॥
बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एका केशवराजे सकळ सिद्धि ॥ २॥
ऋद्धि सिद्धि अन्य निधि अवघीच उपाधी । जंव त्या परमानंदी मन नाहीं ॥ ३॥
ज्ञानदेवीं रम्य रमलें समाधान । हरीचें चिंतन सर्वकाळ ॥ ४॥
१४
नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी । कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥ १॥
रामकृष्णीं वाचा अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥ २॥
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तया मोक्ष ॥ ३॥
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निज स्थान ॥ ४॥
१५
एक नाम हरि द्वैतनाम दूरी । अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥ १॥
समबुद्धि घेतां समान श्रीहरी । शमदमां वरी हरि झाला ॥ २॥
सर्वांघटी राम देहादेहीं एक । सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥ ३॥
ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्‍त झालों ॥ ४॥
१६
हरिनाम जपे तो नर दुर्लभ । वाचेसी सुलभ राम कृष्ण ॥ १॥
राम कृष्ण नामीं उन्मनी साधली । तयासी लाधली सकळ सिद्धि ॥ २॥
सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निमाले साधुसंगे ॥ ३॥
ज्ञानदेवीं नाम रामकृष्ण ठसा । तेणें दशदिशा आत्माराम ॥ ४॥
१७
हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥ १॥
तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदे ॥ २॥
मतृपितृभ्रात सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥ ३॥
ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिधलें माझें हातीं ॥ ४॥
१८
हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन । हरिविण सौजन्य नेणे कोणी ॥ १॥
त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळही घडलें तीर्थाटण ॥ २॥
मनोमार्गें गेला तो तेथें मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥ ३॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णी आवडी सर्वकाळ ॥ ४॥
१९
नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापें अनंत कोटी गेलीं त्यांची ॥ १॥
अनंत जन्मांचें तप एक नाम ।सर्व मार्ग सुगम हरिपाठी ॥ २॥
योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठी ॥ ३॥
ज्ञानदेवी यज्ञयाग क्रिया धर्म । हरीविण नेम नाहीं दुजा ॥ ४॥

२०
वेदशास्त्रपुराण श्रुतीचें वचन । एक नारायण सारा जप ॥ १॥
जप तप कर्म हरीविण धर्म । वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥ २॥
हरीपाठी गेले ते निवांताचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥ ३॥
ज्ञानदेवीं मंत्र हरिनामाचें शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेलें ॥ ४॥

२१
काळ वेळ नाम उच्चारितां नाहीं । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥ १॥
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥ २॥
हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या देवाची कोण वानी ॥ ३॥
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजां वैकुंठ मार्ग सोपा ॥ ४॥

२२
नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ । लक्षुमीवल्लभ तयां जवळी ॥ १॥
नारायण हरी नारायण हरी । भुक्‍ति मुक्‍ति चारी घरीं त्यांच्या ॥ २॥
हरिविण जन्म नर्कचि पैं जाणा । यमाचा पाहुणा प्राणी होय ॥ ३॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तिसी चाड । गगनाहूनि वाड नाम आहे ॥ ४॥

२३
सात पांच तीन दशकांचा मेळा । एक तत्त्वी कळा दावी हरी ॥ १॥
तैसें नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती ॥ २॥
अजपा जपणें उलट प्राणाचा । येथेंही मनाचा निर्धार असे ॥ ३॥
ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥ ४॥

२४
जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥ १॥
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥ २॥
जाति वित्त गोत्र कुळ शीळ मात । भजकां त्वरित भावनायुक्‍त ॥ ३॥
ज्ञानदेव ध्यानीं रामकृष्ण मनीं । वैकुंठभुवनीं घर केलें ॥ ४॥

२५
जाणीव नेणीव भगवंतीं नाही । हरिउच्चारणी पाही मोक्ष सदा ॥ १॥
नारायण हरी उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥ २॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । तें जीवजंतूंसीं केवीं कळे ॥ ३॥
ज्ञानदेव फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥ ४॥

२६
एक तत्त्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करुणा येईल तुझी ॥ १॥
तें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधीं ॥ २॥
नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणि पंथा जाशी झणी ॥ ३॥
ज्ञानदेव नाम जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥ ४॥

२७
सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥ १॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरीविण ॥ २॥
नाममंत्र जप कोटी जाईल पाप । रामकृष्णीं संकल्प धरूनी राहे ॥ ३॥
निजवृत्ति हे काढी माया तोडी । इंद्रियांसवडी लपूं नको ॥ ४॥
तीर्थीं व्रतीं भाव धरीं रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करीं ॥ ५॥

२८
अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस । रचिले विश्वासें ज्ञानदेवें ॥ १॥
नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं । होय अधिकारी सर्वथा तो ॥ २॥
असावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मन । उल्हासें करून स्मरण जीवी ॥ ३॥
अंतकाळीं तैसा संकटाचें वेळीं । हरि तया सांभाळी अंतर्बाह्य ॥ ४॥
संतसज्जनानीं घेतली प्रचीती । आळशी मंदमती केवीं तरें ॥ ५॥
श्रीगुरु निवृत्ति वचन प्रेमळ । तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥ ६॥

२९
कोणाचें हें घर हा देह कोणाचा । आत्माराम त्याचा तोचि जाणे ॥ १॥
मी तूं हा विचार विवेक शोधावा । गोविंदा माधवा याच देहीं ॥ २॥
देहीं ध्याता ध्यान त्रिपुटीवेगळा । सहस्र दळीं उगवला सूर्य जैसा ॥ ३॥
ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती । या नावें रूपें तुम्ही जाणा ॥ ४॥

comments powered by Disqus