गीत दासायन

गीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.


प्रसंग १२

रंगनाथस्वामींच्या निगडीहून समर्थ परत चालले होते. वाटेत अंगापूरजवळ कृष्णातीरावर स्नानसंध्येसाठी थांबले असता डोहातुन ध्वनी आला, "तुम्हाला पाहिजे असलेली प्रभू रामचंद्राची मूर्ती या डोहात आहे." समर्थांनी तत्काळ डोहात उडी मारली आणि मूर्ती बाहेर काढली. मूर्ती झोळीत घालून ते चाफळ गावी गेले. पाहिजे तसा एकान्त आणि मनोहर वनश्री यामुळे समर्थांना हे गाव पसंत पडले. समर्थांनी या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची स्थापना केली. या गावाशेजारीच चार मैलांवर समर्थंची रामघळ ही प्रसिद्ध घळ आहे. या मंदिरासाठी समर्थांनी छत्रपतींच्याकडून एका किर्तनकाराने बिदागि म्हणून मिळविलेले तीनशे होन खर्च केले. मांडव्य नदीच्या दक्षिण तीरावर हे मंदिर आहे. या मंदिरासमोर समर्थांच्या अकरा मारुतीपैकी दास मारुती आहे. समर्थांचे या गावी पुष्कळ दिवस वास्तव्य होते. नंतरच्या काळात समर्थ सज्जनगड आणि चाफळ या दोनही ठिकाणी राहत असत. समर्थांनी स्वतः स्थापन केलेली अशी रामाची मूर्ती आणि ज्या मूर्तीला समर्थांच्या हातून पूजाअर्चा लाभली अशा या मूर्तीचे प्रत्येक भारतवासीयाने एकदा तरी दर्शन घेतलेले असावे. "उजळले भाग्यच भक्तांचे, बांधिले मंदिर रामाचे."

उजळले भाग्यच भक्तांचे,

बांधिले मंदिर रामाचे ॥ध्रु॥

अंगापुरिच्या कृष्णाडोही ।

श्रीरामाचे ध्यान प्रवाही ।

रामदास शोधिती लवलाही

गवसले परब्रह्म साचे ॥१॥

गर्द सभोत हरित तृणांकुर ।

भवति विखुरले रम्य गिरीवर ।

त्यामधि शोभे रघुपति मंदिर ।

हिर्‍याला कोंदण पाचूचे ॥२॥

सगुण प्रभूचे दर्शन होता ।

मिळे मानवा सहज मुक्तता ।

नरजन्माची हो सार्थकता ।

धन्यता ब्रह्मपदी नाचे ॥३॥