हरिविजय

श्रीधरांसारखा भगवंताच्या भक्तिप्रेमात न्हाऊन गेलेला अजोड कवी, गोपालकृष्णाच्या अति गोड लीलांचे वर्णन करतो, तेव्हा काय बहार येते.


अध्याय ३१

श्रीगणेशाय नमः ॥

ओं नमोजी सद्गुरुपंचाक्षरा ॥ श्रीब्रह्मानंदा सौख्यसमुद्रा ॥ तूं परात्परसोइरा ॥ नामरुपातीत जो ॥१॥

नाम रुप गुण वर्ण ॥ तुझे ठायीं नाहींत मुळींहून ॥ सच्चिदानंदघन पूर्ण ॥ हेंही बोलणें न साहे ॥२॥

अनंत ब्रह्मांडें कडोविकडी ॥ माया तुझी घडी मोडी ॥ परी तूं तिकडे एक घडी ॥ न पाहसी विलोकूनि ॥३॥

परी जीव पडिले अविद्येच्या फांसा ॥ त्यांसी उद्धरावया जगदीशा ॥ द्वारकेमाजी पुराणपुरुषा ॥ अवतरलासी म्हणोनि ॥४॥

सांडोनियां योगनिद्रा ॥ सगुण जाहलासी यादवेंद्रा ॥ मन्मथजनका त्रिभुवनसुंदरा ॥ विश्वोद्धारा विश्वेशा ॥५॥

तिसाविये अध्यायीं कथन ॥ सत्यभामेनें केलें कृष्णदान ॥ तुळेवरी तुळसीपत्र ठेवून ॥ रुक्मिणीनें कृष्ण सोडविला ॥६॥

यावरी एकदां कमलोद्भवसुत ॥ जो व्यासवाल्मीकांचा गुरु सत्य ॥ ध्रुव प्रल्हाद परम भक्त ॥ ज्याच्या अनुग्रहें उद्धरलें ॥७॥

चतुर्दश विद्या चौसष्ट कळा ॥ करतळामळ जयासी सकळा ॥ ज्याची ऐकतां गायनकळा ॥ ब्रह्मा हरि हर डुल्लती ॥८॥

चारी वेद मुखोद्गत ॥ सर्व शास्त्रीं पारंगत ॥ सामर्थ्य तयाचें अद्‌भुत ॥ त्रैलोक्य वंदी जयासी ॥९॥

भुतभविष्यवर्तमानज्ञान ॥ हें ज्यापुढें उभें कर जोडून ॥ न लागातांचि एक क्षण ॥ ब्रह्मांड मोडोनि रची पुढती ॥१०॥

अन्याय देखतांचि सत्वरा ॥ जो शिक्षा करी विधिहरिहरां ॥ ज्ञानी कृपाळु ऐसा दूसरा ॥ ब्रह्मांडोदरामाजी नसे ॥११॥

ऐसा तो नारद मुनीश्वर ॥ तीर्थें करीत समग्र ॥ दक्षिणसमुद्रीं रामेश्वर ॥ तेथें सत्वर पातला ॥१२॥

तों तेथें देखिला समीरसुत ॥ जो ज्ञानी भक्त विरक्त ॥ जो श्रीरामाचा प्रियपात्र ॥ प्राणांहूनि पलीकडे ॥१३॥

तो दक्षिणसमुद्रीं करी अनुष्ठान ॥ अंतरीं आठविलें श्रीरामध्यान ॥ नेत्रीं वाहे प्रेमळ जीवन ॥ वेधलें मन श्रीरामीं ॥१४॥

तों ब्रह्मनंदन आला तेथें ॥ तें अंतरीं कळलें हनुमंतातें ॥ ध्यान विसर्जुनि नारदातें ॥ भेटावया धांविन्नला ॥१५॥

घरा आलिया संतजन ॥ जे हरीसी आवडती प्राणांहून ॥ त्यांचा अव्हेर करुनियां जाण ॥ जो कां ध्यान करुं बैसे ॥१६॥

तोचि दुरात्मा खळ निर्धारीं ॥ हरि म्हणे तो मुख्य माझा वैरी ॥ जो माझ्या संतांचा अपमान करी ॥ मी नानाप्रकारें निर्दाळीं त्यांतें ॥१७॥

करुनि संतांचा अनादर ॥ जो माझी पूजा करी पामर ॥ पूजा नव्हे तो लत्ताप्रहर ॥ तेणें मज समर्पिला ॥१८॥

ओलांडूनि पूजा समग्र ॥ जो संतांचा करी परमादर ॥ तेणें कोटि मखांचें फळ निर्धार ॥ मज समर्पिलें ते दिवसीं ॥१९॥

असो उठोनियां हनुमंत ॥ प्रेमें नारदाचे चरण धरीत ॥ दोघे भेटले तेव्हां अद्‌भुत ॥ प्रेमरस न सांवरे ॥२०॥

दोघेही योगी परम निर्धारीं ॥ दोघेही बाळब्रह्मचारी ॥ दोघेही आवडती श्रीहरी ॥ इंदिरेहूनि अत्यंत ॥२१॥

दोघेही केवळ भक्त ॥ दोघेही ज्ञानी अति विरक्त ॥ दोघेही विचरति नित्यमुक्त ॥ पुरुषार्थ अद्‌भुत दोघांचा ॥२२॥

एक हरि एक उमावर ॥ कीं एक मृगांक एक मित्र ॥ तैसे दोघे नारद वायुकुमर ॥ क्षेमालिंगन पैं देती ॥२३॥

हनुमंतें तृणासन घालून ॥ वरी बैसविला ब्रह्मनंदन ॥ प्रेमेंकरुनि चरणक्षालन ॥ केलें पूजन यथाविधि ॥२४॥

नारद म्हणे हनुमंतातें ॥ कैसा तूं काळ क्रमितोसी येथें ॥ ऐसें ऐकतां वायुसुतें ॥ सप्रेम चित्त होवोनि बोले ॥२५॥

श्रीरामअवतार संपलियावरी ॥ मी राहिलों दक्षिणसागरीं ॥ श्रीरामचरित्र आठवितां अंतरीं ॥ हृदय होत सद्गद ॥२६॥

एकबाण एकवचन ॥ एकपत्‍नीव्रत रघुनंदन ॥ जो सत्याचा सागर पूर्ण ॥ स्वानंदघन रुप ज्याचें ॥२७॥

ऐसें सांगतां हनुमंत ॥ प्रेमभरें दाटला अत्यंत ॥ नारद म्हणे रामकथामृत अद्‌भुत ॥ तेथें बुडी देईं सदा ॥२८॥

आणि पृथ्वीवरी तीर्थें बहुत ॥ तीं एकदां विलोकीं समस्त ॥ तीर्थीं भेटती साधुसंत ॥ जे कां डुल्लती ब्रह्मानंदें ॥२९॥

संतदर्शन सर्वांत सार ॥ यालागीं तीर्थें करी समग्र ॥ ऐसें बोलोनि ब्रह्मपुत्र ॥ निराळपंथें चालिला ॥३०॥

मुखीं श्रीरामगुण गात ॥ द्वारकेसी आला अकस्मात ॥ कृष्णें देखतां जलजोद्भवसुत ॥ आसनीं बैसवूनि पूजिला ॥३१॥

हरि पुसे सकळ वर्तमान ॥ नारद म्हणे धुंडिलें त्रिभुवन ॥ कृष्णातीर्थें करितां संपूर्ण ॥ सेतुबंधासी पावलों ॥३२॥

तेथें देखिला श्रीरामभक्त ॥ महायोगी वीर हनुमंत ॥ काय वर्णूं त्याचे गुण अद्‌भुत ॥ ऐसा विरक्त दुसरा नाहीं ॥३३॥

तो तीर्थें करीत यादवेंद्रा ॥ येईल तुमच्या निजनगरा ॥ हरि शोधितां या ब्रह्मांडोदरा ॥ ऐसा दुसरा न भेटे ॥३४॥

ऐसें ऐकतां जगजेठी ॥ नारदाचे कंठीं घातली मिठी ॥ म्हणे तो केव्हां देखेन दृष्टी ॥ सांगसी गोष्टी जयाच्या ॥३५॥

नारदा ऐसिया भक्तावरुन ॥ वाटे ओंवाळूनि टाकावा प्राण ॥ सद्गद जाहला जगज्जीवन ॥ मग ब्रह्मनंदन बोलिला ॥३६॥

भक्तवल्लभाराजीवनयना ॥ तो त्वरितचि येईल तुमच्या दर्शना ॥ असो इकडे हनुमंत तीर्थाटना ॥ निघता जाहला तेधवां ॥३७॥

संपूर्ण पाहोनि दक्षिणमानस ॥ हनुमंत आला गौतमीतीरास ॥ ज्योतिर्लिंग त्र्यंबक विशेष ॥ महिमा ज्याचा न वर्णवे ॥३८॥

देखोनि पंचवटीस्थान ॥ हृदयीं गहिंवरे वायुनंदन ॥ म्हणे येथें माझ्या स्वामीनें राहून ॥ दंडकारण्य उद्धरिलें ॥३९॥

पुढें पश्चिमपंथें चालिला मारुती ॥ तों दृष्टीं देखिलीं द्वारावती ॥ जैसी अयोध्या पूर्वीं देखिली होती ॥ तैसी निश्चितीं दिसे हे ॥४०॥

लक्षावधि कळस एकसरें ॥ झळकती रत्‍नखचित गोपुरें ॥ अहोरात्र मंगळतुरें ॥ द्वारकेमाजी गर्जती ॥४१॥

चित्रविचित्र मंदिरें ॥ आळोआळीं झळकति सुंदरें ॥ नीळरत्‍नांचीं मयूरें ॥ प्राण नसतां धांवती ॥४२॥

पाचूंचे रावे घरोघरीं ॥ नाना शब्द करिती कुसरी ॥ कम्पवृक्ष दारोदारीं ॥ अहोरात्र डुल्लती ॥४३॥

ऐसी द्वारकापुरी देखोन ॥ संतोषला अंजनीहृदयरत्‍न ॥ पुढें गोमतीतीरीं येऊन ॥ उभा ठाकला नावेक ॥४४॥

तों ऋषि ध्यानस्थ बैसले सकळ ॥ जैसे गभस्ती उगवले निर्मळ ॥ कीं मानससरोवरीं मराळ ॥ ओळीयें जैसे विराजती ॥४५॥

हनुमंतें सारुनि संध्यास्नान ॥ केलें रघुनाथाचें ध्यान ॥ मग सकळ द्विजांसी कर जोडून ॥ करी नमन हनुमंत ॥४६॥

परम नम्र विनीत होऊन ॥ द्विजांसी पुसे वायुनंदन ॥ म्हणे या नगराचें नाम कवण ॥ सांगावें जी आम्हांतें ॥४७॥

कोण राजा नांदतो येथें ॥ काय नाम तीर्थातें ॥ देखोनि विचित्र वानरातें ॥ आश्चर्य ऋषींतें वाटत ॥४८॥

म्हणती वानरवेष दिसत ॥ परी चतुर ज्ञानी पंडित ॥ बोलका जैसा अंगिरासुत ॥ महाविरक्त दिसतो हा ॥४९॥

संतोषोनि मुनि बोलती ॥ नगरा नाम द्वारावती ॥ येथें नृप यदुपती ॥ पूर्णावतार आठवा ॥५०॥

नदी नाम गोमती सत्य ॥ पैल चक्रतीर्थ पुण्यवंत ॥ येथें ज्या प्राणियाच्या अस्थि पडत ॥ चक्रें होती तयांचीं ॥५१॥

असो ब्राह्मणांसी करुनि नमन ॥ द्वारकेभोंवतें दिव्य जें वन ॥ लोकप्राणेशनंदन ॥ फळें देखोनि संतोषला ॥५२॥

सदाफळ वृक्ष विराजत ॥ उंच गेले गगन भेदीत ॥ त्यांमाजी प्रवेशला श्रीरामभक्त ॥ फळभक्षणार्थ तेधवां ॥५३॥

दिव्य वृक्षावरी बैसोन ॥ केलें यथेष्ट फळभक्षण ॥ महातरुंच्या शाखा मोडून ॥ फळें झोडून टाकिलीं ॥५४॥

फळें घेऊनि निजकरीं ॥ वनरक्षकांवरी झुगारी ॥ वांकुल्या दावी नानापरी ॥ नेत्र वटारी तयांकडे ॥५५॥

चक्राकार मारी उडी ॥ पुच्छ नाचवी कडोविकडी ॥ मान घुलकावी घडिघडी ॥ मग वनकर तांतडी धांवले ॥५६॥

वानरें विध्वंसिलें तरुवर ॥ वनरक्षक मिळाले अपार ॥ म्हणती कैंचें आलें हें वानर ॥ बहुत चार मांडिले ॥५७॥

म्हणती वानरा ऐक वचन ॥ तुवां विध्वंसिलें दिव्य वन ॥ तुज ताडितील राजनंदन ॥ मीनकेतनसांबादि ॥५८॥

राघवप्रिय म्हणे तयांप्रती ॥ कोण येथें नांदतो नृपती ॥ येरु म्हणती राम आणि श्रीपती ॥ अतिपुरुषार्थी बंधु दोघे ॥५९॥

ऐसें वनकर बोलती ॥ मग वज्रदेही बोले तयांप्रती ॥ श्रीराम एक दाशरथी ॥ सूर्यवंशीं अवतरला ॥६०॥

माझ्या रामाचा नामधारी ॥ ऐसा कोण आहे उर्वीवरी ॥ नांवा सांगा रे झडकरी ॥ नाहीं तरी नगरी न उरेचि ॥६१॥

पाषाण लागतां श्रीरामचरणा ॥ उद्धरली गौतमाची ललना ॥ जे सरसिजोद्भवाची कन्या ॥ ते रघुनंदनें तारिली ॥६२॥

माझ्या रामाचें नाम घेतां ॥ गणिका उद्धरली तत्त्वतां ॥ जेणें मर्दिलें पौलस्तिसुता ॥ देवां समस्तां सोडविलें ॥६३॥

एक जानकी वेगळीकरुन ॥ सकळ स्त्रिया कौसल्येसमान ॥ त्या रामाचें नामाभिधान ॥ धरील कोण दूसरा ॥६४॥

तों वनकर बोलती ते वेळां ॥ तो राम पूर्वीं आम्हीं ऐकिला ॥ दशरथें बाहेर घातला ॥ सवें मेळा मर्कटांचा ॥६५॥

सीते सीते म्हणोन ॥ आलिंगी वनीं वृक्षपाषाण ॥ आमुचा बळिराम बळकट पूर्ण ॥ यदुवंशीं अवतरला ॥६६॥

ऐसें ऐकतांचि वचन ॥ क्रोधावला सीताशोकहरण ॥ भीमरुप अंजनीनंदन ॥ प्रकट करिता जाहला ॥६७॥

म्हणे हे द्वारकानगरी ॥ पालथी घालीन समुद्रीं ॥ पुच्छ आपटिलें धरणीवरी ॥ प्रतिशब्द अंबरी ऊठिला ॥६८॥

वानर देखोनि विशाळ ॥ वनकर पळाले सकळ ॥ म्हणती आला महाकाळ ॥ कृष्णाजवळी सांगों गेले ॥६९॥

तों येरीकडे मेघश्याम ॥ करीत स्नानसंध्यादि सत्कर्म ॥ देवाची पूजा परब्रह्म ॥ स्वयें आपण करीतसे ॥७०॥

एकदां अवघे भक्त मिळोनि ॥ हरीसी विनविती कर जोडूनी ॥ म्हणती तूं जगज्जीवन कैवल्यदानी ॥ पुराणपुरुष जगद्‌गुरु ॥७१॥

तरी तुम्ही एकांतीं बैसोन ॥ नित्य करितां देवार्चन ॥ तूं देवाधिदेव परिपूर्ण ॥ करिसी ध्यान कवणाचें ॥७२॥

तेथें उपकरणसामग्री आणूनी ॥ स्वयें देत मन्मथजननी ॥ तरी देवतार्चन नयनीं ॥ आम्हांलागूनि दाविंजे ॥७३॥

मग उघडिलें देवसदन ॥ आंत आले भक्तजन ॥ तों रत्‍नजडित देव्हारा संपूर्ण ॥ मूर्ती सगुण भक्तांच्या ॥७४॥

प्रल्हाद नारद पराशर ॥ व्यास वाल्मीक सनत्कुमार ॥ अंबरीष रुक्मांगद हरिश्चंद्र ॥ मूर्ती सुंदर भक्तांच्या ॥७५॥

भीष्म दाल्भ्य शुक शौनक ॥ ध्रुव धर्म भीमार्जुनादिक ॥ भरत विदूरथ गुहक ॥ परम सात्त्विक भक्तमूर्ती ॥७६॥

बळी उपमन्यु बिभीषण ॥ उद्धव अक्रूर वायुनंदन ॥ सुग्रीव जांबुवंत वालिनंदन ॥ मूर्ती सगुण भक्तांच्या ॥७७॥

ऐसें हरीचें देवतार्चन ॥ समस्त भक्तीं देखोन ॥ सकळ प्रेमें दाटती पूर्ण ॥ धरिती चरण हरीचे ॥७८॥

म्हणती हरि कमलपत्राक्षा ॥ सच्चिदानंदा सर्वसाक्षा ॥ परात्मया निर्विकल्पवृक्षा ॥ कौतुकदीक्षा दाविसी ॥७९॥

हरि म्हणे भक्तांविण ॥ मी कवनाचें करुं ध्यान ॥ भक्तांविण चिंतन ॥ मज नाहीं दुजयाचें ॥८०॥

असो अग्निहोत्रादिक कर्में ॥ गोभूहिरण्यदानसंभ्रमें ॥ त्या श्रीकृष्णें आत्मयारामें ॥ वेदाज्ञेनें चालिजे ॥८१॥

दिव्य वस्त्रें अलंकार सर्व ॥ लेवविती अक्‍रुर उद्धव ॥ सभेसी चालिला दयार्णव ॥ रमाधव ते वेळे ॥८२॥

उद्धव अक्‍रुरांचा धरुनि कर ॥ स्थिर स्थिर चालत यादवेंद्र ॥ गवाक्षद्वारें गोपी समग्र ॥ हरीचें वक्र विलोकिती ॥८३॥

उद्धवासी म्हणे भगवंत ॥ आजि उत्तम शकुन होती बहुत ॥ वामनेत्र घडिघडी लवत ॥ बाहु स्फुरत वेळोवेळां ॥८४॥

वृक्षःस्थळीं येतें स्फुरण ॥ न कळे कवणासी आजि भेटेन ॥ वाटतें बहुत समाधान ॥ तों उद्धव वचन बोलत ॥८५॥

जगद्वंद्या जगज्जीवना ॥ पद्मजजनका मनमोहना ॥ भक्तप्रियकरा मधुसूदना ॥ न कळे कोणा भेटसी ॥८६॥

असो सभेसी येतां भगवंत ॥ जयजयकारें घोष होत ॥ दुंदुभी गजरें वाजत ॥ बंदीजन गर्जती ॥८७॥

उठोनि उभे ठाकले समस्त ॥ हरि सिंहसनीं बैसत ॥ नारदसनत्कुमारादि भक्त ॥ वाट पाहत हरीची ॥८८॥

सामगायन परम सुंदर ॥ करिती नारद आणि तुंबर ॥ तंव ते वनकर समग्र ॥ गार्‍हाणें सांगो पातले ॥८९॥

हरीसी करुनि नमस्कार ॥ बद्धांजळी ठाकले समग्र ॥ मग भ्‍रुसंकेतें श्रीधर ॥ तयांप्रती पुसतसे ॥९०॥

तंव ते म्हणती जगज्जीवना ॥ एक वानर आलें जी वना ॥ फळें भक्षूनि वृक्ष नाना ॥ मोडूनियां टाकिले ॥९१॥

तेणें पुसिलें आम्हां समस्तांतें ॥ कोण नृप नांदतो येथें ॥ त्याचीं वचनें ऐकोनि आम्हांतें ॥ परम आश्चर्य वाटलें ॥९२॥

बोलका जैसा बृहस्पती ॥ तेजस्वी जैसा गभस्ती ॥ वानरवेष परी शक्ती ॥ कृतांततुल्य दिसतसे ॥९३॥

तुमचा तयासी पुरुषार्थ ॥ आम्ही सांगितला जी बहुत ॥ कीं बळिराम आणि कृष्णनाथ ॥ अद्‌भुत महायोद्धे येथें ॥९४॥

रामाचें नाम ऐकतां साचार ॥ क्षोभला जैसा प्रळयरुद्र ॥ म्हणे एक रविवंशीं राम थोर ॥ जेणें दशकंधर मारिला ॥९५॥

त्या रामाचें नाम धरी ॥ ऐसा कोण आहे पृथ्वीवरी ॥ आतां बंधूचें नाम सांगा झडकरी ॥ नातरी गति बरी न दिसे ॥९६॥

आश्चर्य करी श्रीधर ॥ तुम्ही बहुत एकला वानर ॥ येरु म्हणती त्यासमोर ॥ मशक वनकर सर्व आम्ही ॥९७॥

कोण समोर पाहील त्यास ॥ सर्वांचा एकदांचि करील ग्रास ॥ ऐसें ऐकतां जगन्निवासें ॥ गरुडाकडे विलोकिलें ॥९८॥

गरुडाचें मनीं गर्व थोर ॥ कीं मी एक पुरुषार्थीं द्विजेंद्र ॥ हें जाणोनि इंदिरावर ॥ वचन काय बोलिला ॥९९॥

म्हणे सुपर्णा तूं परम पुरुषार्थी ॥ तुजाऐसा नाहीं त्रिजगतीं ॥ सत्वर जाऊनि वनाप्रती ॥ वानर धरुनि आणावें ॥१००॥

तूं एकलाचि त्यासी आणिसी ॥ कीं दळभर कांहीं संगें नेसी ॥ आवेश आला उरगरिपूसी ॥ काय हरीसी बोलत ॥१॥

पडल्या आकाशासी धीर ॥ बळें देणार मी पक्षींद्र ॥ त्या मज पाठवितां आणावया वानर ॥ हेंचि अपूर्व वाटतें ॥२॥

पहा सभानायक सकळ ॥ धरुनि आणितों गोलांगूळ ॥ हरिसी नमूनि तत्काळ ॥ निराळमार्गें उडाला ॥३॥

वेगें वनांत प्रवेशे सुपर्ण ॥ तों पाठमोरा बैसला वायुनंदन ॥ फळें झेलीत कौतुकें करुन ॥ श्रीरामगुण मुखीं गात ॥४॥

तों खगपति म्हणे रे वानरा ॥ वन विध्वंसिलें तुवां पामरा ॥ पळविलें सकळ वनकरां ॥ फळें सकळ भक्षिलीं ॥५॥

परम अन्यायी तूं वानर ॥ तुज शिक्षा लावीन साचार ॥ ऐसें बोलतां वायुपुत्र ॥ हास्यवक्‍त्र बोलिला ॥६॥

मग समीरात्मज बोले तयातें ॥ बहुत जल्पसी तूं पुरुषार्थे ॥ परी तुझें नाम सांग आम्हांतें ॥ कोणें तूंतें पाठविलें ॥७॥

येरु म्हणे माझा पुरुषार्थ ॥ जाणे त्रिभुवन समस्त ॥ मी द्विजेंद्र कश्यपसुत ॥ असें दूत श्रीरंगाचा ॥८॥

म्यां देव विभांडूनि समस्त ॥ पुरुषार्थें नेलें अमृत ॥ माझ्या भेणें भोगींद्र भयभीत ॥ पृथ्वीखालीं दडाला ॥९॥

हनुमंत म्हणे स्वमुखेंकरुन ॥ जो आपुला पुरुषार्थ वर्णी आपण ॥ तो शतमूर्खांहूनि अज्ञान ॥ परम दूषण तयासीं ॥११०॥

बळ यश कीर्ति धर्म ॥ पुरुषार्थ विद्या आपुली परम ॥ आत्ममुखेंवर्णी तो अधम ॥ तुजऐसा जाण पां ॥११॥

गरुड म्हणे गोलांगूला ॥ मरणसमयीं तुज फांटा फुटला ॥ हनुमंत म्हणे रे पांखरा तोंडाळा ॥ समीप मृत्यु आला तुज ॥१२॥

ऐसें ऐकतांचि खगेंद्र ॥ अंबरीं उडोनि गर्जे थोर ॥ तेणें नादें अंडज वनचर ॥ भयभीत जाहले ॥१३॥

हनुमंतावरी अकस्मात ॥ वेगें लोटला विनतासुत ॥ जबडा चंचूनें झडपीत ॥ परी किंचित न हाले ॥१४॥

जैसा पर्वतावरी भ्रमर देखा ॥ कीं महावृक्षावरी मक्षिका ॥ कीं गजस्कंधीं पिपीलिका ॥ वायुसुता तैसें वाटे ॥१५॥

ऐसा क्षण एक जाहला ॥ हनुमंतें सुपर्ण पायीं धरिला ॥ कंठीरवें उचलिला ॥ वारण जैसा अकस्मात ॥१६॥

कासावीस गरुड होत ॥ नेत्र मिचकावूनि मुख पसरीत ॥ हनुमंतें भोवंडूनि अकस्मात ॥ समुद्रामाजी टाकिला ॥१७॥

द्वारकेपासूनि भिरकाविला ॥ साठ सहस्त्र योजनें दूर पडिला ॥ बहुत कासावीस जाहला ॥ बुडों लागला सागरांत ॥१८॥

श्वासोच्छ्‌वास कोंडोन ॥ मागुती वरता येत सुपर्ण ॥ म्हणे म्यां जो केला अभिमान ॥ तें फळें पूर्ण पावलों ॥१९॥

कोणीं विद्यामदें जाहले मस्त ॥ एक धनमदें बहु उन्मत ॥ त्यांसी शिक्षा करी भगवंत ॥ अभिमान किंचित धरितांचि ॥१२०॥

असो गरुड स्मरण करी ॥ म्हणे धांव धांव मधुकैटभारी ॥ भक्तवत्सला श्रीहरी ॥ कां मजवरी कोपलासी ॥२१॥

दिशा न कळती गरुडालागूनी ॥ तो द्वारावतीचें तेज देखे नयनीं ॥ मग तैसाचि उडाला गगनीं ॥ श्रीकृष्णस्मरण करीतचि ॥२२॥

म्हणे वनावरुनि जातां ॥ तरी तो धरील मागुता ॥ म्हणूनि तो मार्ग सांडोनि तत्त्वतां ॥ आणिका पंथें चालिला ॥२३॥

चांचरी जात सुपर्णं ॥ महाद्वारीं पडे मूर्च्छा येऊन ॥ हरीसी जाणविती सेवकजन ॥ लोळे सुपर्ण महाद्वारीं ॥२४॥

सेवकीं लवलाहीं उचलोनि ॥ आणोनि घातला हरिचरणीं ॥ मग सावध करी चक्रपाणी ॥ उदक नेत्रीं लावूनियां ॥२५॥

म्हणे काय जाहला रे वृत्तांत ॥ गरुड थरथरां कांपत ॥ वदनीं बोबडी वळत ॥ शब्द त्रुटित येतसे ॥२६॥

म्हणे जी पुराणपुरुषोत्तमा॥ जरी क्रोध आला होता तुम्हां ॥ तरी मज येथेंचि मेघश्यामा ॥ शिक्षा करावी होती स्वहस्तें ॥२७॥

मज वानराहातीं मार ॥ करविला आजी प्रचंड थोर ॥ मग हास्यमुखें बोले श्रीधर ॥ गरुडाप्रति तें ऐका ॥२८॥

काय गरुडा बोलतोसी ॥ कीं विनोदें आम्हां हांससी ॥ तुझेनि बळें मी कोणासी ॥ इंद्रादिकांसी न गणींच ॥२९॥

तुझिया बळेंकरुनी ॥ मी बळकट जाहलों त्रिभुवनीं ॥ त्वां बहुतेक वानर आणिलें बांधोनी ॥ मिथ्या संपादणी करितोसी ॥१३०॥

तुजयोग्य नव्हे हें काज ॥ परी म्यां तुज पाठविलें सहज ॥ गरुडा तुझें प्रतापतेज ॥ न सोसवेचि कोणातें ॥३१॥

कीं वानर जिवें मारिलें ॥ किंवा उठवूनि पळविलें ॥ गरुडें डोळां अश्रु आणिले ॥ हांसों लागले सभाजन ॥३२॥

गरुड म्हणे मजवरी ॥ कां कोप अजूनि कंसारीं ॥ हरि म्हणे ना भीं धीर धरीं ॥ वर्तमान तरी सांगें कां ॥३३॥

येरु म्हणे हरि तो कृतांत ॥ वानरवेषें आला येथ ॥ आतां हे द्वारका समस्त ॥ घालील समुद्रांत पालथी ॥३४॥

त्यासीं भिडे समरांगणीं ॥ ऐसा वीर न दिसे त्रिभुवनीं ॥ मज सागरीं दिधलें भिरकावूनी ॥ पायी धरुनि सर्वेशा ॥३५॥

हरि म्हणे खगेशा ॥ तुझा आम्हांसी थोर भरंवसा ॥ तुझी जाहली ऐसी दशा ॥ आम्हां तो कैसा आटोपे ॥३६॥

नारदाकडे पाहोनी ॥ क्षणक्षणां हांसे चक्रपाणी ॥ तंव तो विनोदेंकरुनी ॥ शेंडी कांडोळी घडोघडी ॥३७॥

नारद म्हणे नाम सांडिल्याविण ॥ तो कदापि न जाय तेथून ॥ हरि म्हणे बळकट आमुचा सुपर्ण ॥ त्याची गति हे जाहली ॥३८॥

मग बळिरामासी म्हणे श्रीधर ॥ कैसा करावा आतां विचार ॥ क्रोधें बोले बळिभद्र ॥ क्षणांत वानर आणितों मी ॥३९॥

एक्याचि घायें सदट ॥ आतांचि चूर्ण करीन मर्कट ॥ तों हरीचा पुत्र वरिष्ठ ॥ प्रद्युम्न बोलता जाहला ॥१४०॥

काय काढिलें वानर ॥ मज आज्ञा करावी सत्वर ॥ न लागतांचि क्षणमात्र ॥ धरुनि आतां आणितों ॥४१॥

तयांचा गर्व जाणोनि माधव ॥ म्हणे तुम्ही जा रे सर्व यादव ॥ प्रद्युम्नसांबादि पुत्र सर्व ॥ सिद्ध जाहले तेधवां ॥४२॥

सिद्ध केलें चतुरंगदळ ॥ धडके वाद्यांचा कल्होळ ॥ लोक पाहों धांवती सकळ ॥ अद्‌भुत नवल वर्तलें ॥४३॥

निजभारेंसी यादव ॥ समुद्रतीरा आले सर्व ॥ तंव तो हनुमंत बलार्णव ॥ समस्त वीरीं देखिला ॥४४॥

तो दशकंठरिपूचें प्रियपात्र ॥ उन्मनींत लावूनियां नेत्र ॥ मनीं आठवूनि रामचरित्र ॥ पाठिमोरा बैसला ॥४५॥

भुजादंड कवळी ॥ घडि घडी पाठ कुरवाळी ॥ यादवांसी वांकुल्या वेळोवेळीं ॥ परतोनियां दावीतसे ॥४६॥

यादव म्हणती वानरा धीटा ॥ रामाचें नांव सोडवितोसी मर्कटा ॥ तुवां बहुत मांडिल्या चेष्टा ॥ शिक्षा आतां लावूं तूतें ॥४७॥

गदगदां हांसे हनुमंत ॥ वीर तरी येथें आले बहुत ॥ अत्यंत असती जल्पत ॥ गति बहुत न दिसे बरी ॥४८॥

हनुमंत म्हणे तुम्हांत मुख्य कोण ॥ तें सांगा आधीं नामाभिमान ॥ मग बोले रुक्मिणीनंदन ॥ नाम प्रद्युम्न माझें असे ॥४९॥

माझा प्रताप अद्‌भुत ॥ पिता जाणे श्रीकृष्णनाथ ॥ जेणें बाळपणीं मारिले दैत्य ॥ अघबककेशीकंसादि ॥१५०॥

जरासंध सत्रा वेळ धरिला ॥ द्वारका रचिली अवलीळा ॥ नरकासुर वधूनि सकळा ॥ गोपी आणिल्या सोळा सहस्त्र ॥५१॥

मग बोले अनिलकुमर ॥ सांगसी पितयाचा बडिवार ॥ परी तुवां पराक्रम थोर ॥ कोठें केला सांग पां ॥५२॥

एकदांचि अवघेजण ॥ कां आलेति मरावयालागून ॥ तुम्हां लेंकरांशीं युद्ध पूर्ण ॥ लाजे मन करावया ॥५३॥

तंव ते म्हणती रे वानरा ॥ आगळें बोलसी पालेखाइरा ॥ तुज आतां धाडूं मृत्युपुरा ॥ तरीच कृष्णाचे कुमर आम्ही ॥५४॥

ऐसें बोलोनि ते वेळे ॥ सर्वीं धनुष्यीं बाण योजिले ॥ बाणांचा पर्जन्य बळें ॥ हनुमंतावरी पडियेला ॥५५॥

अमर्याद येती शर ॥ गदगदां हांसे वायुकुमर ॥ वांकुल्या दावी वारंवार ॥ यादवांतें लक्षूनियां ॥५६॥

शुष्क तृण पडतां बहुत ॥ कदा न हाले जैसा पर्वत ॥ कीं पुष्पें वर्षतां अद्‌भुत ॥ ऐरावत न मानी जेवीं ॥५७॥

कीं संसारदुःख लागतां सबळ ॥ ज्ञानी न ढळे जैसा अचळ ॥ कीं धुळी उडतां प्रबळ ॥ निर्मळ निराळ न मळेचि ॥५८॥

तैसाचि सीताशोकहरण ॥ न मानी यादवांचे बाण ॥ मग पुच्छ कौतुकेंकरुन ॥ सोडिलें जाण भूमीवरी ॥५९॥

पुच्छ देखतांचि यादववीर ॥ म्हणती सांपडलें रे वानर ॥ पुच्छासी झोंबती समग्र ॥ ओढिती बळेंकरुनियां ॥ १६०॥

एक म्हणती खालता पाडावा ॥ ओढित तैसाचि सभेसी न्यावा ॥ म्हणोनि मिठया घालिती तेधवां ॥ यादवदृढ पुच्छासी ॥६१॥

ओढितां ओढितां कृष्णकुमर ॥ पुच्छ वाढूं लागलें अपार ॥ तों द्वारकेमाजी पुच्छ सत्वर ॥ प्रवेशतें जाहलें ते वेळीं ॥६२॥

कौतुक वर्तलें अद्‌भुत ॥ आळोआळीं पुच्छ धांवत ॥ ज्यांचे अंतरी गर्व देखत ॥ त्यांसी बांधीत आंवळोनी ॥६३॥

एक भाग्यमदें जाहले मस्त॥ कोणासी न लेखिती उन्मत्त ॥ शिबिकेमाजी बैसोनि येत ॥ तंव पुच्छें त्वरित देखिलें ॥६४॥

भोई पळाले चहूंकडे ॥ पालखी टाकिती पुच्छापुढें ॥ पुच्छें घालूनियां वेढे ॥ शिबिकेसहित आंवळिले ॥६५॥

वीर बैसले तुरंगांवरी ॥ तोडा तोडा म्हणती झडकरी ॥ तंव पुच्छें वरिच्यावरी ॥ अश्वांसहित आंवळिले ॥६६॥

जयासी हरिनामीं नाहीं भाव ॥ परम उन्मत्त गायक गंधर्व ॥ तेही पुच्छें बांधिले सर्व ॥ अहंभाव जाणोनियां ॥६७॥

वृक्षीं बैसला वायुनंदन ॥ तेथूनि चळलें नाहीं आसन ॥ परी ज्यांसी गर्वें शापिलें पूर्ण ॥ त्यांसी बंधन केलें पुच्छें ॥६८॥

एकाएकीं पुच्छ उचलिलें ॥ यादववीर लोंबती खालें ॥ हनुमंतें मुख पसरिलें ॥ अति विक्राळ तेधवां ॥६९॥

तंव ते अवघे डोळे झांकिती ॥ हनुमंत म्हणे तयांप्रति ॥ कां रे युद्ध न करा निश्चिती ॥ शस्त्रें गळती सांवरा रे ॥१७०॥

तंव तिंहीं झांकिले नयन ॥ म्हणती यासी देतां प्रतिवचन ॥ आतांचि गिळील न लागतां क्षण ॥ अनर्थ पूर्ण ओढवला ॥७१॥

एक म्हणती आम्हीं गर्व केला ॥ म्हणोनि ईश्वरें हा प्रेरिला ॥ कीं वानरवेषें प्रकटला ॥ कृतांतचि आपण ॥७२॥

एक एकासी दाविती खूण ॥ यासी देऊं नका रे प्रतिवचन ॥ एकदां वांचवा प्राण ॥ हरिचरण पाहों द्या ॥७३॥

एक हळूचि मिठी सोडविती ॥ समुद्रामाजी उडी टाकिती ॥ ऐसें देखोनि मारुती ॥ पुच्छ समुद्रीं बुडवीत ॥७४॥

वृक्षीं बैसला सावकाश ॥ तेथूनचि हेलकावी पुच्छ ॥ यादव होती कासावीस ॥ धांवा करिती हरीचा ॥७५॥

अवघे करिती कृष्णस्मरण ॥ गळोनि गेला अभिमान ॥ मुक्त जाहले अवघेजण ॥ एकामागें एक पळतीं पैं ॥७६॥

भुभुःकारें गर्जे वायुनंदन ॥ यादव मागें न पाहती परतोन ॥ एक वाटे पडती अडखळोन ॥ वस्त्रें भूषणें गळालीं ॥७७॥

एकासी हुडहुडी येत ॥ एकाची दांतखिळी बैसत ॥ ऐसे सभेसी आले धांवत ॥ कृष्णनंदन सर्वही ॥७८॥

तों सिंहासनीं क्षीराब्धिजावर ॥ आकर्णनयन मुख उदार ॥ हांसे विस्मित श्रीधर ॥ निजकुमार देखोनियां ॥७९॥

यादव म्हणती जगन्नायका ॥ आतां कदा न उरे द्वारका ॥ तो वानरवेषें देखा ॥ कृतांतचि पातलासे ॥१८०॥

श्रीकृष्ण बोले नारदमुनी ॥ कैसी करावी आतां करणी ॥ तंव तो विनोदेकरुनी ॥ टाळी वाजवूनि बोलत ॥८१॥

नांव सांडावें सत्वर ॥ नाहीं तरी अनर्थ करील वानर ॥ बळिरामाजवळी आला ब्रह्मकुमर ॥ कर्णीं गोष्टी सांगतसे ॥८२॥

म्हणे हा रामभक्त हनुमंत ॥ येणें त्रासिला लंकानाथ ॥ नगर जाळूनि समस्त ॥ अशोकवन विध्वंसिलें ॥८३॥

लक्ष्मणासी लागली जेव्हां शक्ती ॥ गिरि द्रोण आणिला नुगवतां गभस्ती ॥ शंभर गांवें अपांपती ॥ ढेंगेमाजी उडाला ॥८४॥

पुच्छाचें दुर्ग करुनी ॥ वानर रक्षिले सुवेळास्थानीं ॥ पाताळीं अहिमही त्रासूनी ॥ राघव जेणें सोडविला ॥८५॥

बळवंत विरक्त ब्रह्मचारी चिरंजीव आणि वज्‍रशरीरी ॥ ऐसा कोण आहे उर्वीवरी ॥ जो युद्ध करी तयाशीं ॥८६॥

बळिराम म्हणे ऐशियालागूनी ॥ काय करुं मी नारदमुनी ॥ येरु म्हणे हें जाणे चक्रपाणी ॥ मज हें कांहीं समजेना ॥८७॥

गेला सर्वांचा अहंकार ॥ मग काय बोले क्षीराब्धिजावर ॥ रामरुप दाविल्याविण साचार ॥ तो वानर समजेना ॥८८॥

अद्‌भुत केलें गोपाळें ॥ तात्काळ रामरुप प्रकटविलें ॥ आकर्ण विराजती नेत्रोत्पलें ॥ करीं शोभले धनुष्यबाण ॥८९॥

बळिभद्र जाहला लक्ष्मण ॥ भरत जाहला पांचजन्य ॥ सुदर्शन जाहला शत्रुघ्न ॥ नवल विंदान दाखविलें ॥१९०॥

मग म्हणे नारदमुनी ॥ सत्यभामेसी सांगावें कानीं ॥ वेगें जानकीचें रुप धरोनी ॥ सभामंडपीं येइंजे ॥९१॥

स्वयें आपणचि निघाला ॥ अंतःपुरामाजी प्रवेशला ॥ म्हणे सत्यभामेसी ते वेळां ॥ वेगें जानकी व्हावें तुम्हीं ॥९२॥

भेटीसी येतो हनुमंत ॥ तुम्ही जानकीचा वेष धरा त्वरित ॥ कृष्णजी जाहले रथुनाथ ॥ तुम्हीं अगत्य चलावें ॥९३॥

मग श्रृंगार करुनि ते अवसरीं ॥ सभेसी आली सत्यभामा नारी ॥ तों श्रीरामरुप देखिलें नेत्रीं ॥ आश्चर्य करी मानसीं ॥९४॥

मग बोलिजे रमाधवें ॥ हें जानकीचें रुप नव्हे ॥ दर्पणीं न्याहाळूनि पाहें बरवें ॥ मागुती यावें परतोनि ॥९५॥

येरी परतली ते वेळां ॥ दुसरा आणीक श्रृंगार केला ॥ दासीस पुसे ते वेळां ॥ म्हणे बरा बाणला वेष कीं ॥९६॥

श्रीरंग म्हणे सुभद्रेसी ॥ वेगें आणावें जानकीसी ॥ तंव ते येऊनि राणिवशासी ॥ काय तियेसी बोलत ॥९७॥

चाल गे किती करिसी श्रृंगार ॥ कोरडा दाविसी बडिवार ॥ तुज पाचारितो श्रीधर ॥ म्हणोनि करीं धरियेली ॥९८॥

तांतडी जाहली श्रृंगारासी ॥ काजळ ठायीं ठायीं माखलें मुखासी ॥ तैसीच सुभद्रेनें धरुनि वेगेंसीं ॥ समोर सभेसी आणिली ॥९९॥

तें पाहोनियां श्रीरंग ॥ म्हणे पहा रे आलें सोंग ॥ जाहला सत्यभामेचा गर्वभंग ॥ वाटे प्राणत्याग करावा ॥२००॥

हांसती सकळ सभाजन ॥ सत्यभामा अधोवदन ॥ मग बोले कमलोद्भवनंदन ॥ रुक्मिणीतें बोलावा ॥१॥

मग सत्यभामेसी म्हणे सर्वेश्वर ॥ तूं आणि गोपी सोळा सहस्त्र ॥ रुक्मिणीच्या गृहा जाऊनि सत्वर ॥ तीस घेऊनि येईजे ॥२॥

सत्यभामेसहित सकळा ॥ भीमकीच्या सदना आल्या ते वेळां ॥ तों देखिली जानकी वेल्हाळा ॥ दिव्यरुप बैसली ॥३॥

तप्तहाटकवर्ण चारुगात्री ॥ सुहास्यवक्‍त्री आकर्णनेत्री ॥ सत्यभामा देखोनि अंतरीं ॥ आश्चर्य करी तेधवां ॥४॥

शुभ्र कंचुकी शुभ्र वस्त्र ॥ कंठीं शुभ्र मोतियांचे हार ॥ सर्व भूषणांनीं विराजे सुकुमार ॥ जे आदिमाया अवतरली ॥५॥

मग सत्यभामा बोले वचन ॥ तुम्हांसी बोलावितो जगज्जीवन ॥ ऐकतांचि अवश्य म्हणोन ॥ हंसगती चालिली ॥६॥

सभामंडपीं येऊनी ॥ अर्धांगीं बैसली विश्वजननी ॥ राम मेघवर्ण हे सौदामिनी ॥ अक्षयप्रभा झळकतसे ॥७॥

मग सर्वेश्वर म्हणे गरुडातें ॥ आतां घेऊनि येईं तयातें ॥ म्हणें श्रीरामें बोलाविलें तुम्हांतें ॥ भेटावयासी आदरें ॥८॥

तंव तो गरुड अधोवदन ॥ स्फुंदस्फुंदोनि करी रुदन ॥ म्हणे तो आतां माझा घेईल प्राण ॥ थोर निर्वाण मांडिलें ॥९॥

मग कुमारांसी म्हणे तुम्ही जाऊन ॥ वेगें आणा वायुनंदन॥ तंव ते म्हणती आम्हांसी देखोन ॥ पुढती सागरीं बुडवील ॥२१०॥

मग अक्रूर आणि उद्धव ॥ तयांसी म्हणे रमाधव ॥ माझा हनुमंत भक्तराव ॥ तुम्हीं जावोनि आणिजे ॥११॥

सांगातें न्यावें गरुडासी ॥ आदरें घेऊनि यावें तयासी ॥ मग नमस्कारोनि रघुपतीसी ॥ तिघेजण चालिले ॥१२॥

पुढें जाती उद्धव अक्रूर ॥ मागें हळूचि येत खगेंद्र ॥ उद्धवासी म्हणे तो वानर ॥ अतिक्रोधें पाहतसे ॥१३॥

दुरुनि बोलवा आधीं पूर्ण ॥ विश्वासूं नका दोघेजण ॥ तों वृक्षावरी सीताशोकहरण ॥ उन्मनींत नयन लाविले ॥१४॥

समीप येऊनि उद्धव अक्रूर ॥ घालिती साष्टांग नमस्कार ॥ तैसाचि दुरुनि नमी खगेंद्र ॥ अंतरी भय वाटतसे ॥१५॥

उद्धव अक्रूर म्हणती मारुती ॥ तुम्हांसी बोलावितो अयोध्यापती ॥ ऐसे ऐकतांचि प्रेम चित्तीं ॥ न सांवरेचि तयातें ॥१६॥

उद्धव अक्रूरांच्या चरणांवरी ॥ हनुमंत लोटला ते अवसरीं ॥ आलिंगन दिधल्यावरी ॥ नेत्रीं अश्रुधारा लोटल्या ॥१७॥

मज सत्वर दावा रघुनाथ ॥ म्हणोनि पुढती पाय धरीत ॥ मग हनुमंताचे दोन्ही हस्त ॥ उद्धव अक्‍रुरीं धरियेले ॥१८॥

पुढें सत्वर तिघे जाती ॥ मागें येत खगपती ॥ मनीं म्हणे सभेसी रघुपती ॥ न देखतां मारुती क्षोभेल ॥१९॥

जरी हरी जाहला असेल कृष्णनाथ ॥ तरी मग करील हा अनर्थ ॥ माझा तों पुरला अंत ॥ हें मज निश्चित समजलें ॥२२०॥

अद्‌भुत हरीची करणी ॥ द्वारका अयोध्या केली ते क्षणीं ॥ रामचरित्रें नितंबिनी ॥ घरोघरीं गाताती ॥२१॥

पुढें देखिला दिव्य मंडप सतेज ॥ सिंहासनीं बैसला रघुराज ॥ ऐसें देखोनि वायुतनुज ॥ लोटांगण घातलें ॥२२॥

दृष्टीं देखतां हनुमंत ॥ सप्रेम जाहला सीतकांत ॥ जैसा इंदु देखतां सरितानाथ ॥ परमानंदें उचंबळे ॥२३॥

रामपदीं मस्तक ठेवी हनुमंत ॥ नयनोदकें चरण क्षालीत ॥ दोन्ही हातें उचलोनि वायुसुत ॥ सीताधवें आलिंगिला ॥२४॥

मस्तकीं ठेविला वरद हस्तक ॥ कुरवाळीत मारुतीचा मुखमृगांक ॥ कंठींचा मुक्ताहार सुरेख ॥ गळां घातला तयाच्या ॥२५॥

वामांगीं बैसली सीता ॥ सव्यांगीं बैसविलें हनुमंता ॥ येरें चरणीं ठेविला माथा ॥ तों अद्‌भुत वर्तलें ॥२६॥

वरतें पाहे जों अंजनीपुत्र ॥ तों श्रीकृष्ण देखे राजीवनेत्र ॥ उद्धव अक्रूर रेवतीवर ॥ द्वारकानगर पूर्ववत ॥२७॥

चंचळ जाहला अनिलसुत ॥ मग काय बोले रमानाथ ॥ हनुमंता आठवीं हृदयांत ॥ रामअवतारींची गोष्ट पैं ॥२८॥

कीं द्वापारीं कृष्णअवतार ॥ तैं तुज भेट देईन साचार ॥ मग बोले निरालोद्भवपुत्र ॥ होय साचार स्वामिया ॥२९॥

परी श्रीरामरुप धरोनी ॥ मज बोळवावें ये क्षणीं ॥ ऐसें बोलतां तो चापपाणी ॥ अयोध्यानाथ बैसला ॥२३०॥

मग नानाउपचारें तत्त्वतां ॥ रामें गौरविलें हनुमंता ॥ म्हणे तुझे उपकार वायुसुता ॥ कदाकाळीं न विसरें मी ॥३१॥

तुवां लंकेसी केला प्रताप पूर्ण ॥ ऐकतांचि चकित होय त्रिभुवन ॥ तूं मज आवडसी जैसा प्राण ॥ नावडे आन पदार्थ ॥३२॥

तों भीतरी झालिया पंक्ती ॥ जवळी बैसवोनि मारुती ॥ भोजन करीत रघुपती ॥ सीता सती वाढीतसे ॥३३॥

भोजनें झालिया संपूर्ण ॥ सभेसी बैसे रघुनंदन ॥ हनुमंत उभा ठाकला कर जोडून ॥ म्हणे मज न विसरावें ॥३४॥

सर्वेश्वर म्हणे मारुती ॥ मी होईन अर्जुनाचा सारथी ॥ तूं ध्वजस्तंभीं बैसें प्रीतीं ॥ भूमार निश्चितीं उतरुं हा ॥३५॥

अवश्य म्हणे वायुकुमर ॥ घातला साष्टांग नमस्कार ॥ पुढें तीर्थें पहावया सत्वर ॥ कपिवर चालिला ॥३६॥

नारद म्हणे सीताशोकहरणा ॥ मीही सवें येतों तीर्थाटना ॥ नमोनियां जगन्मोहना ॥ दोघेजण चालिले ॥३७॥

नगराबाहेर सीताकांत ॥ जावोनि बोळविला वायुसुत ॥ सद्गद जाहला रघुनाथ ॥ हनुमंत गेला देखोनि ॥३८॥

नगरलोक जाहले संतुष्ट ॥ म्हणती मोठे टळलें अरिष्ट ॥ ब्रह्मानंद जनांसी वरिष्ठ ॥ आनंद करिती गृहीं गृहीं ॥३९॥

हनुमंतासी बोळवून ॥ परतोनि आला जगज्जीवन ॥ वर्णीत हनुमंताचे गुण ॥ उद्धव अक्रूरांजवळी पैं ॥२४०॥

सत्यभामा यादव आणि सुपर्ण ॥ केलें सर्वांचें गर्वहरण ॥ भक्तांसी बाधक अभिमान ॥ म्हणोनि विंदान केलें हें ॥४१॥

हरिविजयग्रंथ जाण ॥ हेंचि केवळ नंदनवन ॥ नाना इतिहास वृक्ष घन ॥ प्रेमरसें सदा फळे ॥४२॥

ब्रह्मानंदा द्वारकाधीशा ॥ श्रीधरवरदा आदिपुरुषा ॥ अक्षया अभंगा अविनाशा ॥ निजदासासी रक्षीं तूं ॥४३॥

इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ सदा परिसोत प्रेमळ भक्त ॥ एकत्रिंशतितमाध्याय गोड हा ॥२४४॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥