गीत दासायन

गीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.


प्रसंग १०

मातोश्रींच्या आणि बंधूंच्या प्रेमळ सहवासात काही दिवस काढल्यानंतर त्यांची अनुज्ञा घेऊन समर्थ पुन्हा संचाराला निघाले. मसूर प्रांतात मुक्काम असताना एका वाड्यात ते भिक्षेसाठी गेले. रामनामाचा जयजयकार केला. मालकीणबाईने बाहेर येऊन त्यांना बजावले. "भरल्या घरात 'राम राम' म्हणू नकोस." असा क्रम दहा दिवस चालला. बाई संताप सोडीना, समर्थ शांतपणा सोडीनात. शेवटी एक दिवस जयजयकारानंतरही बाई आली नाही म्हणून समर्थांनी पुन्हा जयजयकार केला तेव्हा बाईंनी समर्थांना सांगितले की. "घरच्या मालकांना मुसलमानी अधिकार्‍याने कैद करून विजापुरास नेले आहे." समर्थ म्हणाले, "आजपासून अकराव्या दिवशी तुमचे पती सुरक्षित घरी येतील. त्याबद्दल तुम्ही मला रामनामाची भिक्षा घाला." समर्थ तेथून निघाले आणि विजापूरच्या दरबारात प्रकट झाले. त्यांनी बाईंच्या पतींना सोडविले आणि त्यांच्यासह मसूरच्या वेशीपर्यंत आले. पतीला पाहून बाईंना आनंद झाला. ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांना आपण नाही नाही ते बोललो असे वाटून त्यांनी समर्थांचा धावा सुरू केला. "रामदास गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी."

रामदास गुरु माझे आई

मजला ठाव द्यावा पायी ॥ध्रु॥

गतजन्मीचे भाग्य उदेले

म्हणुनी सद्गुरु दारी आले

दैवे दिधले कर्मे नेले

काय करू मी चुकले बाई ॥१॥

मज मूढेला नाही कळले

मजवरुनी मी जग पारखिले

दुर्वचने मी स्वये बोलले

कधी भेटतिल कवण्या ठायी ॥२॥

क्षमा करा मज हे गुरुमाउली

करी दयाळा कृपा साउली

वाट पाहुनी दृष्टी थकली

धाव सत्वरी दर्शन देई ॥३॥