श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही.

१८५५
सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही.
श्रींच्या वृत्तीतील फरक आता जाणवू लागला. रोजपहटे नदीवर स्नानाला गेले की दोन-दोन तास तेथेच ध्यानस्थ बसत. एकादशीच्या दिवशी देवाची पूजा करून डोळे झाकून बसले म्हणजे तासचे तास निघून जात. आईन हलवून उठवावे लागे. श्रींच्या घरापासून थोडयाच अंतरावर असलेल्या मारूती मंदिरात अनेक बौरागी, गोसावी, वारकरी, यत्रोकरू वस्तीला येत. हे लोक आले म्हणजे श्री मुद्दाम तेथे जाऊन त्यांची गाठ घेत व त्यांना भगवंताविषयी अनेक प्रश्र विचारीत. मारूती
मंदिरात उतरलेल्या एका वृद्ध रामदासीला श्रींनी विचारले, "तुम्ही हा वेष कशासाठी घेतला ?" त्यावर रामदासी म्हणाले " देवाचे दर्शन व्हावे म्हणून " मग आपल्याला दर्शन झाले कां ?" असे श्रींनी विचारले, त्यावर रामदासी म्हणाले, "नाही रे बाळ, सद्‍गुरुवाचून जीवाची तळमळ शांत होत नाही, कुणी तरी संत भेटावा म्हणून मी असा गावोगाव फिरत आहे. श्रींची विचारचक्रे चालू झाली. त्यांना घरी मुळीच चैन पडेना. एके दिवशी पहाटे ३- ३॥ ला श्री आपला चुलत भाऊ दामोदर व विश्र्वासू मित्र वामन म्हासुर्णेकर यांच्याबरोबर सद्‍गुरुशोधार्थ घराबाहेर पडले. मजल दरमजल करीत कोल्हापूरला आले. अंबाबाईचे दर्शन घेऊन जवळ्च्या धर्मशाळेत उतरले. श्रींच्या अंगावर सदरा, लंगोटी व कानात भिकबाळी होती. धर्मशाळेत १ / २ दिवस राहिल्यावर दामू कंटाळला व घरी जातो म्हणून श्रींच्या परवानगीने गोंदवल्यास परत गेला. कोल्हापूरहून पुढे जावे या इच्छेने ते दोघे श्रीअंबाबाईच्या देवळातून बाहेर पडले. एक भिकारी काहीतरी द्या म्हणून श्रींच्या सारखा मागे लागला. शेवटी कानातील भिकबाळी खसकन ओढून त्याच्या हातावर ठेवून त्याला वाटेला लावला. श्रीं कानाचे रक्त पुशीत वामनबरोबर चालले होते. तेवढयात एक घोडयाची गाडी त्यांच्यापुढे थांबली. त्यात बसलेल्या गृहस्थाने श्रींची चौकशी केली. वामनने त्यांना सर्व हकिकत सांगितली. त्या गृहस्थाला व त्याच्या पत्नीला श्रींचे फार कौतुक वाटले. त्या दोघांना गाडीत बसवून देवीच्या दर्शनानंतर त्यांनी घरी नेले. श्रींना दत्तक घ्यावयाचे आपल्या मनाशी ठरवून कुटुंबाला तसे सांगून ठेवले. श्रींना सर्व राजोपचार चालू झाले. बिचारा वामन कंटाळून श्रींना विचारून गोंदवल्यास जाण्यास निघाला. तो परत येत असता कोल्हापूरच्या जवळच रावजी ( श्रींचे वडील ) त्याला भेटले. रावजींना त्याने श्री कुठे आहेत ते सांगितले आणि आपण पुढे गेला. रावजी शोध करीत करीत सिद्धेश्वर नावाच्या राजगुरूंच्या घरी आले. ( ते पन्नास एक वर्षांचे सात्त्विक पुरुष असून त्यांना मूलबाळ नव्हते. म्हणून ते दत्तक घेण्याचा विचार करून एखाद्या चांगल्या कुळातल्या लहान मुलाच्या शोधात होते. ) तेथे श्रींची गाठ पडल्यावर श्रींनी लगेच रावजींना साष्टांग नमस्कार घातला. रावजींनी मुलाला पोटाशी धरले. राजगुरूंनी आणि त्यांच्या बायकोने रावजींची अनेक प्रकारे विनवणी केली, परंतु ते ऐकेनात. तेव्हा श्रींना परत नेण्यास परवानगी मिळाली. रावजी श्रींना घेऊन गोंदवल्यास परत आले. श्रींचे नित्याचे जीवन गोंदवल्यास पुन्हा सुरु झाले.