श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस.

१८५३-५४
मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली
मात्र खरीच वाहिली पाहिजेस.
गणूला आता आठवे वर्ष लागले होते. शाळा बंद झाल्याने घरी श्रींना चैन पडेना. मुलांना घेऊन ते कुणाच्या मळ्यातला ऊस तोडत, कुणाच्या झाडावरील डाळिंबे फस्त करीत, कुणाच्या शेळ्या पळवीत, कुणाच्या भाजीची नासाडी करीत. अशा अनेक तक्रारी संध्याकाळी पंतांच्याकडे यायच्या. पंतांनी श्रींना प्रेमाने जवळ घेऊन सांगावे, "बाळ, आपल्या कुळाचे नांव राहील असे वागावे " त्यावर श्री त्यांना म्हणत "आजोबा, तुम्ही स्वस्थ रहा, माझ्यामुळे कुळाला कधीही कमीपणा येणार नाही." रोज येणा‍र्‍या तक्रारी ऐकून गीतामाय एकदा कंटाळ्ली आणि रात्री श्रींना एकटयाला जवळ घेऊन म्हणाली "गणु, तू असा का रे वागतोस ? तू पुष्कळ विद्या शीक आणि आपल्या घरामध्ये चालत आलेले कुळकर्णीपण नीट सांभाळ, एवढे माझे ऐक. श्री तेवढयाच प्रेमळपणाने आईला म्हणाले, "आई, मी फक्त तुलाच सांगतो; मला सगळे काही येते, तू अगदी काळजी करू नकोस. आपली वृत्ती आणि आपले वतन मी अगदी नीट सांभाळीन." श्रींच्या बोलण्यामध्ये लहानपणापासून अशी खुबी होती की, ते ऐकणा‍र्‍याचा त्यांच्यावर, लगेच विश्र्वास बसे. म्हणून त्यांचे आश्र्वासन ऐकून आईच्या मनाचे पूर्ण समाधान होई व आई लगेच त्यांना पोटाशी धरून त्यांच्या तोंडावरून हात फिरवीत असे शाळा सुटून बरेच दिवस झाले होते, तरी ते घरी स्वस्थ बसत नसत. त्यांचे बालमित्र नेहमी त्यांच्याबरोबर असून रोज काही ना काही खोडया चालायच्या. श्रींना गुंतवून ठेवण्यासाठी ती श्रींना म्हणाली, "हे बघ गणू, तू घरी स्वस्थ बसत नाहीस, यापुढे तू आपल्या गावी रानात चरायला नेत जा." आईने घरच्या गवळ्याकडून गायी काढल्या व श्रींच्या स्वाधीन केला. गावाच्या बाहेर पोचल्यावर गायी-वासरांना, गुराख्यांच्या पोरांबरोबर चरायला मोकळे सोडून सवंगडयांबरोबर खेळ मांडून खेळायला त्यांनी सुरूवात केली. दगडाची छोटीशी भिंत उभी करून तिच्यापुढे तीन दगड मांडायचे, मधला जरा मोठा असायचा आणि त्यांच्या समोर एक दगड ठेवायचा. ते तीन दगड म्हणजे लक्ष्मण, राम व सीता व पुढील दगड म्हणेज मारूतीचा. मुलांच्या. मुलांच्या हातातील काठी म्हणजे वीणा. श्रींची गोरी, गुटगुटीत मनोहर मूर्ती मध्ये असून त्यांच्या भोवती सर्व गोपाळ उभे रहात. मग जोराने भजन म्हणत नाचायला सुरूवात व्हायची. थोडा वेळ भजन म्हणून झाले की, श्री त्या मुलांना भक्तांच्या गोड कथा अगदी प्रेमळपणे सांगत. इकडे, गायी-वासरे चारा खात खात वाटेल तिकडे भटकत, सैरावैरा पळत, शेतांची व मळ्यांची नासधूस करीत. श्री घरी येण्याच्या आतच, "आज आमचा ऊस मोडला, आमच्या मिरच्या तुडवल्या, आमचा जोंधळा खाल्ला अशा तक्रारी घरी येत. गीतामाई म्हणायच्या, "गणू मी आतां कंटाळले बाबा ! रोज लोकांना मी सांगू तरी काय ?" श्री हसू लागल्यावर तिचा राग अनावर होऊन ती श्रींना मारायला धावली व अडखळून पडली. श्रींच्या डोळ्याला पाणी आले. गीतामाईचा राग नाहीसा होऊन ती म्हणाली, "बाळ तू चांगला वागलास तर मी देवाला रामनामाची लाखोली वाहीन." त्यावर श्री म्हणाले "तू पहाच, मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखीली मात्र खरीच वाहिली पाहिजेस." यानंतर श्रींच्या वृत्तीत फार फरक पडू लागला.