श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते

१९१०
विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते, त्याचप्रमाणे मंदिर हे अलौकिक म्हणजे अध्यात्म विद्येचे केन्द्र असले पाहिजे.
मुंबईहून सर भालचंद्र भाटवडेकर यांनी श्रींना आग्रहाचे पत्र पाठवून आमंत्रण केले. काही मंडळींना घेऊन श्री भाटवडेकर यांच्याकडे राहिले. एके दिवशी श्री निर्णयसागर छापखान्यात गेले. तेथे काही पोथ्या विकत घेतल्या. एके दिवशी परळला कापडाची गिरणी पाहण्यास श्री व बरोबरची मंडळी जाऊन आली. भालचंद्राच्या नवीन मोटारीत श्रींनी प्रथम बसावे म्हणून त्याना विनंती केली. श्री एकदा बसले व म्हणाले बरोबरची मंडळी असाता मी एकट्याने गाडीत बसावे हे योग्य नाही म्हणून एक घोड्याची गाडी त्याच्या तैनातीला दिली. श्री सहा दिवस मुंबईला राहिले. पुढे काही दिवसांनी पुन्हा मुंबईस आले. यावेळी वरळीस समुद्रस्नानासाठी गेले. दोन दिवसांनी गोंदवल्यास जाण्यास बोरीबंदर स्टेशनवर आले. गाडीस अवकाश होता, तेवढ्यात एक शुभ्र पातळ नेसलेली मध्यम वयाची स्त्री आली, श्रींना भेटून त्यांच्या पायांवर डोके ठेवले" आज्ञेप्रमाने वागेन" एवढे म्हणाली. "मग राम मागे उभा आहे." असे श्री तिला म्हणाले. एका व्यसनी व उधळ्या इंदूरच्या सरदाराची ही बायको असून चांगल्या बुवाना लाजवील अशी परमार्थाची ही अधिकारी आहे, राम तिचे व तिच्यामुळे त्याचेहि. कल्याण करील असे श्री म्हणाले. श्रींना याच वर्षी हुबळीला सावकार चिदंबर नाईक व इतरांनी बांधलेल्या श्रीराममंदिराची स्थापना करण्यास बोलावले. मुंबईहून परत गोंदवल्यास आल्यावर बर्‍याच मंडळींनी घेऊन श्री हुबळीला गेले. दर्शनाला खूप गर्दी झाली म्हणून तबीबांनी श्रींना दिवाणखान्यातून वरच्या मजल्यावर खोलीत बसवले व सेवेला मनुष्य दिला. खोलीतील कोनाड्यात लावलेली मेणबत्ती श्रींनी पंख्याने विझवली व पुन्हा खाली दिवाणखान्यात येऊन बसले. श्री आलेले पाहून मंडळींना खूप आनंद झाला. रात्री ११ पर्यंत सर्वांनी श्रींचे दर्शन घेतले. रामाच्या स्थापनेच्या आधल्या दिवशी श्री मंदिरात जाण्यासाठी निघाले व कोणाला नकळत जानकीबाईंच्या घरी गेले. (जानकीबाई भाऊसाहेब केतकर गदगला असताना त्यांच्याकडे  स्वयंपाकाला होती. भाऊसाहेबांनी पेन्शन घेतल्यावर ही ७५ वर्षांची बाई हुबळीला येऊन राहिलो.) श्री तिच्याकडे गेल्यावर म्हणाले. "जानकीबाई, कालपासून मला ताप आहे, बुरकुल्यात थोडा मऊ भात शिजवा व आमसुलाचे सार करुन खायला घाला." तिने लगेचच सार भात केला व आपल्या हाताने भरवला. श्री तेथून निघताना जानकी त्यांच्या पाया पडली. दोघांच्याही डोळ्यांत पाणी आले. श्री म्हणाले, " माय, तुमची जबाबदारी माझ्याकडे लागली. होईल तेवढे नाम घ्या. राम आपले प्रेम तुम्हाला दिल्यावाचून राहणार नाही. शांत आनंदात रहा." श्रीराम मंदिराची स्थापना झाल्यावर खूप अन्नदान झाले. श्री सिद्धारुढ स्वामी यांचे श्रींना आमंत्रण आले. मठात गेल्यावर दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. श्रींनी काही सांगावे अशी स्वामींनी विनंती केली. त्यावर श्री म्हणाले, " भगवंताचे अखंड स्मरण राखावे" हीच स्वामींची आज्ञा आहे अशी माझी खात्री आहे हे स्मरण राखण्याचा तुम्ही प्रयत्न करावा; हे जो करील त्याच्या हाताला धरुन स्वामी तुम्हाला भगवंतापर्यंत पोचवतील. ही मी हमी देतो. हे ऐकल्यावर स्वामी एकदम उद्धारले, "साधु साधु !! वा वा फार छान" त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. स्वामीणी आपला मठ व बांधून ठेवलेली समाधी श्रींना दाखवली. पुढे हुबळीला एक दिवस राहून श्री गोंदवल्यास आले.
श्रींनी पुष्कळ ठिकाणी रामाची मंदिरे स्थापन केली आपण सामान्यपणे समजतो त्यापेक्षा मंदिराविषयी त्यांची कल्पना निराळी होती. ज्याप्रमाणे विश्चविद्यालय हे लौकिक विद्येचे केंद्र असले पाहिजे. आपल्या आचारधर्माचे व परंपरेच रक्षण करणे हे मंदिराचे काम असून त्यात राहणारे लोक देखील त्या पेशाला लायक असेच असावेत. मंदिरात अध्यात्माचे श्रवण व मनन चालावे, जो साधक असेल त्याला साधन करण्यास योग्य स्थान असावे. प्रपंचाच्या त्रासाने कष्टी झालेल्या जीवाला मंदिरात आल्यानंतर स्वत:च्या दु:खाचा काही काळ तरी विसर पडावा असे तेथील वातावरण असावे., मंदिरात नियमित अन्नदान व नियमित उपासना चालू असावी. मंदिर हे मोठे पवित्र स्थान असले पाहिजे. मंदिरात गेले की भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे. हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून श्रींनी अनेक मंदिर स्थापन केली. या वर्षी तेरदाल येथे दत्तमंदिराची स्थापना श्रींच्या हस्ते झाली.