गीत दासायन

गीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.


प्रसंग १७

छत्रपती शिवाजीमहाराजांचा अहंकार नाहीसा झाल्याचे पाहून समर्थांना आनंद झाला आणि समर्थ स्वस्थानी परतले. काही दिवसांनंतर समर्थ महाबळेश्वरी असताना शिवाजीराजे त्यांच्या दर्शनासाठी आले. समर्थांनी ही गोष्ट अंतर्ज्ञानाने आधीच जाणली होती म्हणून ते अरण्यात निघून गेले होते. छत्रपतींनी स्वामींची चौकशी केली आणि त्यांच्या शोधासाठी एकटेच अरण्यात निघाले. बराच काळ अरण्यात घालविल्यानंतर शिवाजीमहाराज निराश झाले. परंतु दर्शन झाल्याशिवाय परतावयाचे नाही या दृढनिश्चयाने तसेच पुढे चालले. शेवटी अत्यंत करुण स्वरात विव्हळणारे समर्थ एका वृक्षाखाली बसलेले त्यांना दिसले. शिवबांनी जवळ जाऊन नम्रतेने त्यांना विचारले तेव्हा समर्थ म्हणाले, "हे माझे दुखणे असाध्य आहे. यावर औषध नाही. वाघिणीचे दूध एवढे एकच औषध उपयोगी पडणारे आहे, पण ते कसे मिळणार?" असे म्हणून समर्थ पुन्हा विव्हळू लागले. छत्रपती तसेच अरण्यात शिरले आणि वाघाच्या गुहेपाशी जाऊन थांबले. आपल्या गुहेपाशी माणूस आलेला पाहून वाघिणीने शिवबांना ओरबाडले. छत्रपतींनी वाघिणीला नम्रपणे विनंती केली आणि सांगितले, "माझ्या गुरुजींसाठी थोडेसे दूध दे." वाघिणीचे दूध काढून शिवबा परत फिरले तोच त्यांच्या कानावर "जयजय रघुवीर समर्थ" अशी समर्थांची प्रेमळ वाणी पडली. "सदैव सद्गुरुचरणी वाहिले जीवन शिवबांचे, काढिले दूध वाघिणीचे."

सदैव सद्गुरुचरणी वाहिले जीवन शिवबांचे

काढिले दूध वाघिणीचे ॥ध्रु०॥

गुरुदर्शन मज नित्य घडावे

गुरुसेवेतच सतत रमावे

अशी मनीषा अविरत नांदवि, मानस शिवबांचे ॥१॥

ध्यास मानसी धरुन निघाले

समर्थाश्रमी शिवबा आले

परी न त्यांना दर्शन घडले गुरुपदकमलांचे ॥२॥

एका जागी कधी न वसती

भुवनत्रयि जे नित संचरती

कसे घडावे दर्शन सुखकर । सहज सुलभ त्यांचे ॥३॥

निबिड वनांतरि शोधशोधिले

अवचित त्यांना सन्मुख दिसले

व्यथित व्याधिने व्याकुळलेले ध्यान समर्थांचे ॥४॥

धावत शिवबा सन्निध गेले

गुरुचरणांना स्पर्शुनि वदले

आज असे का मुख विन्मुखले सद्गुरुराजांचे ॥५॥

स्वामी म्हणती ऐक नरेशा

कोण निवारिल रे यमपाशा

नुरली आशा औषध दुर्लभ दूध वाघिणीचे ॥६॥

त्वरित निघाले श्रीशिवभूपति

निबिड वनांतरि व्याघ्रगुहेप्रति

घोर गर्जना ऐकुनि स्मरती चरण समर्थांचे ॥७॥

वाघिण झेपावे शिवबावरि

क्रोधावेशे झोंबे शरिरि

ढळला परि नच नृपति तिळभरी फल दृढ श्रद्धेचे ॥८॥

गुरुभक्तीची सीमा झाली

निष्ठुर वाघीण कपिला बनली

प्रकटुनि पाहति श्रीगुरुमाउली कौतुक शिष्याचे ॥९॥