श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


"ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील."

१८७९
"ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले,
त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील."
श्री फिरत फिरत उज्जैनला पोचले. श्री तेथे आले आहेत असे कळताच सर्व पूर्वपरिचित मंडळी श्री जेथे उतरले होते तेथे जमा झाली. नामस्मरण, भजन, कीर्तन, वेदान्तश्रवण व अन्नदान इत्यादी सर्व धुमधडाक्याने सुरू झाले. श्रींवर सर्वांचे प्रेम असल्याने रोजकोणी ना कोणी त्यांना आपल्या घरी बोलावीत असे. श्रींचे तेथील दिवस भराभर जात होते. श्री एके ठिकाणी जेवावयास गेले असता श्रीसमर्थांचे प्रेम असणार एक मोठा सरकारी अधिकारी श्रींना भेटला. श्रींची परीक्षा घेऊनच श्रींना आपल्या घरी बोलवावे असे त्याने ठरवले. थोडया दिवसांनी त्यांचा दहाबारा वर्षांचा मुलगा विषमज्वराने आजारी पडला. औषधपाणी चालू होते. नवव्या दिवशी मुलाची अवस्था फार कठीण झाली. मुलाचा बाप श्रींकडे आला व त्यांना म्हणाला, "आपण उद्या आपल्या सर्व मंडळींसह माझ्याकडे प्रसादाला यावे." श्री म्हणाले, "रावसाहेब, आपण आपल्या शिष्यांपैकी कोणी आमंत्रण केले तर त्याच्याकडे जाता, पण मी बाहेरचा असल्याने आपण माझा अव्हेर करता असे दिसते, हे माझे दुर्दैव आहे." त्यावर श्री एकदम म्हणाले, "छे छे ! रावसाहेब आपण हे काय बोलता ! कष्टी होऊ नका, मी उद्या सर्व मंडळींसह आपल्याकडे येईन." रावसाहेब श्रींना बोलावून घरी आले, त्यावेळी मुलाची नाडी सुटलेली होती व पहाटे तीन वाजता मुलगा गेला. मुलाचे प्रेत तसेच ठेवून त्या गृहस्थाने दुसर्‍या दिवशी भोजनाची सर्व तयारी केली. सकाळी अकरा / बारा वाजता श्री आपली मंडळी घेऊन त्याच्या घरी आले. त्याने श्रींचे मोठे आदरातिथ्य केले. सर्व मंडळी नंतर पानावर येऊन बसली. सर्व पदार्थ वाढले. श्री आपल्या पानावर बसले आणि आता संकल्प सोडायचा, तेवढयात त्या अधिकार्‍याची बायको मुलाचे प्रेत घेऊन, पंक्तीमध्ये आलीव प्रेत श्रींच्यासमोर ठेवून रडत म्हणाली, "महाराज, हा माझा बाळ काल रात्री आम्हाला सोडून गेला, त्याला सोडून तुम्ही कसे जेवता ?" हा सर्व प्रकार पाहून पानावर बसलेली मंडळी गारठून गेली, सबंध वातावरण एकदम बदलून गेले. आता श्री काय करतात इकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. श्रींनी यक्तिंचितही अस्वस्थता न दाखवता त्या मुलाला आपल्या मांडीवर घेतले व त्याच्या छातीवर हात ठेवून आईला म्हणाले, "माय, याच्या अंगात अजून उष्णता आहे, तो गेला नाही, थोडा धीर धरा, त्याला मात्रा चाटवा म्हणजे तो सावध होईल." लगेच मात्रा उगाळून आणली व श्रींनी स्वतः ती मुलाला चाटवली. तसेच देवाचे तीर्थ त्याला देऊन, त्याच्या अंगाला अंगारा लावला. ५/१० मिनिटांनी श्रींनी त्याला हाक मारण्यास सुरुवात केली. तिसरी हाक ऐकल्यावर मुलाने डोळे उघडले व थोडी हालचाल केली. गंभीर वातावरण एकदम नाहीसे होऊन सर्वजण प्रसन्न झाले. रावसाहेब श्रींच्या एकदम पाया पडले व म्हणाले, "महाराज, मी पुष्कळ साधू पाहिले, परंतु आपणासारखा कोणी नाही. आपण प्रत्यक्ष समर्थांचे अवतार आहात, मला आपल्या पदरात घ्या. त्यावर श्री म्हणाले, "मागचे सर्व विसरून जा. आजपासून समर्थांनी तुम्हाला आपले म्हटले आहे; दासनवमीला तुम्ही सर्वजण सज्जनगडावर त्यांच्या दर्शनाला जा. ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचवले, त्याचे नाम कधी विसरू नका, राम मुलाचे कल्याण करील." मुलगी शुद्धीवर आल्यावर श्रींनी त्याला थोडे दूध पाजले, नंतर सर्व मंडळी आनंदाने जेवली.