हरिविजय

श्रीधरांसारखा भगवंताच्या भक्तिप्रेमात न्हाऊन गेलेला अजोड कवी, गोपालकृष्णाच्या अति गोड लीलांचे वर्णन करतो, तेव्हा काय बहार येते.


अध्याय २

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकेशवाय नमः ॥

जय जय यदुकुळकमळ दिनकरा ॥ दुरितकाननवैश्वानरा ॥ दितिसुतमर्दन्समरधीरा ॥ इंदिरावरा गोविंदा ॥१॥
द्विसहस्त्रवक्‍त्र द्विसहस्त्रनयन ॥ तो अनंत बोलका विचक्षण ॥ रसना जाहल्या चिरोन ॥ दोन सहस्त्र तयाच्या ॥२॥
मग लाजोनि चक्षुःश्रवा ॥ शय्या तुझी जाहला रमाधवा ॥ निगम बोलका बरवा ॥ नेति म्हणोनि तटस्थ ॥३॥
व्यासवाल्मीकांच्या शिणल्या गती ॥ तटस्थ राहिला बृहस्पती ॥ पंचाननाची कुंठित मती ॥ गुण तुझे वर्णावया ॥४॥
तुझे गुणलक्षण चिदाकाश ॥ तेथें व्यासादिक उडती राजहंस ॥ भेदीत गेले आसमास ॥ ज्यांच्या मतीस सीमा नाहीं ॥५॥
त्यांच्या पाठीमागें शलभ ॥ भेदीत गेले जी नभ ॥ त्यांची गति न ठाके स्वयंभ ॥ परी आत्मशक्ती उडावें ॥६॥
न कळोनि निराळाचा अंत ॥ शक्तीऐसें द्विज क्रमीत ॥ तैसा हरिप्रताप अद्‌भुत ॥ परी यथामति वर्णावा ॥७॥
नृपें अर्गजाचें गृह केलें ॥ दुर्बळें मृत्तिकेचें रचिलें ॥ परी साउलीचें सुख न्यून आगळें ॥ नसेचि जैसें सर्वथा ॥८॥
म्हणोनि श्रीहरीचे गुण ॥ वर्णावे सांडूनि अभिमान ॥ आतां ऐसें पूर्वानुसंधान ॥ पूर्वाध्यायीं काय जाहलें ॥९॥
पृथ्वी प्रजा ऋषिजन ॥ कमलोद्भवासी आले शरण ॥ आक्रोशें करिती रुदन ॥ पीडिलें जाण दैत्यांनीं ॥१०॥
इंद्रादि देव प्रजा समस्ता ॥ सवें घेऊनि चालिला विधाता ॥ जेथें असे आपुलां जनिता ॥ क्षीराब्धिशायी सर्वेश ॥११॥
क्षीराब्धीचा महिमा देखतां दृष्‍टीं ॥ वर्णितां न सरे वर्षें कोटी ॥ तेथें सर्वांसमवेत परमेष्ठी ॥ पैलतीरीं उभा ठाके ॥१२॥
त्या क्षीराब्धीचें मध्यपीठ ॥ तेथें प्रभाकर विशाळ बेट ॥ लक्षानुलक्ष गांवें सुभट ॥ लांब रुंद शोभतसे ॥१३॥
तेथें निर्विकल्पवृक्ष लागले ॥ चिदाकाश भेदूनि गेले ॥ त्या छायेचें सुख आगळें ॥ शिवविरिंचींसी दुर्लभ ॥१४॥
दिव्य नवरत्‍नीं विराजित ॥ मध्यें मंडप शोभिवंत ॥ लक्ष योजनें लखलखित ॥ ओतप्रोत तितुकाचि ॥१५॥
सूर्यप्रभेसी आणिती उणें ॥ ऐसे जेथें प्रभामय पाषाण ॥ गरुडपाचूंच्या ज्योती पूर्ण ॥ प्रभामय विराजती ॥१६॥
पद्मरागाचे तोळंबे स्वयंभ ॥ वरी दिव्य हिर्‍यांचे खांब ॥ निळ्यांची उथाळीं सुप्रभ ॥ उपमा नाहीं तयांतें ॥१७॥
जें कां जांबूनद सुवर्ण ॥ त्याचीं तुळवटें लंबायमान ॥ आरक्त माणिकांचे दांडे जाण ॥ सरळ सुवाड पसरिले ॥१८॥
शुद्ध पाचूंच्या किलच्या वरी ॥ अभेदें जोडिल्या कळाकुसरी ॥ दिव्य मुक्तांचा पंक वरी ॥ अक्षय दृढ जडिलासे ॥१९॥
जैसे पंक्तीं बैसले गभस्ती ॥ तैशा चर्या समान झळकती ॥ नाना चक्रें ओप देती ॥ दिव्य रत्‍नें अनेक ॥२०॥
मध्यें शिखराचा जो कळस ॥ भेदूनि गेला महदाकाश ॥ सहस्त्र सूर्यांचा प्रकाश ॥ एकसरां तळपतसे ॥२१॥
निळ्याच्या मदलसा जडित ॥ वरी मुक्तांचे राजहंस खेळत ॥ रत्‍नपुतळ्या गात नाचत ॥ असंख्यात प्रभा त्यांची ॥२२॥
दाही अवतार मूर्तिमंत ॥ स्तंभांप्रती शोभले जडित ॥ त्रैलोक्यरचना समस्त ॥ प्रतिमा तेथें साजिर्‍या ॥२३॥
मंडपाचे अष्टकोनी ध्वज ॥ सहस्त्रविजांऐसे तेजःपुंज ॥ तळपतां तेणें सतेज ॥ ब्रह्मांड समग्र जाहलें ॥२४॥
अनंत ब्रह्मांडांच्या स्थितिगती ॥ रेखिल्या अनंत मूर्ती अनंत शक्ती॥ त्या मंडपाची पाहतां स्थिती ॥ चंद्र सूर्य खद्योतवत ॥२५॥
ऐसा मंडप लक्ष योजन ॥ तितुकाच उंच रुंद चतुष्कोण ॥ चिंतामणींचीं सोपानें पूर्ण ॥ चहूंकडे सतेज ॥२६॥
तयावरी जो तल्पक ॥ शुभ्र सतेज भोगिनायक ॥ जैसा रजताचल निष्कलंक ॥ असंभाव्य पसरला ॥२७॥
असंभाव्य ज्याचें शरीर ॥ मंचक योजनें साठी सहस्त्र ॥ चतुष्कोण मावे परिकर ॥ निजांगींच शेषाच्या ॥२८॥
ठायीं ठायी उशा बहुवस ॥ निजांगाच्या करी शेष ॥ सहस्त्रफणांचीं छत्रें विशेष ॥ प्रभा न माये निराळीं ॥२९॥
ऐसा शेष जाहला पलंग ॥ वरी पहुडला श्रीरंग ॥ लक्षार्ध योजनें अव्यंग ॥ शेषशायी परमात्मा ॥३०॥
इंद्रनीळाचा मेरु पहुडला ॥ कीं परब्रह्मरस ओतिला ॥ भक्तांलागीं आकारला ॥ नीलजीभूतवर्ण पैं ॥३१॥
योजनें पन्नास सहस्त्र ॥ सगुण लीलाविग्रही श्रीधर ॥ श्रोते म्हणती यास आधार ॥ कोठें आहे सांग पां ॥३२॥
तरी ब्रह्मांडपुराणींची कथा अवधारा ॥ नारद गेला होता क्षीरसागरा ॥ तो पाहून आला सर्वेश्वरा ॥भृगूचिया आश्रमाप्रती ॥३३॥
तेणें वर्णिलें हें ध्यान सुरेख ॥ ऐका नारदमुखींचा श्लोक ॥ पहुडला ब्रह्मांडनायक ॥ क्षीरसागरीं कैसा तो ॥३४॥
श्लोक ॥ लक्षार्धयोजनोपेतं विग्रहं कामरुपिणम् ॥ सर्वाश्चर्यमयं देवं शयानं शेषतल्पके ॥१॥
टीका ॥ यालागीं लक्षार्ध योजनें प्रमाण ॥ पहुडला नीलजीमूतवर्ण ॥ कोटी मदन ओंवाळून ॥ नखांवरुन सांडिजे ॥३५॥
घनश्याम कमलनयन जें मायातीत शुद्ध चैतन्य ॥ जें पूर्णब्रह्म सनातन ॥ क्षीरसागरीं पहुडलें ॥३६॥
श्रीवत्सांकितभूषण ॥ हृदयीं कौस्तुभप्रभा घन ॥ मुक्तामाळा विराजमान ॥ वैजयंती आपाद ॥३७॥
कल्पांतींचे सहस्त्र आदित्य ॥ तैसी दिव्य मूर्ति प्रकाशवंत ॥ परम जाज्वल्य कुंडलें तळपत ॥ मकराकार उभयकर्णीं ॥३८॥
कल्पांतींच्या सहस्त्र विजा पूर्ण ॥ तैसा मुकुटप्रकाश गहन ॥ सरळ नासिक विशाळ नयन ॥ धनुष्याकृति भृकुटिया ॥३९॥
अनंत ब्रह्मांडींचें सौंदर्य एकवटलें ॥ संतापनाशक हें रुप ओतिलें ॥ कीं कैवल्यसुख गोळा जाहलें ॥ क्षीरसागरीं प्रत्यक्ष ॥४०॥
कौस्तुभतेजें क्षीरसागर ॥ लखलखिला देदीप्यमान सुंदर ॥ नाभि वर्तुळ गंभीर ॥ बालदिवाकरप्रकाश जैसा ॥४१॥
शंख चक्र गदा पद्म ॥ परम उदार घनश्याम ॥ जो अनंत पुराण पुरुषोत्तम ॥ पूर्णकाम सर्वेश ॥४२॥
चहूं भुजीं कीर्तिमुखें ॥ मणगटीं हस्तकटकें सुरेखें ॥ दशांगुलीं मुद्रिकांचें तेज फांके ॥ असंभाव्य न वर्णवे ॥४३॥
नाभिस्थानीं दिव्य कमळ ॥ त्यांत चतुर्मुख खेळे बाल ॥ सहस्त्र वरुषें कमलनाळ ॥ शोधितां अंत न सांपडे ॥४४॥
सहस्त्र विजांचा एक भार ॥ तैसा नेसला पीतांबर ॥ त्या सुवासें अंबर ॥ परिपूर्ण धालें हो ॥४५॥
हरितनूचा सुवास पूर्ण ॥ जाय ब्रह्मांड भेदून ॥ कटीं मेखला विराजमान ॥ दिव्य रत्‍नीं झळकतसे ॥४६॥
माजी क्षुद्रघंटांची दाटी ॥ अंगीं दिव्य चंदनाची उटी ॥ श्यामवर्ण जगजेठी ॥ चंदन जैसा वरी शोभे ॥४७॥
सांवळें सूर्यकन्येचें नीर ॥ त्यावरी भागीरथीचें शुभ्र ॥ कीं नीळवर्ण अंबर ॥ त्यावरी चांदणें पौर्णिमेचें ॥४८॥
नभाचे गाभे काढिले ॥ तैसे जानुजघन शोभले ॥ चरणीं तोडर खळाळे ॥ वांकी नेपुरें रुणझुणती ॥४९॥
कोटी चंद्र एकवटले ॥ चरणनखीं सुरवाडले ॥ कीं स्वशरीराचीं करुनि दहा शकलें ॥ दशांगुळीं जडिलीं हो ॥५०॥
दिव्य मुक्तपल्लव रुळत ॥ ऐसा दुजा पीतांबर झळकत ॥ पांघरलासे दीननाथ ॥ शेषशायी परमात्मा ॥५१॥
अंगींच्या प्रकाशशिखा पूर्ण ॥ जाती सप्तावरण भेदून ॥ ज्याच्या श्यामप्रभेनें घन ॥ अद्यापि सांवला दिसतसे ॥५२॥
क्षीरसागरींचा श्याम प्रकाश पडला ॥ तोचि हा नभासी रंग चढला ॥ हेचि सुनीळता डोळां ॥ अद्यापि वरी दिसतसे ॥५३॥
क्षीरसागरीं जगदुद्धार ॥ मंदस्मितवदन सुंदर ॥ दंतपक्तींच्या तेजें थोर ॥ कोटिसूर्य प्रकाशले ॥५४॥
सर्व आनंदाचें सदन ॥ मिळोनि ओतिलें हरीचें वदन ॥ एवढी प्रभा देदीप्यमान ॥ परी तीव्र नव्हे सर्वथा ॥५५॥
तें तेज शांत सोज्ज्वळ॥ तीक्ष्ण नव्हे परम शीतल ॥ परी स्थूळ दृष्‍टीचें बळ ॥ पहावया तेथें चालेना ॥५६॥
तेथें प्रत्यक्ष लक्ष्मीस दर्शन ॥ आदर्शबिंबवत विधीस जाण ॥ माध्यान्हींचा सूर्य पूर्ण ॥ तैसा ऋषीसी दिसतसे ॥५७॥
मानवी भक्तांचिये ध्यानीं ॥ प्रगटे साक्षात येऊनी ॥ यालागीं क्षीरसागरींचें रुप नयनीं ॥ कोणासही न पाहवे ॥५८॥
ज्ञानदृष्‍टीं जे पाहत ॥ त्यांसी जवळी आहे भगवंत ॥ अभक्तांसी न दिसे सत्य ॥ कोटी वर्षें शोधितां ॥५९॥
असो आतां त्या अवसरीं ॥ क्षीरसागराच्या ऐलतीरीं ॥ बद्धांजलि करुनि निर्धारीं ॥ सुरवर उभे ठाकले ॥६०॥
पुढें मुख्य आधीं परमेष्ठी ॥ इंद्रादि देव उभे त्यापाठीं ॥ जयजयकाराच्या बोभाटीं ॥ ऋषी गर्जती ते वेळीं ॥६१॥
ॐ नमो आदिनारायणा ॥ लक्ष्मीनारायणा मनमोहना ॥ महाविष्णु मधुसूदना ॥ कैटभारी केशवा ॥६२॥
जय जय वैकुंठपीठविहारा ॥ शेषशायी विश्वंभरा ॥ पुराणपुरुषा रमावरा ॥ धांवें त्वरें ये वेळीं ॥६३॥
जय जय वेदोद्धारका ॥ कूर्मरुपा सृष्‍टिपाळका ॥ नमो सकळदैत्यांतका ॥ दीनरक्षका दीनबंधो ॥६४॥
जय जय हिरण्यकशिपुमर्दना ॥ नमो त्रिविक्रमा बलिबंधना ॥ ब्राह्मणकुलपालना ॥ नमो श्रीधरा गोविंदा ॥६५॥
नमो पौलस्तिकुलकाननदहना ॥ नमो मीनकेतनारिहृदयजीवना ॥ नमो चतुर्दशलोकपालना ॥ पीतवसना माधवा ॥६६॥
जय जय कमळनयना कमळावरा ॥ कमळशयना कमळवक्‍त्रा ॥ कमळनाभा कमळछत्रा॥ कमळधरा कमलाप्रिया ॥६७॥
जय जय विश्वपाळणा ॥ विश्वव्यापका विश्वकारणा ॥ विश्वमतिचालका विश्वजीवना ॥ विश्वरक्षणा विश्वेशा ॥६८॥
जय जय लक्ष्मीकुचकुंकुमांका ॥ जय सकळदेवविस्तारका ॥ जय सकळदेवपाळका ॥ सकळदेवदीक्षागुरो ॥६९॥
नमो निर्जरललाटपट्टलेखना ॥ नमो सनकसनंदनमनोरंजना ॥ नमो दानवकुलनिकृंतना ॥ भवभंजना भवहृदया ॥७०॥
नमो मायाचक्रचालका ॥ नमो अज्ञानतिमिरांतका ॥ नमो वेदरुपा वेदपाळका ॥ वेदस्थापका वेदवंद्या ॥७१॥
नमो भवगजपंचानना ॥ नमो पापारण्यकुठारतीक्ष्णा ॥ नमो त्रिविधतापदाहशमना ॥ अनंतशयना अनंता ॥७२॥
नमो दशावतारचरित्रचाळका ॥ नमो अनंतवेषधारका ॥ नमो अनंतब्रह्मांडनायका ॥ जयदुध्दारका जगत्पते ॥७३॥
नमो सर्गस्थित्यंतकारका ॥ नमो कैवल्यपददायका ॥ अज अजित सर्वात्मका ॥ करुणालया सुखाब्धे ॥७४॥
नमो जन्ममरणरोगवैद्या ॥ सच्चिदानंदास्वसंवेद्या ॥ मायातीता जगद्वंद्या ॥ भेदाभेदातीत तूं ॥७५॥
नमो षड्‌विकाररहिता ॥ नमो सकलषड्‌गुणालंकृता ॥ नमो अरिषड्‌वर्गच्छेदक प्रतापवंता ॥ शब्दातीता निरंजना ॥७६॥
वृषभाचे नाकीं वेसणी ॥ घालूनि भोवंडी अखंड धरणी ॥ तैसे तुझ्या सत्तेंकरुनी ॥ सकळ देव वर्तती ॥७७॥
तुझें शिरीं धरुनि शासन ॥ वर्ततों तुझी आज्ञा पाळून ॥ ऐसें असतां दैत्यीं विघ्न ॥ पृथ्वीवरी मांडिलें ॥७८॥
कंसचाणूरादि दैत्य माजले ॥ काळयवनें यज्ञ मोडिले ॥ जरासंधें थोर पीडिलें ॥ बंदी घातले धर्मिष्‍ठ नृप ॥७९॥
मारिले गाई ब्राह्मण ॥ विष्णुभक्तां ओढवलें विघ्न ॥ धर्म टाकिले मोडून ॥ पृथ्वी संपूर्ण गांजिली ॥८०॥
ऐशियासी काय विचार ॥ तूं दयार्णव जगदुद्धार ॥ ऐसें बोलोनि विधि सुरवर ॥ तटस्थरुप पाहती पैं ॥८१॥
तों क्षीरासागराहूनी ॥ उठली अंतरिक्षध्वनी ॥ नाभी नाभी म्हणोनी ॥ चिंता मनीं करुं नका ॥८२॥
मी यादवकुळीं अवतार ॥ घेऊन करीन दुष्‍टसंहार ॥ तुम्हीं देव समग्र ॥ यादव होऊनि येइंजे ॥८३॥
आणिक जे उपदेव सकळ ॥ त्यांहीं गोकुळीं व्हावें गोपाळ ॥ ऋषीं वत्स व्हावें सकळ ॥ मी पाळून उद्धरीन ॥८४॥
धर्म समीर सहस्त्रनयन ॥ अश्विनौदेव दोघे जण ॥ यांहीं कुंतीउदरीं अवतरुन ॥ भूमारहरण करावें ॥८५॥
बृहस्पतीनें व्हावें द्रोण ॥ द्यावें पांडवांसी विद्यादान ॥ अग्नीनें व्हावें धृष्टद्युम्न ॥ पांचाळाचे निजयागीं ॥८६॥
कलह माजवावया आधीं ॥ पार्वतीनें व्हावें द्रौपदी ॥ लक्ष्मी रुक्मिणी त्रिशुद्धी ॥ वैदर्भउदरीं अवतार ॥८७॥
बळिभद्र होईल संकर्षण ॥ वसुदेव देवकी दोघेंजण ॥ मी त्यांच्या पोटीं अवतरोन ॥ करीन पावन तयांसी ॥८८॥
जें तीन जन्मपर्यंत ॥ त्यांहीं तप केलें बहुत ॥ तें फळा आलें समस्त ॥ मी होईन सुत तयांचा ॥८९॥
ऐसी अंतरिक्षीं होतां ध्वनी ॥ देवीं जयजयकार करुनी ॥ नमस्कार साष्टांग घातला धरणीं ॥ आनंद मनीं न समाये ॥९०॥
ते शब्द देवांस कैसे वाटले ॥ कीं सुखाचे सागर लोटले ॥ कीं चातकासी ओळले ॥ मेघ जैसे आकाशीं ॥९१॥
जन्मवरी दरिद्रें पीडिला ॥ त्यासी धनाचा कूप सांपडला ॥ कीं मरे तयासी जोडला ॥ सुधासिंधु अकस्मात ॥९२॥
कीं जननी चुकोनि गेली ॥ ते बाळकासी जैसी भेटली ॥ कीं तृषाक्रांतें देखिली ॥ भागीरथी अकस्मात ॥९३॥
कीं जन्मांधासी आले नयन ॥ कीं रोगिया जोडलें दिव्य रसायन ॥ कीं वणव्यांत जळतां पूर्ण ॥ अद्‌भुत धन वर्षला ॥९४॥
कीं वांचवावया लक्ष्मण ॥ हनुमंतें आणिला गिरि द्रोण ॥ वानर सुखावले देखोन ॥ तैसेच देव हर्षले ॥९५॥
कीं अयोध्येसी आला रघुनाथ ॥ देखोनि आनंदला भरत ॥ तैसेच देव समस्त ॥ ब्रह्मानंदें कोंदले ॥९६॥
आनंद जाहला सकळां ॥ देव पावले स्वस्थळा ॥ चिंतेचा दुष्काळ गेला ॥ सुखसोहळा वाटे ॥९७॥
इकडे यदुवंशीं शूरसेन ॥ त्यासी जाहलें पुत्रनिधान ॥ आनकदुंदुभि नाम पूर्ण ॥ वासुदेव तोचि जाण पां ॥९८॥
वसुदेवाच्या जन्मकाळीं ॥ देवीं दुंदुभी वाजविल्या निराळीं ॥ आनकदुंदुभि नाम ते वेळीं ॥ वासुदेवासी ठेविलें ॥९९॥
दुंदुभी वाजवावयाचें कारण ॥ याचे पोटीं वासुदेव आपण ॥ अवतरेल हें जाणून ॥ देवीं दुंदुभी वाजविल्या ॥१००॥
याचें उदरीं अवतरेल वासुदेव ॥ म्हणोन नांव ठेवविलें वसुदेव ॥ त्याचा आरंभिला विवाह ॥ मथुरेमाजी गजरेंसीं ॥१॥
उग्रसेन मथुरानाथ ॥ कंस दुरात्मा त्याचा सुत ॥ परी तें पितृरेत नव्हे निश्चित ॥ अन्यवीर्य मिसळलें ॥२॥
उग्रसेनाची स्त्री पतिव्रता । परमसात्विक शुचिस्मिता ॥ एक दैत्य आला अवचिता ॥ तेणें उचलोन ते नेली ॥३॥
अरण्यांत नेऊन बळें ॥ सती भोगिली चांडाळें ॥ मग दैत्य म्हणे ते वेळे ॥ पुत्र तुज होईल ॥४॥
मग सती काय बोले बोल ॥ तुझा पुत्र जो का होईल ॥ त्यासी श्रीकृष्ण वधील ॥ आपटोन क्षणमात्रें ॥५॥
सती देखोनि क्रोधायमान ॥ दैत्य पळाला टाकून ॥ त्यावरी कंस दुर्जन ॥ पुत्र जाहला तोचि पैं ॥६॥
सदा पितयासी द्वेषी ॥ देखों न शके मातेसी ॥ यादवांसी उपहासी ॥ संगतीसी राहूं नेदी ॥७॥
बापास मागें लोटून ॥ स्वइच्छें राज्य करी आपण ॥ विष्णुभक्त गाई ब्राह्मण ॥ त्यासी आणूनि जिवें मारी ॥८॥
दैत्य जे का दुष्‍ट दुर्जन ॥ तेच केले आपुले प्रधान ॥ गांवांतून गेले सज्जन ॥ अधर्म पूर्ण वर्तला ॥९॥
नरकींचे राहणार किडे ॥ त्यांसी दुर्गंधीच बहु आवडे ॥ विष्ठा देखोनि सुरवाडे ॥ काक जैसा दुरात्मा ॥११०॥
जो मद्यपी दुर्जन त्यासी नावडे तत्त्‍वज्ञान ॥ दिवाभीतालागून ॥ नावडे दिन सर्वथा ॥११॥
शशी नवडे तस्करा ॥ सत्संग नावडे पापी नरा ॥ हिंसकाचिया अंतरा ॥ दया कैंची उद्भवे ॥१२॥
कृपणासी नावडे धर्म ॥ स्त्रीलुब्धा नावडे सत्कर्म ॥ निंदकासी नावडे प्रेम ॥ भजनमार्ग सर्वथा ॥१३॥
कीर्तन नावडे भूतप्रेतां ॥ दुग्ध नावडे नवज्वरिता ॥ टवाळासी तत्त्वतां ॥ जपानुष्ठान नावडे ॥१४॥
तैसें कंसें मथुरेस केलें॥ धर्म सत्कर्म बुडालें ॥ दैत्य अवघे मिळाले ॥ कंसाभोंवते सर्वदा ॥१५॥
मुष्टिक आणि चाणूर ॥ केशी प्रलंब अघासुर ॥ जळासुर दुराचार ॥ असुरासुर पापात्मा ॥१६॥
कागासुर आणिक खर ॥ शल तोशल धेनुकासर ॥ परम निर्दय अरिष्टासुर ॥ व्योमासुर महाक्रोधी ॥१७॥
परम सुंदर लोकमान्या ॥ उग्रसेनासी जाहली कन्या ॥ देवकी नामें परम धन्या ॥ सर्वलक्षणीं युक्त जे ॥१८॥
जैसा शुक्लपक्षींचा चंद्र ॥ तैसा ते वाढे सुकुमार ॥ देखोनियां उपवर ॥ वसुदेव वर नेमिला ॥१९॥
निजभारेंसी शूरसेन ॥ मथुरेसी आला करावया लग्न ॥ सामोरे जाऊन कंस उग्रसेन ॥ सीमांतपूजा त्या केली ॥१२०॥
परम सुंदर वसुदेव वर ॥ पुढें भेरी धडकती चंद्रानना थोर ॥ मुखद्वयाचे गंभीर ॥ मृदंग वाद्यें गर्जती ॥२१॥
मुखवायूचें लागतां बळ ॥ सनया गर्जती रसाळ ॥ झल्लरी टाळ घोळ ॥ पणव ढोल गर्जती ॥२२॥
तंत वितंत घन सुस्वर ॥ चतुर्विध वाद्यांचा गजर ॥ लोक पहावया येती समग्र ॥ वसुदेव वर कैसा हें ॥२३॥
जानवशासी घर ॥ दिधलें विशाळ सुंदर ॥ देवकप्रतिष्‍ठा करुनि सत्वर ॥ लग्नघटिका घातली ॥२४॥
मिरवत आणिला वसुदेव ॥ अंबरीं हर्षले सकळ देव ॥ याच्या पोटीं अवतरेल वसुदेव ॥ सत्य शब्द हा एक ॥२५॥
ज्याच्या पोटीं येईल जगज्जीवन ॥ त्याची पूजा करी उग्रसेन ॥ यथाविधि पाणिग्रहण ॥ केलें बहुत आनंदें ॥२६॥
दोन सहस्त्र दासी आंदण ॥ दिधले लक्ष एक वारण ॥ पवनवेगी तरंग सहित आभरण ॥ दोन लक्ष दीधले ॥२७॥
मिरवावया दोघें वधूवरेम ॥ वरात काढिली कंसासुरें ॥ रथावरी बैसविलीं ओहरें ॥ आपण धुरे सारथी जाहला ॥२८॥
पुढें होती वाद्यांचे गजर ॥ दारुनळियांचे भडिमार ॥ चंद्रज्योती चंद्राकार ॥ तेजें अंबर प्रकाशे ॥२९॥
आपण कंस जाहला सारथी ॥ पुढें वेत्रपाणी लोकांस सारिती ॥ रथ चालवावया वाव करिती ॥ कंसाच्या चित्तीं सुख वाटे ॥१३०॥
तों अकस्मात तये वेळीं ॥ देववाणी गर्जे निराळीं ॥ लोक तटस्थ सकळी ॥ वाद्यें राहिलीं वाजतां ॥३१॥
म्हणे रे कंसा निर्दैवा ॥ खळा धरितोस बहुत हावा ॥ परी देवकीचा पुत्र आठवा ॥ तुज वधील निर्धारें ॥३२॥
ऐसें ऐकतां श्रवणीं ॥ कंस दचकला अंतःकरणीं ॥ म्हणे आतां कासयाची भगिनी ॥ टाकूं वधोनि येधवां ॥३३॥
वेणीसी देवकी धरिली ॥ आसडोनि रथाखालीं पाडिली ॥ जैसी रंभा ताडिली ॥ शुंडादंडें वारणें ॥३४॥
कीं कमळिणी सुकुमार ॥ धक्का लागतां होय चुर ॥ कीं शिरसफूल अरुवार ॥ क्षणमात्रे कुंचुंबे ॥३५॥
कंसें शस्त्र उपसिलें ॥ देवकीच्या मानेवरी ठेविलें ॥ करुणास्वरें ते वेळे ॥ देवकी बोले बंधूसी ॥३६॥
अरे तूं कंसा माझा बंधु प्रसिद्ध ॥ काय देखिलासी सख्या अपराध ॥ कां रे करितोसी माझा वध ॥ बंधुराया सुजाणा ॥३७॥
बा रे तूं माझ्या कैवारिया ॥ कां कोपलासी कंसराया ॥ म्हणोनि देवकी लागे पायां ॥ करुणास्वरें रुदन करी ॥३८॥
हिंसकें धरिली जेवीं गाय ॥ कंठीं सुरी घाली निर्दय ॥ कीं व्याघ्रें महापापियें ॥ हरिणी ग्रीवें धरियेली ॥३९॥
करुणास्वरेम आक्रंदे सुंदर ॥ परी न सोडीच दुराचार ॥ विदेहकन्या नेतां दशकंधर ॥ न सोडी जैसा दुरात्मा ॥१४०॥
देखोन देवकीची करुणा ॥ अश्रू आले जनांच्या नयना ॥ परम खेद उग्रसेना ॥ दुःखार्णवीं बुडतसे ॥४१॥
म्हणे रे कंसा चांडाळा ॥ कां वधिसी माझी वेल्हाळा ॥ माझ्या गळ्याची चंपकमाळा ॥ रुळत पडली भूतळीं ॥४२॥
माज्या हृदयींचें दिव्य रत्‍न ॥ लज्जापंकीं गेलें बुडोन ॥ माझें सुढाळ मुक्त जान ॥ दावाग्नींत पडियेलें ॥४३॥
माझी सुकुमार सुमनकळी ॥ पडली जनांच्या पायांतळीं ॥ कंबरीवरी पडली धुळी ॥ म्लान मुख दिसतसे ॥४४॥
तुटली शिरींची मुक्ताजाळी ॥ विजवरा पडिला भूमंडळीं ॥ वदनचंद्रा लागली धुळी ॥ मुक्तें विखुरलीं कंठींचीं ॥४५॥
जाहला एकचि हाहाकार ॥ रडती समस्त नारीनर रथाखालीं शुरसेनकुमर ॥ उडी टाकोनि पातला ॥४६॥
येऊन धरी कंसाचा हात ॥ म्हणे स्त्री वधितां पाप बहुत ॥ या पापासी नाहीं गणित ॥ धर्मशास्त्रीं बोलिलें ॥४७॥
एक रथभरी वधितां किडे ॥ एक मेषवधाचें पाप घडे ॥ शत मेष मारितां पडे ॥ एक वृषभहत्या पैं ॥४८॥
शत वृषभ वधिले ॥ एक गोहत्येचें पाप घडलें ॥ शंभर गोवधांहून आगळें ॥ ब्रह्महत्येचें पाप पैं ॥४९॥
शत ब्रह्महत्यांचें पाप जाण ॥ एक स्त्रीहत्येसमान ॥ कंसराया तूं परम सुजाण ॥ स्त्रीदान मज देईं ॥१५०॥
कंस म्हणे इचा पुत्र देख ॥ माझिया जीवाचा घातक ॥ मी ईस वधीन आवश्यक ॥ म्हणोनि शस्त्र उचलिलें ॥५१॥
वसुदेव घेईं भाक ॥ जो मज सुत होईल देख ॥ तो तुज देईन निःशंक ॥ त्रिवाचा हें सत्य पैं ॥५२॥
भाक देऊनि ते वेळीं ॥ सोडविली ते वेल्हाळी ॥ अश्रु वाहती नेत्रकमळीं ॥ अधोवदनें स्फुंदत ॥५३॥
सोहळ्यामाजी अनर्थ । जैसें दुग्धामाजी सैंधव पडत ॥ कीं दिव्य आन्नामाजी कालवत ॥ विष महादुर्धर ॥५४॥
कीं सुमनशेजे अरुवारी ॥ पहुडला दिव्य मंदिरीं ॥ तों तें घर आंगावरी ॥ अकस्मात पडियेलें ॥५५॥
कीं द्रव्याचा घट लाधला ॥ म्हणोनि कर आंत घातला ॥ तों तेथें भुजंग प्रकटला ॥ तेणें डंखिलें क्षणमात्रें ॥५६॥
साधावया जातां निधान ॥ तों विवशी पडे गळां येऊन ॥ कीं उपजतां वैराग्यतत्त्वज्ञान ॥ प्रारब्ध आडवें धांवत ॥५७॥
तैसें कंसें केलें ते वेळा ॥ कैंचे साडे कैंचा सोहळा ॥ भगिनी शालक उभयतांला ॥ बंदिशाळे रक्षिलें ॥५८॥
श्रृंखला घालून उभयतांप्रती ॥ रक्षण दृढ ठेवी भोंवतीं ॥ जैसे चंदनासी रक्षिती ॥ महाभुजंग सर्वदा ॥५९॥
ऐसी कंसें केली करणी ॥ तंव देवकी जाहली गर्भिणी ॥ परम चिंता वाटे मनीं ॥ तंव ते प्रसूत जाहली वो ॥१६०॥
जाहला प्रथमचि पुत्र ॥ परम सुंदर सुनेत्र ॥ बाळ घेऊनि पवित्र ॥ मुख पाहिलें वसुदेवें ॥६१॥
मग वसुदेव बोले वचन ॥ बाळा तुजला आलें रे मरण ॥ देवकीचे आसुवें नयन ॥ भरले तेव्हां सद्गद ॥६२॥
वसुदेव म्हणे प्रणाम ॥ कंसासी दिधलें भाकदान ॥ देवकी म्हणे नेऊन ॥ अवश्य द्यावें स्वामिया ॥६३॥
वसुदेवें उचलिलें बाल ॥ भडभडां वाहे अश्रुजळ ॥ तों कंसासी कळलें तात्काळ ॥ आणवी बाळ क्षणमात्रें ॥६४॥
तों देवकी म्हणे वसुदेवा ॥ तुम्हीं पुत्र तेथें न्यावा ॥ जरी कृपा आली बंधुवा ॥ तरी एवढें सोडील ॥६५॥
बाळ घेवोनि वसुदेव चालिला ॥ परम मुखचंद्र उतरला ॥ पायीं तैसीच श्रृंखला ॥ वाजे खळखळां चालतां ॥६६॥
श्मश्रुकेश बहु वाढले ॥ नखांचे गुंडाळे वळले ॥ आंग परम मळलें ॥ शेणें घोळिलें मुक्त जैसें ॥६७॥
कीं केतूनें व्यापिला दिनकर ॥ कीं राहूनें आच्छादिला क्षीराब्धिपुत्र ॥ तैसा वसुदेव पवित्र ॥ जातां दिसे म्लान पैं ॥६८॥
मागें पुढें रक्षिती सेवक ॥ कंसापाशीं आणिलें बाळक ॥ रायापुढें ठेविलें देख ॥ शूरसेनसुतें ते वेळीं ॥६९॥
बाळक सुंदर देखिला ॥ कंसासी स्नेह दाटला ॥ मग प्रधानासी ते वेळां ॥ काय बोलिला कंस तो ॥१७०॥
म्हणे जो आठवा होईल सुत ॥ तोचि आमुचा शत्रु निश्चित ॥ हो कासया वधावे सात ॥ याचे यास असोत हे ॥७१॥
कंस म्हणे वसुदेवा ॥ हा आपुला तुम्हीं बाळ न्यावा ॥ मुख्य आम्हांसी आठवा द्यावा ॥ तो मीच वधीन स्वहस्तें ॥७२॥
ऐसें ऐकतांचि उत्तर ॥ परतला शूरसेनकुमार ॥ मनीं म्हणे नवल थोर ॥ खळासी उपजला सद्भाव ॥७३॥
म्हणे गोड कैसें जाहलें हालाहल ॥ जातवेद कैसा जाहला शीतळ ॥ पन्नगाच्या मुखींचें गरळ ॥ सुधारसतुल्य जाहलें ॥७४॥
पाषाणाचें हृदय द्रवलें ॥ वृश्चिकें साधुपण धरिलें ॥ कंटकशेजे निवालें ॥ आंग आजी वाटतें ॥७५॥
मद्यपियासी उपजलें ज्ञान ॥ हिंसक जाहला दयाघन ॥ महाकृपणें सकल धन ॥ दान आजि दीधलें ॥७६॥
व्याघ्रें धरिली आजि शांती ॥ खळासि उपजली हरिभक्ती ॥वज्रधार निश्चिती ॥ नम्र आजि वाटतसे ॥७७॥
वसुदेव वेगें ते वेळे ॥ प्रवेशला हो बंदिशाळे ॥ देवकीपाशीं बाळ दिधलें ॥ सांगितलें वर्तमान ॥७८॥
देवकीसी संतोष वाटला ॥ जैसा प्राण जातां परतला ॥ तंव तो नारद ते वेळां ॥ येतां जाहला कंससभे ॥७९॥
नारदातें कंसें पूजिलें ॥ सकळ वर्तमान निवेदिलें ॥ नारद म्हणे भुललें ॥ चित्त कां तुझें कंसराया ॥१८०॥
तुवां सोडिलें वसुदेवसुता ॥ परि तुझा शत्रु कोणता ॥ आठांपासून उफराटें गणितां ॥ तरी पहिलाच शत्रु तुझा ॥८१॥
दुसरा कीं तिसरा चौथा ॥ शत्रु तुझा रे तत्त्वतां ॥ आठांमध्यें तुझ्या घाता ॥ प्रवर्तेल कोण तो न कळे ॥८२॥
ऐकोन ब्रह्मसुताचें वचन ॥ कंसें तुकाविली मान ॥ सरडा कंटकवृक्षीं बैसोन ॥ ग्रीवा जैसी हालवी ॥८३॥
नारद हितशत्रु होय ॥ हित सांगोन करवी क्षय ॥ बाळहिंसा करितां पाहें ॥ अल्पायुषी होय तो ॥८४॥
कुलक्षय होऊनि राज्य बुडे ॥ ऐसे नारद सांगे निवाडे ॥ कंसासी ते बुद्धि आवडे ॥ म्हणे बरवें कथिलें जी ॥८५॥
कंस क्रोधें धांविन्नला ॥ बंदिशाळेमाजी आला ॥ जैसा तस्कर संचरला ॥ धनाढ्याचें निजगृहीं ॥८६॥
कीं देवघरीं रिघे श्वान ॥ कीं मूषकबिळीं व्याळ दारुण ॥ कीं होमशाळेमाजी मळिण ॥ अत्यंज जैसा पातला ॥८७॥
कीं हरिणीचें पाडस सुकुमार ॥ न्यावया आला महाव्याघ्र ॥ कीं गोवत्स देखोनि सुंदर ॥ वृक जैसा धांविन्नला ॥८८॥
ऐसा बंदिशाळेमाजी आला ॥ देवकीसी काळच भासला ॥ बाळ हृदयीं दृढ धरिला ॥ आच्छादिला निजपल्लवें ॥८९॥
कोठें गे कोठें बाळ ॥ म्हणोनि बोले चांडाळ ॥ देवकी म्हणे तूं स्नेहाळ ॥ बंधुराया सुजाणा ॥१९०॥
ओंटी पसरी म्लानवदन ॥ येवढें दे मज पुत्रदान ॥ म्हणोनि धरिले चरण ॥ निर्दयाचे तेधवां ॥९१॥
कंसें बळें हात घालूनी ॥ बाळ धरिला दृढ चरणीं ॥ येरी आरडत पडे धरणीं ॥ केळी जैसी चंडवातें ॥९२॥
द्वारीं होती चंड शिळ ॥ तिजवरी निर्दयें आपटिलें बाळ ॥ तें छिन्नभिन्न जाहलें तात्काळ ॥ पक्व फळासारिखें ॥९३॥
दुर्जनाची कैंची दया ॥ वाटपाड्यासी कैंची माया ॥ उपरति पैशून्यवादिया कदाकाळीं नव्हेचि ॥९४॥
ऐसें मारुन तें बाळ ॥ निघोन गेला कंस खळ ॥ मागुती गरोदर झाली ते वेल्हाळ ॥ दुसर्‍यानें प्रसूत जाहली ॥९५॥
स्वयें येऊन आपण ॥ तेंही मारिलें आपटून ॥ तिसरें जाहलें सगुण ॥ तेंही मारिलें क्षणार्धें ॥९६॥
चौथें पांचवें सहावें नेटें ॥ तेंही लाविलें मृत्युवाटे ॥ वसुदेवाचें दुःखें हृदय फुटे ॥ म्हणे कर्मं मोठें दुर्धर ॥९७॥
कंसें सहा गर्भ वधिले ॥ पाप असंभाव्य सांचलें ॥ गाई विप्र भक्त गांजिले ॥ थोर मांडिलें पाप पैं ॥९८॥
आतां श्रीहरि क्षीरसागरीं ॥ यावरी कैसा विचार करी ॥ तें कथाकौतुक चतुरीं ॥ सेविजे सादर होवोनियां ॥९९॥
श्रीकृष्णकथाकमळ सुकुमार ॥ सज्जन श्रोते त्यावरी भ्रमर ॥ माजी पद्यरचना केसर ॥ अतिसुवासें सेविजे ॥२००॥
कीं कृष्णकथा दुग्ध सुरस ॥ सज्जन तुम्ही राजहंस ॥ सेवा होवोनि सावकाश ॥ निद्रा आळस टाकूनि ॥१॥
कीं हे कथा सुधारस सुंदर ॥ तुम्ही संत श्रोते निर्जर ॥ हें अमृतपान करिता दुर्धर ॥ जन्ममरण तुटे पैं ॥२॥
स्वर्गींचें अमृत देव प्राशिती ॥ तो नाश पावती कल्पांतीं ॥ त्यांसी आहे पुनरावृत्ती ॥ जन्मपंक्ति सुटेना ॥३॥
तैसी नव्हे ही कथा ॥ पुनरावृत्ति नाहीं कल्पांता ॥ ब्रह्मानंदपद ये हाता ॥ तेथींच्या अर्था पाहतां हो ॥४॥
ब्रह्मानंदकृपेच्या बळें ॥ हें ग्रंथजहाज चाले ॥ भक्तीचें शीड वरी लाविलें ॥ दयावातें फडकतसे ॥५॥
ब्रह्मानंदरुप साचार ॥ तुम्ही संत श्रोते निर्धार ॥ वारंवार श्रीधर ॥ चरण वंदी प्रीतीनें ॥६॥
या अध्यायाचें अनुसंधान ॥ वसुदेवाचें जाहलें लग्न ॥ कंसें येऊनि आपण ॥ बाळें मारिलीं सहाही ॥७॥

इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंश भागवत ॥ चतुर परिसोत संत ॥ द्वितीयाध्याय गोड हा ॥२०८॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥अध्याय ॥२॥ ॥ओव्या २०८॥