श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


"तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक "

१८५८
श्रीरामकृष्णांनी त्यांना पोटाशी धरले आणि "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " असे बोलले.
अक्कलकोटहून श्री निघाले ते हुमणाबादला श्रीमाणिकप्रभूंच्या दर्शनासाठी गेले. इ. स. १८२१ मध्ये जन्मलेले श्री माणिकप्रभू जन्मापासूनच सिद्ध पुरुष होते. साक्षातू दत्ताचा त्यांना अनुग्रह होता. यांच्या कुलात नृसिंहाची उपासना होती. अंतर्यामी अगदी विरक्त पण राजाला शोभेल अशा थाटात ते रहात. घरात खूप अत्रदान होई. भजन फारच प्रेमळ असे. हिंदु मुसलमान दोघांनाही त्यांनी भगवंताच्या मार्गाला लावले. गावाच्या बाहेर जाऊन ते श्रींची वाट पहात जेवण्यासाठी  थांबले. ’आजमाझा भाऊ येणार आहे असे मंडळींना त्यांनी सांगितले.’ श्रींना पाहिल्याबरोबर दोघांनाही भरून आले ते श्रींना घरी घेऊन आले. थोडे दिवस ठेवून घेतले. ’योग्य वेळी तुझे काम होईल ’ असे सांगून श्रींना त्यांनी निरोप दिला. तेथून श्री अबूच्या पहाडाकडे जाण्यास निघाले. ’दाट जंगलामुळे सामान्य माणसास तेथे जाणे अशक्य असे. श्री तसेच जंगलात शिरले. दोन दिवस हिंडल्यावर तेथे एक गुहा दिसली. श्री निर्भयपणे आत शिरले, थोडेसे आत गेल्यावर एका दगडाच्या चबुत‍‍र्‍यावर एक योगिराजद्दष्टीस पडले. श्रींनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला व समोर उभे राहिले. योगीराजांनी डोळे उघडून श्रींना विचारले, "बाळ, तू एवढा लहान असून येथे कसा आलास ?" त्यावर ’आपल्या दर्शनासाठी आलो " असे श्रींनी सांगितले. तेथे काही दिवस राहून श्री योग शिकले. त्यांच्या जवळची विद्या संपल्यावर श्री काशीकडे रवाना झाले. काशीला तेलंगस्वामी नावाच्या थोर सत्‍पुरुषांची गाठ पडली. आईच्या मृत्युनंतर ते प्रपंचातून बाजुला होऊन योगाभ्यासाने पूर्ण पदाला पोचले होते. काशीमध्ये ते अवधूत वृत्तीने राहात. त्यांनी श्रींनी आपल्यापाशी काही दिवस ठेवून घेतले. श्री मोठयाने नामस्मरण करू लागले की, ते कावरेबावरे होऊन त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहत असे. स्वामींनी श्रींना आशीर्वाद दिला व म्हणाले, "तुझे काम लवकर होईल आणि ते तुझ्या मनासारखे होईल " काशीहून श्री निघाले आणि अयोध्येला आले. तेथे त्यांना कळले की, नैमिषारण्यात अनेक योगी तपश्चर्या करीत बसलेले आहेत. श्री लगेच तिकडे जाण्यास निघाले. दिवसा बारा वाजता रात्रीसारखा अंधार असायचा, वाटेत मोठे अजगर आडवे पडलेले असत. दोन फडे असलेले नाग श्रींना तेथे दिसले श्री चालले असता बाजूला सरून ते त्यांना वाट करून देत. आहारासाठी तेथे कंद मिळायचे. काही कंदांनी आठ दिवस भूक लागत नसे. तर काही कंदांनी एकवीस दिवस भूक लागत नाही. अरण्यात रानगाई पुष्कळ. त्यांचे दूध बर्फावर सांडून गोठते, त्याच्या वडया बनतात. नैमिषारण्यात श्रींना अधिकारी, तपस्वी पहायला मिळाले. एका मोठया गुहेत श्री शिरले तेव्हा धुनी पेटली होती, तिच्याभोवती सात आसने मांडली होती. सहा आसनांवर तपस्वी धानस्थ बसले होते. आळंदीचे श्रीनृसिंहसरस्वती स्वामी हे महापुरुष या सहा जणांपैकी एक होते. एका योग्याने श्रींना सातव्या आसनावर बसण्यास सांगितले. श्री ध्यानात तल्लीन झाले. तेथे काही दिवस राहून फिरत, फिरत
 श्री बंगालमध्ये आले. तेथे एक मोठा भक्त आढळला. त्याचे अंतःकरण इतके मृदू होते, की भगवंताचे नाम कानावर आले की, तो कावराबावरा होई. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागत. श्री एक आठवडा त्यांच्या संगतीला राहिले. मग श्रीरामकृष्णांना भेटण्यासाठी दक्षिणेश्वरला गेले. श्रीरामकृष्ण तेथे नसून ते कलकत्त्याला गेल्याचे समजले. श्रीही कलकत्त्यास आले. रस्त्यातून चालताना समोरून श्रीरामकृष्ण येत आहेत असे पाहून श्रींनी रस्त्यातच त्यांना साष्टांग नमस्कार घातला. श्रीरामकृष्णांनी त्यांना उचलून पोटाशी धरले आणि ’तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " असे बोलले. पुढे कलकत्त्याहून फिरत फिरत दक्षिण हैद्राबादकडे आले.