हरिविजय

श्रीधरांसारखा भगवंताच्या भक्तिप्रेमात न्हाऊन गेलेला अजोड कवी, गोपालकृष्णाच्या अति गोड लीलांचे वर्णन करतो, तेव्हा काय बहार येते.


अध्याय १०

श्रीगणेशाय नमः ॥

जय जय सिंहाद्रिवासा ॥ त्रिगुणातीता परमहंसा ॥ अत्रिनंदना परमहंसा ॥ लीलावेषा दिगंबरा ॥१॥
जय जय सर्गस्थित्यंतकारणा ॥ दत्तात्रेया मुनिमानसरंजना ॥ अमलदलराजीवनयना ॥ जगद्‌भूषणा जगद्‌गुरो ॥२॥
कैवल्यज्ञानदायका अवधूता॥ अवयवरहिता मायातीता ॥ भक्तजनपालका अव्यक्ता ॥ अपरिमिता निरंजना ॥३॥
सकळ योगियांत शिरोमणी ॥ सच्चिदानंद मोक्षदानी ॥ तो दिगंबर कटीं कर ठेवुनी ॥ पंढरीये उभा असे ॥४॥
जें वेदांचें निजसार ॥ जें सकळ शास्त्रांचें जिव्हार ॥ तो हा भीमातीरीं दिगंबर ॥ अति उदार सर्वात्मा ॥५॥
स्तंभें न उचले गगन ॥ न करवे अवनीचें वजन ॥ समुद्राचें किती जीवन ॥ नव्हे प्रमाण सर्वथा ॥६॥
तैसे तुझे अपार गुण ॥ शिव विरिंचि नेणती महिमान ॥ तेथें मी एक एकजिव्हें करुन ॥ काय गुण वर्णूं तुझे ॥७॥
हरिविजयग्रंथसार ॥ अवधूतांचें निजमंदिर ॥ तेथें दूषणश्वान अपवित्र ॥ प्रवेशेल कोठोनियां ॥८॥
असो नवमाध्यायीं कथन ॥ गोपी नावेंत बैसोन ॥ नौका बुडतां जगज्जीवन ॥ रक्षी पूर्ण गोपींतें ॥९॥
जो पांचां सहांवेगळा जाणा ॥ न ये पंचास्याच्या ध्याना ॥ तो वैकुंठपीठींचा राणा ॥ पांचां वर्षांचा जाहला ॥१०॥
गोपी म्हणती यशोदे सती ॥ वत्सें चाराया धाडी श्रीपती ॥ सवें देऊनि धाकुटे सांगाती ॥ वनाप्रती धाडीं कां ॥११॥
गांवांत असतां मुरारी ॥ घरोघरीं करितो चोरी ॥ सवें देऊनि सिद्ध शिदोरी ॥ पाठवावा वनातें ॥१२॥
असो प्रातःकाळीं उठोनियां ॥ माता म्हणे ऊठ प्राणसखया ॥ जाई वत्सें चारावया ॥ काननाप्रतीं गोविंदा ॥१३॥
सवें घेऊनि धाकुटया गोवळां ॥ सकळ वत्सें करुनि गोळा ॥ राजबिदीवरुनि सांवळा ॥ वना चालिला जगदात्मा ॥१४॥
वाद्यें वाजताती गंभीर ॥ मोहर्‍या पांवे सुस्वर ॥ टाळमृंगांचे झणत्कार ॥ करिती गजर स्वानंदें ॥१५॥
तेथें मृगांकमरीच्याकारें ॥ ढाळिताती दोहींकडे चामरें ॥ हरीवरी पल्लवछत्रें ॥ चिपणे गोपाळ धरिताती ॥१६॥
चिमणा श्रीकृष्ण सांवळा ॥ चिमणा पीतांबर कांसे कसिला ॥ चिमणी बरी कटीं मेखळा ॥ विद्युत्प्राय झळकतसे ॥१७॥
चिमण्या वांकी नेपुरें रुणझुणती ॥ मजा पाहात वेदश्रुती ॥ न वर्णवे निर्गुणाची कीर्ती ॥ म्हणोनि सगुणीं जडल्या त्या ॥१८॥
चिमणीच हातीं मुरली ॥ तेथें चित्तवृत्ति समूळ मुराली ॥ मिथ्या माया सकळ हरली ॥ चिमणी सांवळी मूर्ति पाहतां ॥१९॥
चिमणीच घोंगडी शोभली ॥ दशियांप्रती मोत्यें ओंविलीं ॥ चिमणाच वेत करकमळीं ॥ कमलनयनें धरिलासे ॥२०॥
चिमणे गळां मोत्यांचे हार ॥ चिमण्या क्षुद्रघंटांचा गजर ॥ गळां वनमाळांचे भार ॥ शोभे किशोर नंदाचा ॥२१॥
मूर्ति सांवळी गोमटी ॥ अंगीं शोभे केशराची उटी ॥ टिळक रेखिला ललाटीं ॥ रत्‍नें मुकुटीं झळकती ॥२२॥
कर्णीं कुंडलें मकराकार ॥ नेत्र आकर्ण अतिसुकुमार ॥ मंदास्मितवदन सुंदर ॥ रमावर शोभतसे ॥२३॥
भोंवते सखे गाती निर्भर ॥ मृदंग वाजती सुस्वर ॥ मध्यें पांवा वाजवी श्रीधर ॥ महिमा अपार न वर्णवे ॥२४॥
गोपिका आणि यशोदा सती ॥ हरीस बोळवीत जाताती ॥ माता म्हणे श्रीपती ॥ झडकरीं येईं माघारा ॥२५॥
गोपांसमवेत जगन्निवास ॥ आला तमारिसुतेचे तीरास ॥ नाना खेळ लीलाविलास ॥ पुराणपुरुष दावीतसे ॥२६॥
यावरी काननीं जगदुद्धार ॥ दिवस आला दोन प्रहर ॥ शिदोर्‍या मेळवूनि समग्र ॥ काला थोर मांडिला ॥२७॥
कमलपत्राकार गोपाळ ॥ मध्यें मिलिंद तमालनीळ ॥ कीं निधानाभोंवते साधक सकळ ॥ साधावया बैसती ॥२८॥
कीं फणिवरीं वेष्टिला चंदन ॥ कीं विबुधीं वेष्टिला सहस्त्रनयन ॥ कीं वराभोंवते संपूर्ण ॥ वर्‍हाडी जैसे बैसले ॥२९॥
कीं अनर्घ्य रत्‍नाजवळी ॥ मिळाली परीक्षकमंडळी ॥ कीं कनकाद्रीभोंवते सकळी ॥ कुलाचल बैसले ॥३०॥
कीं मानससरोवर निर्मळ ॥ त्याभोंवते बैसती मराळ ॥ कीं वेष्टूनियां जाश्वनीळ ॥ तपस्वी बैसती प्रीतीनें ॥३१॥
कीं श्रीकृष्ण सूर्यनारायण ॥ गोप ते किरण प्रकाशघन ॥ कीं हरिचंद्रास वेढून ॥ उडुगण गोप बैसले ॥३२॥
आपुल्या शिदोर्‍या संपूर्ण ॥ हरीपुढें ठेविती आणून ॥ एकीं मांडेच आणिले जाण ॥ अंतर्बाह्य गोड जे ॥३३॥
एकीं आणिली गुळवरी ॥ एकाचा दहींभात भाकरी ॥ एकाची ते शिळीच शिदोरी ॥ सोडोनियां बैसले ॥३४॥
कोंडयाची भाकरी एक सोडीत ॥ एकाचा ताकभात झिरपत ॥ एकाची शिदोरी विटली समस्त ॥ चवी न लागे जेवितां ॥३५॥
सकळांसी म्हणे हरि तेव्हां ॥ आपुलें वाढिलें उगेच जेवा ॥ दुसर्‍याचा नका करुं हेवा ॥ मनोभावापासुनी ॥३६॥
आपुलें पूर्वकर्म नीट नाहीं ॥ दुसर्‍याचा हेवा करुनि काई ॥ जें पेरिलें तें लवलाहीं ॥ बाहेर उगवोनि ठसावे ॥३७॥
असो काला करितां मुरारी ॥ त्यांतून पेंधा उठे झडकरी ॥ आणिक वृक्षच्छायेसी निर्धारीं ॥ जाऊनियां बैसला ॥३८॥
वेगळेंच थोंब तयानें केलें ॥ गोप आपणाकडे फोडिले ॥ एक एक अवघेच गेले ॥ टाकून एकले हरीसी ॥३९॥
गोपाळ म्हणती हृषीकेशी ॥ काय सुख तुझे संगतीसी ॥ नसतें जीवित्व आम्हांस देसी ॥ फेरे चौर्‍यायशीं भोगावया ॥४०॥
तूं आधीं एकला निर्गुण ॥ तुज पुसत होतें तरी कोण ॥ मग आम्हीं तुज सगुण ॥ करुनि आणिलें आकारा ॥४१॥
आम्हीं तुज नांवरुपा आणिलें ॥ महत्त्व चहुंकडे वाखाणिलें ॥ तुज थोरपण आम्हीं दिधलें ॥ तुंवा वेगळें केलें आम्हां ॥४२॥
तूं परब्रह्म मायेपरता ॥ आणि जीवदशा आमुचे माथां ॥ तूं अक्षय अचल अनंता ॥ नाना पंथां पिटिसी आम्हां ॥४३॥
तूं जाहलासी निर्विकार ॥ आम्हांसी लाविले नाना विकार ॥ तूं ब्रह्मानंद परात्पर ॥ निरय घोर आम्हांसी कां ॥४४॥
तूं देवाधिदेव आत्माराम ॥ तूं चराचरबीजफलद्रुम ॥ आमुच्या पाठीं क्रोध काम ॥ दुर्जन परम लाविले ॥४५॥
तूं अज अजित अचल ॥ आम्हां केलें सदा चंचल ॥ तूं ज्ञानरुप अतिनिर्मळ ॥ अज्ञान सबळ आम्हांसी कां ॥४६॥
तूं महाराज नित्यमुक्त ॥ आम्हां केलें विषयासक्त ॥ तूं मायेहूनि अतीत ॥ अविद्यावेष्टितत्व आम्हांसी कां ॥४७॥
महामुनी सोंवळे मुरारी ॥ ते तुज चिंतिती अंतरीं ॥ आम्हांसी न शिकवी क्षणभरी ॥ ऐसी परी तुवां केली ॥४८॥
तूं मदनमनोहर पुतळा ॥ आम्ही वांकडे विरुप अवकळा ॥ तुझे बोल लागती सकळां ॥ आमुच्या बोला हांसती ॥४९॥
ऐसें बोलोनि गोवळे ॥ अवघे पेंध्याकडे गेले ॥ मग तेणें घननीळें ॥ काय केलें ऐका तें ॥५०॥
आपण येऊनि गोपांजवळी ॥ उभा ठाकला वनमाळी ॥ तंव ते मिळोनि सकळी ॥ बळें दवडिती हरीतें ॥५१॥
म्हणती तूं नलगेसी आम्हांतें ॥ म्हणोनि माघारें लोटिती हातें ॥ हरि काकुळती ये तयांतें ॥ मी तुम्हांतें न विसंबें ॥५२॥
तुम्ही बोलाल जें वचन ॥ त्यासारिखा मी वर्तेन ॥ सांगाल तेंचि मी करीन ॥ तुम्हांविण न गमे मज ॥५३॥
मत्स्यकूर्मादि अवतार ॥ तुम्हांलागीं घेतले साचार ॥ सूकरनरसिंहरुपें सुंदर ॥ तुम्हांलागीं धरिलीं म्यां ॥५४॥
पाळावया तुम्हांलागुनी ॥ म्यां निःक्षत्री केली अवनी ॥ पौलस्त्यकुळ निर्दाळुनी ॥ रक्षिलें म्यां तुम्हांतें ॥५५॥
ऐसा मी निजभक्त साहाय्यकारी ॥ मज कां दडवितां ये अवसरीं ॥ ऐसें बोलतां हरीचे नेत्रीं ॥ अश्रु वाहती भडभडां ॥५६॥
ऐसें तें क्षणीं देखोनी ॥ पेंधा धांवोनि लागे चरणीं ॥ आपुल्या नेत्रोदकेंकरुनी ॥ हरिपदीं केला अभिषेक ॥५७॥
गडी स्फुंदत बोलती तेव्हां ॥ वैकुंठपाळा गा माधवां ॥ आम्ही तुज दडवूनि केशवा ॥ ठकलों होतों सर्वस्वें ॥५८॥
असो हरीस मध्यें बैसवूनी ॥ काला मांडिला ते क्षणीं ॥ आपुल्या हातें चक्रपाणी ॥ कवळ देत निजभक्तां ॥५९॥
गडी म्हणती जगन्मोहना ॥ आधीं ग्रास घे तूं जनार्दना ॥ हरि म्हणे तुम्हांविना ॥ ग्रास न घें मी सर्वथा ॥६०॥
मग म्हणती गोपाळ ॥ तुजविण ग्रास न घेऊं सकळ ॥ रुसोनि चालिला घननीळ ॥ जो वेल्हाळ वैकुंठींचा ॥६१॥
गोपाळ धांवोनि लागती पायां ॥ बैसे बैसे रे भक्तसखया ॥ तुझेंच ऐकूं म्हणोनियां ॥ कान्हयालागीं बैसविलें ॥६२॥
आधीं भक्तीं घेतला ग्रास ॥ तैं शेष सेवी जगन्निवास ॥ जो परात्पर पुराणपुरुष ॥ लीला अगाध दावीतसे ॥६३॥
ऐसा नित्यकाळ यमुनातीरीं ॥ काला करीत पूतनारी ॥ आपुल्या हातें शिदोरी ॥ वांटी हरि सकळांतें ॥६४॥
गडी म्हणती ते समयीं ॥ आमुचा ग्रास तूं घेईं ॥ तुझा ग्रास लवलाहीं ॥ आम्हीं घेऊं गोविंदा ॥६५॥
मीपण आणि तूंपण ॥ या दोहींचा ग्रास करुन ॥ मग रुचि कैंची संपूर्ण ॥ अनुभवेंकरुन पहावें ॥६६॥
गोपाल करिती करपात्रें ॥ त्यांत कवळ ठेविले राजीवनेत्रें ॥ आलें लोणचीं चित्रविचित्रें ॥ अंगुलिकासंधीं धरिताती ॥६७॥
मजा पहात ते परमहंस ॥ भोंवतें बैसले सदा उदास ॥ जैसें मानस वेष्टितीं राजहंस ॥ मुक्त सेवूं बैसले ॥६८॥
मध्यें बैसला भुवनसुंदर ॥ भोंवते गोपाळ दिगंबर ॥ मानापमान समग्र ॥ दोन्ही नेणती सर्वथा ॥६९॥
जैसी श्वानाची विष्ठा ॥ तैसी त्यांत वाटे प्रतिष्ठा ॥ तरीच पावले वरिष्ठा ॥ श्रीवैकुंठा हरीतें ॥७०॥
असो हरिमुखीं कवळ ॥ सकळ घालिती गोपाळ ॥ उरलें तें शेष गोवळ ॥ स्वयें घेती प्रीतीनें ॥७१॥
तों सकल निर्जर ते वेळीं ॥ विमानीं पाहती अंतराळीं ॥ तो ब्रह्मानंद वनमाळी ॥ काला कैसा करीतसे ॥७२॥
ब्रह्मा म्हणे ब्रह्मपद जाळावें ॥ गोकुळीं निरंतर बसावें ॥ इंद्र म्हणे रमाधवें ॥ कां येथें गोविलें आम्हांसी ॥७३॥
बोलती शसी सूर्य दोघेजण ॥ आम्हां कृष्णें लाविलें भ्रमण ॥ आपण गोकुळीं अवतरोन ॥ भक्तजन मुक्त केले ॥७४॥
तेथींचा प्रसादकवळ ॥ जरी आम्हांसी प्राप्त केवळ ॥ तरी मुक्त होऊं तत्काळ ॥ मायाचक्रापासूनि ॥७५॥
मग देव म्हणती एक करावें ॥ मत्स्य होऊनि अवघीं जावें ॥ मित्रकन्याहृदयीं रहावें ॥ प्रेमें तळपावें सादर ॥७६॥
गडियांसमवेत श्रीधर ॥ हस्तप्रक्षालना येईल जगदुद्धार ॥ तें शेष सेवूनि उद्धार ॥ सर्वहीं करुं आपुला ॥७७॥
सुरवर ऐसें बोलोन ॥ कालिंदीजीवनीं जाहले मीन ॥ तें एक जाणे जगज्जीवन ॥ अंतरखूण तयांची ॥७८॥
तों गडी म्हणती जगज्जीवना ॥ चला जाऊं यमुनाजीवना ॥ मग तो वैकुंठपीठींचा राणा ॥ काय बोले तयांतें ॥७९॥
हरि म्हणे तृषा लागली जरी ॥ तरी तक्र प्यावें निर्धारीं ॥ अथवा दुग्धचि प्यावें वरी ॥ परी नव जावें यमुनेतें ॥८०॥
हरि म्हणे गडियांतें ॥ हात पुसावे घोंगडियांतें ॥ ऐसें म्हणतां कान्हया तें ॥ तेंचि सर्वांते मानले ॥८१॥
गडी म्हणती जगज्जीवना ॥ कां आवर्जिली बा यमुना ॥ कोण्या विचारें मधुसूदना ॥ कोप धरिला तिजवरी ॥८२॥
मग म्हणे हृषीकेशी ॥ बा रे तेथें आली आहे विवशी ॥ ते धरुनि नेईल सकळांसी ॥ मी जावया भितों तेथें ॥८३॥
तंव पेंधा बोले वचन॥ तरी मी यमुनेसी जाईन ॥ जीवन अगत्य सेवीन ॥ आपुल्या करें करोनियां ॥८४॥
हरि म्हणे रे पेंधिया ॥ नसताचि घेऊं नको थाया ॥ तंव तो म्हणे प्राणसखया ॥ मी सर्वथा न राहें ॥८५॥
हरि म्हणे पेंधियासी ॥ तुज ग्रासील रे विवशी ॥ तरी गेळ्यानें कडेसी ॥ पाणी काढूनि सेविंजे ॥८६॥
मग पेंधा ते अवसरीं ॥ वेगें आला यमुनातीरीं ॥ न्याहाळूनि पाहे यमुनानीरीं ॥ विवशी कोठें म्हणोनियां ॥८७॥
तों यमुनाजीवनाचा खळाळ ॥ कानीं पेंधा ऐके तुंबळ ॥ गेळ्या खालता ठेविला तत्काळ ॥ जाळें माजीं आंवळिलें ॥८८॥
पेंधा म्हणे यमुनेसी ॥ तूं बायको होऊनि आम्हांसीं ॥ हमामा आजि घालिसी ॥ कैसी तगसी पाहीन आतां ॥८९॥
जरी मी कृष्णदास असेन सत्य ॥ तरीच तुज करीन शांत ॥ म्हणोनि हमामा त्वरित ॥ मांडियेला यमुनेसीं ॥९०॥
मग खळाळासीं पेंधा ॥ हमामा घालितां न राहे कदा ॥ तें कदंबातळीं गोविंदा ॥ आनंदकंदा समजलें ॥९१॥
कृष्ण म्हणे गडियांसी ॥ पेंधा गेला यमुनेसी ॥ तेथें आधींच होती विवशी ॥ गति कैसी जाहली ॥९२॥
समाचारासी गडी धाडिले ॥ तेही पेंधियासीं साह्य जाहले ॥ म्हणती आम्हांसी इणें लाविलें ॥ कृष्णभक्तांसी खळखळ ॥९३॥
आणिक समाचारासी गडी धाडिले ॥ तेही तेथेंचि गुंतले ॥ आणिक मागून पाठविले ॥ तेही जाहले साह्य पैं ॥९४॥
आले अवघे नव लक्ष गडी ॥ बळकाविली यमुनाथडी ॥ हमामा घालिती कडोकडीं ॥ मेटाखुंटीं येऊनियां ॥९५॥
पेंधियासी पाठिराखे ॥ मिळाले नव लक्ष सखे ॥ घाई हमाम्याची देखें ॥ एकसरें मांडिली ॥९६॥
जैसी मांडे रणधुमाळी ॥ तैसी हमाम्याची घाई गाजली ॥ सर्वांच्या मुखांस खरसी आली ॥ परी न सांडिती आवांका ॥९७॥
प्राण जाहले कासाविस ॥ परी कदा न येती हारीस ॥ जे सकळ सुरांचे अंश ॥ गोपवेषें अवतरले ॥९८॥
हे रामावतारीं वानर होऊन ॥ केलें लंकेसी रणकंदन ॥ जिंहीं दशकंधर त्रासवून ॥ रामचंद्र तोषविला ॥९९॥
तेचि हे गोकुळ गोपाळ ॥ पुन्हां अवतरले सकळ ॥ जरी राहील यमुनेचें जळ ॥ तरी उगे राहतील हे ॥१००॥
कदंबातळीं नंदनंदन ॥ एकला उरला जगज्जीवन ॥ मुरली हातीं घेऊन ॥ वेगे आला यमुनातीरा ॥१॥
कौतुक पाहे श्रीहरी ॥ गडी नाहींत देहावरी ॥ मग म्हणे मुरारी ॥ कां रे व्यर्थ शीणतां ॥२॥
आतां कां करितां श्रमा ॥ खळाळासीं घालितां हमामा ॥ तेथें नाहीं स्त्रीपुरुषप्रतिमा ॥ कैसें तुम्हां न कळेचि ॥३॥
ऐसें बोले शेषशायी ॥ परी प्रत्युत्तर ते समयीं ॥ कदा न देती कोणी कांहीं ॥ थोर घाई हमाम्याची ॥४॥
कृष्ण म्हणे जरी न राहे यमुना ॥ तरी तेथें समर्पिती प्राणा ॥ ऐसें जाणोनि वैकुंठराणा ॥ काय करिता जाहला ॥५॥
जो निजजनप्राणरक्षक मुरारी ॥ जो त्रिभुवनमोहन पूतनारी ॥ तत्काळ मुरली वाजविली अधरीं ॥ नादें भरी गगनातें ॥६॥
मुरली वाजवितां मुरलीधर ॥ सकळांची वृत्ती मुरली समग्र ॥ मुराले सकळांचे अहंकार ॥ मुरहरें थोर वेधिलें ॥७॥
मनोहर ध्वनि उमटती ॥ जैशा वेदश्रुती गर्जती ॥ नकुल भोगी विचरती ॥ एके ठायीं तेधवां ॥८॥
व्याघ्र आणि गाई ॥ निर्वैर चरती एके ठायीं ॥ गजकेसरींस वैर नाहीं ॥ थोर नवलाई हरीची ॥९॥
प्राणी स्थिर राहिले चराचर ॥ शांत जाहलें यमुनेचें नीर ॥ मुरलींत म्हणे मुरहर ॥ गडे हो स्थिर रहा आतां ॥११०॥
यमुना भिऊनि पळाली ॥ सावध होऊनि पहा सकळी ॥ तें पेंधियानें ऐकिलें ते वेळीं ॥ शांत जाहली यमुना ते ॥११॥
मांडी थापटोनि पळाली सहजी ॥ पेंधा आपणातें नांवाजी ॥ मग म्हणे भला मी पेंधाजी ॥ बळिया आढय जन्मलों ॥१२॥
पेंधा म्हणे पहा चक्रपाणी ॥ यमुना पळविली येच क्षणीं ॥ मग बोले त्रिभुवनज्ञानी ॥ तुमची करणी अगाध ॥१३॥
तुम्ही बळकट गोपाळ ॥ तुम्हांसी देखतां विटे काळ ॥ ऐसें बोले वैकुंठपाळ ॥ गडी हांसती गदगदां ॥१४॥
गडियांसमवेत वनमाळी ॥ वेगें परतला सायंकाळीं ॥ देव मत्स्य जाहले यमुनाजळीं ॥ तेही गेले स्वस्थाना ॥१५॥
गोधनें घेऊनि सांजवेळे ॥ परतला परब्रह्म सांवळें ॥ सवें वेष्टित गोवळे ॥ नाना वाद्यें वाजवती ॥१६॥
कल्याण गौडी श्रीराग ॥ मुरलींत आळवी श्रीरंग ॥ वसंत पावक पद्म सुरंग ॥ नीलांबर राग वाजवीत ॥१७॥
कनकदंडश्वेतचामरें ॥ गोप ढाळिती वरी आदरें ॥ झळकताती पल्लवछत्रें ॥ एक तुंगारपत्रें वाजविती ॥१८॥
आरत्या घेऊनि गोपिका ॥ सामोर्‍या येती वैकुंठनायका ॥ निंबलोण उतरिती देखा ॥ हरीवरुनि प्रीतीनें ॥१९॥
निजमंदिरांत येतां जगजेठी ॥ टाकोनियां घोंगडी काठी ॥ धांवोनि यशोदेच्या कंठीं ॥ घातली मिठी श्रीहरीनें ॥१२०॥
बळिरामें रोहिणीच्या गळां ॥ मिठी घातली ते वेळां ॥ एक गौर एक सांवळा ॥ दाविती लीला भक्तांतें ॥२१॥
ते साक्षात शेष नारायण ॥ यशोदेनें पूजिले दोघेजण ॥ दोघांसी करवूनि मार्जन ॥ माया आपण टिळक रेखी ॥२२॥
रत्‍नजडित पदकमाळा ॥ घातल्या दोघांचियां गळां ॥ चिमणा पीतांबर पिंवळा ॥ कांसे कसिला मायेनें॥२३॥
षड्रस अन्न वाढूनी ॥ आणिती जाहली रोहिणी ॥ माया आपुल्या हातेंकरुनी ॥ ग्रास घाली दोघांतें ॥२४॥
नाना क्रतु करितां करितां ॥ जो न घे अवदानें सर्वथा ॥ तो यशोदेच्या हाता ॥ पाहुनि मुख पसरीत ॥२५॥
झाडोनियां मंचक ॥ वरी पाटोळा क्षीरोदक ॥ शेष नारायण देख ॥ दोघे तेथें पहुडती ॥२६॥
क्षीरसागरींचीं निधानें ॥ शेजे निजविलीं मायेनें ॥ अनंत जन्में तपाचरणें ॥ केली होतीं याचलागीं ॥२७॥
असो उठोनि प्रातःकाळीं ॥ माया जागें करी वनमाळी ॥ कोमलहस्तें तें वेळीं ॥ थापटीत यशोदा ॥२८॥
ऊठ वेगें गोविंदा ॥ जगन्माहेना आनंदकंदा ॥ पुराणपुरुषा ब्रह्मानंदा ॥ गडी पाहती वाट तुझी ॥२९॥
जागा जाहला त्रिभुवनपती ॥ माता धरीं हृदयीं प्रीतीं ॥ तों बळिभद्र महामती ॥ उठता झाली ते क्षणी ॥१३०॥
मुख प्रक्षाळूनि ते क्षणीं ॥ दोघां जेववी नंदराणी ॥ हरीनें पांवा करीं घेऊनी ॥ आळवीत गोपाळां ॥३१॥
प्राणसखे हो चला त्वरित ॥ वेगें जाऊं काननांत ॥ वत्सें गोळा करुं समस्त ॥ गोप धांवती तेधवां ॥३२॥
गौळिणींसहित यशोदा ॥ बोळवीत जाय सच्चिदानंदा ॥ ज्याचें स्वरुप शेषवेदां ॥ ठायीं न पडे सर्वथा ॥३३॥
वाद्यें वाजविती गोवळे ॥ मध्यें पूर्णब्रह्म मिरवलें ॥ पाहतां गोपींचे डोळे ॥ पातीं ढाळूं विसरले ॥३४॥
पुढें जाती वत्सांचे भार ॥ ते वत्सरुपें सकल ऋषीश्वर ॥ पाळूनियां सर्वेश्वर ॥ उद्धरीत तयांतें ॥३५॥
तंत वितंत घन सुस्वर ॥ वाद्यें वाजविती परम मधुर ॥ मध्यें नाचत श्रीधर ॥ जें त्रिभुवनसुंदर रुपडें ॥३६॥
देवांचे अवतार गोप ॥ वत्से तितुके ऋषीश्र्वररुप ॥ सवें घेऊनि यादवकुलदीप ॥ वनांतरीं हिंडतसे ॥३७॥
धन्य गोपाळांचें तप थोर ॥ वश केला जगदुद्धार ॥ जो योगिमानसहृदयविहार ॥ न कळे पार वर्णितां ॥३८॥
मध्यें श्रीकृष्ण पांवा वाजवी ॥ जो आदिपुरुष मायालाघवी ॥ नाना अवतारभाव दावी ॥ नृत्य करितां स्वानंदें ॥३९॥
टाळ मृदंग मोहरिया ॥ पांवे श्रृंगें घुमरिया ॥ रुद्रवीणे पिनाकिया ॥ वाजविती सुस्वरें ॥१४०॥
घमंडी टाळांची घाई ॥ करटाळिया फडकती पाहीं ॥ गाती नाना गती लवलाहीं ॥ नाकें वाजविती वीणा एक ॥४१॥
नाना श्वापदें बाहती वनीं ॥ त्यांसीच देती प्रतिध्वनी ॥ एक वृक्षावरी वानर होऊनी ॥ बळें शाखा हालविती ॥४२॥
एक देती बळें भुभुःकार ॥ तेणें नादावलें अंबर ॥ एक म्हणती लंकानगर ॥ आम्हींच पूर्वीं जाळिलें ॥४३॥
नाना परींचे टिळे रेखिले ॥ वृक्षडाहाळे शिरीं खोंविले ॥ एक वृक्षावरी गाती चांगले ॥ लीला अपार हरीची ॥४४॥
एक गायनाचा छंद पाहोन ॥ तैसीच तुकाविती मान ॥ एक टिरीचा मृदंग करुन ॥ वांकुल्या दावीत वाजवीत ॥४५॥
खालती लक्षूनियां एक ॥ वरुनि फळें हाणिती देख ॥ मयूरपिच्छें शिरीं कित्येक ॥ अति सतेज झळकती ॥४६॥
एक बैसोनि वृक्षावरी ॥ मयूराऐसाचि ध्वनि करी ॥ एक मंडूक होऊनि निर्धारीं ॥ अवनीवरी उडताती ॥४७॥
एक मांजराऐसा गुर्गुरी ॥ एक कच्छ होऊनि रांगती पृथ्वीवरी ॥ एक वृषभ होऊनि धरणीवरी ॥ धांवताती तुडवावया ॥४८॥
एक दृढ आसन घालिती ॥ चरणांगुष्ठ करीं धरिती ॥ दोघे उचलोनि त्यास नेती ॥ मग बैसती दुजे स्थानीं ॥४९॥
गुंजमाळा गळां आरक्त ॥ वनमाळा डोलती पादपर्यंत ॥ तुळसीमाळा सुवासित ॥ परिमळत वन तेणें ॥१५०॥
एक खेळती चेंडूफळी ॥ एक वावडी उडविती निराळीं ॥ एक लंपडाईत वेळीं ॥ नेत्र झांकून खेळती ॥५१॥
भोंवरा विटीदांडू चक्रें ॥ एक हमामा घालिती गजरें ॥ हुतुतु हुमली एकसरें ॥ गोप घालिती आवडीं ॥५२॥
एक बळें झोंबी घेऊनी ॥ एक एकासी पाडिती मेदिनीं ॥ एक सुरवाती टाकूनी ॥ म्हणती शोधूनि काढा रे ॥५३॥
हे रामवतारीं बहु श्रमले ॥ युद्ध करितां लंकेसी भागले ॥ म्हणोनि गोकुळीं ये वेळे ॥ ब्रह्मानंदें क्रीडती ॥५४॥
पूर्वीं हे निराहार होते ॥ म्हणोनि जेविती हरीसांगातें ॥ आपुल्या हातें रमानाथें ॥ ग्रास त्यांस घातले ॥५५॥
असो वनीं खेळे जगदात्मा ॥ वृक्ष भेदीत गेले व्योमा ॥ त्या छायेसी शिवब्रह्मा ॥ क्रीडा करुं इच्छिती ॥५६॥
अशोक वृक्ष उतोतिया ॥ रायआंवळे आंबे खिरणिया ॥ निंब वट पिंपळ वाढोनियां ॥ सुंदर डाहाळिया डोलती ॥५७॥
डाळिंबी सुपारी सायन मांदार ॥ चंदन मोहवृक्ष अंजीर ॥ चंपक जाई परिकर ॥ बकुल मोगरे शोभती ॥५८॥
शेवंती जपावृक्ष परिकर ॥ तुळसी करवीर कोविदार ॥ कनकवेली नागवेली सुंदर ॥ पोंवळवेली आरक्त ॥५९॥
कल्पवृक्ष आणि कंचन ॥ गरुडवृक्ष आणि अर्जुन ॥ वाळियाचीं बेटें सुवासें पूर्ण ॥ कर्पूरकर्दळी डोलती ॥१६०॥
द्राक्षामंडप विराजती ॥ शतपत्रें कल्हारें विकासती ॥ वृक्षांवरी चढती मालती ॥ बदरी डोलती फलभारें ॥६१॥
शाल तमाल पारिजातक ॥ शिरस आणि रायचंपक ॥ फणस निंबोणी मातुलिंग सुरेख ॥ कळंब महावृक्ष सुंदर ॥६२॥
नारिंगी बिल्व देवपाडळी ॥ देवदारवृक्ष नभमंडळीं ॥ अगरु कृष्णागरु सुवासमेळीं ॥ नभःस्थळीं परिमळती ॥६३॥
जायफळ वृक्ष सुंदर ॥ लवंगी नाना लता परिकर ॥ येत सुंगध मलयसमीर ॥ रुंजती भ्रमर कमलांवरी ॥६४॥
कपित्थ ताड सुंदर वाढले ॥ सूर्यवृक्ष टवटवले ॥ औंदुबर सदा फळले ॥ इक्षुदंड रसभरित ॥६५॥
मयूर चातकें बदकें ॥ कस्तूरीमृग जवादी बिडलकें ॥ राजहंस नकुळ चक्रवाकें ॥ अतिकौतुकें विचरती ॥६६॥
कोकिळा आळविती पंचमस्वर ॥ विपिन तें सुवासिक मनोहर ॥ ऐसिया वनांत श्रीधर ॥ वत्सभार चारीतसे ॥६७॥
दिवस आला दोन प्रहर ॥ वृक्षच्छायेसी समग्र ॥ वत्सें गोळा करुनि जगदुद्धार ॥ कदंबातळीं बैसला ॥६८॥
काला मांडिला घननीळें ॥ गोप भोंवतें वेष्टूनि बैसले ॥ सकळ सुरवर पातले ॥ विमानीं बैसोनि पाहावया ॥६९॥
वत्सें जीं होतीं गोळा केलीं ॥ तीं चरत चरत दूर गेलीं ॥ कमळासनें देखोनि ते वेळीं ॥ मनामाजी आवेशला ॥१७०॥
म्हणे श्रीकृष्ण पूर्ण अवतार ॥ किंवा अंशरुप आहे साचार ॥ हा पुरता पाहूं विचार ॥ मांडिलें चरित्र कमलोद्भवें ॥७१॥
येऊनियां वृंदावनीं ॥ परमेष्ठी अवलोकी नयनीं ॥ म्हणे वत्सें न्यावीं चोरुनी ॥ करील करणी कैसी पाहूं ॥७२॥
हा पयःसागरनिवास ॥ जरी असे पुराणपुरुष ॥ तरी प्रताप दावील विशेष ॥ अति अद्‌भुत मजलागीं ॥७३॥
जरी हा असेल माझा जनिता ॥ तरी प्रत्यया येईल मज आतां ॥ ऐसें कल्पूनि विधिता ॥ वत्सें नेलीं क्षणमात्रें ॥७४॥
आपली माया वरी घातली॥ सत्यलोकीं नेऊनि लपविलीं ॥ तों इकडे सच्चिदानंद वनमाळी ॥ काला वांटीत बैसला ॥७५॥
नाना प्रकारचीं लोणचीं ॥ ज्यांची देवही नेणती रुची ॥ चवी पहावया दध्योदनाची ॥ लाळ विरिंचि घोंटीतसे ॥७६॥
गोप मुखीं घालिती ग्रास ॥ वरतें दाविती देवांस ॥ तें शेष प्राप्त नव्हे कोणास ॥ बहु तपे तपतां हो ॥७७॥
धन्य धन्य गोकुळींचे गोप ॥ अनंत जन्में केलें तप ॥ तें एकदांचि फळलें अमूप ॥ चित्स्वरुप वश्य केलें ॥७८॥
कीं पूर्वीं बहुत मख केलें ॥ कीं अनंत तीर्थीं नाहले ॥ कीं वातांबुपर्ण सेवूनि तप केलें ॥ शीत उष्ण सोसूनियां ॥७९॥
कीं त्रिवेणीसंगमीं पाहीं ॥ शरीर घातलें कर्वतीं त्यांहीं ॥ त्या पुण्यें क्षीराब्धीचा जांवई ॥ वश केला गोपाळीं ॥१८०॥
असो ब्रह्मा तेथें येऊनि गुप्त ॥ हरिलीला विलोकीत ॥ म्हणे येणें पूतना तृणावर्त ॥ शकटासुर मारिला ॥८१॥
इतुकेनि हा पुरुषार्थी ॥ आम्ही न मानूं श्रीपती ॥ ऐसें परमेष्ठी मनीं चिंती ॥ तों गडी बोलती हरीतें ॥८२॥
वत्सें बहु दूर गेलीं ॥ घेऊनि येईं वनमाळी ॥ आतां वळावयाची पाळी ॥ तुझीच असे ये वेळीं ॥८३॥
ऐसें ऐकतां वचन ॥ उठिला इंदिरामनमोहन ॥ जो मायातीत निरंजन ॥ चैतन्यघन जगद्‌गुरु ॥८४॥
वेणु खोंविलासे पोटीं ॥ कक्षेसी धरी श्रृंग आणि काठी ॥ दध्योदन वाम करपुटीं ॥ ग्रास जगजेठी घालीतसे ॥८५॥
वत्सें पहात दूरी॥ गेला वैकुंठपुरविहारी ॥ इकडे गोपाळ कवळ घेऊनि करीं ॥ वाट पाहती कृष्णाची ॥८६॥
हातींचा ग्रास राहिला हातीं ॥ मुखींचा कदा न गिळिती ॥ तटस्थ हरीची वाट पाहती ॥ म्हणती श्रीपती कां न ये ॥८७॥
तो ब्रह्मदेवें केलें विंदान ॥ वासरें नेलीं चोरुन ॥ इकडे वनीं यादवकुलभूषण ॥ वत्सें शोधीत हिंडतसे ॥८८॥
वत्सें न दिसती ते वेळां ॥ म्हणोनि पूर्वस्थळासी हरि आला ॥ तों न दिसे गोपमेळा ॥ घेऊनि गेला विधाता ॥८९॥
कळलें विरंचीचें विंदाण ॥ मग मनीं हांसे नारायण ॥ म्हणे कमलोद्भवाचा अभिमान ॥ दूर करावा तत्त्वतां ॥१९०॥
मग काय करी रमाजीवन ॥ सर्व स्वरुपें जाहला आपण ॥ ज्या ज्या वत्साचा जैसा वर्ण ॥ मनमोहन तैसा होय ॥९१॥
चितारें भिंगारें खैरें ॥ मोरें सेवरें आणि कैरें ॥ तांबडें काळें पांढरें ॥ अवघीं वासरें आपण जाहला ॥९२॥
ढवळें सांवळें चितळें ॥ पोवळें पारवें डफळें ॥ तैसींच रुपें घननीळें ॥ असंख्यात धरियेलीं ॥९३॥
वडजे वांकडे गोपाळ ॥ एक धाकुटे एक विशाळ ॥ एक रोडके एक ढिसाळ ॥ होय सकळ आपण ॥९४॥
मोडके कुब्जे काणे बहिर ॥ गोरे सांवळे सुंदर ॥ तितुकीं स्वरुपें श्रीधर ॥ आपण नटला एकदांचि ॥९५॥
त्यांची घोंगडी पायतण पांवे ॥ तितुकीं स्वरुपें धरिलीं कमलाधवें ॥ कटिसूत्र वनमाला श्रृंग सर्वें ॥ मयूरपिच्छें जाहला ॥९६॥
वेत्र घुमरिया शिदोरी जाळें ॥ लघु दीर्घ सूक्ष्म विशाळें ॥ अनंतब्रह्मांडगोपाळें ॥ रुपें सकळ धरियेलीं ॥९७॥
सायंकाळीं हृषीकेशी ॥ परतोनि आला गोकुळासी ॥ ज्याची ज्याची सवे जैसी ॥ तैसाचि होय जगदात्मा ॥९८॥
कोणासी न दिसे विपरीत ॥ कृष्णमाया परमाद्‌भुत ॥ एक संवत्सर निश्चित ॥ याच प्रकारें लोटला ॥९९॥
ब्रह्मा मनीं वाहे अभिमान ॥ म्हणे आतां गोकुळ पाहूं जाऊन ॥ काय करीत असे कृष्ण ॥ गोपवत्सांविण तो ॥२००॥
ब्रह्मा गुप्तरुपें पाहे ॥ तों पूर्ववत बैसला आहे ॥ शिदोरी वांटीत लवलाहें ॥ गोपाळांसी निजकरें ॥१॥
पांचां वर्षांची मूर्ती ॥ आकर्ण नेत्र विराजती ॥ कंठीं मुक्तमाळा डोलती ॥ पदकें झळकती अतितेजें ॥२॥
चिमणाच कांसे पीतांबर पिंवळा ॥ दशांगुलीं मुद्रिका वेल्हाळा ॥ चिमणी झळके कटीं मेखळा ॥नेपुरें खळखळां वाजती ॥३॥
असो गोपाळ जेविती स्वानंदें ॥ गदगदां हांसती ब्रह्मानंदें ॥ त्यांच्या मुखीं ग्रास गोविंदें ॥ आपुल्या हस्तें घालिजे ॥४॥
तों गडी म्हणती नारायणा ॥ वत्सें दूर गेलीं कानना ॥ तुझीच पाळी मनमोहना ॥ लौकर घेऊनि येइंजे ॥५॥
ब्रह्मा गुप्तरुपें पाहे अवलोकुनी ॥ म्हणे अगाध श्रीहरीची करणी ॥ अभिमान होता माझें मनीं ॥ सृष्टिकर्ता मीच असें ॥६॥
महा अद्‌भुत वर्तलें ॥ दों ठायीं वत्सें आणि गोवळे ॥ सत्यलोकीं आपण नेले ॥ ते तों संचले तैसेची ॥७॥
हा होय माझा जनिता ॥ आदिमायेचा निजभर्ता ॥ जो अनंतब्रह्मांडकर्ता ॥ करुन अकर्ता तोचि हा ॥८॥
तों इकडे कैवल्यदानी ॥ वत्सें शोधीत हिंडे वनीं ॥ दध्योदन करीं घेऊनी ॥ ग्रास वदनीं घालीतसे ॥९॥
शिरीं मयूरपिच्छें साजिरीं ॥ घोंगडी शोभे खांद्यावरी ॥ वनीं हिंडे पूतनारी ॥ अति तांतडी चहूंकडे ॥११०॥
काखेसी शिंग वेत्र ॥ जो मायालाघवी राजीवनेत्र ॥ हांसतसे श्रीधर ॥ ग्रास घेत हिंडतसे ॥११॥
ऐसें देखोनि विधाता ॥ म्हणे हा क्षीराब्धिशायी माझा पिता ॥ ज्याचा महिमा वर्णितां ॥ वेदशास्त्रां अतर्क्य ॥१२॥
याच्या नाभिकमळीं जन्मलों ॥ दिव्य सहस्त्र वर्षें मी श्रमलों ॥ कमलनालामाजी उतरलों ॥ जाचावलों बहुत मी ॥१३॥
मग अत्यंत निर्बुजोनी ॥ कमलावरी बैसलों येऊनी ॥ मग या जगद्‌गुरुनें तेच क्षणीं ॥ दिव्यज्ञान उपदेशिलें ॥१४॥
म्यां हरिस्वरुप नेणोनियां ॥ गेलों वत्स गोप घेऊनियां ॥ आतां शरण रिघावें याच्या पायां ॥ प्रेमभावें अनन्य ॥१५॥
निरंजनीं सांपडला श्रीधर ॥ समोर येऊनि चतुर्वक्‍त्र ॥ साष्टांग घातला नमस्कार ॥ प्रेमें अंतर सद्गदित ॥१६॥
जैसा कनकदंड पृथ्वीवरी ॥ हरिचरणीं शिरें ठेविलीं चारी ॥ नेत्रोदकें अभिषेक करी ॥ अष्टभाव उमटले ॥१७॥मागुती करी प्रदक्षिणा ॥ वारंवार घाली लोटांगणा ॥ सवेंचि उठोनि विलोकी ध्याना ॥ तों दहींभातें वदन माखलेंसे ॥१८॥
मग जोडोनि दोन्ही कर ॥ स्तविता जाहला चतुर्वक्त्र ॥ म्हणे जय जय जगदुद्धार ॥ निर्विकार निर्गुण तूं ॥१९॥
नमो महामाया आदिकारणा ॥ अज अजिता विश्वभूषणा ॥ पुराणपुरुषा जगन्मोहना ॥ गुणागुणातीत तूं ॥२२०॥
जय जय नागेंद्रदेहशयना ॥ कमलपत्राक्षा विश्वपालना ॥ परात्परा शुद्धनिरंजना ॥ भवमोचना भवहृदया ॥२१॥
जय जय कृष्णा करुणार्णवा ॥ हे केशवा देवाधिदेवा ॥ हे नारायणा अपारवैभवा ॥ हे माधवा गोविंदा ॥२२॥
हे विष्णो मधुप्राणहरणा ॥ हे त्रिविक्रमा बलिबंधना ॥ हे श्रीधरा हृत्पद्मशयना ॥ पद्मनाभा परेशा ॥२३॥
हे दामोदरा संकर्षणा ॥ हे वासुदेवा विश्वरक्षणा ॥ हे प्रद्युम्नजनका मनमोहना ॥ हे अनिरुद्धा अधोक्षजा ॥२४॥
हे पुरुषोत्तमा नरहरे ॥ हे अच्युत जनार्दन मुरारे॥ हे उपेंद्र मधुंकैटभारे ॥ हे पूतनारे श्रीकृष्णा ॥२५॥
हे कृष्णा सजलजलदवर्णा ॥ हे कृष्णा अमलनवपंकजलोचना ॥ हे कृष्णा इंदिरामनरंजना ॥ हे भक्तरक्षका यादवेंद्रा ॥२६॥
हे कृष्णा ब्रह्मानंदमूर्ति ॥ हे कृष्णा अनंतकल्याण अनंतकीर्ति ॥ हें कृष्णा जगद्‌भूषण जगत्पति ॥ अतर्क्य गति वेदशास्त्रां ॥२७॥
हे कृष्णा परममंगलधामा ॥ हे कृष्णा मृडमानसविश्रामा ॥ हे कृष्णा जलजनाभा अनामा ॥ सकलकामातीत तूं ॥२८॥
अपराध आचरे बालक ॥ परी क्षमा करी निजजनक ॥ भुवनसुंदर लक्ष्मीनायक ॥ सुखदायक सकळांतें ॥२९॥
सर्व अपराध तूं क्षमा करीं ॥ पीतवसना असुरारी ॥ माझिये मस्तकीं श्रीहरी ॥ वरदहस्त ठेवीं तुझा पैं ॥२३०॥
पुढती घाली लोटांगण ॥ सप्रेम धरिले कृष्णचरण ॥ याउपरी नंदनंदन ॥ व्रजभूषण काय बोले ॥३१॥
ऊठ ऊठ चतुरानना ॥ सोडोनि देहबुद्धि अभिमाना ॥ आपुल्या स्वस्वरुपस्मरणा- माजी विलसें सर्वदा ॥३२॥
ऐसें बोलतां जगज्जीवन ॥ सत्वर उठला कमलासन ॥ कृष्णें दृढ हृदयीं आलिंगून ॥ करी समाधान तयाचें ॥३३॥
मनमोहन पूतनारी ॥ कृष्ण हस्त ठेवी त्याचें शिरीं ॥ विरिंचि तृप्त झाला अंतरीं ॥ सुखसमुद्रीं निमग्‍न ॥३४॥
वत्सें गोप हरि झाला होता ॥ सादर विलोकी जों विधाता ॥ तंव त्या कृष्णमूर्ति तत्त्वतां ॥ पाहतां जाहला तन्मय ॥३५॥
लक्षानुलक्ष कृष्णमूर्ती ॥ शंखचक्रादि आयुधें हातीं ॥ श्रीवत्सादि चिन्हें झळकती ॥ श्रीनिकेतनासमवेत ॥३६॥
श्रृंग वेत्र पांवे पायतण ॥ सर्व स्वरुपें नटला नारायण ॥ असंख्य मूर्ती घनश्यामवर्ण ॥ दुसरेपण दिसेना ॥३७॥
असंख्य नाभिकमलें विराजमान ॥ तेथें असंख्य विरिंचि शिव सहस्त्रनयन ॥ चंद्र सूर्य कुबेर वरुण ॥ सृष्टि संपूर्ण चालविती ॥३८॥
कमलाप्रति भिन्न भिन्न ब्रह्मांड ॥ चित्रविचित्र परम प्रचंड ॥ वैकुंठ कैलासादि उदंड ॥ पदें दिसती कमलाप्रति ॥३९॥
समाधिस्थ झाला विधाता ॥ अहंकृति गेली पाहतां पाहतां ॥ वाचा राहिली बोलतां ॥ वृत्ती समस्त निमाल्या ॥२४०॥
मुख्य मूर्तिं त्यांत कोण ॥ न दिसे कांहीं दुजेपण ॥ वृंदावनींचे द्रुम पाषाण ॥ श्वापदें कृष्णरुप दिसतीं पैं ॥४१॥
भू आप तेज वात नभ ॥ दिसती कृष्णरुप स्वयंभ ॥ सरिता सिंधु चराचर सुप्रभ ॥ श्रीवल्लभरुप दिसताती ॥४२॥
हरली सकल अहंकृति ॥ अनंत ब्रह्मांडें अनंत कीर्ति ॥ अनंत वेद अनंत शास्त्ररीति ॥ कीर्ति गाती अनंत ॥४३॥
अनंत पुराण अनंत कला ॥ अनंत अवतार अनंत लीला ॥ अनंत स्वरुपें आपण नटला ॥ दावी तो सोहळा विधातया ॥४४॥
बहुत आकृती नाना याती ॥ स्त्री पुरुष नपुंसक व्यक्ती ॥ अवघा ओतला वैकुंठपती ॥ नाहीं स्थिति दूसरी ॥४५॥
विराट हिरण्यगर्भ महत्तत्त्व जाण ॥ न दिसे स्थूल लिंग कारण ॥ न चले तर्काचें विंदाण ॥ अवघा जगज्जीवन ओतला ॥४६॥
जागृति स्वप्न सुषुप्ति तुर्या ॥ अवस्था गेल्या हरोनियां ॥ सृष्टिस्थितिप्रलयसर्वसाक्षिणीया ॥ न उरे माया समूळीं ॥४७॥
विश्व तेजस प्राज्ञ प्रत्यगात्मा ॥ ब्रह्मा विष्णुरुद्र परमात्मा ॥ अवघा एक जगदात्मा ॥ नामानामातीत जो ॥४८॥
अकार उकार मकार ॥ चवथा अर्धमात्रा ओंकार ॥ रजतमसत्त्वविकार ॥ सर्व यादवेंद्र ओतला ॥४९॥
वैखरी मध्यमा पश्यंती परा ॥ वाचा खुंटल्या नयनीं धारा ॥ पाहतां ब्रह्मानंदा उदारा ॥ ब्रह्मा जाहला समाधिस्थ ॥२५०॥
अवस्था जिरवूनि पोटीं ॥ नेत्र उघडोनि पाहे परमेष्ठी ॥ तों श्वापदें सर्व सृष्टीं ॥ निर्वैर तेथें खेळती ॥५१॥
गाई व्याघ्र निर्वैर देख ॥ खेळे नकुळ दंदशूक ॥ वारण मृगेंद्र होती एक ॥ हरिप्रतापेंकरुनि ॥५२॥
पुढती ब्रह्मा घाली लोटांगण ॥ म्हणे धन्य धन्य आजि जाहलों पूर्ण ॥ काय करुं ब्रह्मपद घेऊन ॥ सदा राहों वृंदावनीं ॥५३॥
पदाभिमानें आम्ही नाडलों ॥ निजस्वरुपा विसरलों ॥ कामक्रोधचोरीं नागवलों ॥ अंतरलों हरिपायां ॥५४॥
नाहीं आमुची आत्मशुद्धी ॥ दृढ धरिली देहबुध्दी ॥ वेष्टित सदा आधिव्याधी ॥ आत्मशुद्धि कैंची मग ॥५५॥
सांडूनि सकल अभिमान ॥ होऊनि वृंदावनीं तृणपाषाण ॥ तेथें लगती कृष्णचरण ॥ तेणें उद्धरोन जाऊं आम्ही ॥५६॥
विधिजाहला निरभिमान ॥ मग बोले जगत्पालन ॥ म्हणे निजपदीं राहें सावधान ॥ दुरभिमान टाकूनियां ॥५७॥
ब्रह्मा करी प्रदक्षिणा ॥ पुढती मिठी घाली चरणा ॥ आज्ञा मागोनि रमाजीवना ॥ निजस्थाना विधि गेला ॥५८॥
गोपवत्सें जी चोरुनि नेलीं ॥ तीं अवघीं सोडूनि दिधलीं ॥ कृष्णें आपुली रचना झांकिली ॥ आपणामाजी सत्वर ॥५९॥
वत्सें गोप ब्रह्मयानें नेलें ॥ मागुती फिरोन आणिले ॥ परी हें चरित्र कोणास न कळे ॥ हरीवांचोनि सर्वथा ॥२६०॥
विधीनें पूर्वीं गोपाळ नेले होते ॥ तैसेचि मागुती बैसविले तेथें ॥ कृष्ण घेऊनि वत्सांतें ॥ सत्वर आला त्यांजवळी ॥६१॥
एक संवत्सरपर्यंत ॥ नेले होते गोप समस्त ॥ परी हरिमाया अद्‌भुत ॥ न कळे चरित्र तयांसी ॥६२॥
गडी म्हणती श्रीहरी ॥ लौकर येईं तूं पूतनारी ॥ आम्ही ग्रास घेऊनि निजकरीं ॥ वाट तुझी पाहतों ॥६३॥
गदगदां हरि हांसला ॥ त्यांमाजी येऊनि बैसला ॥ तों वासरमणी अस्ता गेला ॥ सत्वर परतला गोकुळा ॥६४॥
वत्सें आणि गोवळे ॥ जाती परम उल्लाळें ॥ बळिरामासी कांहीं न कळे ॥ हरीनें केलें चरित्र जें ॥६५॥
कृष्णमुखाकडे पाहे बळिराम ॥ तों ईषद्धास्य मेघश्याम ॥ गुज कळोनि सप्रेम ॥ बळिभद्र तेव्हां जाहला ॥६६॥
गोवर्धनीं ज्या गाई चरती ॥ त्या ओरसा येऊनि वत्सें चाटिती ॥ गौळी गोकुळींचे धांवती ॥ हृदयीं धरिती बाळकांतें ॥६७॥
तें कौतुक पाहोन ॥ हांसती शेषनारायण ॥ शचीरमणा न कळे ही खूण ॥ इतर कोठून जाणती ॥६८॥
थोर दाविलें कौतुक ॥ विरिंचि पोटींचें बालक ॥ त्यासी कृपेनें वैकुंठपालक ॥ रमानायक बोलिला ॥६९॥
दिधलें अद्‌भुत दर्शन ॥ हरिला सकळ अभिमान ॥ गोकुळींचें सर्व जन ॥ ब्रह्मानंदें डुलती ॥२७०॥
आरत्या घेऊनि गोपिका ॥ सामोर्‍या येती त्रिभुवननायका ॥ निजमंदिरा आला भक्तसखा ॥ यशोदा माता आलिंगी ॥७१॥
केलें जेव्हां वत्सहरण ॥ तेव्हां पांच वर्षांचा श्रीकृष्ण ॥ पुढिले अध्यायीं कालियामर्दन ॥ सावधान परिसावें ॥७२॥
गोकुळीं अवतरला यादवेंद्र ॥ तोचि पंढरीं ठेऊनि कटीं कर ॥ भीमातीरीं दिगंबर ॥ ब्रह्मानंद उभा असे ॥७३॥
हरिविजयग्रंथ वरिष्ठ ॥ हेंचि षड्रसअन्नें भरिलें ताट ॥ ज्यांसी भक्तिक्षुधा उत्कट ॥ तेचि जेविती प्रीतीनें ॥७४॥
जे निंदक रोगिष्ठ सहजीं ॥ कुटिलता कुपित्त उदरामाजी ॥ परम दुरात्मे भक्तकाजीं ॥ देह कदा रुळेना ॥७५॥
ऐसे अभक्त क्षयरोगी जाण ॥ त्यांस न जिरे हें अन्न ॥ असो क्षुधार्थी जे भक्तजन ॥ त्यांहींच भोजन करावें ॥७६॥
जो आनंदसंप्रदायभूषण ॥ तो ब्रह्मानंद यतिराज पूर्ण ॥ श्रीधर तयासी अनन्य शरण ॥ जैसें लवण सागरीं ॥७७॥

इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ श्रोते चतुर परिसोत ॥ दशमाध्याय गोड हा ॥२७८॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥अध्याय॥१०॥ ॥ओंव्या॥२७८॥