श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे.

१८८४
भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे, तेव्हा या भूमीमध्ये अनेक ठिकाणी अनेक लोक भगवंताच्या प्राप्तीसाठी विविध प्रकारची साधने करण्यात आपले आयुष्य वेचीत असतात.
वयाच्या नवव्या वर्षी श्री प्रथम घराच्या बाहेर पडले. एका लंगोटीशिवाय त्यांच्याजवळ काही नसे. भारतवर्षामधील सर्व तीर्थे त्यांनी पाहिली व अनेक वेळा काशीची कावड रामेश्वरला नेली. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे, तेव्हा या भूमीमध्ये अनेक ठिकाणी अनेक लोक भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक प्रकारची साधने करण्यात आपले आयुष्य वेचीत असतात. परमार्थाकडे खरी प्रवृत्ती असणारे किती लोक येथे अस्तित्वात आहेत हे पाहण्यासाठी श्री सबंध भारतवर्ष तीन वेळा पायी हिंडले. आपल्या देशातील अनेक खेडयांची व गावांची त्यांनी माहिती होती. गोंदवल्यास येऊन राहिल्यावर एखाद्या गावची गोष्ट निघाली की लगेच श्री सांगत, " मला हे गाव माहीत आहे. लहानपणी फिरत फिरत मी येथे गेलो होतो, तेथे अमुक प्रकारचे मंदिर आहे, तेथली घरे अमुक प्रकारची आहेत, तेथे अमका मनुष्य असा होता " वगैरे. एकदा प्रसिद्ध वेदान्ती बाबा गर्दे त्यांना भेटण्यास गदगला आले. त्यांनी श्रींना नमस्कार केल्यावर भाऊसाहेब केतकर त्यांची ओळख करून देऊ लागले. त्यावेळी श्री बोलले, "मी यांना पाहिले आहे, बाबा, अमक्या वर्षी तुम्ही विजापूरला मास्तर होता. एके दिवशी दुपारी बारा वाजता तुम्ही वर्गात शिकवीत होता. तेव्हा मी बाहेरून तुम्हाला खिडकीतून पाहून गेलो." इतक्या अफाट पर्यटनात अक्षरशः लाखो लोकांशी त्यांचा संबंध आला. त्यांना "आपण कोण ?" म्हणून विचारणारेही काही लोक भेटत. "मी जंगम आहे." असे श्री त्यांना उत्तर देत. जुन्या शास्त्रीय पद्धतीने वेदान्ताचा बारान्‌बारा वर्षे अभ्यास केल्यावर तोंडाने "शिवोऽगम्‍ " म्हणत विषय भोगणार्‍या कित्येक वेदांत्यांना व संन्याशांना त्यांनी भगवंताच्या नामाला लावले. तसेच कर्मकांड हेच जीवित सर्वस्व मानून भगवंताच्या भजनाला तुच्छ लेखणार्‍या अनेक वैदिक विद्वानांना त्यांनी हातात माळ घेऊन रामनामाचा जप करायला लावले. पुष्कळदा श्री अशी गंमत करीत की, त्यांना भेटण्यासाठी येत असलेला मनुष्य गोंदवल्याच्या जवळ आला म्हणजे ते पूर्वी त्याच्या गावाला गेले असताना घडलेली हकिकत बरोबरच्या मंडळींना सांगण्यास आरंभ करीत. ती सांगून संपते न संपते इतक्यात तो मनुष्य येऊन पोचायचा. तो आला की लगेच श्री म्हणत, "बघ हे गृहस्थ त्या गावाचेच आहेत, मी आता सांगितलेली हकिकत खरी आहे की नाही हे त्यांना विचारा." श्री प्रवासात असताना हजारो लोकांनी त्यांना गुरुत्त्व दिले, परंतु त्यांपैकी पुष्कळांना श्री कोण व कोठले हे माहीत नसल्याने ते लोक गोंदवल्याला आलेच नाहीत. काशीमध्ये व अयोध्येमध्ये श्रींना "दख्खन का साधू " असे म्हणत. श्री गोंदवल्यास येऊन राहिल्यावर अनेकांना त्यांची खरी ओळख होऊ लागली.