श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


"तुझे काम माझ्याकडे नाही."

१८५७
"तुझे काम माझ्याकडे नाही."
लग्नाचा परिणाम उलटच होऊन श्रींचा जास्तच वेळ ध्यानामध्ये जाऊ लागला. श्रींना आता अगदी मोकळीक मिळाली. त्यांच्या मनामध्ये चाललेली खळबळ ओळखण्याची किंवा समजून घेण्याची पात्रता जवळपास कुणापाशीच नसल्याने त्यांना घरी चैन पडेना. म्हणून एक दिवस संधी साधून गुरुशोधार्थ त्यांनी पुन्हा प्रयाण केले. यावेळी अगोदर त्यांनी आपल्या आईला सूचना देऊन ठेवली होती म्हणून ते गेल्यावर आईबापांनी शोधाशोध केली नाही. पांडुरंगावर भार टाकून ते स्वस्थ राहिले. श्री घर सोडून निघाले तेव्हा त्यांच्या अंगावर लंगोटीशिवाय दुसरे वस्त्र नव्हते. बारा वर्षांचे वय, चांगले शरीर, चलाख बुद्धी आणि तोंडी अखंड रामनाम असलेला हा मुलगा सद्‍गुरूंच्या शोधासाठी घरदार व कुटूंब सोडून फिरत आहे, हे बघून प्रत्येक साधनी माणसाला अचंबा वाटे. पोटापुरत्या माधुकरीशिवाय कोणापाशी काही न मागावे आणि जेथे कोणी संत, सत्पुरुष आहेत तेथे दर्शनाला जावे असा क्रम श्रींनी आरंभला. कोण मनुष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे श्रींना त्या मनुष्याला बघितल्यावर कळत असे. पुष्कळ वेळा असे होई की, ज्या पुरूषाच्या दर्शनाला श्री जात. त्याने आपण होऊन स्वतःजवळ असलेली विद्या त्यांना द्यावी. पण तेवढयाने समाधान न होऊन श्री पुढे जात. अशा रीतीने परमार्थाच्या मार्गामध्ये असणारे नाना प्रकारचे साधनी लोक श्रींनी पाहिले. कृष्णा व वारणा यांच्या संगमाजवळ हरिपूर नावाच्या क्षेत्री राधाबाई नावाच्या अत्यंत सात्त्विक, भोळ्या आणि प्रेमळ साध्वी रहात असत. त्या भजन करू लागल्या म्हणजे रामाची मूर्ती डोलत असे. त्यांच्या घरी फार अन्नदान चाले. श्री त्यांच्याकडे दोन दिवस राहिले. तिने श्रींना मिरजेचे अण्णाबुवा यांच्याकडे जाण्यास सांगितले. हे सिद्ध पुरुष होते. सामान्य लोकांना ते वेडयाप्रमाणे वाटत. श्री त्यांच्याकडे गेले तेव्हा ते उकिरडयावर बसलेले होते. श्री त्यांच्याकडे गेले तेव्हा ते उठले व ’परमात्मा तुझे कल्याण करील ’ असे बोलून त्यांनी ’देव मामलेदार ’ यांच्याकडे जाण्यास सुचविले. त्यांनी सोळाव्या वर्षापासून अठ्ठावन्न वर्षांपर्यंत सरकारची नोकरी केली, त्यांचे नाव यशवंत महादेव भोसेकर. यांच्या साधुत्वामुळे लोक त्यांना देव मामलेदार म्हणत. यांच्या घरी कुणालाही मज्जाव नसे. कुणीही काही खाल्ल्यावाचून जात नसे. १८८७ साली नाशिक येथे ते वारले. श्रींची व त्यांची भेट सटाणे गावी झाली. श्री त्यांच्या घरी बरेच दिवस राहिले, त्या नवराबायकोंचे श्रींवर पुत्रवत प्रेम जडले. ते श्रींना म्हणाले, "तुला अनुग्रह देण्याचा माझा अधिकार नाही, तू आणखी कोणाकडे जा " तेथून ते अक्कलकोटच्या स्वामींकडे गेले. त्यावेळी स्वामी अध्यात्मविद्येच्या शिखरावर पोचलेले होते. श्री त्यांच्याकडे गेले तेव्हा स्वामींच्या डोळ्यांतून अश्रू आले. श्रींनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला, त्यावेळी श्रींना त्यांनी जवळ घेऊन ’माझा बाळ ’ असे म्हणून पाठीवरून हात फिरवला. आणि ’ तुझे काम माझ्याकडे नाही ’ असे म्हणून डाळिंबांच्या दाण्याने भरलेले ताट श्रींना दिले. श्रींनी थोडा प्रसाद आपण घेऊन उरलेले दाणे वाटून टाकले.