हरिविजय

श्रीधरांसारखा भगवंताच्या भक्तिप्रेमात न्हाऊन गेलेला अजोड कवी, गोपालकृष्णाच्या अति गोड लीलांचे वर्णन करतो, तेव्हा काय बहार येते.


अध्याय ३

श्रीगणेशाय नमः ॥

जय जय अनंतब्रह्मांडनायका ॥ चतुराननाचिया निजजनका ॥ चोघांसीही नव्हे आवांका ॥ तुझें स्वरुप वर्णावया ॥१॥
साही जणें वेडीं होती ॥ अठरांची खुंटली गती ॥ चौघीजणी तटस्थ पाहती ॥ स्वरुपस्थिति न वर्णवे ॥२॥
पांचां नुरेचि ठाव ॥ चारी सहजचि जाहलीं वाव ॥ चौदाजणींची ठेव ॥ न चले स्वरुप वर्णावया ॥३॥
शिणल्या बहुत चौसष्टी ॥ आठजणी बहुत कष्टी ॥ अकराही हिंपुटी ॥ स्वरुप तुझें वर्णितां ॥४॥
आणीक बारा देखण्या ॥ सोळाजणी चतुर शाहाण्या ॥ आणि चौघी डोळेमोडण्या ॥ लाजोनियां तटस्थ ॥५॥
पंचविसां जाहली वाव ॥ तिघांचें नुरेचि नांव ॥ दोन्ही म्हणणें भाव ॥ हेंही तेथें विरालें ॥६॥
चहूं मुखांचा वर्णितां भागला ॥ पांचां मुखांचा तटस्थ राहिला ॥ सहा मुखांचा दडाला ॥ कपाटामाजी जाऊनि ॥७॥
सहस्त्र मुखांचा वर्णितां देख ॥ तोही जाहला तळीं तल्पक ॥ थोरथोरांसी पडले अटक ॥ एक मुखें काय वर्णूं ॥८॥
जीमूतींचें बिंदू किती ॥ हेही एक वेळां होय गणती ॥ निराळीं पायीं वेंघती ॥ परी तुझी स्थिति अगम्य ॥९॥
होईल पृथ्वीचें वजन ॥ गणवेल सिंधूचें जीवन ॥ अवनीवरी किती तृण ॥ मोजवेल गणितां तें ॥१०॥
अंबर आहे किती विती ॥ हेंही गनवेल रमापती ॥ परी तुझे गुण निश्चिती ॥ न वर्णवती कोणातें ॥११॥
असो आतां पूर्वानुसंधान ॥ द्वितीयाध्याय संपतां पूर्ण ॥ कंसें देवकीचे गर्भ वधून ॥ साही टाकिले बंदिशाळे ॥१२॥
पाप जाहलें उत्कट जाण ॥ गांजिले गाई ब्राह्मण ॥ यावरी क्षीरसागरीं जगज्जीवन ॥ काय करिता जाहला ॥१३॥
अनंतासी म्हणे अनंत ॥ चला अवतार घेऊं त्वरित ॥ करुं दुष्‍टांचा निःपात ॥ संत भक्त रक्षूं पैं ॥१४॥
तंव बोले धरणीधर ॥ मी न घें आतां अवतार ॥ पूर्वीं मी जाहलों सौमित्र ॥ कष्ट फार भोगितले ॥१५॥
हांसोनि बोले द्विसहस्त्रनयन ॥ अष्टविंशति अयनें उपोषण ॥ निराहार घोर अरण्य ॥ तुम्हांसवें सेविलें जी ॥१६॥
आतां आपणांचे अवतरावें ॥ अवतारनाटय दाखवावें ॥ गोब्राह्मण सुखी रक्षावे ॥ प्रतिपाळावे साधुजन ॥१७॥
टाकोनि कपट कुटिलभाव ॥ स्वामीसी हांसे भोगिराव ॥ बोले कौतुकें रमाधव ॥ शेषाप्रती स्वानंदें ॥१८॥
तूं माझा प्राणसखा ॥ समरभूमीचा पाठिराखा ॥ तुजविण भक्तटिळका ॥ अवतार मी न घेंचि ॥१९॥
तूं माझें निजांग पूर्ण ॥ तूं सखया माझा निजप्राण ॥ तुजविण मज एक क्षण ॥ न गमेचि जिवलगा ॥२०॥
तूं जाहलासी पूर्वीं लक्ष्मण ॥ लंकेसी केलें रणकंदन ॥ बहुत सेवा करुन ॥ मज तुवां तोषविलें ॥२१॥
आतां तूं पुढें जाय सत्वर ॥ होईं माझा ज्येष्‍ठ सहोदर ॥ मी तूझी आज्ञा पाळीन निर्धार ॥ बळिभद्र होईं तूं ॥२२॥
वडील बंधु तूं होईं देवकीच्या गर्भीं जाऊनि राहीं ॥ मी योगमायेस लवलाहीं ॥ पाठवितो तुजमागें ॥२३॥
कंसें वधिलें गर्भ सकळ ॥ तुज योगमाया काढील ॥ मग गोकुळीं नेऊनि ठेवील ॥ रोहिणीच्या निजगर्भीं ॥२४॥
माया जाईल यशोदेच्या उदरा ॥ मग मी येईन मथुरापुरा ॥ देवकीचा गर्भवोवरा ॥ माझा अवताररुप होय ॥२५॥
उपजतांचि गोकुळीं येईन ॥ मग तुम्ही आम्ही खेळों दोघे जण ॥ गोरक्षमिषें संपूर्ण ॥ दैत्य तेथील संहारुं ॥२६॥
करुन साष्टांग नमन ॥ पुढें चालिला संकर्षण ॥ देवकीच्या उदरीं येऊन ॥ गर्भ राहिला सातवा ॥२७॥
दिवसेंदिवस गर्भ वाढे ॥ मंदिरीं परम प्रकाश पडे ॥ जैसा पळेंपळ सूर्य चढे ॥ उदयाद्रीहूनि पश्चिमे ॥२८॥
वसुदेवाप्रती देवकी बोले ॥ सहा वेळां मी गर्भिणी जाहलें ॥ परी नवल वाटतें ये वेळे ॥ या गर्भाचें मजलागीं ॥२९॥
वाटे पृथ्वी उचलीन ॥ कीं आकाशा धीर देईन ॥ सप्त समुद्र सांठवीन ॥ नखाग्रीं मज वाटतसे ॥३०॥
घेऊन नांगरमुसळ ॥ मीच मर्दीन कंसदळ ॥ दैत्य मारावे समूळ ॥ मनामाजी वाटतसे ॥३१॥
वसुदेव म्हणे ते क्षणीं ॥ न कळे ईश्वराची करणी ॥ येवढा तरी वांचोनी ॥ विजयई हो का सर्वदा ॥३२॥
तों लागला सातवा मास ॥ निद्रा आली देवकीस ॥ वसुदेवही सावकाश ॥ निद्रार्णवीं निमग्न ॥३३॥
तंव ती हरीची योगमाया ॥ तिची ब्रह्मांदिकां न कळे चर्या ॥ इच्छामात्रें महत्कार्या ॥ ब्रह्मांड हें रचियेलें ॥३४॥
ब्रह्मा विष्णु शिव तीन्ही ॥ गर्भी आलीं बाळें तान्हीं ॥ परी एकासी नेत्र उघडूनी ॥ स्वरुप पाहों नेदीच ॥३५॥
आत्मसुखाचा समुद्र ॥ त्यांत पहुडले जीव समग्र ॥ परी चाखों नेदी अणुमात्र ॥ गोडी तेथींची कोणातें ॥३६॥
हे चैतन्याची बुंथी ॥ हे अरुपाची रुपकर्त्री ॥ ब्रह्मांडींचे पुतळे नानागती ॥ एका सूत्रें नाचवी पैं ॥३७॥
इनें निर्गुण गुणासी जाहली पतिव्रता ॥ ब्रह्मांड रचिलें तत्त्वतां ॥ इच्छामात्रेंकरुनियां ॥३९॥
शेजे निजवूनि भ्रतार ॥ सृष्टी घडी मोडी समग्र ॥ समाचार अणुमात्र ॥ कळों नेदी पतीचें ॥४०॥
हे कौटाळीण निर्धारीं ॥ नसतींच दैवतें उभीं करी ॥ जीव पाडिले अघोरीं ॥ नाना योनीं हिंडवी ॥४१॥
धरील कोणी स्वरुपाची चाड ॥ त्यावरी घाली नसतें लिगाड ॥ पुढें स्वर्गसुख करी आड ॥ तेंचि गोड दाखवी ॥४२॥
गोड तें कडवट केलें ॥ कडवटा गोडपण दाखविलें ॥ अहंकारामद्य जीवा पाजिलें ॥ वेडे केले सर्वही ॥४३॥
आतां असो हे मायाराणी ॥ इची विपरीतचि करणी ॥ तिनें देवकीचा गर्भ काढूनी ॥ गोकुळासी पैं नेला ॥४४॥
कैसा नेला काढुनी ॥ ब्रह्मादिकां न कळे करणी ॥ रोहिणी वसुदेवाची पत्‍नी ॥ नंदागृहीं होती ते ॥४५॥
कंसाचिया भयें जाण ॥ नंदगृहीं राहिली लपोन ॥ तिच्या पोटीं नेऊन ॥ गर्भ घातला ते क्षणीं ॥४६॥
निजले ठायीं गर्भ ॥ पोटांत घातला स्वयंभ ॥ परम तेजस्वी सुप्रभ ॥ सूर्य जैसा तेजस्वी ॥४७॥
जागी जाहली रोहिणी ॥ तों सात मासांची गर्भिणी ॥ म्हणे कैसी जाहली करणी ॥ चिंता मनीं वर्तत ॥४८॥
पुरुष नसतां गर्भ राहिला ॥ परम चिंताक्रांत ते अबला ॥ नंदयशोदेस कळला ॥ समाचार सर्व तो ॥४९॥
जीवीं झोंबला चिंताग्नी ॥ तों आकाशीं वदली देववाणी ॥ चिंता करुं नको रोहिणी ॥ वसुदेवाचा गर्भ असे ॥५०॥
पोटा येतो भोगींद्र ॥ उतरील पृथ्वीचा भार ॥ ऐकतां हें उत्तर ॥ सुख जाहलें समस्तां ॥५१॥
लोकापवाद सर्व हरला ॥ चिंतेचा डाग धुतला ॥ तों बळिराम जन्मला ॥ नवमास भरतांचि ॥५२॥
प्रकाशला सहास्त्रकिरण ॥ तैसा बाळ देदीप्यमान ॥ नंदें जातक वर्तवून ॥ बळिभद्र नाम ठेविलें ॥५३॥
ऐसा उपजला अहींद्र ॥ तों यशोदा जाहली गरोदर ॥ हरिमायेनें अवतार ॥ तेथें घेतला तेधवां ॥५४॥
यशोदा गर्भिणी जाहली ॥ इकडे कथा कैसी वर्तली ॥ देवकी पाहे घाबरली ॥ तों गर्भ नाहीं पोटांत ॥५५॥
नेणों कैसी जाहली करणी ॥ सांगे वसुदेवा लागोनी ॥ म्हणे गर्भ न पडेची धरणीं ॥ गेला जिरोनि पोटांत ॥५६॥
वसुदेव म्हणे ते वेळां ॥ कंसधाकें गर्भ जिरला ॥ न कळे ईश्वराची कळा ॥ कंसास कळला समाचार ॥५७॥
दूत सांगती कंसातें ॥ गर्भ जिरला तेथिंचा तेथें ॥ कंस म्हणे आतां आठव्यातें ॥ बहुत जपा सर्वही ॥५८॥
देवकी होतांचि गर्भिण ॥ जागा नेत्रीं तेल घालून ॥ आठव्याची आठवण ॥ विसरुं नका सर्वथा ॥५९॥
देवकीउदरींचा आठवा ॥ निजध्यास बसला कंसभावा ॥ जनीं वनीं आघवा ॥ आठवा आठवा आठवत ॥६०॥
जागृतीं सुषुप्तीं स्वप्नीं ॥ आठवा दिसे ध्यानीं मनीं ॥ आठवा दिसे भोजनीं ॥ आठवा शयनीं सोडीना ॥६१॥
भूमि दिसे आठव्याऐसी ॥ आठवा दिसे आकाशीं ॥ आठव्यानें व्यापिलें त्यासी ॥ दिवसनिशी आठवा ॥६२॥
क्षीरसागरीं श्रीहरी ॥ क्षीराब्धिसुतेसी आज्ञा करी ॥ पद्माक्षि तूं क्षितीवरी ॥ क्षितीपाळउदरीं अवतरें ॥६३॥
वैदर्भदेशींचा भीमक राजा ॥ तयाची तूं होय आत्मजा ॥ तात्काळ चालली कमळजा ॥ नमस्कारुनि हरीतें ॥६४॥
जगद्वंद्य स्वयें आपण ॥ प्रवेशाला मथुरापट्टण ॥ देवकीचे गर्भी येऊन ॥ राहता जाहला कौतुकें ॥६५॥
गर्भवासा आला भगवंत ॥ म्हणतां हांसतील साधुसंत ॥ लीलावतारी जगन्नाथ ॥ जन्ममृत्यु त्या कैंचा ॥६६॥
ज्याचें करितां स्मरण ॥ जाय जन्ममृत्यु खंडोन ॥ तो राहिला गर्भीं येऊन ॥ कल्पांतींही घडेना ॥६७॥
उगाच लौकिकभाव ॥ दाविली मृत्युलोकींची टेव ॥ तो ब्रह्मानंद स्वयमेव ॥ जन्म मृत्यु त्या कैंचा ॥६८॥
क्षीरसागरींहून हरि आला ॥ तरी तो ठाव काय ओस पडिला ॥ तो तैसाचि संचला ॥ लक्ष्मीशेषांसमवेत ॥६९॥
अनंत रुपें अनंत नामें ॥ अनंत अवतार अनंत कर्में ॥ अनंत लीला घनश्यामें ॥ भक्तांलागीं दाविल्या ॥७०॥
अनंत ब्रह्मांडें अनंत शक्ती ॥ अनंत युगींच्या अनंत कीर्ती ॥ अनंत रुपें अनंत मूर्ती ॥ अतर्क्य गति वेदशास्त्रां ॥७१॥
असो लौकिक विचार देख ॥ गर्भीं आला लक्ष्मीनायक ॥ कंसासी लाविला धाक ॥ देखिला नसतां सर्वदा ॥७२॥
देवकी जाहली गर्भिणी ॥ तेज न माये गगनीं ॥ खेद कांहीं न वाटे मनीं ॥ सुखेंकरुनि डुल्लत ॥७३॥
पोटा आला विदेही हरी ॥ देवकी नाहीं देहावरी ॥ जनीं वनीं दिगंतरीं ॥ अवघा मुरारी दिसतसे ॥७४॥
वसुदेव म्हणे देवकीप्रती ॥ तुज चिंता कां न वाटे चित्तीं ॥ आठव्याची कैसी गती ॥ होईल ते न कळे पां ॥७५॥
कंस जपतो बहुत ॥ आठव्याचा करावया घात ॥ यावरी देवकी बोलत ॥ प्रतिउत्तर काय तेव्हां ॥७६॥
भुजा पिटोनि बोले वचन ॥ कंसास मारीन आपटोन ॥ मुष्टिकचाणूरांचा प्राण ॥ क्षणमात्रें घेईन मी ॥७७॥
हांक फोडोन गर्जे थोर ॥ उतरीन पृथ्वीचा भार ॥ करुनि दैत्यांचा संहार ॥ बंदिशाळा फोडीन मी ॥७८॥
आणीं वेगें धनुष्यबाण ॥ युद्ध करीन मी दारुण ॥ जरासंध रथीं बांधोन ॥ सत्रा वेळां आणीन मी ॥७९॥
भस्म करीन कालयवन ॥ रचीन द्वारकापट्टण ॥ सकळ नृपां शिक्षा लावून ॥ पट्टरानी आणीन मी ॥८०॥
हांक फोडिली क्रोधें थोर ॥ जिवें मारीन भौमासुर ॥ निवटीन कौरवभार ॥ निजभक्तकैवारें ॥८१॥
मी भक्तांचा सारथि होईन ॥ दुष्ट सर्व संहारीन ॥ मी ब्रह्मानंद परिपूर्ण ॥ अवतरलों पृथ्वीवर ॥८२॥
वसुदेवासी चिंता वाटे ॥ ही गर्जते येवढ्या नेटें ॥ जरि बाहेर मात प्रकटे ॥ तरी अनर्थ होईल पां ॥८३॥
वसुदेव बोले वचन ॥ देवकी धरीं आतां मौन ॥ येरी म्हणे कैंची देवकी पूर्ण ॥ ब्रह्म सनातन मी असें ॥८४॥
स्त्री पुरुष नपुंसक ॥ त्यांहूनि वेगळा मी निष्कलंक ॥ सकळमायाचक्रचाळक ॥ कर्ता हर्ता मीच पैं ॥८५॥
मी सर्वद्रष्टा अतींद्रिय ॥ मी अज अव्यय निरामय ॥ अजित अपार निष्क्रिय ॥ आनंदमय वर्तें मी ॥८६॥
मी प्रळयकाळाचा शास्ता ॥ मी आदिमायेचा नियंता ॥ मी चहूं वाचांपरता ॥ मायानिमिंता मीच पैं ॥८७॥
मीच सगुण मीच निर्गुण ॥ मीच थोर मीच लहान ॥ देव दैत्य निर्मून ॥ पाळिता हर्ता मीच पैं ॥८८॥
ऐसें देवकी बोलोन ॥ मागुती धरिलें मौन ॥ तों आकाशीं देव संपूर्ण ॥ गजर करिती दुंदुभींचा ॥८९॥
अवतरेल आतां भगवंत ॥ करील दुष्‍टांचा निःपात ॥ देव मिळोनि समस्त ॥ गुप्त मथुरेंत उतरले ॥९०॥
ब्रह्मादिक आणि चंद्र ॥ बंदिशाळे पातळे समग्र ॥ देवकीस प्रदक्षिणा करिती सुरवर ॥ एक नमस्कार घालिती ॥९१॥
उभे ठाकूनि बद्धांजली ॥ गर्भस्तुति आरंभिली ॥ जय सच्चिदानंद वनमाळी ॥ देवकीजठरगर्भा ॥९२॥
जय हरे नारायणा गोविंदा ॥ इंदिरावर आनंदकंदा ॥ सर्वेशा मुकुंदा परमानंदा ॥ परमपुरुषा परज्ञा ॥९३॥
पद्मजजनका पुरातना ॥ पंकजनेत्रा परमपावना ॥ पद्मवल्लभा पशुपतिजीवना ॥ पयोब्धिवासा परेशा ॥९४॥
पतितपावना पंकजधारका ॥ कमनीयरुपा निष्कलंका ॥ कमळस्वरुपा कमलानायका ॥ किल्बिषमोचका कमलेशा ॥९५॥
कर्ममोचका करिवरतारणा ॥ कैवल्यनिधि कैटभभंजना ॥ करुणाकरा कामविहीना ॥ काळनाशना काळात्मया ॥९६॥
आदिकेशवा विश्वभूषणा ॥ विश्वंभरा वेदपाळणा ॥ वेदपुरुषा वेदस्थापना ॥ विश्वाधीशा विश्वपते ॥९७॥
अनंतेवषा अनंतवदना ॥ अनंतनामा अनंतनयना ॥ अनंतपाणि अनंतचरणा ॥ अनंतकल्याणा नमोस्तु ते ॥९८॥
अव्ययरुपा अपरंपारा ॥ आगण्युआ अगुणा अगोचरा ॥ अनामा असंगा अक्षरा ॥ आदिकारणा आत्मया ॥९९॥
अमानुइषा अविद्याछेदना ॥ आनंदरुपा आनंदसदना ॥ अभेदा अबोधी अमळपूर्णा ॥ आदिमूळा अव्यक्ता ॥१००॥
सर्वतीता सर्वज्ञा ॥ गुणसागरा गुणज्ञा ॥ आम्ही सकळ सुर तवाज्ञा ॥ पाळोनियां राहतों ॥१॥
ऐसी स्तुति करुनि जाणा ॥ देव पावले अंतर्धाना ॥ आनंद न माये मना ॥ सुरवरांच्या तेधवां ॥२॥
कंसास रात्रंदिवस ॥ लागला आठव्याचा निजध्यास ॥ आठही प्रहर तयास ॥ आठवावयास दुजें नाहीं ॥३॥
दूतींप्रती पुसे कंस ॥ गर्भास किती जाहले मास ॥ त्या म्हणती संपावयास ॥ नवमासां अवधि थोडी हो ॥४॥
आपण येऊन कंसासुर ॥ उभा राहे देवकीसमोर ॥ तंव ते आनंदरुप साचार ॥ चिंता अणुमात्र नाहींच ॥५॥
नासाग्रीं ठेवून दृष्टी ॥ कृष्णरुप पाहे सृष्‍टी ॥ कृष्णरुप पाहे पाठीं पोटीं ॥ बोलतां ओठीं कृष्णचि ये ॥६॥
कृष्णरुप आसन वसन ॥ कृष्णरुप अन्न पान ॥ कृष्णरुप दिसे सदन ॥ भूषण संपूर्ण कृष्णरुप ॥७॥
पृथ्वी आप तेज वायु निराळ ॥ कृष्णरुप दिसे सकळ ॥ स्थावर जंगम निर्मळ ॥ घननीळरुप दिसतसे ॥८॥
पुढें उभा कंस देख ॥ परी निर्भय देवकी सुरेख ॥ महेशापुढें मशक ॥ तैसा कंस भासतसे ॥९॥
इंद्रापुढें जैसा रंक ॥ कीं ज्ञानियापुढें महामूर्ख ॥ कीं केसरीपुढें जंबुक ॥ का सूर्यापुढें खद्योत पैं ॥११०॥
कीं हंसापुढें बक ॥ कीं कोकिळेपुढें काग ॥ कीं विप्रासमोर मांग ॥ तैसा खळ उभा तेथें ॥११॥
कीं नामापुढें पाप देख ॥ कीं वेदांतापुढें चार्वाक ॥ कीं शंकरापुढें मशक ॥ कीं मीनकेतन उभा जैसा ॥१२॥
कीं पंडितापुढें अजापाळक ॥ कीं श्रोतियापुढें हिंसक ॥ कीं वासुकीपुढें मूषक ॥ लक्षणें पाहूं पातला ॥१३॥
अग्नीपुढें जैसें तृण ॥ कीं ज्ञानियापुढें अज्ञान ॥ कीं महावातासी आडवें पूर्ण ॥ जलदजाल जैसें कां ॥१४॥
ऐसा कंस देवकीपुढें ॥ तीस न्याहाळूनि पाहे निवाडें ॥ तंव तें चतुर्भुज रुपडें ॥ शंखचक्रयुक्त दिसे ॥१५॥
न दिसे स्त्रियेची आकृती ॥ परम देदीप्यमान विष्णुमूर्ती ॥ आरक्तनेत्र सुदर्शन हातीं ॥ ऊर्ध्व करुनि उभी असे ॥१६॥
मुरकुंडी कंसाची वळली ॥ शस्त्रें हातींचीं गळालीं ॥ बोबडी तोंडासी पडली ॥ हांक फोडिली भयें तेव्हां ॥१७॥
आरडोनियां कंस पळे ॥ थरथरां कांपे वाटे अडखळे ॥ पिशाचवत संचरलें ॥ गृहामाजी आपुलिया ॥१८॥
कंस तेव्हां शस्त्र घेऊनी ॥ रागें आपटीत मेदिनीं ॥ आठव्यास जिवें मारुनी ॥ टाकीन मी निर्धारें ॥१९॥
आठव्यानें मज व्यापिलें ॥ त्यास मी गिळीन सगळें ॥ कंस रागें फिरवी डोळे ॥ आल्यागेल्यावरी पैं ॥१२०॥
आतां श्रीकृष्णाचा जन्मकाळ ॥ पाहों आले निर्जर सकळ ॥ दुंदुभिनादें निराळ ॥ दुमदुमलें तेधवां ॥२१॥
विमानांची जाहली दाटी ॥ वाव नाहीं नभापोटीं ॥ करिती दिव्य सुमनवृष्‍टी ॥ आनंद पोटीं न समाये ॥२२॥
वर्षाऋतु श्रावणमास ॥ बुधाष्टमी कृष्णपक्ष ॥ अवतरला कमलदलाक्ष ॥ रोहिणी नक्षत्र ते दिवशीं ॥२३॥
सोमवंशीं अवतार ॥ म्हणोनि साधिला चंद्रपुत्रवार ॥ जाहला शशीचा उद्धार ॥ दशा आली वंशासी ॥२४॥
मध्यरात्रीं अष्टमीस ॥ देवकीपुढें परमपुरुष ॥ चतुर्भुज हृषीकेश ॥ निमासुर डोळस पैं ॥२५॥
आठां वर्षांची मूर्ती ॥ असंभाव्य पडली दीप्ती ॥ तेजें दश दिशा उजळती ॥ तेथें लपती शशिसूर्य ॥२६॥
पदकमळींचा आमोद सेवावया ॥ भ्रमरी जाहली क्षीराब्धितनया ॥ सर्वकाळ न विसंबे पायां ॥ कृपण जैसा धनातें ॥२७॥
भागीरथी चरणीं उद्भवली ॥ सागरीं ते एक जाहली ॥ परी न विसंबे निजमुळीं ॥ कदाकाळीं तुटेना ॥२८॥
अरुणबालार्कसंध्याराग ॥ दिव्य रत्‍नांचे काढिले रंग ॥ तैसे तळवे आरक्त सुरंग ॥ श्रीरंगाचे शोभती ॥२९॥
चंद्र क्षयरोगें जाहला कष्टी ॥ मग राहिला चरणांगुष्ठीं ॥ कीं दशधा होऊनि दाही बोटीं ॥ सुरवाडला शशी तो ॥१३०॥
वज्र ध्वज पद्म अंकुश ॥ ऊर्ध्वरेखा चक्र पदीं विशेष ॥ सामुद्रिक चिन्हें सुरस ॥ काय अर्थ सुचविला ॥३१॥
साधकास ऊर्ध्वरेखा ॥ ऊर्ध्वमार्ग दावी देखा ॥ सत्त्वशीळा प्रेमळ भाविका ॥ ऊर्ध्वसंकेत दावीतसे ॥३२॥
विद्यामदें जाहले जे मस्त ॥ कोणास न लेखिती गज उन्मत्त ॥ त्यांसी आकर्षावया वैकुंठनाथ ॥ क्षमांकुश धरी पदीं ॥३३॥
पद्म कां धरिलें पायीं ॥ पद्मा वसे तया ठायीं ॥ आणिकांतें प्राप्त नाहीं ॥ घोर तप आचरतां ॥३४॥
अहंकार पर्वत थोर ॥ भक्तांस बाधक जड फार ॥ तो फोडावया वज्र ॥ हरीनें पायीं धरियेलें ॥३५॥
कीं तें चरणलक्षण जहाज ॥ वरी विशाळ भक्तिध्वज ॥ भक्त तारावया अधोक्षज ॥ सदा उदित वाट पाहे ॥३६॥
जीव शरण येती जडरुप ॥ त्यांचें छेदावया सर्व पाप ॥ चक्र पायीं देदीप्य ॥ तेज अमूप झळकतसे ॥३७॥
प्रपदें दिसती विमल ॥ घोटी त्रिकोण सोज्ज्वळ ॥ इंद्रनीळमणि सुढाळ ॥ परी उपमे पुरेना ॥३८॥
तळवे आरक्त विराजती ॥ कीं बहु श्रमली सरस्वती ॥ म्हणोनि घ्यावया विश्रांती ॥ तळवां राहिली हरीच्या ॥३९॥
विश्वाचीं पापें किती हरावीं ॥ म्हणोनि श्रमली जान्हवी ॥ शुभ्र वांकीरुप जाहली बरवी ॥ म्हणोनि सत्कवि वर्णिती हो ॥१४०॥
कालिंदी कृतांताची भगिनी ॥ ऐसें बोलिजे सर्वजनीं ॥ तो अपवाद चुकवावयालागूनी ॥ मांडया सुनीळ झाली ते ॥४१॥
ऐसी हरिपदीं त्रिवेणी सुरंग ॥ अज्ञानच्छेदक दिव्य प्रयाग ॥ अक्षयवट सुरंग ॥ ध्वजांकुश तेचि पैं ॥४२॥
चरणीं सुरवाडले प्रेमळ ॥ तेच तेथें पूर्ण मराळ ॥ वांकींवरी रत्‍नें तेजाळ ॥ तपोधन तपती ते ॥४३॥
प्रयागीं मोक्ष ठेवितां देह ॥ येथींच्या श्रवणें होय विदेह ॥ भावें माघमासीं निःसंदेह ॥ त्रिवेणीमाधव सेविजे ॥४४॥
त्या प्रयागीं जातां कष्ट ॥ हा ध्यानींच होतो प्रगट ॥ या प्रयागीं नीलकंठ ॥ क्षेत्रसंन्यास घेत पैं ॥४५॥
वांकी नेपुरें तोडर ॥ करिती दैत्यांवरी गजर ॥ पोटर्‍या जंघा सुकुमार ॥ श्यामसुंदर दिसती पैं ॥४६॥
कीं ते सरळ कर्दळी स्तंभ ॥ कीं गरुडपाचूंचे उगवले कोंभ ॥ कीं शोधूनियां सुनीळ नभ ॥ जानु जंघा ओतिल्या ॥४७॥
कीं मिळोनि सहस्त्र सौदामिनी ॥ शीतळ होऊनि पीतवसनीं ॥ जडल्या चंचळपण टाकूनी ॥ हरिजघनीं सर्वदा ॥४८॥
कटीं मेखळेचें तेज आगळें ॥ दिव्य रत्‍नें मिरवती सुढाळें ॥ कीं एकहारी सूर्यमंडळें ॥ हरिजघनीं जडलीं पैं ॥४९॥
नाभि वर्तुळ गंभीर ॥ जैसा कां बालभास्कर ॥ तेथें उद्भवला चतुर्वक्‍त्र ॥ सृष्टीचिये आदिकाळीं ॥१५०॥
उदरीं त्रिवळी सुकुमार ॥ कौस्तुभतेजें झांके अंबर ॥ वैजयंती मुक्ताहार ॥ चरणांगुष्ठापर्यंत पैं ॥५१॥
वक्षःस्थळीं श्रीवत्सलांछन ॥ सव्यभागीं शोभायमान ॥ वामभागीं श्रीनिकेतन ॥ वास्तव्यस्थळ श्रीचें पैं ॥५२॥
शंख चक्र गदा पद्म ॥ चतुर्बाहु उत्तमोत्तम ॥ कीं धर्मार्थमोक्षकाम ॥ चारी पुरुषार्थं उभारिले ॥५३॥
पांघुरला जो पिंताबर ॥ जडितपल्लव मनोहर ॥ कीं तेणें रुपें सहस्त्रकर ॥ अवतरला भासतसे ॥५४॥
चांदणें शोभे शुद्ध निराळीं ॥ तैसी उटी आंगीं शोभली ॥ कीं इंद्रनीळा गवसणी घातली ॥ काश्मीराची सुरंग ॥५५॥
कंबुकंठ विराजमान ॥ नासिक सरळ सुहास्यवदन ॥ मंदस्मित झळकती द्शन ॥ चंद्रतेज उणें पैं ॥५६॥
कीं सर्वही आनंद मिळोन ॥ हरिमुखीं वसती अनुदिन ॥ त्रैलोक्यसौंदर्य विसांवोन ॥ तेथेंच गोळा जाहलें ॥५७॥
कुंडलें तळपती मकराकार ॥ तेजें लखलखिलें अंबर ॥ मज वाटे शशिदिनकर ॥ हरिश्रोत्रीं लागले ॥५८॥
कुंडलांची दिव्य दीप्ती ॥ गंडस्थळीं झळके ज्योती ॥ कुंडलांस कर्ण शोभविती ॥ कर्णाची दीप्ती विशेष ॥५९॥
कृष्णतनूच्या सुरवाडे ॥ अलंकारांसी प्रभा चढे ॥ कपाळीं टिळक निवाडे ॥ मृगमदाचा सतेज ॥१६०॥
कल्पांतीचा सूर्य प्रगटला ॥ तैसा मुकुट तेजागळा ॥ वरी दिव्य मणि मिरवला ॥ तो वर्णिला नवजाय ॥६१॥
बाहुदंडीं कीर्तिमुखें ॥ हस्तकंकणें दिव्य सुरेखें ॥ मुद्रिकांचें तेज झळके ॥ चपळेहूनि विशेष ॥६२॥
ऐसा एकाएकीं बंदिशाळे ॥ देवकी देखे घनसांवळें ॥ जिवाचें निंबलोण केलें ॥ हरीवरुनि तेधवां ॥६३॥
आनंद न माये अंबरीं ॥ म्हणे भक्तवत्सला श्रीहरी ॥ तूं माझिया निजोदरीं ॥ पुत्र होवोनि अवतरें ॥६४॥
तूं विश्वंभर बहु थोर ॥ परी लोक म्हणती माझा पुत्र ॥ ऐसा होईं तूं राजविनेत्र ॥ आळी माझी पुरवावी ॥६५॥
हरी म्हणे ते वेळ ॥ मी बाळक होईन अवलीळा ॥ परी मज सत्वर गोकुळा ॥ नेऊनियां घालावें ॥६६॥
तेथें माझा प्राणमित्र ॥ ज्येष्ठ बंधु बळिभद्र ॥ मग दोघेही येऊ साचार ॥ दर्शनालागीं तुमच्या ॥६७॥
ऐसें बोलून जगज्जीवन ॥ हास्यवदनें अवलोकून ॥ आपुली योगमाया घालून ॥ देवकीसी मोहिलें ॥६८॥
सच्चिदानंद घननीळ ॥ देवकीपुढें जाहला बाळ ॥ तीस वाटलें केवळ ॥ माझें उदरीं जन्मला ॥६९॥
पहिला प्रताप विसरली ॥ बाळ देखोन घाबरली ॥ असंभाव्य प्रभा पडली ॥ बंदिशाळे न समाये ॥१७०॥
रात्र जाहली दोन प्रहर ॥ वसुदेवासी उठवी सुंदर ॥ म्हणे शब्द जाईल बाहेर ॥ तरी कंस धांवेल पैं ॥७१
कोठें तरी कृष्ण लपवावा ॥ बाहेर तर्क कळों न द्यावा ॥ मौनेंचि हृदयीं धरावा ॥ तरीच लाभेल कृष्ण हा ॥७२॥
वसुदेव लावलाहें धांविन्नला ॥ श्रीकृष्ण हृदयीं धरिला ॥ म्हणे कोठें लपवूं याला ॥ हा झांकिला नवजाय ॥७३॥
सूर्य काय मुष्टींत झांके ॥ चंद्र न लपे कदा काखे ॥ ऐरावत शक्राचा देखें ॥ लपे कैसा पर्णकुटीं ॥७४॥
सिंधु न माये रांजणीं ॥ बोचक्यांत न लपे कदा अग्नी ॥ मेरु काखेसी घालूनी ॥ कोणा लपवे सांग पां ॥७५॥
मूर्खांमाजी पंडित ॥ अभाग्यांत श्रीमंत ॥ क्लीबांमाजी प्रतापवंत ॥ शूर कैसा झांके पां ॥७६॥
लवणाचा घट थोर ॥ आवरुं न शके गंगापूर ॥ वानरांमाजीं रघुवीर ॥ कदाकाळीं झांकेना ॥७७॥
भूतांमाजी शंकर ॥ किरडांमाजी धरणीधर ॥ रंकामाजी राजेंद्र ॥ कदा झांकिला जाईना ॥७८॥
कस्तुरी चोरिली चोरें ॥ परी परिमळें हाट भरे ॥ तैसा कृष्ण न झांके वो सुंदरे ॥ लपवितां कोठेंही ॥७९॥
बाहेर प्रकटतां मात ॥ तात्काळ होईल अनर्थ ॥ ज्यासी द्रव्यकूप सांपडत ॥ तेणें लोकातें न सांगावें ॥१८०॥
तों हळूच बोले देवकी बोला ॥ हा अयोनिसंभव पुतळा ॥ यास नेऊन घाला गोकुळा ॥ भय तुम्हांला कदा नाहीं ॥८१॥
तंव वसुदेव म्हणे ॥ पदीं श्रृंखला द्वारीं रक्षणें ॥ लोहारें ठोकूनि घणे ॥ कुलुपें कपाटें दृढ केलीं ॥८२॥
मध्यरात्रीं पर्जन्यकाळ ॥ यमुनेसी पूर असे तुंबळ ॥ बेडी वाजे खळखळ ॥ द्वारपाळ जागे पैं ॥८३॥
घन वर्षतो मंदमंद ॥ वसुदेव जाहला सद्गद ॥ हृदयीं धरिला ब्रह्मानंद ॥ चैतन्यधन श्रीकृष्ण ॥८४॥
अवलोकिता श्रीकृष्णवदन ॥ बेडी तुटली न लागतां क्षण ॥ ज्यांचे करितांच स्मरण ॥ भावबंधन निरसे पैं ॥८५॥
नवल वाटलें वसुदेवा ॥ घेवोनि चालिला वासुदेवा ॥ माय धांवोनि तेधवां ॥ वदन विलोकी पुत्राचे ॥८६॥
पुन्हां बाळा दावी वदन ॥ आसुवें भरले तेव्हां नयन ॥ कृष्ण करी हास्यवदन ॥ मातेकडे पाहोनियां ॥८७॥
तो चहूं दारवंटा ते वेळे ॥ दृढ कुलुपें ठोकिले खिळे ॥ जावळी येता घननीळें ॥ पायें स्पर्शिलीं कपाटें ॥८८॥
तात्काळ उघडलीं चारीं द्वारें ॥ रक्षक व्यापिले निद्राभरें ॥ वसुदेव चालिला त्वरें ॥ कोणी दुसरें आढळेना ॥८९॥
वर्षती पर्जन्याच्या धारा ॥ तों फणींद्र धांविन्नला त्वरा ॥ विशाळ फळा ते अवसरा ॥ कृष्णावरी उभारिला ॥१९०॥
खालीं पिता नेत राजीवनेत्र ॥ भोगींद्र वरी जाहला छत्र ॥ वेगें पावला यमुनातीर ॥ तों महापूर भरलासे ॥९१॥
मागें पुढें वसुदेव पाहे ॥ म्हणे येथें करावें काय ॥ उदकामाजी लवलाहें ॥ बाळ घेवोन संचरला ॥९२॥
जों जों उचली कृष्णातें ॥ तों तों जीवन चढे वरुतें ॥ स्पर्शावया जगज्जीवनातें ॥ यमुनेतें आल्हाद ॥९३॥
वरी उचलितां माधवा ॥ आकंठ उदक जाहलें वसुदेवा ॥ वसुदेव म्हणे कमळाधवा ॥ वैकुंठपति धांवें कां ॥९४॥
तंव श्रीकृष्णें दक्षिणचरण ॥ तात्काळ बाहेर काढून ॥ स्पर्शिलें यमुनाजीवन ॥ जाहली पावन तेणें ते ॥९५॥
परमसुखें यमुना सवेग ॥ तात्काळ जाहली दोन भाग ॥ जैसा स्त्रिया करिती भांग ॥ क्षणमात्र नलगतां ॥९६॥
वसुदेव उतरुन यमुना ॥ तात्काळ आला नंदभवना ॥ तंव यशोदेसी जाहली कन्या ॥ परी ते कांहीं नेणेचि ॥९७॥
ते योगमाया हरीची पूर्ण ॥ तिनें निद्रिस्त केले सकळ जन ॥ यशोदेशी न कळे वर्तमान ॥ कन्यारत्‍न पुढें तें ॥९८॥
कपाटें मोकळीं सर्वही ॥ वसुदेव प्रवेशला अंतर्गृहीं ॥ कृष्णा ठेवूनि लवलाही ॥ कन्या वेगें उचलिली ॥९९॥
पुत्र ठेवूनि कन्या नेली ॥ कोणासी न कळे गोकुळीं ॥ वसुदेव तेच वेळीं ॥ बंदिशाळे पातला ॥२००॥
वसुदेव परम ठकला ॥ कृष्ण हातींचा दूर टाकिला ॥ माया आणितां श्रृंखला ॥ पायीं दृढ तैसीच ॥१॥
कपाटें तैसींच सकळिक ॥ द्वारीं जागती सेवक ॥ मायेसी घेतां अटक ॥ सर्व जाहली पूढती ॥२॥
हिरा ठेवूनि आणिली गार ॥ सूर्य देऊनि घेतला अंधकार ॥ पाच देऊनि निर्धार ॥ कांच घरा आणिली ॥३॥
परीस देऊनि घेतला खडा ॥ पंडित देऊनि आणिला वेडा ॥ चिंतामणि देऊनि रोकडा ॥ पलांडू घेतला वळेंचि ॥४॥
अमृत देऊनि घेतली कांजी ॥ कल्पवृक्ष देऊनि घेतली भाजी ॥ कामधेनु देऊनि सहजी ॥ अजा घेतली पालटें ॥५॥
निजसुख देऊनि घेतलें दुःख ॥ कस्तूरी देऊनि घेतली राख ॥ सोनें देऊनि सुरेख ॥ शेण जैसें घेतलें ॥६॥
हंस देऊनि घेतला काग ॥ विप्र देऊनि घेतला मांग ॥ मुक्त देऊनि सुरंग ॥ गुंज जैसी घेतली ॥७॥
देवोनियां रायकेळें ॥ घेतलीं अर्कीचीं फळें ॥ ज्ञान देऊनि घेतलें ॥ अज्ञानत्व जैसें पैं ॥८॥
तैसें वसुदेवें केलें ॥ कृष्ण ठेवूनि मायेसी आणिलें ॥ तंव ते कन्या कोल्हाळें ॥ रडतां कळलें रक्षकां ॥९॥
चहूंकडून सेवक धांवत ॥ राया देवकी जाहली प्रसूत ॥ येरु उठिला त्वरित ॥ पिशाचवत धांवतसे ॥२१०॥
बिडालक धांवे मूषकावरी ॥ तैसा आला बंदिशाळेभीतरी ॥ कोठें गे आठवा अरी ॥ म्हणोनियां धीट बोलत ॥११॥
तों देवकी म्हणे बंधु ॥ करुं नको येवढा वधु ॥ देवकी रडे करी खेदु ॥ काकुळती येतसे ॥१२॥
देवकी वोसंगा घेऊनि बैसली ॥ कंस ओढीत तये वेळीं ॥ पुत्र कीं कन्या नाहीं ओळखिली ॥ रात्रिभागीं तेधवां ॥१३॥
रागें भोवंडी दुराचारी ॥ आपटावी जंव शिळेवरी ॥ तंव ते महाशक्ति झडकरी ॥ गेली अंबरी निसटूनियां ॥१४॥
सहस्त्र कडकडती चपला ॥ तैसा प्रलय तेव्हां वर्तला ॥ कंस भयभीत जाहला ॥ म्हणे वैरी गेला हातींचा ॥१५॥
कंस जंव वरतें पाहे ॥ तंव ते महाशक्ति तळपत आहे ॥ तेज अंबरीं न समाये ॥ बोले काय कंसासी ॥१६॥
अरे मूढा दुराचारा ॥ महामलिना खळा निष्ठुरा ॥ तुझा वैरी पामरा ॥ पृथ्वीवरी वाढतसे ॥१७॥
ऐकतांच ऐसें वचन ॥ धगधगलें कंसाचें मन ॥ शक्ति गेली अदृश्य होऊन ॥ कंस आला मंदिरासी ॥१८॥
श्रोतीं व्हावें सादर ॥ पुढें कथा मनोहर ॥ गोकुळा गेला जगदुध्दार ॥ परिसा चरित्र तयाचें ॥१९॥
श्रीकृष्णकथा मुक्तमाळा ॥ सभाग्य श्रोते हो घाला गळां ॥ ब्रह्मानंद श्रीकृष्ण पुतळा ॥ धन्य गोकुळा करील तो ॥२२०॥
तुमच्या हृदयगोकुळीं ॥ शांतियशोदेजवळी ॥ शेजे पहुडला वनमाळी ॥ पुराणपुरुष तो पहा ॥२१॥
ब्रह्मानंद म्हणे श्रीधर ॥ धन्य तें गोकुळ पवित्र ॥ जेथें अवतरला यादवेंद्र ॥ त्रिभुवनसुंदर जगदात्मा ॥२२॥
या अध्यायाचें निरुपण ॥ कंस येऊनि आपण ॥ माया आपटावी जों धरुन ॥ तंव ते हातींची निसटली ॥२३॥

इति श्रीहरिविजयग्रंठ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ विचक्षण परिसोत संत ॥ तृतीयध्याय गोड हा ॥२२४॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥श्रीक्षीराब्धिजारमणार्पणमस्तु ॥ ॥अध्याय॥३॥ओंव्या॥२२४॥