श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
नामधारक म्हणे सिद्धासी । पुढें अवतार जाहले कैसी । विस्तारोनियां आम्हांसी । सांगा स्वामी कृपामूर्ति ॥१॥
सिद्ध म्हणे ऐक वत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा । पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्त्रियेची ॥२॥
शनिप्रदोषीं सर्वेश्वरासी । पूजित होती गुरु-उपदेशीं । देहवासना असतां तियेसी । पंचत्व पावली तयेवेळीं ॥३॥
झाला जन्म पुढें तिसी । कारंज-नगर उत्तरदेशीं । वाजसनीय शाखेसी । विप्रकुळीं जन्मली ॥४॥
जातक वर्तलें तियेसी । नाम 'अंबा-भवानी' ऐसी । आरोपिलें स्नेहेसीं । मातापितरीं परियेसा ॥५॥
वर्धतां मातापित्यागृहीं । वाढली कन्या अतिस्नेही । विवाह करिती महोत्साहीं । देती विप्रासी तेचि ग्रामीं ॥६॥
शिवव्रती असे तो ब्राह्मण । नाम तया 'माधव' जाण । त्यासी दिधली कन्या दान । अतिप्रीतींकरुनि ॥७॥
तया माधवविप्राघरीं । शुभाचारें होती नारी । वासना तिची पूर्वापरीं । ईश्वरपूजा करीतसे ॥८॥
पूजा करी ईश्वरासी । दंपती उभयवर्ग मनोमानसीं । प्रदोषपूजा अतिहर्षी । करिती भक्तिपुरस्कर ॥९॥
मंदवारीं त्रयोदशीसी । पूजा करिती अतिंविशेषीं । तंव वत्सरें झालीं षोडशीं । अंतर्वत्नी झाली ऐका ॥१०॥
मास तृतीय-पंचमेसी । उत्साह करिती अनेक हर्षी । उत्तम डोहाळे होती तियेसी । बह्मज्ञान बोलतसे ॥११॥
करिती उत्साह मास-सातीं । द्विज करी सीमंती । अक्षवाणें वोंवाळिती आरती । सुवासिनी मिळूनियां ॥१२॥
ऐसें क्रमितां नवमासीं । प्रसूत झाली शुभ दिवशीं । पुत्र जाहला म्हणून हर्षी । निर्भर होतीं मातापिता ॥१३॥
जन्म होतांचि तो बाळक । 'ॐ' कार शब्द म्हणतसे अलोलिक ।
पाहूनि झाले तटस्थ लोक । अभिनव म्हणोनि तयेवेळीं ॥१४॥
जातककर्म करी तो ब्राह्मण । विप्रांसी देत दक्षिणा दान । ज्योतिषी सांगती सुलक्षण । लग्न सत्वर पाहोनियां ॥१५॥
सांगती ज्योतिषी त्या द्विजासी । मुहूर्त बरवा असे विशेषीं । कुमर होईल कारणिक पुरुषी । गुरु होईल सकळिकां ॥१६॥
याचा अनुग्रह होईल ज्यासी । तो वंद्य होईल विश्वासी । याचें वाक्य होईल परिस । चिंतामणि याचे चरण ॥१७॥
अष्टही सिद्धि याचे द्वारीं । वोळगत राहतील निरंतरीं । नव निधि याच्या घरीं । राहती ऐक द्विजोत्तमा ॥१८॥
न होती यासी गृहिणी-सुत । पूज्य होईल त्रिभुवनांत । याचे दर्शनमात्रें पतित । पुनीत होतील परियेसीं ॥१९॥
होईल हा अवतार-पुरुषी । आम्हां दिसतसे भरवंसीं । संदेह न धरावा मानसीं । म्हणोनि करिती नमस्कार ॥२०॥
म्हणती समस्त द्विजवर । सांगती जनकासी उत्तर । याचेनि महादैन्य हरे । भेणें नलगे कळिकाळा ॥२१॥
तुमचे मनीं जे जे वासना । सर्व साधेल निर्गुणा । यातें करावें हो जतना । निधान आलें तुमचे घरा ॥२२॥
ऐसें जातक वर्तवोन । सांगता झाला विद्वज्जन । जनक जननी संतोषोन । देती दान वस्त्राभरणें ॥२३॥
सांगोनि गेले ब्राह्मणस्तोम । मातापिता अति प्रेम । दृष्टि लागेल म्हणून विषम । निंबलोण वोंवाळिती ॥२४॥
व्यवस्था फांकली नगरांत । अभिनव आजि देखिलें म्हणत ।
उपजतां बाळ 'ॐ' कार जपत । आश्चर्य म्हणती सकळ जन ॥२५॥
नगलोक इष्ट मित्र । पहावया येती विचित्र । दृष्टि लागेल म्हणोनि मात्र । माता न दाखवी कवणासी ॥२६॥
मायामोहें जनकजननी । बाळासी दृष्टि लागेल म्हणोनि । आंगारा लाविती मंत्रोनि । रक्षा बांधिती कृष्णसुतें ॥२७॥
परमात्मयाचा अवतार । दृष्टि त्यासी केवीं संचार । लौकिकधर्म ममत्कार । मातापिता संरक्षिती ॥२८॥
वर्ततां बाळ येणेंपरी । दिवस दहा झालियावरी । नामकरण पुरःसरीं । ठेविता झाला जनक द्विजोत्तम ॥२९॥
'शालग्रामदेव' म्हणत । जन्मनाम झालें ख्यात । नाम 'नरहरी' ऐसें म्हणत । उच्चार केला धर्मकर्मे ॥३०॥
ममत्व थोर बाळकावरी । प्रतिपाळ करिती प्रीतिकरीं । माता म्हणतसे येरी । न पुरे क्षीर बाळकासी ॥३१॥
पतीसी म्हणे तये वेळां । स्तनीं दूध थोडें बाळा । एखादी मिळवा कां अबळा । स्तनपान देववूं ॥३२॥
अथवा आणा मेषी एक । आपुले स्तनें न शमे भूक । ऐकोनि हांसे बाळक । स्पर्श करी स्तनासी सव्यकर ॥३३॥
स्तनीं स्पर्श होतांचि कर । बत्तीस धारा वाहे क्षीर । वस्त्र भिजोनि विचित्र । वाहों लागे भूमीवरी ॥३४॥
विस्मय करिती जनकजननी । प्रगट न करिती गौप्यगुणीं । नमन करिती बाळकाचरणीं । माता होय खेळविती ॥३५॥
पाळण्या घालूनि बाळकासी । पर्यंदें गाय अति हर्षी । न राहे बाळक पाळणेसीं । सदा खेळे महीवरी ॥३६॥
वर्धे बाळ येणेंपरी । मातापिता-ममत्कारीं । वर्धतां झाला संवत्सरीं । न बोले बाळ कवणासवें ॥३७॥
माता बोलवी कुमरासी । बोले शब्द ॐकारेसीं । चिंता करीतसे मानसीं । मुकें होईल म्हणोनि ॥३८॥
पुसती जाण ज्योतिष्यासी । म्हणे बोल नये काय यासी । उपाय असेल यास विशेषी । म्हणोनि पुसे वेळोवेळीं ॥३९॥
सांगती जाण ज्योतिषी । आराधावें कुलदेवतेसी । अर्कवारीं अश्वत्थपर्णेसीं । अन्न घालावें तीनी वेळां ॥४०॥
एक म्हणती होईल मुकें । यासि शिकवावें बरव्या विवेकें । बाळ बोल बोलूं शिके । म्हणोनि सांगती विनोदें ॥४१॥
हांसोनि ॐकार उच्चारी बाळ । आणिक नेणे बोल केवळ । विस्मय करिताति लोक सकळ । ॐकार शब्द ऐकोनि ॥४२॥
एक म्हणती नवल झालें । सर्व ज्ञान असे भलें । श्रवणीं ऐकतो बोल सकळ । जाणूनि न बोले कवण्या गुणें ॥४३॥
कांहीं केलिया न बोले सुत । चिंता करिताति मातापिता । पुत्रासी जाहलीं वर्षे सात । मुका झाला दैवयोगें ॥४४॥
सातवें वर्ष कुमरासी । योग्य झाला मुंजीसी । पुसताति समस्त ब्राह्मणांसी । केंवी करावें म्हणोनियां ॥४५॥
विप्र म्हणती तया वेळां । संस्कारावें ब्राह्मणकुळा । उपनयनावें केवळा । अष्ट वरुषें होऊं नये ॥४६॥
मातापिता चिंता करिती । उपदेशावें कवणे रीतीं । मुका असे हा निश्चितीं । कैसें दैव झालें आम्हां ॥४७॥
कैसें दैव जाहलें आपुलें । ईश्वरगौरी आराधिले । त्रयोदशीं शिवासी पूजिलें । वायां झालें म्हणतसे ॥४८॥
ईश्वरें तरी दिधला वरु । सुलक्षण झाला कुमरु । न बोले आतां काय करुं । म्हणोनि चिंता शिवासी ॥४९॥
एकचि बाळ आमुचे कुशीं । आणिक न देखों स्वप्नेसीं । वेष्टिलों होतों आम्ही आशीं । आमुतें रक्षील म्हणोनि ॥५०॥
नव्हेच आमुचे मनींचा वास । पुत्र झाला निर्वाणवेष । काय वर दिधला त्या महेशें । शनिप्रदोषीं पूजितां म्यां ॥५१॥
ऐसें नानापरी देखा । जननी करी महादुःखा । जवळी येवोनि बाळक । संबोखीत मातेसी ॥५२॥
घरांत जाऊनि तये वेळां । घेऊनि आला लोखंड सबळा । हातीं धरितांचि निर्मळा । झालें सुवर्ण बावन्नकशी ॥५३॥
आणोनि देतसे मातेसी । विस्मय करी बहुवसीं । बोलावूनियां पतीसी । दाविती झाली तयेवेळीं ॥५४॥
गौप्य करिती तये वेळां । मंदिरांत नेलें तया बाळा । पाहती त्याची बाळलीला । आणिक लोह हातीं देती ॥५५॥
अमृतदृष्टीं पाहतां स्वामी । समृद्धि झाली सर्व हेमीं । विश्वास धरिती मनोधर्मी । होईल पुरुष कारणिक ॥५६॥
मग पुत्रातें आलिंगोनि । विनविताति जनकजननी । तूं तारका शिरोमणि । कारणिक पुरुष कुळदीपका ॥५७॥
तुझेनिं सर्वस्व लाधलें । बोलतां आम्हीं नाहीं ऐकिलें । अज्ञान-मायेनें विष्टिलें । भुकें ऐसें म्हणों तुज ॥५८॥
आमुचे मनींची वासना । तुंवा पुरवावी नंदना । तुझे बोबडे बोल आपणा । ऐकवावे पुत्रराया ॥५९॥
हास्यवदन करी बाळ । यज्ञोपवीत दावी गळां । कटीं दांवी मौंजीस्थळा । म्हणोनि दाखवी मातेसी ॥६०॥
संज्ञा करोनि मातेसी । दावी बाळक संतोषीं । मुंजी बांधितांचि आपणासी । येईल म्हणे बोल सकळ ॥६१॥
मातापिता संतोषती । विद्वांस ज्योतिषी पाचारिती । व्रतबंधमुहूर्त-लग्न पाहती । सर्व आयती करिते झाले ॥६२॥
केली आयती बहुतांपरी । रत्नखचित अळंकारीं । मायामोहें प्रीतीकरीं । समारंभ करिताति ॥६३॥
चतुर्वेदी ब्राह्मण येती । शाखापरत्वें वेद पढती । इष्ट सोयरे दाईज गोत्री । समस्त आले तया भवना ॥६४॥
नानापरीचे श्रृंगार । उभारिले मंडपाकार । आनंद करीतसे द्विजवर । अपार द्रव्य वेंचीतसे ॥६५॥
नगरलोक विस्मय करिती । मूक पुत्रासी एवढी आयती । द्विजा लागली असे भ्रांति । वृथा करितो द्रव्य आपुलें ॥६६॥
इतुकें वेंचूनि पुत्रासी । व्रतबंध करील परियेसीं । गायत्री केवीं उपदेशी । करील आचार कवणेवरी ॥६७॥
एक म्हणती हो कां भलतें । मिष्टान्न आम्हांसि मिळतें । देकार देतील हिरण्य वस्त्रें । चाड नाहीं त्याचे मंत्रा ॥६८॥
ऐसे नानापरीचे लोक । विचार करिती अनेक । मातापित्या अत्यंत सुख । देवदेवक करिताति ॥६९॥
चौलकर्म येरे दिवसीं । भोजन चौलमणीसी । पुनरभ्यंग करुनि हर्षी । यज्ञोपवीत धारण केलें ॥७०॥
मंत्रपूर्वक यज्ञोपवीत । धारण करविती द्विज समस्त । सहभोजन करावया माता । घेऊनि गेली मंदिरांत ॥७१॥
भोजन करोनि मातेसवें । निरोप घे तो एकोभावें । मुंजीबंधन असे करावें । म्हणोनि आला पित्याजवळी ॥७२॥
गृह्योक्तमार्गे मौंजी देखा । बंधन केलें त्या बाळका । सुमुहूर्त आला तत्काळिका । मंत्रोपदेश करिता झाला ॥७३॥
गायत्रीमंत्र अनुक्रमेसीं । उपदेश देती परियेसीं । बाळ उच्चारी मनोमानसीं । व्यक्त न बोले कवणापुढें ॥७४॥
गायत्रीमंत्र कुमरासी होतां । भिक्षा घेऊन आली माता । वस्त्रभूषणें रत्नखचिता । देती झाली तया वेळीं ॥७५॥
पहिली भिक्षा घेऊनि करीं । आशीर्वचन दे ती नारी । बाळ ऋग्वेद म्हणोन उच्चारी आचारधर्मे वर्ततसे ॥७६॥
पहिली भिक्षा येणेंपरी । देती झाली प्रीतिकरीं । 'अग्निमीळे पुरोहितं' उच्चारी । ब्रह्मचारी तया वेळीं ॥७७॥
दुसरी भिक्षा देतां माता । उच्चार केला यजुर्वेद 'इषेत्वा०। लोक समस्त तटस्था । माथा तुकिती तये वेळीं ॥७८॥
तिसरी भिक्षा देतां माता । म्हणे सामवेद पढे आतां । 'अग्नआयाहि०' गायन करीत । तीन्ही वेद म्हणतसे ॥७९॥
सभा समस्त विस्मय करी । पहाती हर्षनिर्भरीं । मुकें बोले वेद चारी । म्हणती होईल कारणिक ॥८०॥
यातें म्हणों नये नर । होईल देवाचा अवतार । म्हणोनि करिती नमस्कार । जगद्गुरु म्हणोनिया ॥८१॥
इतुक्यावरी तो बाळक । मातेसी म्हणतसे ऐक । तुंवा उपदेश केला एक । भिक्षा माग म्हणोनि ॥८२॥
नव्हती बोल तुझे मिथ्या । निर्धार राहिला माझिया चित्ता । निरोप द्यावा आम्हां त्वरिता । जाऊं तीर्थे आचरावया ॥८३॥
आम्हां आचार ब्रह्मचारी । भिक्षा करावी घरोघरीं । वेदाभ्यास मनोहरी । करणें असे परियेसा ॥८४॥
ऐकोनि पुत्राचें वचन । दुःखें दाटली अतिगहन । बाष्प निघताति लोचनीं । आली मूर्च्छना तये वेळीं ॥८५॥
निर्जीव होऊनि क्षणेक । करिती झाली महाशोक । पुत्र माझा तूं रक्षक । म्हणोनि केली आशा बहु ॥८६॥
आमुतें रक्षिसी म्हणोनि । होती आशा बहु मनीं । न बोलसी आम्हांसवें याचि गुणीं । मुकें म्हणविसी आपणासी ॥८७॥
न ऐकों कधीं तुझे बोल । आतां ऐकतां संतोष होईल । ईश्वरपूजा आलें फळ । म्हणोनि विश्वास केला आम्हीं ॥८८॥
ऐसें नानापरी देखा । पुत्रासि म्हणे ते बाळिका । आलिंगोनि कुमारका । कृपा भाकी तयेवेळीं ॥८९॥
ऐकोनि मातेचें वचन । बाळक सांगे ब्रह्मज्ञान । नको खेदवूं अंतःकरण । आम्हां करणें तेंचि असे ॥९०॥
तुतें आणखी पुत्र चारी । होतील माते निर्धारीं । तुझी सेवा परोपरी । करितील मनोभावेसीं ॥९१॥
तुवां आराधिला शंकर । जन्मांतरीं पूर्वापार । म्हणोनि मस्तकीं ठेविती कर । मग तिसी जहालें जातिस्मरण ॥९२॥
पूर्वजन्मींचा वृत्तांत । स्मरतां जाहली विस्मित । श्रीपादश्रीवल्लभ स्वरुपता । दिसतसे तो बाळक ॥९३॥
देखोनि माता तये वेळां । नमन केलें चरणकमळां । श्रीपाद उठवूनि अवलीळा । सांगती गौप्य अवधारीं ॥९४॥
ऐक माते ज्ञानवंती । हा बोल करीं वो गुप्ती । आम्ही संन्यासी असों यति । अलिप्त असों संसारीं ॥९५॥
याचिकारणें आम्ही आतां । हिंडूं समस्त तीर्थां । कारण असे पुढें बहुता । म्हणोनि निरोप मागती ॥९६॥
येणेंपरी जननियेसी । गुरुमूर्ति सांगे विनयेसीं । पुनरपि विनवी पुत्रासी । ऐका श्रोते एकचित्तें ॥९७॥
पुत्रासी विनवी तये वेळ । मातें सांडूनि तुम्ही जरी जाल । आणिक कधीं न देखों बाळ । केवीं वांचूं पुत्रराया ॥९८॥
धाकुटपणीं तुम्हां तापस- । धर्मी कवण आहे हर्ष । धर्मशास्त्रीं ख्याति सुरस । आश्रम चारी आचरावे ॥९९॥
ब्रह्मचर्य वर्षे बारा । त्यावरी गृहस्थधर्म बरा । मुख्य असे वानप्रस्थ तदनंतरा । घडती पुण्यें अपरांपर ॥१००॥
मुख्य आश्रम असे गृहस्थ । आचरतां होय अतिसमर्थ । मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ । धर्मशास्त्र येणेंपरी ॥१॥
ब्रह्मचर्यमार्ग ऐका । पठण करावें वेदादिकां । विवाह होतां गृहस्थें निका । पुत्रादिक लाधावे ॥२॥
यज्ञादिक कर्म साधोनियां । तदनंतर संन्यास करणें न्याया । येणेंविधि संन्यास असे मुख्या । अग्राह्य संन्यास बाळपणीं ॥३॥
समस्त इंद्रियें संतुष्टवावीं । मनींची वासना पुरवावी । तदनंतर तपासी जावें । संन्यास घेतां मुख्य असे ॥४॥
ऐकोनि मातेचें वचन । श्रीगुरू सांगती तत्त्वज्ञान । ऐक नामधारका सुमन । म्हणोनि सांगे सिद्धमुनि ॥५॥
गंगाधराचा नंदन । विनवीतसे नमून । तें परिसा श्रोते जन । श्रीगुरुचरित्रविस्तार ॥६॥
पुढें वर्तलें अपूर्व ऐका । सिद्ध सांगे नामधारका । महाराष्ट्रभाषेंकरुनि टीका । सांगतसे सरस्वती-गंगाधर ॥१०७॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे श्रीगुरुनरहरिबाळचरित्रलीलावर्णनं नाम एकादशोऽध्यायः ॥११॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
श्रीगुरुदेवदत्त ॥
( ओंवीसंख्या १०७ )
गुरुचरित्र
गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्याय पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय.