श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


"तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ."

१८६७
"तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला
आम्ही तुला घेऊन जाऊ."
श्री दुसरे दिवशी खातवळहून निघून डांबेवाडीस आपल्या चुलत बहिणीच्या घरी जाऊन दाराशीच ’जय जय रघुवीर समर्थ ’ अशी गर्गना केली व भीमाबाई, लवकर भिक्षा घाल" असे मोठयाने म्हणाले. भीमाबाई, बाहेर आली, पण तिने ओळखले नाही. तिच्याकडे पाहात श्री म्हणाले, "भीमाताई, तू तर सासरी अगदी तल्लीन होऊन गेलीस. माहेरच्या माणसांनासुद्धा तू विसरून गेलीस ना ?" श्रींचे हे शब्द कानावर पडल्यावर "गणू " म्हणून तिने हंबरडा फोडला व रडू लागली. आणि म्हणाली, "अरे गणू, तू एकाएकी निघून गेल्याने सर्वांना अतिशय दुःख झाले, तू बैरागी बनून साधलेस तरी काय ?" श्री तिला म्हणाले, "हे बघ, मी आता जातो, मी येथे येऊन गेलो ते कुणाला सांगू नकोस. मी पुन्हा लवकर परत येईन." असे म्हणून श्री तेथून लगेच निघून गेले. पुढे समर्थांच्या दर्शनाला सज्जनगडावर गेले. तेथे त्रिरात्र राहून पुढे रामेश्र्वराच्या दर्शनाकरिता निघाले. वाटेत तिरूपतीला व्यंकोबाचे दर्शन घेतले; पुढे खाली आल्यावर रस्त्याच्या कडेला एक रोगी भिकारी पडलेला त्यांना आढळला. त्याच्या जवळ जाऊन श्रींनी त्याला उठवून बसवले. त्याला खायला-प्यायला घातल्यावर "तुझी अशी अवस्था का झाली ?" म्हणून विचारले, त्यावर त्याने आपली हकिकत सांगितली. "तेलंगी मातॄभाषा असलेल्या इनामदाराचा मी एकुलता एक मुलगा. लाडात वाढल्यामुळे मला अनेक वाईट सवयी लागल्या. व्यसनांची भर पडली. मी ३० वर्षांचा असताना आई वारली. वडिलांनी दुसरी लग्न केले. नवीन आई माझा अत्यंत द्वेष करी व मी घराबाहेर पडावे असा तिचा सारखा प्रयत्न सुरू झाला. दुर्दैवाने मला याच वेळी उपदंश झाला. माझे अंग सगळीकडे फुटले. मी फार आजारी पडलो. उठण्याची शक्तीही राहिली नाही. माझ्या नव्या आईने माझ्या वृद्ध गडयाला वश करून घेऊन मला अन्नात विष कालवून मारण्याचा कट रचला. लहानपणापासून श्रीरामेश्र्वरावर माझे प्रेम आहे, तर अंतकाळी श्रीरामेश्र्वराच्या चरणावर जाऊन पडावे असा विचार मनात आला व आपल्या वृद्ध गडयाला "रामेश्र्वराच्या वाटेवर मला नेऊन ठेव " असे सांगितले. त्याप्रमाणे मध्यरात्री गडयाने मला पाठीवर घेतले व रस्त्यावर आणून ठेवले." तेव्हापासून मी अखंड नामस्मरण करतो व यद्दच्छेने जे मिळेल त्यावर जगतो व रामेश्र्वराची वाट जितकी जाववेल तेवढी चालतो. या अवस्थेतही मी आनंदात आहे " त्याची ही हकिकत ऐकून श्रींना ब बरोबरच्या बैराग्यांना त्याचे कौतुक वाटले. श्रींनी त्याला सांगितले, "तू नामस्मरण करीत रहा रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." त्याप्रमाणे श्रींनी एक झोळी तयार केली. एका मोठया बांबूला अडकवली व पाळीपाळीने त्या सर्वांनी मजल दरमजल करीत रामेश्र्वराला नेऊन मंदिरात त्याला रामेश्र्वराचे दर्शन घडवले. त्याला इतका आनंद झाला की, तेलगू भाषेत एक सुंदर पद त्याच्या तोंडून बाहेर पडले व तेथेच त्याचा अंत झाला. श्रींनी त्याला वाळवंटावर आपल्या हाताने अग्नी दिला. रामेश्र्वराहून श्री पुन्हा थेट काशीला गेले, तेथे श्रीवरदराजाचे दर्शन घेतले. येताना एका चांदीच्या मोठया व्यापार्‍याची पत्नि वरदराजाची युक्ती साधली होती. इतकेच नव्हे तर तिला दिव्या द्दष्टीही प्राप्त झाली होती. सकाळी १० वाजता बाई घरात बसली असताना एकाएकी आपल्या गडयाला हाक मारून सांगितले बाहेर रस्त्यावर एक तरूण बैरागी चालला आहे त्याला नमस्कार करून घरी घेऊन ये." त्याप्रमाणे त्या गडयाने श्रींना पाहिले व आपल्या मालकिणीने बोलावले आहे असे सांगून त्यांना घरी आणले. श्रींना पाहिल्याबरोबर तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले. श्री तिच्या पाया पडले, तिने आपल्या पतीलाही लगेच बोलावून घेतले. श्रींना पाहून त्यालाही समाधान वाटले. श्रींना पाहून त्या बाईला मातृप्रेमाचा जोरात उमाळा येई व तिच्या स्तनातून दूध वाहू लागले. श्री तेथे तीन दिवस राहिले व नंतर येहळेगावला जायला निघाले.