गीत दासायन

गीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.


प्रसंग ३

सूर्याजीपंतांचे देहावसान झाल्यानंतर काही दिवसातच "नारायणाचे लग्न करावे" असे राणूबाईंच्या मनात आले. त्यांनी आपला विचार ज्येष्ठ पुत्र गंगाधर यांना सांगितला. श्रेष्ठ म्हणाले, "आई, नारायण हा सामान्य मुलगा नाही. लग्नाचा विषय काढला की तो किती रागावतो हे तुला माहीत आहे." पण राणूबाईंनी ऐकले नाही. एकदा घरातच लग्नाची गोष्ट निघाली तेव्हा नारायण घराबाहेर पडला आणि थेट गावाबाहेर असलेल्या डोहाजवळच्या वटवृक्षावर उंच जागी जाऊन बसला. श्रेष्ठ गंगाधर त्याला नेण्यासाठी आले. त्यांना पाहताच नारायणाने डोहात बुडी मारली. डोहातील खडकावर कपाळ आपटून एक टेंगूळ आले. नारायण बुडताच सर्वत्र हाहाकार उडाला. डोहाच्या काठावरून श्रेष्ठांनी वात्सल्याने हाक मारली, 'नारायणा, वर ये.' ती ऐकताच नारायण वर आला आणि श्रेष्ठांच्या बरोबर घरी गेला. राणूबाईंनी त्याला जवळ घेतले आणि प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरविला. त्या म्हणाल्या, "नारायणा, तू माझे ऐकणार नाहीस का? निदान लग्नाचा अंतरपाट धरलेला तरी मला पाहू दे." नारायणाने आईच्या म्हणण्याला मान दिला. राणूबाईंनी आपल्या भावाच्या कन्येशी नारायणाचा विवाह निश्चित केला. लग्नाचा दिवस उजाडला. नवरा मुलगा बोहल्यावर उभा राहिला आणि सर्वजण म्हणू लागले, "शुभमंगल सावधान."

घोष करिति विप्र सर्व शुभमंगल सावधान

ऐकुनि तो नारायण झाला झणि सावधान ॥ध्रु०॥

सावधान सावधान ।

बावरला नारायण ।

सावरला त्याच क्षणी ।

पुसत मातुला ॥१॥

सावधान मी असता

सावध मज का करिता

सांगा मज घोष वृथा

काय चालला ॥२॥

परिसुनि हे नवल वचन

मुक्तहास्य करिति स्वजन

म्हणती "ही बेडि तुम्हा

आज घातली ॥३॥

आता नच स्वैर गमन

संसारी स्थिर आसन

संपलाच खेळ सर्व

ध्यानि हे धरा" ॥४॥

नारायण करि विचार

काय घडत हा प्रकार

अवधि नुरे परि पळभर

सोडि संभ्रमा ॥५॥

मातृवचन मानियले

यथासांग पाळियले

'झालो मी सावधान

चाललो अता' ॥६॥

अंतरपट उडवि क्षणी

लंघियला मंडप आणि

हां हां हां म्हणत जाइ

गगन भेदुनी ॥७॥