हरिविजय

श्रीधरांसारखा भगवंताच्या भक्तिप्रेमात न्हाऊन गेलेला अजोड कवी, गोपालकृष्णाच्या अति गोड लीलांचे वर्णन करतो, तेव्हा काय बहार येते.


अध्याय ७

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णनाथाय नमः ॥

जय जय सच्चिदानंद सगुण ॥ अतीसीकुसुमभास तूं पूर्ण ॥ वाटे त्याच रंगेंकरुन ॥ नीलोत्पलें रोविलीं ॥१॥
नभासी चढला तोचि रंग ॥ त्याचे प्रभें रंगले मेघ ॥ इंद्रनीळ हरिरंग ॥ त्याच प्रकाशें जाहलें ॥२॥
तेथींचें सौंदर्य अद्‌भुत ॥ गरुडपाचूंस तेज चढत ॥ मर्गजासी वीक दिसत ॥ तनु सांवळी देखोनियां ॥३॥
लावण्यामृतसागराद्‌भुत ॥ कीं कोटिमकरध्वजाचा तात ॥ तो पुष्पधन्वा उदरीं जन्मत ॥ अंकीं खेळत जयाच्या ॥४॥
श्यामलांगी अतिनिर्मळ ॥ वरी डोले वैजयंतीमाळ ॥ पुष्करीं चक्रचाप सुढाळ ॥ सुरंग जैसें मिरवे पैं ॥५॥
कीं मेघीं स्थिरावली क्षणप्रभा ॥ तैसी वैजयंतीची शोभा ॥ सहस्त्रमुखाचिया जिभा ॥ शिणल्या गुण वर्णितां ॥६॥
इंद्रनीळाचा मेरु प्रभाघन ॥ वेष्टिला शातकुंभतगटेकरुन ॥ तैसा झळकत वसन ॥ हरिजघनीं सर्वदा ॥७॥
कीं सकळ चपळा गाळून ॥ रंगविले हे पीतवसन ॥ वाटे द्वादश भानु येऊन ॥ कटीं मेखळेवरी जडियेले ॥८॥
पांघरावयाचा क्षीरोदक ॥ कीं शुभ्र यशा चढलें बीक ॥ कीं शुभ्र श्वेत मृडानीनायक ॥ कर्पूरेंकरुनि उटिला ॥९॥
कीं शुद्धरजततगटा घडिलें ॥ कीं पारदें कैलास डवरिलें ॥ कीं जान्हवीतीरीं वोपिलें ॥ दिनकरनाथें स्वहस्तें ॥१०॥
अंगीं उटी दिसे सुढाळ ॥ कीं इंदुबिंब उकललें निर्मळ ॥ कीं मुक्ताफळांचा गाळून ढाळ ॥ इंद्रनीळ चर्चिला ॥११॥
त्रिभुवनसौंदर्य एकवटलें ॥ तें हरिमुखीं येवोनि ओतिलें ॥ आनंदाचें स्वरुप उजळलें ॥ रुपा आलें हरिमुखीं ॥१२॥
हरिअंगींचा अखिल सुवास ॥ भेदूनि गेला महदाकाश ॥ कीं ब्रह्मानंद भरोनि निःशेष ॥ सगुण सुरस ओतिलें ॥१३॥
आनंदसरोवरींचीं कमळदळें ॥ तैसे आकर्णनेत्र विकासले ॥ ते कृपादृष्‍टीनें निवाले ॥ प्रेमळ जन सर्वही ॥१४॥
अहो तें स्वानंदरुप सगुण ॥ कीं कमलेचें सौभाग्य पूर्ण ॥ कीं सद्भक्तांचें निजधन ॥ ठेवणें हें आकारलें ॥१५॥
तो वैकुंठीचा वेल्हाळ सुंदर ॥ कीं भक्तमंदिरांगणमंदार ॥ पद्मोद्भवाचा तात उदार ॥ गोकुळामाजी अवतरला ॥१६॥
मत्स्य कच्छ रुपें धरीं श्रीपती ॥ परी तेथें न बैसे लोकांची भक्ती ॥ म्हणोनि गोकुळीं आला व्यक्ती ॥ मानववेष धरुनियां ॥१७॥
जे कां विषयपर जन ॥ न ऐकती हरीचे गुण ॥ त्यांस श्रृंगाररस दावून ॥ वेधी मन आपणाकडे ॥१८॥
भक्तांसी विघ्नें येती प्रबळ ॥ तीं निजांगीं सोशी तमाळनीळ ॥ मर्दूनियां दुर्जन खळ ॥ भक्त प्रेमळ रक्षीतसे ॥१९॥
सबळ काष्ठें भ्रमर कोरी ॥ पिष्ट करी क्षणाभीतरी ॥ परी कमळास निर्धारीं ॥ धक्का न लावी सर्वथा ॥२०॥
कमळआकोचें कोंडे भ्रमर ॥ परी तें न फोडीच अणुमात्र ॥ तैसे दासांचे अन्याय समग्र ॥ सोसूनि रक्षी तयांतें ॥२१॥
तिळमात्र पाषाण ॥ जळीं न तरे देखती जन ॥ तेथेंचि सबळ काष्ठ तरे पूर्ण ॥ कदा जीवन न बुडवी ॥२२॥
जीवनीं हाचि अभिमान ॥ कीं आपण वाढविलें काष्ठ पूर्ण ॥ तें न बुडवीं मी कदा जाण ॥ कालत्रयीं सहसाही ॥२३॥
त्या काष्ठाच्या नौका होती ॥ आणिक जड जीवां तारिती ॥ तैसे भगवद्भक्त उद्धरिती ॥ बहुतांसही समागमें ॥२४॥
असो जलकाष्ठन्यायें निश्चित ॥ शरणागतां तारी भगवंत ॥ नाना चरित्रें अद्‌भुत ॥ दावी भक्तां तारावया ॥२५॥
असो षष्ठाध्यायीं कथा ॥ गौळणीनें ठकविलें कृष्णनाथा ॥ गोरस मथुरे विकूं जातां ॥ अति अनर्थ पावली ॥२६॥
गोरस न देऊनि वनमाळी ॥ गौळणचि परम ठकली ॥ सच्चिदानंदमूर्ति सांवळी ॥ महिमा न कळे तियेतें ॥२७॥
नवल एक गोकुळीं वर्तलें ॥ एका गौळियानें स्त्रियेसी सांगितलें ॥ म्हणे दधि दूध जें सांचलें ॥ अनसूट धरीं येथूनि ॥२८॥
भगवंताचा नवस पुरवीन ॥ करीन ब्राह्मणसंतर्पण ॥ तरी घृत ठेवीं सांचवून ॥ अवश्य म्हणे नितंबिनी ॥२९॥
घृत सांचलें बहुत ॥ स्त्रीनें अर्ध चोरिलें त्यांत ॥ शेजारिणीच्या घरीं त्वरित ॥ घट भरुनि ठेविला ॥३०॥
स्त्रियांचें कर्तृत्व न कळे भ्रतारां ॥ महाअनृता अविचारा ॥ सकळ असत्याचा थारा ॥ भय न धरिती पापाचें ॥३१॥
अनृत साहस माया मूर्खत्व ॥ अतिलोभ अशौच निर्दयत्व ॥ हे स्वभावगुण सत्य ॥ स्त्रियांच्या ठायीं असती हो ॥३२॥
गौळियानें महोत्सव केला ॥ नवस श्रीहरीचा फेडिला ॥ परी घृतघट जो ठेविला ॥ तो कळला श्रीरंगातें ॥३३॥
बाहेर गेली घरची सुंदरी ॥ कृष्ण प्रवेशला तिचें मंदिरीं ॥ घृतघट काढोनि झडकरी ॥ नेला दूरी ते वेळीं ॥३४॥
मेळविलीं गौळियांचीं बाळें ॥ घृत तें सकळांसी वांटिलें ॥ कृष्णें आपण भक्षिलें ॥ पूर्ण केलें नवसासी ॥३५॥
वसुधारा घृतावदान ॥ येथें तृप्ति न पावे नारायण ॥ तो गौळियांचें घृत चोरुन ॥ भक्षून तृप्त जाहला ॥३६॥
कमलासन मीनकेतनारी ॥ सदा ध्याती तो कैटभारी ॥ तो बळेंच गौळियांचें घरीं ॥ चोरुनि घृत भक्षीत ॥३७॥
असो घरा गेला वैकुंठराणा ॥ यशोदा म्हणे जगज्जीवना ॥ खोडी करुनि मनमोहना ॥ कोठूनि आलासी सांग पां ॥३८॥
कडे घेतला कृष्णनाथ ॥ माता हर्षें मुख चुंबीत ॥ तों अंगास माखलें घृत ॥ माता पुसत हरीसी ॥३९॥
घृत लागलेंसे अंगा ॥ कोठें गेला होतासी श्रीरंगा ॥ आतां गार्‍हाणीं अतिवेगा ॥ गौळिणी सांगों येतील ॥४०॥
येरीकडे गौळण ते पाहीं ॥ सेजीच्या गृहा येत लवलाही ॥ म्हणे माझा घृतघट देईं ॥ आणूनियां सत्वर ॥४१॥
घरांत गौळण पाहत ॥ तों आपलीं शिंकीं तैसींच समस्त ॥ तो घृतघट नाहीं तेथ ॥ नवल वाटलें तियेतें ॥४२॥
म्हणे बाई शिंकीं आणि घागरी ॥ न दिसती कोठें मंदिरीं ॥ आळ घालावी कृष्णावरी ॥ तरी मागही कोठें दिसेना ॥४३॥
ते म्हणे तुझा गोरस उरला ॥ माझाचि घृतघट कां गेला ॥ नष्टे तुवांचि अभिलाषिला ॥ कलह माजला अद्‌भुत ॥४४॥
ते गौळण वाहे आण ॥ म्यां घृतघट ठेविला असेल चोरुन ॥ तरी हे हस्त जाऊं दे झडोन ॥ कां तुवां आणोनि ठेविला ॥४५॥
मनीं गौळण विचारीत ॥ कलह माजवावा बहुत ॥ कळेल भ्रतारासी मात ॥ तोही अनर्थ दुसरा ॥४६॥
मग ते म्हणे मृगनयनी ॥ गलबला न करीं वो साजणी ॥ माझ्या भ्रताराच्या श्रवणीं ॥ गोष्टी जाईल सर्वथा ॥४७॥
बरें गेलें तरी जाऊं दे घृत ॥ कृष्णार्पण झालें निश्चित ॥ ऐसें बोलोनि त्वरित ॥ गौळण गेली गृहातें ॥४८॥
गोकुळीं एक दंपत्यें ॥ राखिती बहुत गोरसातें ॥ राजीवनेत्रें तेथें ॥ कौतुक केलें अद्‌भुत ॥४९॥
दोघें निजलीं मध्यरातीं ॥ तेथें प्रकटोनि रमापती ॥ एक मुंगूस निश्चितीं ॥ दोघांमध्यें सोडिलें ॥५०॥
गृहींचा सर्व गोरस ॥ स्वहस्तें काढी जगन्निवास ॥ तृप्त झाला सर्वेश ॥ शेषशायी परमात्मा ॥५१॥
मुंगूस दोघांमध्यें उकरी ॥ तंव तीं होतीं निजसुरीं ॥ एकाएकीं घाबरी ॥ हांक फोडीत उठली ॥५२॥
न सांवरत वसन ॥ बाहेर आली भिऊन ॥ म्हणती भूत उरावरी येऊन ॥ बैसलें होतें दोघांच्या ॥५३॥
धांवा धांवा म्हणती कोणी ॥ लोक मिळाले चहूंकडोनी ॥ दीपिका लाविल्या तत्क्षणीं ॥ पुसती दोघांसी तेधवां ॥५४॥
तंव तीं म्हणती भूत आलें ॥ आम्हां दोघांमध्यें बैसलें ॥ आम्हीं तत्काळ ओळखिलें ॥ सदनाबाहेरी मग आलों ॥५५॥
पंचाक्षरी घेऊनि विभूती ॥ द्वाराबाहेरचि फुंकिती ॥ परी सदनीं कोणी न प्रवेशती ॥ भय वाटे मनीं तयां ॥५६॥
तों घरांत हिंडे नकुळ ॥ लोक म्हणती भूत सबळ ॥ मग धीट गौळी जे तत्काळ ॥ निःशंक आंत प्रवेशती ॥५७॥
तंव तें मुंगूस देखिलें ॥ तत्काळ बाहेर आणिलें ॥ लोक गदगदां हांसिले ॥ नवल जाहलें तेधवां ॥५८॥
एक म्हणती मुंगूस सकाळीं ॥ कांखेस घेऊनि वनमाळी ॥ हिंडत होता आळोआळीं ॥ त्याणेंच आणूनि सोडिलें ॥५९॥
एक म्हणती मोठा नष्ट ॥ करणी करतो अचाट गोकुळींचीं मुलें चाट ॥ तेणें समस्त केलीं पैं ॥६०॥
जन गेले सदना सत्वर ॥ तो उदय पावला सहस्त्रकर ॥ मग ते गौळण चतुर ॥ नंदमंदिरीं गेली हो ॥६१॥
मग म्हणे सुंदरी यशोदे ॥ थोर पीडिलें मुकुंदें ॥ मुंगूस सोडिलें गृहामध्यें ॥ नवल गोविंदें केलें हो ॥६२॥
गदगदां हांसे नंदराणी ॥ हरिवदन पाहे नयनीं ॥ तों एक बोले गौळणी ॥ तुज चक्रपाणी लावीन शिक्षा ॥६३॥
हरि तूं माझ्या घरा येसी ॥ मी तुज बांधीन खांबासी ॥ मग बोले हृषीकेशी ॥ बांध कैसी पाहूं आतां ॥६४॥
गृहासी गेली गौळिणी ॥ रात्रीं दृढ कपाटें देऊनी ॥ भ्रतारासहित नितंबिनी ॥ निद्रार्णवीं निगग्न ॥६५॥
पतीपुढें निजली कामिनी ॥ तों पातला पंकजपाणी ॥ पतीची दाढी तिची वेणी ॥ धरुनि ते क्षणीं गांठी देत ॥६६॥
कृष्णें गांठी दिधली हटें ॥ जे ब्रह्मादिकां न सुटे ॥ जे न जळे हव्यवाटें ॥ तीक्ष्ण शस्त्रें न कापेचि ॥६७॥
ऐसें करुनि जगन्मोहन ॥ घरींचा गोरस सर्व भक्षून ॥ नेला तेथूनि न लागतां क्षण ॥ अतर्क्य विंदान हरीचें ॥६८॥
तों सरली अवघी रजनी ॥ धार काढूं उठे कामिनी ॥ तों ओढतसे तिची वेणी ॥ मृगनयनी हांसतसे ॥६९॥
पतीस म्हणे सुंदरा ॥ कांहीं तरी लाज धरा ॥ मी काढूं जातें धारा ॥ वेणी सत्वर सोडिंजे ॥७०॥
अजूनि काय भोगव्यसन ॥ उदय करुं पाहतो सहस्त्रकिरन ॥ अद्यापि न धायेचि मन ॥ वेणी सोडोनि द्यावी जी ॥७१॥
तंव तयाची दाढी ओढत ॥ जागा जाहला पति त्वरित ॥ स्त्रियेसी म्हणे तुझें चित्त ॥ अजूनि इच्छीत कामातें ॥७२॥
सोडीं वेगीं माझी दाढी ॥ जाय वेगीं धारा काढीं ॥ बहु माजलीसी धांगडी ॥ ओढीओढी करितेसी ॥७३॥
सोडीं दाढी गे तरुणी ॥ उदयाद्रीवरी आला तरणी ॥ पुढें अरुणोदय होवोनी ॥ प्रकाश आरक्त पडियेला ॥७४॥
कीं पूर्वदिशेनें मुख धुतलें ॥ निढळीं कुंकुम रेखिलें ॥ तेंचि आरक्तवर्ण नभ जाहलें ॥ अरुणोदय वाटतसे ॥७५॥
सूर्याआधीं उगवे अरुण ॥ ज्ञानाआधीं जैसें भजन ॥ कीं भजनाआधीं नमन ॥ श्रेष्ठ जैसेम सर्वांसी ॥७६॥
कीं तपाआधीं शुचित्व ॥ कीं बोधाआधीं सत्त्व ॥ कीं सत्त्वाआधीं अद्‌भुत ॥ पुण्य जैसें प्रकटलें ॥७७॥
साक्षात्काराआधीं निजध्यास ॥ कीं मननाआधीं श्रवण विशेष ॥ कीं श्रवणाआधीं सुरस ॥ आवडी पुढें विराजत ॥७८॥
कीं वैराग्याआधीं विरक्ति ॥ कीं आनंदाआधीं उपरति ॥ कीं महासुखासी शांति ॥ पुढें आधीं ठसावे ॥७९॥
तैसा जाहला अरुणोदय ॥ सोडीं मूर्खे दूरी राहें ॥ दोघें उठोनि लवलाहें ॥ बोलताती सक्रोध ॥८०॥
पति म्हणे चांडाळिण ॥ गांठ कां दिधली दाढीवेणी ॥ येरी आण वाहे ते क्षणीं ॥ माझी करणी नव्हे हे ॥८१॥
म्यां गांठ दिधली असेल ॥ तरी हे नेत्र जातील ॥ पति म्हणेल जिव्हा झडेल ॥ जरी म्यां गांठ असेल दिधली ॥८२॥
नानाप्रकारेम होती कष्टी ॥ परी न सुटेचि कदा गांठी ॥ सोडितां भागल्या चिमटी ॥ अति हिंपुटी दोघेंही ॥८३॥
तो मायालाघवी जगजेठी ॥ त्याची कोणा न सुटे गांठी ॥ जरी आलिया परमेष्ठी ॥ तरी न सुटे त्याचेनि ॥८४॥
भ्रतार म्हणे आणीं शस्त्र ॥ वेणी कापूं तुझी सत्वर ॥ येरी म्हणे दाढीच अणुमात्र ॥ कातरुनि काढावी ॥८५॥
सौभाग्यदायक हे वेणी ॥ कातरुं पाहतां ये क्षणीं ॥ पति म्हणे कोणी करणी ॥ केली ऐसी न कळे पां ॥८६॥
उदय पावला चंडकिरण ॥ कोण करील गोदोहन ॥ पति म्हणे शस्त्रेंकरुन ॥ दाढी माझी छेदी तूं ॥८७॥
तंव ते शस्त्रें न कापे सर्वथा ॥ न तुटे न सुटे पाहतां ॥ न जळे कदा अग्नि लावितां ॥ विचित्र गति जाहली ॥८८॥
पति म्हणे ते वेळे ॥ तुज जरी मरण आलें ॥ तरी म्यांही मरावें वो वहिलें ॥ पूर्वकर्म कैसें हें ॥८९॥
दीर्घस्वरें दोघें रडती ॥ मग बिदीस येऊनि उभीं ठाकती ॥ आल्यागेल्यास येती ॥ काकुळती तेधवां ॥९०॥
व्याही जांवई पिशुन ॥ भोंवते मिळाले बहुत जन ॥ जे ते पाहती गांठी सोडून ॥ परी ते जाण न सुटेचि ॥९१॥
कोणी कातरुनि पाहती ॥ परी ते न कापे कष्टी होती ॥ तो समाचार नंदाप्रति ॥ एक सांगती कौतुकें ॥९२॥
नंद चावडिये बैसला ॥ घेऊनि गौळियांचा मेळा ॥ इंद्र जैसा मिरवला ॥ देवसभेंत श्रेष्ठ पैं ॥९३॥
अंकीं बैसविला जगन्मोहन ॥ जो अमलदलराजीवनयन ॥ तो ब्रह्मानंद सगुण ॥ गोकुळीं खेळे निज लीला ॥९४॥
जो सर्वांतर्यामीं वसे ॥ जो सर्वांचीं मनें जाणतसे ॥ जें जें प्राणी राहटतसे ॥ हृषीकेशी जाणत ॥९५॥
जग नग हा कनक जान ॥ जग पट हा तंतु पूर्ण ॥ जग तरंग हा सागर खूण ॥ अभेदपण मोडेना ॥९६॥
असो नंदें ते वेळीं ॥ दोघें चावडिये आणिलीं ॥ पुढें स्त्री मागें गौळी ॥ देखोनि सकळ हांसती ॥९७॥
नंदें पुसिलें वर्तमान ॥ कोणीं गांठी दिधली येऊन ॥ तंव तीं दोघें करिती रुदन ॥ गहिंवरुन करुणस्वरें ॥९८॥
म्हणती न कळे ईश्वरकरणी ॥ गदगदां हांसे चक्रपाणी ॥ म्हणे काल माझी शेंडी धरुनी ॥ बांधीन म्हणत होतीस कीं ॥९९॥
तुज प्रचीत दाखविली भगवंतें ॥ व्यर्थ बांधीन म्हणसी आम्हांतें ॥ तंव तीं म्हणती हरीतें ॥ आमुची गति काय आतां ॥१००॥
दीनवदनें भाकिती करुणा ॥ कृपा आली जगज्जीवना ॥ जो परब्रह्म वैकुंठराणा ॥ वेद्पुराणां अगम्य जो ॥१॥
मग पाहतांचि कृपादृष्टीं ॥ तत्काळ सुटली मायागांठी ॥ आनंद न माये सकळ सृष्टीं ॥ जगजेठी लाघवी हा ॥२॥
असो तीं दोघें जाहलीं सद्गदित ॥ श्रीहरीचें वदन अवलोकीत ॥ अहंकृति समस्त ॥ बुडोनि गेली तेधवां ॥३॥
काम क्रोध जाहले लज्जित ॥ मद मत्सर उठोनि पळत ॥ दंभ मोह अनर्थ ॥ जाहले गलित तेधवां ॥४॥
नमस्कारुनि यादवेंद्रा ॥ दोघें गेलीं निजमंदिरा ॥ सुख न माये अंतरा ॥ दोघांचेही तेधवां ॥५॥
आणिक एके दिवशीं श्रीरंगें ॥ नवल केलें भक्तभवभंगें ॥ एके गोपीचें घरीं सवेगें ॥ प्रवेशला गोविंद ॥६॥
तंव ते बोले मृगनयनी ॥ कां आलासी येथें चक्रपाणी ॥ काय पाहसी पाळती घेऊनी ॥ जातोसी तें कळेना ॥७॥
चित्तचोरा सकळचाळका ॥ जगन्मोहना महानाटका ॥ संचितगोरसभक्षका ॥ जगद्रक्षका जगदीशा ॥८॥
गोपी म्हणे कृष्णा बैस ॥ तों करें नेत्र चोळी हृषीकेश ॥ हळूंच बोले जगन्निवास ॥ गौळणीस तेधवां ॥९॥
माझे दुखती वो नयन ॥ मग बोले गोपी वचन ॥ कांहीं औषधेंकरुन ॥ व्यथा दूर करावी ॥११०॥
मग बोले घननीळ ॥ जे पुत्राचि माता असेल ॥ तिचें दुग्ध तत्काळ ॥ डोळियांमाजी घालिजे ॥११॥
तंव ते कुरंगनयनी बोले वचन ॥ माझे स्तनींचे दुग्ध जा घेऊन ॥ मग बोले राजीवनयन ॥ हास्यवदन करुनि ॥१२॥
म्हणे ते दुग्ध कामा न ये जाण ॥ तूं मागसी तेंचि देईन ॥ परी मी आपुल्या करयुगेंकरुन ॥ पिळीन स्तन तुझे वो ॥१३॥
ऐसें ऐकतांचि वचन ॥ गोपी हांसली गदगदोन ॥ म्हणे ऊठ चावटा येथून ॥ नसतेंच वचन बोलसी ॥१४॥
पुढें पुढें वाढतां ॥ बहु शहाणा होशील अच्युता ॥ तुझे मातेपासीं तत्त्वतां ॥ चाल अनंता सत्वर ॥१५॥
म्हणोनि धरावया धांविन्नली ॥ उठोनि पळे वनमाळी ॥ गोपी दारवंटा उभी ठाकली ॥ तंव तो गेला सत्वर ॥१६॥
येऊनि मायेजवळी ॥ गार्‍हाणें सांगे वेल्हाळी ॥ यशोदा हांसे वनमाळी ॥ कडियेवरी बैसलासे ॥१७॥
कृष्णाकडे माता पाहे ॥ मुख चुंबीत लवलाहें ॥ म्हणे हरि करुं काय ॥ खोडी तुझ्या अनिवार ॥१८॥
असो कृष्ण एके दिवसीं ॥ बाहेर गेला खेळावयासी ॥ मुलें मिळालीं सरसीं ॥ क्रीडताती हरीसवें ॥१९॥
सखयांसी म्हणे हरी ॥ तुमची माता जातांचि बाहेरी ॥ सांगा मज लौकरी ॥ तेचि मंदिरीं रिघों वेगें ॥१२०॥
ज्या घरीं प्राप्त नोहे गोरस ॥ ताडन करी त्यांच्या मुलांस ॥ कां रे न सांगा आम्हांस ॥ पाळती तुमच्या गृहींची ॥२१॥
वासरांच्या पुच्छीं बांधी अर्भकें ॥ आळोआळी पिटी कौतुकें ॥ आक्रोशें रडती बाळकें ॥ माता धांवती सोडावया ॥२२॥
बाळें सोडोनि गौळिणी ॥ मायेसी सांगती गार्‍हाणीं ॥ म्हणती जावें गोकुळ टाकोनी ॥ तुझ्या पुत्राचेनि त्रासें ॥२३॥
घरीं राखीत बैसल्या जरी नारी ॥ तरी वांसरें सोडितो बाहेरी ॥ वत्सांपाठीं जातां झडकरी ॥ मागें हरि गोरस खातो ॥२४॥
ताक सांडी मडकीं फोडूनी ॥ खापरें पसरितो आंगणीं ॥ असार सांडी सार भक्षूनी ॥ विचित्र करणी हरीची ॥२५॥
सारुनि कर्मजाळ समस्त ॥ स्वरुपप्राप्तीसी पावती संत ॥ कीं शब्द टाकूनि अर्थ ॥ सार जैसेम घेइजे ॥२६॥
शुक्ति सांडोनि घेइजे मुक्त ॥ कीं प्रपंचत्यागें परमार्थ ॥ क्रोधत्यागें जैसें समस्त ॥ शांतिसुख हाता ये ॥२७॥
भूस टाकूनि घेइजे कण ॥ कीं धूळ टाकूनि घेइजे रत्‍न ॥ कीं विषयत्यागें संपूर्ण ॥ स्वानंदसुख सेविजे ॥२८॥
ऐसें कृष्णें केलें सत्य ॥ सार सेविलें नवनीत ॥ ताक असार समस्त ॥ लवंडोनि फोडी भाजनें ॥२९॥
कोणीएक गजगामिनी ॥ चालिली सूर्यकन्येच्या जीवनीं ॥ घट भरुनि निजसदनीं ॥ मृगनयना जातसे ॥१३०॥
तों ते वाटे आला गोंविंद ॥ सवें शोभला बाळांचा वृंद ॥ कृष्णाकडे पाहूनि छंद ॥ लेंकरें बहुत करिताती ॥३१॥
कृष्णें तेव्हां काय केलें ॥ गोपीचें वस्त्र वेगें असुडिलें ॥ तत्काळ धरेवरी पडिलें ॥ उघडें जाहलें सर्वांग ॥३२॥
कर गुंतले घागरीं ॥ वस्त्र घेऊनि पळाला हरी ॥ चोहटां ते नग्न नारी ॥ सकळ लोक पाहती ॥३३॥
काकुळती येत गोपिका ॥ कृष्णा माझें वस्त्र देईं कां ॥ हरीनें वृक्षावरी एका ॥ वस्त्र तिचें टाकिलें ॥३४॥
आपण पळाला सत्वरा ॥ नग्न गोपी जात मंदिरा ॥ तिचें पाठीं अर्भकें एकसरा ॥ हांसतचि धांवती ॥३५॥
गोपी प्रवेशली मंदिरीं ॥ दुजें वस्त्र नेसे सुंदरी ॥ गार्‍हाणें सांगावया झडकरी ॥ घरा आली यशोदेच्या ॥३६॥
म्हणे कोठें तुझा हृषीकेशी ॥ माझें वस्त्र फेडिलें वाटेसी ॥ माता म्हणे कृष्णासी ॥ काय खोडीसी करुं तुझ्या ॥३७॥
एक सांगे तरुणी ॥ मी भरीत होतें यमुनेचे पाणी ॥ मागें येऊनि चक्रपाणी ॥ नेत्र माझे झांकिले ॥३८॥
मी भयभीत होऊनी ॥ मागे पाहे परतोनी ॥ अदृश्य जाहला तेच क्षणीं ॥ नवल करणी हरीची ॥३९॥
एक म्हणे मी उदक आणितां ॥ मागूनि आला अवचिता ॥ थै थै म्हणोनि त्वरितां ॥ नितंब करें थापटी ॥१४०॥
जैसे पर्जन्यकाळीं गंगेचे पूर ॥ लोटावरी लोट येती अनिवार ॥ तेवीं गार्‍हाणियांचे चपेटे थोर ॥ एकावरि एक पडताती ॥४१॥
पाहूनियां श्रीरंगा ॥ गोपी चितीं सानुरागा ॥ मृषा कोप वाउगा ॥ बाह्यदृष्टीं दाविती ॥४२॥
अंतरीं सप्रेम वरी कोपती ॥ फणस आंत गोड ॥ वरी कांटे दिसती ॥ जेवीं नारिकेल वरी कठिण भासती ॥ परी अंतरी जीवन तयांच्या ॥४३॥
कीं ज्ञानी वर्तती संसारीं ॥ परी सर्वदा निःसंग अंतरीं ॥ तैशा गोपी क्रोधायमान वरी ॥ परी हृदयीं सप्रेम ॥४४॥
ऐशा त्या सकळ नारी ॥ दृष्टीं लक्षूनि पूतनारी ॥ गार्‍हाणें देती सुंदरी ॥ ऐकतां दूरी शोक होय ॥४५॥
हाता न ये ज्या घरचा गोरस ॥ तरी ताडन करी त्यांचिया मुलांस ॥ त्यांच्या गळां काठमोरे हृषीकेश ॥ घालोनियां हिंडवी ॥४६॥
निद्रिस्तास तुडवी चरणीं ॥ बाळकें उठवितो रडवूनी ॥ म्हणे अग्नि लावीन ये सदनी ॥ तृप्त नव्हें मी येथें ॥४७॥
जेथें न लाभो गोरस पूर्ण ॥ म्हणे हें घर मसणवटीसमान ॥ जेथें मी तृप्त नव्हें मधुसूदन ॥ तेंचि स्थान अपवित्र ॥४८॥
मी तृप्त न होत जगन्निवास ॥ तें घर नांदतचि ओस ॥ तेथें अवदशा ये बहुवस ॥ आसमास कष्ट होती ॥४९॥
ऐसिया खोडी बहुत ॥ जननीस गोपी सांगत ॥ कृष्ण्मुखाकडे पाहूनि हांसत ॥ यशोदादेवी तेधवां ॥१५०॥
तें वैकुंठींचें निधान ॥ मातेकडे पाहे राजीवनयन ॥ म्हणे या गौळिणी संपूर्ण ॥ असत्य जाण बोलती ॥५१॥
मजवरी घालिती व्यर्थ आळ ॥ मी सर्वातीत निर्मळ ॥ जैसें आकाश केवळ ॥ घटमठांशीं वेगळें ॥५२॥
मी ब्रह्मानंद निर्मळ ॥ मज म्हणती हा धाकुटा बाळ ॥ यांच्या खोडी सकळ ॥ तुज माते सांगेन मी ॥५३॥
ह्या मज नेती गृहांत ॥ कुचेष्टा शिकविती बहुत ॥ मज हृदयीं धरुनि समस्त ॥ कुस्करिती निजबळें ॥५४॥
माते माझे चावोनि अधर ॥ चुंबन देती वारंवार ॥ मज कष्टविती थोर ॥ सकळ धमकटी मिळोनि ॥५५॥
बहुतजणी मिळोन ॥ घरांत होताती आपुल्या नग्न ॥ मज मध्यें बैसवून ॥ नाचताती सभोंवत्या ॥५६॥
म्हणती कृष्णा असतासी थोर ॥ तरी होता बरवा विचार ॥ तुजजवळी हा समाचार ॥ सांगेन म्हणतां दाबिती ॥५७॥
ऐसें बोले पूतनाप्राणहरण ॥ गोपी लटक्याचि क्रोधें पूर्ण ॥ म्हणती यशोदे तुझा नंदन ॥ तुजचि गोड वाटतसे ॥५८॥
अवघ्या मिळोनि गौळिणी ॥ गोफाटली नंदराणी ॥ म्हणती काय कौतुक नयनीं ॥ निजपुत्राचें पाहसी ॥५९॥
अगे हा परम नष्ट अनाचारी ॥ नसतीच आळी घेतो आम्हांवरी ॥ पुढें बहुतांचि घरें निर्धारीं ॥ हा बुडवील यशोदे ॥१६०॥
हंसतां हंसतां कौतुकें ॥ ब्रह्मांड लपवी कांखे ॥ सप्त समुद्र क्षण एकें ॥ नखाग्रांत जिरवील ॥६१॥
याच्या एक एक गोष्टी सांगतां ॥ तरी धरणी न पुरे लिहितां ॥ काल आमुच्या मंदिरांत तत्त्वतां ॥ अकस्मात पातला ॥६२॥
आम्ही बोलिलों कौतुकरीतीं ॥ तुज नवरी कैसी पाहिजे श्रीपती ॥ येणें प्रतिउत्तर कोणे रीतीं ॥ दिधलें तें ऐक पां ॥६३॥
अनंतब्रह्मांडांच्या गती ॥ जिच्या इच्छामात्रें होती जाती ॥ जे परब्रह्मींची मूळस्फूर्ती ॥ तेचि निश्चितीं नोवरी माझी ॥६४॥
ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥ इंद्र चंद्र वरुण दिनकर ॥ हीं बाहुलीं नाचवी समग्र ॥ एकसूत्रेंकरुनियां ॥६५॥
जगडंबर हा दावी नेटें ॥ सवेंचि झांकूनि म्हणे कोठें ॥ ते माझी नोवरी भेटे ॥ तरीच करणें विवाह ॥६६॥
ते पतिव्रताशिरोमणी ॥ नांवरुपा आणिलें मजलागुनी ॥ माझी योगनिद्रा मोडोनी ॥ जागविलें मज तिनें ॥६७॥
मज न कळतां जागें केलें ॥ अवघें मोडोनि मजमाजी मिळविलें ॥ माझ्या सत्तेनें खेळ खेळे ॥ परी मी नेणें तियेतें ॥६८॥
ऐशा लबाड गोष्टी फार ॥ रचितो गे तुझा कुमार ॥ तों एक कुरंगनेत्री सुकुमार ॥ गार्‍हाणें सांगे ऐका हो ॥६९॥
काल माझ्या मंदिरा येऊनी ॥ शिंकीं पाहे अवलोकूनी ॥ तंव तीं न दिसती नयनीं ॥ म्हणे लपवोनि ठेवियेलीं ॥१७०॥
मज भेणें लपवितां लोणी ॥ परी मी काढीन धुंडोनी ॥ म्यां समुद्रांत शोधूनी ॥ शंखासुर काढिला ॥७१॥
असुर वेद घेऊनि गेला जेव्हां ॥ विधि माझा धांवा करी तेव्हां ॥ धांवें धांवें कमलाधवा ॥ हे केशवा दीनबंधो ॥७२॥
ब्रह्मा माझें पोटींचें बाळ ॥ मज बहुत त्याची कळकळ ॥ मी मत्स्यरुप होऊनि तत्काळ ॥ वेदशोधना निघालों ॥७३॥
तों असंभाव्य समुद्रजळ ॥ सवालक्ष गांवें रुंद विशाळ ॥ तितुकाच खोल सबळ ॥ पृथ्वीभोंवता असंभाव्य ॥७४॥
मी जाहलों मत्स्यरुप विशाळ ॥ असंभाव्य समुद्रजळ ॥ पुच्छघायें जळ सकळ ॥ आकाशपंथें उडविलें ॥७५॥
जैसें विहिरियाचें पाणी ॥ एकाच हस्तचपेटेंकरुनी ॥ बाहेर पडे येऊनी ॥ तैसा सागर उडविला ॥७६॥
सवालक्ष गांवें समुद्र ॥ आकाशीं उडविला समग्र ॥ मग पायीं धरुनि शंखासुर ॥ ओढूनियां काढिला ॥७७॥
असुरासी बाहेर काढिलें ॥ मग समुद्रजळ खालीं पाडिलें ॥ शंखासुरासी वधिलें ॥ करीं धरिलें कलेवर ॥७८॥
ते काळीं ब्रह्मादिक इंद्र ॥ स्तुतिस्तोत्रें करिती अपार ॥ वेद देऊनि समग्र ॥ म्यां मान रक्षिला देवांचा ॥७९॥
याकारणें चतुरे कामिनी ॥ जेणें प्रळयजळीं वेद शोधूनी ॥ काढिलें त्यापुढें लोणी ॥ लपवाल कोठें अबला हो ॥१८०॥
ऐक यशोदे सुंदरी ॥ लटक्याचि कथा उत्पन्न करी ॥ मी घुसळितां मंदिरीं ॥ हरि येऊनि बोलिला ॥८१॥
म्हणे घुसळितां गोपी समस्ता ॥ परी न ये माझिया चित्ता ॥ म्यां कूर्मअवतारीं तत्त्वतां ॥ क्षीरसागर मथिला हो ॥८२॥
एकादश सहस्त्र योजनें सबळ ॥ रवी केली मंदाराचळ ॥ जो अवक्र उंच सरळ ॥ सुवर्णमय प्रभा त्याची ॥८३॥
वासुकीची त्यास बिरडी ॥ मग समुद्र मथिला कडोविकडीं ॥ सुर आणि असुर प्रौढीं ॥ दोहींकडे सम धरिती ॥८४॥
मग चालिला भेदीत पाताळतळ ॥ मी कूर्म जाहलों घननीळ ॥ चतुर्दश रत्‍नें निर्मळ ॥ नवनीत तेंचि काढिलें ॥८५॥
तुम्ही दूध पाजितां बाळकांस ॥ तैसाचि मी सुरांस पाजीं सुधारस ॥ मोहिनीस्वरुप विशेष ॥ मीच नटलों तेधवां ॥८६॥
म्यां मोहिनीस्वरुप धरिलें जाण ॥ म्हणोनि मोडूनि दाखवी नयन ॥ तें कूर्मचरित्र संपूर्ण ॥ आपुलें आंगीं दावितो ॥८७॥
आणिक नवल एक साजणी ॥ मी कुंभ भरितां तमारिकन्याजीवनीं ॥ तों हळूंच माझा कर धरुनी ॥ काय बोलिला गोपाळ ॥८८॥
तुम्ही गे घागरी उचलितां ॥ बहुत गोपी कष्टी होतां ॥ म्यां दाढेवरी तत्त्वतां ॥ पृथ्वी उचलोनि धरियेली ॥८९॥
तो मी वराहवेषधारी ॥ हिरण्याक्ष मारिला क्षणाभीतरी ॥ अद्यापि दाढेवरी धरित्री ॥ म्यां धरिलीसे निजबळें ॥१९०॥
म्यां दाढेवरी धरिली अवनी ॥ कुंभ न उचले तुमचेनी ॥ मी ब्रह्मांड नखाग्रीं धरुनी ॥ नाचवीन म्हणतसे ॥९१॥
ऐकें यशोदें शुभकल्याणी ॥ आम्ही फळें कांकडया चिरतां सदनीं ॥ म्हणे हिरण्यकश्यपा चिरुनी ॥ आंतडीं ऐशीं काढिलीं म्यां ॥९२॥
तो मी नृसिंहवेषधारक ॥ असुरकुळकाननपावक ॥ माझ्या क्रोधापुढें ब्रह्मादिक ॥ उभे न ठाकती सर्वथा ॥९३॥
क्रोधें विदारिला असुर ॥ रक्षिला प्रल्हाद किंकर ॥ तो नरसिंहअवतार समग्र ॥ लीला अपार दाविली ॥९४॥
ऐकें यशोदें सुताचें विंदाण ॥ नसतेंच करितो निर्माण ॥ एके दिवशीं मी पतीचे चरण ॥ धूत होतें निजगृहीं ॥९५॥
हळूंच बैसला येऊन ॥ म्हणे बळीनें धुतलें माझे चरण ॥ मज त्रिपादभूमी दान ॥ प्रल्हादपौत्रें दिधली पैं ॥९६॥
दोन पाद जाहलें त्रिभुवन ॥ मम बळीनें केलें आत्मनिवेदन ॥ बळी माझें रुप विलोकी पूर्ण ॥ तों असंभाव्य लक्षवेना ॥९७॥
सप्तपाताळांखालीं चरण ॥ प्रपद तें रसातळ पूर्ण ॥ गुल्फद्वय तें महातल जाण ॥ पोटरिया तें सुतळ ॥९८॥
अतळ आणि वितळ ॥ त्या जानु जंघा निर्मळ ॥ कटिप्रदेश तें भूमंडळ ॥ मृत्युलोक वसे वरी ॥९९॥
सप्त समुद्र पोटांत ॥ जठराग्नि वडवानळ धडधडीत ॥ नाभिस्थान नभ निश्चित ॥ ज्योतिर्लोक वक्षःस्थळ ॥२००॥
महर्लोक तो कंठ जाण ॥ मस्तक तें विधिभुवन ॥ दोहों हस्तरुपें शची रमण ॥ माझ्या अंगीं वसतसे ॥१॥
नेत्र ते सूर्यनारायण ॥ चंद्रमा ते माझें मन ॥ दिशा ते माझे श्रवण ॥ विष्णु अंतःकरण जाण पां ॥२॥
विरिंची बुद्धि साचार ॥ शंकर माझा अहंकार ॥ यम माझ्या दाढा समग्र ॥ वरुण जिव्हा जाणिजे ॥३॥
ऐसें माझें स्वरुप अद्‌भुत ॥ देखोनि बळी माझा भक्त ॥ तेणें शरीर निश्चित ॥ मज केलें अर्पण ॥४॥
मग मी स्थापिला रसातळीं ॥ अद्यापि उभा आहें जवळी ॥ त्याचें द्वार राखें मी वनमाळी ॥ तोच गोकुळीं अवतरलों ॥५॥
जान्हवी माझें चरणजळ ॥ मस्तकीं वाहे तो जाश्वनीळ ॥ ऐशा गोष्टी घननीळ ॥ सांगे आम्हांतें जननीये ॥६॥
जें पोर मोडी पितृआज्ञेतें ॥ त्यासी ताडन करी स्वहस्तें ॥ मी मारीं आपुले मातेतें ॥ पितृआज्ञेंकरुनियां ॥७॥
एकवीस वेळां निःक्षत्री ॥ म्यां परशुधरें केली धरित्री ॥ तोचि गोकुळाभीतरी ॥ अवतरलों मी म्हणतसे ॥८॥
रामावतारीं मी पितृभक्त ॥ वना जाई चरणीं चालत ॥ खर दुषण त्रिशिरा समस्त ॥ वधिले अद्‌भुत विरोधें ॥९॥
माझी सीता नेली रावणें ॥ सवेंच म्यां केलें धांवणें ॥ वाली वधूनि सुग्रीवाकारणें ॥ किष्किंधा ते समर्पिली ॥२१०॥
माझा प्राणसखा हनुमंत ॥ सीताशुद्धि करुनि येत ॥ मी दळभारें रघुनाथ ॥ समुद्रतीरा पातलों ॥११॥
पाषाणीं पालाणिला समुद्र ॥ सुवेळेसी गेलों मी राघवेंद्र ॥ देवांतक नरांतक महोदर ॥ अतिकाय प्रहस्त वधियेले ॥१२॥
कुंभकर्ण इंद्रजित सर्व ॥ शेवटीं मारिला दशग्रीव ॥ सोडविलें बंदीचे देव ॥ निजप्रतापेंकरुनियां ॥१३॥
तोचि मी आतां गोकुळीं येथें ॥ कंस वधीन निजहस्तें ॥ मी क्षीर सागरीं असतां तेथें ॥ शरण देव मज आले ॥१४॥
ब्रह्मा शंकर प्रजा ऋषी ॥ गार्‍हाणीं सांगती मजपासीं ॥ मग मी मारावया कंसासी ॥ नंदगृहीं अवतरलों ॥१५॥
मुष्टिक चाणूर अघासुर ॥ दैत्य अवघे मारीन दुर्धर ॥ मी बायका सोळा सहस्त्र ॥ पुढें करीन म्हणतो कीं ॥१६॥
होईन मी भक्तांचा सारथी ॥ उच्छिष्ट काढीन स्वहस्तीं ॥ दुष्ट भारुनि निश्चितीं ॥ भूमार सर्व हरीन ॥१७॥
ब्रह्मयाचा बाप म्हणतो बाई ॥ म्हणवी क्षीराब्धीचा जांवई ॥ परमात्मा शेषशायी ॥ म्हणवी पाहीं यशोदे ॥१८॥
ज्यांचें घरीं न लाभे चोरी ॥ त्याचिया अर्भकांसी करीं धरी ॥ म्हणे तुमचे शिरींचे निर्धारीं ॥ केश लुंचीन अवघे पैं ॥१९॥
पोरें केश लुंचिती ॥ चिमटी मुलांच्या भागती ॥ म्हणे मी बौद्ध निश्चितीं ॥ कलियुगीं गति दावीन हो ॥२२०॥
पोरें न सांगती पाळती ॥ त्यांसी जाची नानागती ॥ एके मुलावरी बैसे श्रीपती ॥ ताट हातीं घेऊनियां ॥२१॥

मुलांस म्हणे म्लेंच्छ तुम्ही ॥ मरोन पडा रे रणभूमीं ॥ कलंकी अवतार पुढें मी ॥ ऐसाचि होईन जाण पां ॥२२॥
करीं घेऊनियां कुंत ॥ म्लेंच्छ संहारीन सत्य ॥ मी वैकुंठीचा नाथ ॥ यादवकुळीं अवतरलों ॥२३॥
ऐसे माझे अवतार किती ॥ भोगींद्रासही नेणवती ॥ मेघधारा मोजवती ॥ परी अंत नाहीं अवतारां ॥२४॥
मी आद्य निष्कलंक अचळ ॥ अरुप निर्विकार निर्मळ ॥ मी ब्रह्मानंदस्वरुप अढळ ॥ नाहीं चळ मजलागीं ॥२५॥
मी अच्युत अनंत ॥ मी नामरुपातीत ॥ मी गुणागुणरहित ॥ करुनि सत्या अकर्ता मी ॥२६॥
मी सर्वांचें निजमूळ ॥ परी नोळखती लोक बरळ ॥ जीवदशा पावोनि सकळ ॥ अविद्येनें वेष्टिले ॥२७॥
अहंकारमद्य पिऊनी ॥ भ्रमती मायाघोरविपिनीं ॥ आपुली शुद्धि विसरोनी ॥ आडफांटा भरले हो ॥२८॥
काम क्रोध मद मत्सर ॥ हे अनामिक दुराचार ॥ यांचे संगतीं जीव समग्र ॥ भ्रष्टोनि मज विसरती ॥२९॥
मी सर्वांजवळी असें ॥ परी कोणासही पाहतां न दिसें ॥ मृगनाभीं कस्तूरी वसे ॥ परी न गवसे तयातें ॥२३०॥
एक दर्पणांचें निकेतन ॥ त्यांत सोडिलें जैसें श्वान ॥ प्रतिबिंबें असंख्यात देखोन ॥ भुंकोन प्राण देत जैसें ॥३१॥
कां स्फटिकाचे पर्वतीं ॥ प्रतिबिंब द्विरद देखती ॥ झाडां व्यर्थ हाणितीं दांती ॥ परी न येती मरणावरी ॥३२॥
कां चणियाच्या आशें वानर ॥ गोवूनि बैसे दोनी कर ॥ कां नळिकेच्या योगें पामर ॥ शुक बद्ध जाहले ॥३३॥
कीं आंधळें हातरुं माजलें ॥ कीं सिंहानें प्रतिबिंब देखिलें ॥ कृपामाजी व्यर्थ मेलें ॥ जीवा झालें तैसेंचि ॥३४॥
कां उडुगणप्रतिभांस देखोन ॥ हंस पावे व्यर्थ मरण ॥ तैसें अविद्यायोगें भुलोन ॥ जन्ममरण भोगिती ॥३५॥
स्फटिक सर्वदा निर्मळ असे ॥ परी काजळावरी काळा दिसे ॥ कां केशावरी भासे ॥ चिरफळिया जाहल्या ॥३६॥
असो आतां यशोदे माय ॥ गोष्टी याच्या सांगों काय ॥ ऐकतां चित्ता उपरम होय ॥ प्रेम सये नावरे मज ॥३७॥
एक म्हणे नाटकी मोठा ॥ पुत्र तुझा बहुत गोटा ॥ मिथ्या गोष्टी गे अचाटा ॥ घेऊनियां ऊठतो ॥३८॥
जितुक्या सांगितल्या गोष्टी ॥ तितुक्या मिथ्याचि चावटी ॥ नसती क्रियाकर्मरहाटी ॥ आपुलें आंगीं लावितो ॥३९॥
पूर्वीं जे अवतार झाले ॥ ते आपुलेचि आंगीं लावितो बळें ॥ जें जें हा जननीये बोले ॥ तितुकें मिथ्या मृगजल ॥२४०॥
रांजणींचें पाणी देखतां ॥ भय वाटे तुझ्या सुता ॥ तो प्रळयसमुद्रीं तत्त्वतां ॥ मत्स्य कैसा झाला गे ॥४१॥
थापटोनी निजवितां जगजेठी ॥ म्हणे हळूचि थापटीं माझी पाठी ॥ तो म्हणतो मंदराचळ उठाउठीं ॥ पृष्ठीवरी धरिला म्यां ॥४२॥
चेंडू न उचले लवकरी यातें ॥ म्हणे म्यां दाढेवरी धरिलें धरेतें ॥ पृथ्वी रक्षिली म्यां अनंतें ॥ वराहवेषें म्हणतसे ॥४३॥
आंगडियाचा कसा सोडितां ॥ म्हणे नखें दुखती माझीं आताम ॥ आणि म्हणतो असुर तत्त्वतां ॥ विदारिला निजहस्तें ॥४४॥
शिंकें यासी न पवे वहिलें ॥ तो म्हणतो ब्रह्मांड नखें भेदिलें ॥ जान्हवीजळ काढिलें ॥ त्रिविक्रम होऊनियां ॥४५॥
मारुं जातां शिपटी ॥ भेणें पळतो जगजेठी ॥ तो म्हणतो तीन सप्तकें सृष्टी ॥ निःक्षत्री म्यां केली हो ॥४६॥
इक्षु न मोडे यास जाण ॥ म्हणतो मोडिलें भवसायकासन ॥ जो पळतो बागुलाच्या भेणें ॥ सांगें रावण मारिला म्यां ॥४७॥
मागील गोष्टी मिथ्या सर्व ॥ आतां मारीन म्हणतो कंसराव ॥ दावितो अवताराचा भाव ॥ निजांगींच आपुल्या ॥४८॥
उडत उडत होय मासा ॥ म्हणे हा मत्स्यावतार ऐसा ॥ अर्भक पायीं धरुनि ऐसा ॥ शंखासुर हाचि पैं ॥४९॥
चक्रवत फिरे घननीळ ॥ म्हणे ऐसा भ्रमविला मंदराचळ ॥ खडे घेऊनि तत्काळ ॥ म्हणे रत्‍नें काढिलीं ॥२५०॥
दांतांवरी काडी धरुनी ॥ वस्त्रघडी त्यावरी ठेवूनी ॥ म्हणे म्यां असे धरिली अवनी ॥ दावी रांगोनी सूकर ऐसा ॥५१॥
बाहुल्याचें पोट फोडी ॥ म्हणे हिरण्यकश्यपाचीं काढितों आंतडीं ॥ पोरें पळती तांतडीं ॥ भिती देखोनि तयातें ॥५२॥
गुडघे टेंकूनि होय वामन ॥ म्हणे म्यां त्रिपद घेतलें भूमिदान ॥ एका पोरावरी उभा राहोन ॥ म्हणे बळी पाताळीं घालितों ॥५३॥
करीं घेऊनि कंदुक ॥ म्हणे हेंचि माझे फरश देख ॥ निःक्षत्री करीन धरणी सकळिक ॥ म्हणोनि हिंडे सैराचि ॥५४॥
चुईचें धनुष्य करुनी ॥ हरि ठाण मांडी ॥ मेदिनीं आकर्ण ओढूनी ॥ मारीत म्हणे राक्षसां ॥५५॥
घडिभर घेतो मुरली ॥ ऐकतां आमुची वृत्ति मुराली ॥ अहंकृति समूळ हरली ॥ गातो वनमाळी सुंदर ॥५६॥
ऐकें यशोदे जननी ॥ अवघी लटकीच याची करणी ॥ आम्हांवरी इटाळी घेऊनी ॥ नसतीच उठतो गे ॥५७॥
याची गोष्ट न मानींच खरी ॥ परम चक्रचाळक मुरारी ॥ याच्या भेणें निर्धारी ॥ जावें टाकूनि गोकुळ ॥५८॥
यशोदा म्हणे अनंता ॥ सोसूं किती खोडी आतां ॥ क्षणभरी पाय तत्त्वतां ॥ घरीं तुझा न राहे ॥५९॥
परघरीं मी न करीं चोरी ॥ म्हणवोनि आण वाहें मुरारी ॥ तुज मी बांधीन हृदयमंदिरीं ॥ ना सोडींच सवर्था ॥२६०॥
पहा हरिविजयग्रंथ ॥ हाचि त्र्यंबकराज उमाकांत ॥ भावसिंहस्थी यात्रा येत ॥ त्यासी जगन्नाथ नुपेक्षी ॥६१॥
कीं ब्रह्मगिरी हाचि ग्रंथ ॥ जो पारायणप्रदक्षिणा करीत ॥ त्याचे बंध समस्त ॥ जन्मोजन्मींचे तुटती ॥६२॥
ब्रह्मानंदकृपामेघ सुरवाडे ॥ हें हरिविजयक्षेत्र वाढे ॥ श्रीधर म्हणे निवाडे ॥ अर्थ सज्जनीं पाहिजे ॥६३॥

इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ चतुर श्रोते परिसोत ॥ सप्तमाध्याय गोड हा ॥२६४॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥ ॥अध्याय॥७॥ ॥ओंव्या॥२६५॥