गुरुचरित्र

गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्याय पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय.


गुरूचरित्र - अध्याय बावन्नावा

श्रीगणेशाय नमः ।

नामधारक विनवी सिद्धासी । श्रीगुरु निघाले शैल्ययात्रेसी । पुढें कथा वर्तली कैसी । तें विस्तारेंसी मज सांगावें ॥१॥

सिद्ध म्हणे शिष्योत्तमा । काय सांगूं सद्‌गुरुची महिमा । आतां वर्णनाची झाली सीमा । परी गुरुभक्तिप्रेमा नावरे ॥२॥

श्रीगुरु सिद्ध झाले जावयासी । श्रीपर्वतीं यात्राउद्देशीं । हा वृत्तान्त नागरिक जनासी । कळला परियेसीं तात्काळ ॥३॥

समस्त जन आले धावत । नरनारी सर्व मिळाल्या बहुत । गुरुसी प्रार्थित अनेक भक्त । श्रीपर्वतासी स्वामी कां जातां ॥४॥

आम्हांसी भासतें व्यक्त । तुम्ही अवतार करितां समाप्त । निरंतर आपण असा अव्यक्त । परिजनांसी सुव्यक्त दिसत होतां ॥५॥

तुमचे चरणांचें होतां दर्शन । पातकांचें होतसे दहन । आतां कैसें करतील जन । म्हणोनि लोटांगणें घालिती ॥६॥

पुढें आम्हांस काय गति । आम्हीं तरावें कैशा रीतीं । स्वामीचे चरण नौका होती । तेणें पार उतरत होतों ॥७॥

तुम्ही भक्तास कामधेनूपरी । कामना पुरवीत होतां बरी । म्हणोनि जगले आजवरी । याउपरी आम्हीं काय करावें ॥८॥

स्वामीकरितां गाणगापूर । झालें होतें वैकुंठपूर । आतां दीपाविणें जैसें मंदिर । तैसें साचार होईल हें ॥९॥

माउलीविणें तान्हें बाळ । कीं देवाविणें देऊळ । जळाविणे जैसें कमळ । तैसें सकळ तुम्हांविणें ॥१०॥

माता पिता सकळ गोत । इष्‍टमित्र कुळदैवत । सर्वही आमुचा गुरुनाथ । म्हणोनि काळ क्रमित होतों ॥११॥

आपुल्या बाळकांसी अव्हेरुनी । कैसें जातां स्वामी येथुनी । अश्रुधारा लागल्या लोचनीं । तळमळती सकळ जन ॥१२॥

तेव्हां गुरु समस्त जनांप्रती । हास्यवदन करुनि बोलती । तुम्ही जनहो मानूं नका खंती । सांगतों यथास्थित तें ऐका ॥१३॥

आम्ही असतों याचि ग्रामीं । स्नान पान करुं अमरजासंगमीं । गौप्यरुपें रहातों नियमीं । चिंता कांहीं तुम्हीं न करावी ॥१४॥

राज्य झालें म्लेंच्छाक्रांत । आम्ही भूमंडळीं विख्यात । आमुचे दर्शनास बहु येथ । यवन सतत येतील पैं ॥१५॥

तेणें प्रजेस होईल उपद्रव । आम्ही अदृश्य रहातों यास्तव । ज्यास असे दृढ भक्तिभाव । त्यास दृश्य स्वभावें होऊं ॥१६॥

लौकिकामध्यें कळावयासी । आम्ही जातों श्रीशैल्यपर्वतासी । चिंता न करावी मानसीं । ऐसें समस्तांसी संबोधिलें ॥१७॥

मठीं आमुच्या ठेवितों पादुका । पुरवितील कामना ऐका । अश्वत्थवृक्ष आहे निका । तो सकळिकांचा कल्पतरु ॥१८॥

कामना पुरवील समस्त । संदेह न धरावा मनांत । मनोरथ प्राप्त होती त्वरित । ही मात आमुची सत्य जाणा ॥१९॥

संगमीं करुनिया स्नान । पूजोनि अश्वत्थनारायण । मग करावें पादुकांचें अर्चन । मनकामना पूर्ण होतील ॥२०॥

विघ्नहर्ता विनायक । आहे तेथें वरदायक । तीर्थें असती अनेक । पावाल तुम्ही सुख अपार ॥२१॥

पादुकांची करुनि पूजा । त्रिकाळ आरती करुनि ओजा । आमुचें वचन यथार्थ समजा । म्हणोनि द्विजांसी गुरु सांगती ॥२२॥

आम्ही येथेंच रहातों मठांत । हें वचन जाणावें निश्चित । ऐसें संबोधूनि जना आद्यंत । निघाले त्वरित गुरुराज पैं ॥२३॥

समागमें जे धावले जन । त्यांचें करुन समाधान । शिष्यांसहित त्वरित गतीनें । गेले निघून श्रीगुरु ॥२४॥

लोक माघारे परतले । समस्त गुरुच्या मठासी आले । तेथें समस्तांनीं गुरु देखिले । बैसले होते निजासनीं ॥२५॥

सवेंचि पहातां झाले गुप्त । जन मनीं परम विस्मित । आम्ही सोडूनि आलों मार्गांत । येथें गुरुनाथ देखिले ॥२६॥

सर्वव्यापी नारायण । त्रैमूर्ति अवतार पूर्ण । चराचरी श्रीगुरु आपण । भक्तांकारणें रुप धरिती ॥२७॥

ऐसा दृष्‍टान्त दावूनि जनांसी । आपण गेले श्रीशैल्यासी । पावले पाताळगंगेसी । राहिले त्या दिवसीं तेथें ॥२८॥

श्रीगुरु शिष्यांसी म्हणती । मल्लिकार्जुनासी जावोनि शीघ्र गतीं । पुष्पांचें आसन यथास्थितीं । करोनि निगुती आणावें ॥२९॥

शिष्य धावले अति शीघ्र । पुन्नागादि कंद कल्हार । करवीर बकुळ चंपक मंदार । पुष्पें अपार आणिलीं ॥३०॥

त्या पुष्पांचें केलें दिव्यासन । तें गंगाप्रवाहावरी केलें स्थापन । त्यावरी श्रीगुरु आपण । बैसले ते क्षणीं परमानंदें ॥३१॥

बहुधान्य संवत्सर माघमास । कृष्णप्रतिपदा शुभ दिवस । बृहस्पति होता सिंहराशीस । उत्तर दिशे होता सूर्य पैं ॥३२॥

शिशिर ऋतु कुंभ संक्रमण । लग्नघटिका सुलक्षण । ऐसे शुभमुहूर्तीं गुरु आपण । आनंदें प्रयाण करिते झाले ॥३३॥

मध्यें प्रवाहांत पुष्पासनीं । बैसोनि शिष्यास संबोधोनि । आमुचा वियोग झाला म्हणोनि । तुम्हीं मनीं खेद न मानावा ॥३४॥

त्या गाणगापुरांत । आम्ही असोच पूर्ववत । भावता दृढ धरा मनांत । तुम्हां दृष्‍टान्त तेथें होईल ॥३५॥

आम्ही जातों आनंदस्थानासी । तेथें पावलों याची खूण तुम्हांसी । फुलें येतील जिनसजिनसीं । तुम्हांस तो प्रसाद ॥३६॥

पुष्पांचें करिता पूजन । तुम्हां होईल देव प्रसन्न । भक्तिभावें करावी जतन । प्राणासमान मानुनी ॥३७॥

आणिक एक ऐका युक्ति । जे कोणी माझें चरित्र गाती । प्रीतीनें नामसंकीर्तन करिती । ते मज प्रिय गमती फार ॥३८॥

मजपुढें करितील गायन । जाणोनि रागरागिणी तानमान । चित्तीं भक्तिभाव धरुन । करिती ते मज कीर्तन परमानंदें ॥३९॥

भक्त मज फार आवडती । जे माझें कथामृत पान करिती । त्यांचे घरीं मी श्रीपती । वसतों प्रीतीनें अखंडित ॥४०॥

आमुचें चरित्र जो पठण करी । त्यास लाभती पुरुषार्थ चारी । सिद्धि सर्वही त्याच्या द्वारीं । दासीपरी तिष्‍ठतील ॥४१॥

त्यासी नाहीं यमाचें भय । त्यास लाभ लाभे निश्चय । पुत्रपौत्रांसहित अष्‍टैश्चर्य । अनुभवोनि निर्भय पावे मुक्ति ॥४२॥

हें वचन मानी अप्रमाण । तो भोगील नरक दारुण । तो गुरुद्रोही जाण जन्ममरण । दुःख अनुभवणें न सुटे त्यासी ॥४३॥

या कारणें असूं द्या विश्वास । सुख पावाल बहुवस । ऐसें सांगोनि शिष्यांस । श्रीगुरु तेथूनि अदृश्य झाले ॥४४॥

शिष्य अवलोकिती गंगेंत । तों दृष्‍टीं न दिसती श्रीगुरुनाथ । बहुत होवोनि चिंताक्रांत । तेथें उभे तटस्थ झाले ॥४५॥

इतुकियात आला नावाडी तेथ । तो शिष्या सांगे वृत्तान्त । गंगेचे पूर्वतीरीं श्रीगुरुनाथ । जात असतां म्यां देखिले ॥४६॥

आहे वेष संन्यासी दंडधारी । काषयांबर वेष्‍टिलें शिरीं । सुवर्णपादुका चरणामाझारीं । कांति अंगावरी फाकतसे ॥४७॥

तुम्हांस सांगा म्हणोनि । गोष्‍टी सांगितली आहे त्यांनीं । त्यांचे नांवें श्रीनृसिंहमुनि । ते गोष्‍टी कानीं आइका ॥४८॥

कळिकाळास्तव तप्त होउनी । आपण असतों गाणगाभुवनीं । तुम्हीं तत्पर असावें भजनीं । ऐसें सांगा म्हणोनि कथिलें ॥४९॥

प्रत्यक्ष पाहिले मार्गांत । तुम्ही कां झाले चिंताक्रांत । पुष्पें येतील जळांत । घेऊनि निवांत रमावें ॥५०॥

नावाडी यानें ऐसें कथिलें । त्यावरुनि शिष्य हर्षले । इतुकियांत गुरुप्रसाद फुलें । आलीं प्रवाहांत वाहत ॥५१॥

तीं परमप्रसादसुमनें । काढोनि घेतलीं शिष्यवर्गानें । मग परतले आनंदानें । गुरुध्यान मनीं करित ॥५२॥

सिद्धासी म्हणे नामधारक । पुष्पें किती आलीं प्रासादिक । शिष्य किती होते प्रमुख । तें मज साद्यंत सांगावें ॥५३॥

सिद्ध म्हणे नामधारका । तुवां भली घेतली आशंका । धन्य बा तुझ्या विवेका । होसी साधक समर्थ ॥५४॥

खूण सांगतों ऐक आतां । श्रीगुरु गाणगापुरीं असता । बहुत शिष्य होते गणितां । नाठवती ते ये समयीं ॥५५॥

ज्यांणीं केला आश्रमस्वीकार । ते संन्यासी थोर थोर । तीर्थें हिंडावया गेले फार । कृष्णबाळसरस्वती प्रमुख ते ॥५६॥

जे शिष्य झाले गृहस्थ केवळ । ते आपुल्या गृहीं नांदती सकळ । तारक होते श्रीगुरुनाथ प्रबळ । भक्त अपरिमित तारिले ॥५७॥

श्रीजगद्गुरुच्या समागमीं । चारीजण होतों आम्ही । सायंदेव नंदी नरहरी मी । श्रीगुरुची सेवा करीत होतों ॥५८॥

चौघांनीं घेतलीं पुष्पें चारी । गुरुप्रसाद वंदिला शिरीं । हीं पहा म्हणोनि पुष्पें करीं । घेऊनि झडकरी दिधलीं ॥५९॥

चौघांनीं चारी पुष्पांसी । मस्तकीं धरिलीं भावेंसी । आनंद झाला नामधारकासी । गुरुप्रसाद त्याचे दृष्‍टीं पडला ॥६०॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । सिद्ध नामधारकासी सांगत । श्रीगुरुप्रसाद झाला प्राप्त । द्विपंचाशत्तमोऽध्यायः ॥६१॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे प्रसादप्राप्तिर्नाम द्विपंचाशत्तमोऽध्यायः ॥५२॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ॥ ओवीसंख्या ॥६१॥