श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही.

१८५०
माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही,
माझ्या दारी अत्रछत्र घालीन.
आजोबांचा सहवास रात्रंदिवस असल्यामुळे ते करतील तसे श्रीमहाराज करीत. या वयापासून ते आजोबांची सेवासुद्धा करू लागले होते. आजोबा गीता म्हणू लागले, की श्री महाराज त्यांच्याबरोबर म्हणू लागत. आजोबा जप करू लागले, की श्रीही आसन घालून डोळे झाकून स्वस्थ बसत. रात्रीचे भजन झाल्याशिवाय श्री कधी निजले नाहीत. भजनामध्ये आजोबा नाचायला लागले की आपणही नाचू लागत. नाचताना इतके तल्लीन होऊन जात की इतर मंडळी कौतुकाने बघत रहात. श्रींची खाण्याविषयी कधीही तक्रार नसे, त्यांना पुष्कळ मित्र होते. गावातील सर्व मुले त्यांची मित्र होती. सर्वांना ते हवेहवेसे वाटत. त्यांचा आवाज गोड व बोलणे प्रेमळ असे, मुले त्यांनी सांगितलेले करीत असत. आपल्या नातवाची परीक्षा घ्यावी असे पंतांनी श्रींना हाक मारली व विचारले, "बाळ गणू, तुला हंडा भरून मोहरा दिल्या तर तू काय करशील ?" श्रींनी ताडूदिशी उत्तर दिले. ’आंधळे, पांगळे, रोगी, गरीब आणि भिकारी यांना मी सगळ्या वाटून टाकीन." यावर आजोबा पुन्हा म्हणाले, "तुला जर राजा केले तर तू काय करशील ?" श्रींनी लगेच उत्तर दिले, "माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. माझ्या दारी अत्रछत्र घालीन." ही उत्तरे ऐकून पंतांच्या डोळ्यांत पाणी आले, थोडया वेळाने ते रावजीला म्हणाले, "रावजी, ही खरी अमृतवल्ली आहे, श्री पांडुरंगाच्या कृपेने ती आपल्याला लाभली आहे. हा कुणीतरी मोठा योगभ्रष्ट पुरुष असावा असे मला वाटते." श्रींची पाचव्या वर्षी मुंज झाली. कुलगुरू सखारामभट पाठक रोज श्रींना ब्रह्यकर्म शिकवण्यास येऊ लागले. २/३ महिन्यांमध्ये संध्या, पूजा, वैश्र्वदेव, पवमान, रूद्र वगैरे सर्व भराभर शिकून झाले. एक दिवस भटजी म्हणाले, "झाले ! तुम्हाला आता ब्रह्यकर्म सर्व आले." श्री म्हणाले, याच्यापुढे काय शिकायचे असते ?" त्यावर भटजी म्हणाले "याच्यानंतर चार वेद, सहा शास्त्र वगैरे शिकायचे असते. "श्री म्हणाले, "मग मला तुम्ही उद्या वेद आणि शास्त्रे शिकवा." त्यावर भटजी म्हणाले, अरे, एकेका वेदाला वीस-वीस वर्षी आणि एकेका शास्त्राला बारा-बारा वर्षें अभ्यास करावा लागतो." हे ऐकून श्री झटूदिशी बोलले "इतका वेळ कुणाला आहे ?" श्रींची बुद्धी फार तीव्र होती, त्यामुळे जो विषय गुरूने त्यास समजावून द्यावा तो ऐकता ऐकताच त्याला इतका समजे की, यास पूर्वीच माहीत असलेला विषय मी शिकविला की काय ? अशी गुरूलाच भ्रांति पडावी. गुरूजी म्हणायचे आजपर्यंत आमचे वय इतके झाले तरी चार वेद नव्हे, एका वेदाची किंवा एका शास्त्राची आम्हाला माहिती असणे मुष्कील, तेथे हा मुलगा सहा शोस्त्रे आणि ती एका दिवसात शिकवा म्हणतो हे पाहून आमचे मन चकित होते, असा मुलगा आम्ही कधी स्वप्नीही पाहिला नाही, हा केवळ महापुरूष निघेल. असे म्हणून गुरूजींनी त्याचा गौख केला. पंतांनाही या गोष्टीची सत्यता उत्तरेत्तर अधिक पटू लागली.