श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला

१९०३
जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला; त्यालाच माझे चरित्र कळेल. नुसत्या तर्काने ते कळणार नाही.
श्री पुण्याला आले असताना अनेक स्त्री-पुरुष त्यांच्या दर्शनाला येत असत. त्यावेळी गोपाळराव गोखले हे शिवभक्त मोठे तालीमबाजअसून अनेक भोंदू साधू, लोभी संन्यासी, वाह्यात पुराणिक यांची परीक्षा घेऊन त्यांना पिटाळून लावीत. एरव्ही जो कोणी साधू आपली शिवभक्ती प्रकट करुन सांगेल त्याला आपण गुरु करावा असे त्यांनी ठरविले होते. एकदा ते श्रींना भेटायला आले असता नमस्कार करुन बाजूला बसले; तेवढ्यात श्रींनी त्यांच्याकडे पाहिले व म्हणाले, "मी रामाचा उपासक आहे, पण मला शंकराचा भक्त फार आवडतो." असे म्हणताच गोपाळराव एकदम "महाराज!" असे म्हणून श्रींच्या पाया पडले व नंतर श्रींच्या अंतरंगातील शिष्य म्हणून ओळखले जाऊ लागले; ते म्हणायचे, " मी श्रींचा परीक्षक म्हणून गेलो, पण श्री जणू काय आपली लहानपणापासूनची ओळख आहे इतक्या आपलेपणाने माझ्याशी वागू लागले.
पुण्याचा मुक्काम संपवून श्री गोंदवल्यास आले, तेव्हा तेथे कडाक्याचा उन्हाळा चालू होता, एक अशक्त, रोगाने थकलेले गाढव राममंदिरासमोर आले व तेथेच पडले. कोणीतरी ही गोष्ट श्रींना सांगितली. त्यावेळी ते विश्रांती घेत होते. श्री चटकन उठले व बाहेर गाढवापाशी आले, ते तडफडत होते. त्याची ती प्राणांतिक अवस्था पाहून श्रींनी ताबडतोब गंगा घेऊन येण्यास सांगितले व स्वत:त्याच्या अंगावर हात फिरवीत बसले. अनेक मंडळी जमा झाली. सर्वांना मोठ्याने नाम घेण्यास सांगून श्रींनी स्वत: गाढवाच्या तोंडात गंगा घातली. गाढवाने श्रींच्याकडे पाहिले व प्राण सोडला. त्यावर श्री एकदम म्हणाले, " रामाने त्याचे कल्याण केले, त्याला चांगला अंतकाळी मदत झाली तर सर्व जीवप्राणी पुढे जातात. मग गाढव झाले तरी काय हरकत आहे!"
जंगलखात्यातील एक गृहस्थ ज्यांना "भाऊसाहेब फॉरेस्ट" असे म्हणत; पेन्शन घेतल्यावर गोंदवल्यास श्रींच्याजवळ येऊन राहिले. त्यांना लिहिण्याचा व वाचण्याचा खूप नाद होता. सहा महिने गोंदवल्यास राहिल्यावर श्रींचे विलक्षण चरित्र बघून आपण त्यांचे चरित्र लिहावे असे त्यांच्या मनात आले. श्रींविषयी ते माहिती गोळा करीत व रोज जे घडले त्याची नोंद करुन ठेवीत. एकदा ते श्रींना म्हणाले,"महाराज, आपली जन्मतिथी कोणती ती सांगाल का ?" त्यावर श्री हसून म्हणाले, " घ्या लिहून असे म्हणून श्रींनी आपली जन्मवेळ, तिथी आणि महिना सांगितला व शेवटी संवत्सर सांगितले, त्यावर भाउसाहेब एकदम आनंदाने म्हणाले, "महाराज, तुम्ही आणि आम्ही अगदी बरोबरचे आहेत. माझी जन्मवेळ, तिथी, महिना अगदी बरोबर तुमचीच आहे" त्यावेळी तेथे जमलेली मंडळी हसू लागली, भाऊसाहेबांना मग खरा प्रकार लक्षात आला. भाऊसाहेबांनी श्रींचे चरित्र लिहिले व कौतुकाने ते बाड श्रींच्या हातात दिले. श्रींनी ते कौतुकाने ते चाळले व नंतर एकदम फाडून टाकले. त्यावर भाऊसाहेब म्हणाले,"हे काय महाराज!" श्री म्हणाले, भाऊसाहेब, संतांचा चरित्रकार जन्मास यावा लागतो. जो नामात इतका रंगला की त्याला स्वत:चा विसर पडला, त्यालाच माझे चरित्र कळेल, नुसत्या तर्काने ते कळणार नाही." सत्पुरुषाचे चरित्र हे जास्त मानसिक असते, त्याच्या चरित्रामध्ये देहाच्या        हालचालींना दुय्यम महत्व असते आणि चमत्कारांना तर फारच कमी महत्त्व द्यायला पाहिजे. देहाच्या वाटेल त्या अवस्थेमध्ये भगवंताचे अखंड अनुसंधान असणे हेच संतांच्या चरित्राचे खरे मर्म आहे. आपण स्वत: भगवंताला चिकटल्याशिवाय दुसरा तसा चिकटलेला आहे किंवा नाही हे कळत नाही. म्हणून संताच्या चरित्रकाराने स्वत: नामामध्ये रंगून जावे आणि नंतर त्याची आज्ञा घेऊन चरित्र लिहावे."
भाऊसाहेबांनी श्रींचे एकदम पाय धरले व क्षमा मागितली.