श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


"कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही."

१९१२
"कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही."
श्रींची प्रकृती दिवसेंदिवस क्षीण होत चालली होती. कधीमधी दिसणारी पायावरील सूज आता नेहमी दिसू लागली. दम्याचे प्रमाणही पहिल्यापेक्षा अधिक झाले. तरीसुध्दा श्रींचे कार्यक्रम नेहमीप्रमाणे चालू होते. भजन, भोजन, नामस्मरण, हास्यविनोद, इतर खटपटी आनंदात चालू होत्या. लांबलांबचे लोक दर्शनास यायचे व थांबायचे; त्यामुळे साधारणपणे पाचशे माणसे नेहमी श्रींजवळ असायची. जागा अपुरी पडू लागली म्हणून श्रींनी धर्मशाळा बांधली, पाकशाळा दुरुस्त करुन घेतली, विहिरी खोदल्या, ओढ्यास घाट बांधला, नवीन इमारती बांधल्या. यावेळी पंढरपूरच्या जोतिषानें शनीचे मंदिर बांधण्याचे सुचविले. सुचविले . श्री लगेच म्हणाले, " तुम्ही म्हणता तसे करु, शनि देवाचा फौजदार आहे." त्याप्रमाणे धर्मशाळेपाशी शनीचे मंदिर बांधण्यात आले. या वर्षी श्रींनी नवीन शेती खरेदी केली आणि सर्व शेती मंदिरांना वाटून टाकली. तसेच एक मृत्यूपत्रही तयार केले. सर्व मंदिरांचे एक संस्थान बनवून त्यावर पंच नेमले. त्यांना सर्व व्यवस्था आखून दिली. आल्यागेल्याला भाकरी घालावी आणि आपण सर्वांनी नाम घ्यावे हे मुख्यत: सांगून ठेवले. भेटायला आलेल्या मंडळींना श्री आग्रहाने १/२ दिवस जास्त ठेवून घेत. निरोप देताना मंडळींना सांगत के, " मी लवकरच नैमिषारण्यात जाणार आहे. मी सांगितलेले नाम तेवढे विसरु नका, त्यातच कल्याण आहे." काहींना ते म्हणायचे, " कोणती वेळ कशी येईल काय सांगावे. सर्व शंका विचारुन घ्याव्यात आणि नाम घेण्याच्या मागे लागावे. कांही ना ते सांगायचे,’पहा बरं, मी पक्ष्यासारखा केव्हा उडून जाईन नेम नाही. नामाला लागा," समजूतदार लोकांना ते सांगत,"येणारा काळ भयंकर आहे, साधूदेखील भ्रष्ट होतील, कोणाला नीतीची चाड राहणार नाही, लोक कमालीचे विषयांध होतील, कली फार माजेल, तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मात्र भय नाही." एकदा निरुपणास बसले असता श्री म्हणाले, "एखादी गोष्ट मला सांगावी असे जर तुम्हाला वाटले, तर ती तुम्ही मारुतीला सांगा म्हणजे ती मला आपोआप कळेल." बेळगावचे बळ्वंतराव घाणेकर यांनी हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय केला.गावी परत गेल्यावर ते रोज संध्याकाळी मारुतीच्या दर्शनास जात आणि हलक्या आवाजात ते मारुतीराया माझे षड्‌‌विकार माझ्या ताब्यात राहू दे." वर्षभर असा क्रम चालल्यानंतर वर्षभराने ते गोंदवल्यास आले. श्री निरुपणास बसले असता काम क्रोधादि विकारांवर बोलायला आरंभ केला. बोलताना घाणेकरांकडे सहजनजर फिरवीत श्री म्हणाले, " मारुतीच्या समोर नुसता पाठ म्हणून षड्‌विकार कसे ताब्यात येतील  ? त्यासाठी भगवंताचे अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास करायला पाहिजे." हे ऐकून घाणेकरांना खूण पटली व ते हसले. श्री एकदा म्हसवडच्या बाजारात जाणार होते. अनेक जण त्यांना गायी सोडविण्यासाठी पैसे आणून देत. कोणी श्रींना आपल्या घरी पानसुपारीला बोलावोन त्यांचा आदर करुन पैसे देत. बळवंतराव घाणेकरांची पन्नास रुपये देण्याची इच्छा होती. श्रींना एकटे गाठून कोणास नकळत पैसे द्यावे असे त्यांना मनापासून वाटले. श्रींची निघण्याची वेळ झाली, तेव्हा श्रीच त्यांना म्हणाले, " बळवंतराव मी तुमच्यापाशी ठेवायला दिलेले पन्न्नास रुपये द्या बघू." बळवंतरावांनी लगेच त्यांच्याजवळ पैसे दिले. श्री चातुर्याने दुसर्‍याच्या मनातले ओळखून त्याप्रमाणे वागत. एकदा गोंदवल्याला बरीच मंडळी बोलत बसली असता श्री ब्रह्मानंदांना म्हणाले, " बुवा ही, सगळी मंडळी मला समर्थाचा अवतार म्हणतात, त्यांच्यात आणि माझ्यात काय साम्य आहे  ?" ब्रह्मानंदांनी हात जोडले आणि नम्रपणे सांगितले की, "महाराज, समर्थांचे आणि आपले प्रत्येक गोष्टीत साम्य आहे, फक्त आपल्याला कल्याण तेवढा नाही. " ब्रह्मानंदांचे हे मार्मिक उत्तर ऐकून श्री मंडळींना म्हणाले, " समर्थ ते समर्थच, कोण दुसरा त्यांच्यासारखा होईल ! पण हे ब्रह्मानंदबुवा मात्र कल्याण व्हायला लायक आहेत यात शंका नाही." आपल्या मंडळींशी वागताना श्रींची प्रत्येक कृति त्यांना भगवंताकडे नेण्यासाठीच असे. त्यांनी कोणाकडून कशाचीही अपेक्षा कधी केली नाही. विजापूरचे गुरुअप्पा देसाई यांनी गोंदव्ल्यास येऊन श्रींचा अनुग्रह घेतला. श्रींची पूजा करुन चांदीच्या ताटात हजार रुपये घालून ते श्रींच्या पुढे ठेवले व गुरुदक्षिणा म्हणून त्यावर पाणी सोडले. श्रींनी ताटाला नुसता हात लावून ते परत केले. देसाई घेईनात तेव्हा श्रींनी फक्त एक रुपया घेतला व बाकीचे परत केले. श्रींनी कधीही कोणाकडून प्रापंचित वस्तूची कधी अपेक्षा केली नाही. आपल्या माण्साने सदाचार पाळून नाम घ्यावे ही एकच गोष्ट श्रींना हवी असे.