श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते.

१८९२
मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते.
थोरले श्रीराममंदिर बांधल्यावर श्री गोंदवल्यासच कायम वास्तव्यास असत. कर्‍हाड येथील दुसंगे आडनावाची एक विधवा स्त्री आपल्या वीस वर्षांच्या मुलाला घेऊन श्रींच्याकडे आली. बाप लहानपणीच वारल्यामुळे मुलगा कोणाचा धाक न राहिल्याने व्यसनी बनला. श्री मुलाला जवळ घेऊन म्हणाले, "बाळ, तुझ्या बापाला बरेच वर्षांपूर्वी पाहिले होते. मला तुझ्याविषयी प्रेम वाटते. तू माझ्या सांगण्याप्रमाणे वागलास तर राम तुझे कल्याण करील. रोज आईच्या पाया पडत जा. आई सांगेल तसे वागण्याचा निश्चय कर." श्रींच्या प्रेमाने ओथंबलेल्या शब्दांनी त्या मुलावर परिणाम होऊन, तो मुलगा चांगला वागू लागला. पुढे चार महिन्यांनी आईचा अंतकाळ जवळ आल्यावर तिने मुलाला श्रींच्या पदरात घातला व ती शांतपणे समाधानात गेली. काही दिवस मुलगा चांगला वागला पण नंतर पुन्हा बाहेरख्यालीपण करू लागला. एके दिवशी रात्री मुलगा प्रसादाच्या वेळी न दिसल्याने श्रींनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ओढयाच्या काठी एका स्त्रीबरोबर झोपलेला पाहिला. श्रींनी आपली कफनी त्या दोघांवर घातली व नंतर मंदिरात आले. पहाटे गार वारा सुटल्यावर मुलाला जाग आली. अंगावरचे पांघरूण पाहिले तर श्रींची कफनी त्याला दिसली. त्याला आपलीच लाजवाटली. ओढयावर स्नान करून कफनी घातली व श्री उठण्याच्या आधी मंदिरात श्रींच्या खोलीसमोर जप करीत उभा राहिला. श्री उठल्यावर लगेच त्याने श्रींना साष्टांग नमस्कार घातला व मान खाली घालून उभा राहिला. त्यावर श्री त्याला म्हणाले, "जा बाळ, गिरनारवर बारा वर्षे नामस्मरण कर, तुझे काम होईल." पुढे श्री आईला घेऊन काशी यात्रेस गेले त्यावेळी तो मुलगा काही दिवस त्यांच्याबरोबर होता व नंतर नैमिष्यारण्यात निघून गेला. श्री गोंदवल्यास राहू लागल्यावर कोणी ना कोणी रोज श्रींना भेटण्यास येत. भिकाजी श्रीपत नावाचे फौजदार श्रींना भेटायला आले तेव्हा त्यांनी बरोबर बत्ताशा नावाचा सुंदर व मस्त असा घोडा आणला होता. तो त्याने श्रींना अर्पणा केला. घोडा खटयाळ होता, श्रींशिवाय कोणाला तो दाद देत नसे. श्री एक दोन दिवसांनी त्याच्यापाशी जात, पाठीवर थाप मारून त्याच्याशी चार शब्द बोलत. अनेक वेळा त्याच्या पाठीवर बसून चांगले लांब फिरवून आणीत. श्री त्याच्यावर बसले म्हणजे त्याची तब्येत खुश होऊन तो वार्‍यासारखा धावे. श्रींचे एक शिष्य शाहूराव चिवटे हे एकदा श्रींना विचारून बत्ताशाला आपल्या घरी घेऊन गेला. पण तेथे गेल्यावर घोडयाने दाणा खाल्ला नाही व पाणीही घेतले नाही. तीन दिवस त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा येत होत्या. हे पाहून चिवटयांनी बत्ताशाला परत आणला. श्रींना पाहिल्याबरोबर घोडे फुरफुरू लागले. श्री त्यांच्याशी बोलले, त्याला थोपटले तेव्हा घोडे शांत झाले. श्रींनी हाताने त्याला दाणा चारला. पाणी पाजले व त्याच्या जागेवर बांधले. त्या वेळेपासून बत्ताशाला लोक पूज्य समजू लागले. गोंदवल्यापासून दहा कोसांवर असणार्‍या गावी एका सुखवस्तू कुटुंबाची बरीच शेती होता. जनावरेही होती. पुढे परिस्थिती खालावली. मालकाने जनावरे काढण्यास प्रांरभ केला. त्याच्यापाशी एक लंगडी गाय होती. ती श्रींना देण्याविषयी एकाने सुचविले, त्याप्रमाणे त्याने गोंदवल्यास गाईला आणले, श्रींनी तिला आपल्यापाशी ठेवून घेतली. पुढे दोन वर्षांनी परिस्थिती सुधारल्यावर तो गाईला नेण्यासाठी गोंदवल्यास आला. श्री गाईजवळ गेले व तिच्याशी बोलले, "गंगे, हे बघ तुला नेण्यासाठी आले आहेत. त्यांच्याबरोबर आनंदाने जा." लगले, श्रींच्याकडे तिने दीनवाणीने पाहिले व जाण्याची इच्छा नाही. तुमची संमती असेल तर तिला मी मुलीप्रमाणे सांभाळीन. तिला इथेच ठेवून जा." त्याने आनंदाने संमती दिली. गंगीचे श्रींच्यावर इतके प्रेम होते, की श्रींना पाहिल्याबरोबर दावे सोडण्यास हिसकावणी करू लागे, मोकळी सोडल्याबरोबर ती श्रींच्या मागेमागे जाऊ लागे. श्रींनी कुरवाळून तिच्याशी थोडे बोलले की मगच ती गोठयात जाई. मुक्या जनावरांचे सुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते.