श्रीगणेशाय नमः ॥
जय जय यादवकुळदीपका ॥ त्रिभुवनजनहृदयप्रकाशका ॥ अंतःकरणचतुष्टयचाळका ॥ दारुकायंत्रन्यायेंसीं ॥१॥
आम्ही जग आणि तूं जगदीश्वर ॥ नाहीं द्वैतभेदविकार ॥ तूंचि नटलासी चराचर ॥ कनककटकन्यायेंसीं ॥२॥
मित्र आणि रश्मी देख ॥ स्फुलिंग आणि दाहक ॥ तैसा तूं सर्वांत श्रेष्ठ एक ॥ लोहखड्गन्यायेंसीं ॥३॥
धातु आणि पात्र ॥ तंतु आणि वस्त्र ॥ कीं तरंग आणि नीर ॥ तैसा श्रीधर व्यापक तूं ॥४॥
मधुसंहारका यादवेंद्रा ॥ मुरहरा श्रीकुचदुर्गविहारा ॥ कालियामर्दना गुणसमुद्रा ॥ ब्रह्मानंदा यतिराया ॥५॥
तुझें चरित्र तूंचि बोले ॥ यावरी गोकुळीं काय वर्तलें ॥ तें कृष्ण परब्रह्म सांवळे ॥ अवतरलें प्रत्यक्ष भक्तकाजा ॥६॥
एकादश अध्यायाचें कथन ॥ केलें दुर्धर कलियामर्दन ॥ द्वादश गांवें महा अग्न ॥ हरि प्राशून अक्षयी ॥७॥
प्रातःकाळीं एके दिनीं ॥ हरिसमीप येऊनि नंदराणी ॥ कोमल हस्तेंकरुनी ॥ थापटोनि उठवीत ॥८॥
उठीं उठीं माझे आई ॥ सांवळे राजसे कृष्णाबाई ॥ राजीवनेत्रा वदन धुईं ॥ वना जाईं राजसा ॥९॥
उदया आला चंडकिरण ॥ ताटीं वाढिलें दध्योदन ॥ वना जाईं जेवून ॥ गाई घेऊन कान्हया ॥१०॥
मायालाघवी ते समयीं ॥ उठूनियां देई जांभई ॥ मातेनें धरिला हृदयीं ॥ वदन चुंबी प्रीतीनें ॥११॥
इंद्रादिकां दृष्टी न पडती चरण ॥ त्याचें यशोदा धूतसे वदन ॥ कपाळीं रेखिला चंदन ॥ उटी दिधली सर्वांगीं ॥१२॥
ऐसा पूजिला यादवेंद्र ॥ तैसाचि रोहिणीनें अर्चिला बळिभद्र ॥ पदकें माळा परिकर ॥ दोघां कंठीं शोभती ॥१३॥
प्रत्यक्ष ते शेषनारायण ॥ बाहेर आले जेवून ॥ मुरली वाजवितां चहूंकडोन ॥ गाई गोप मिळाले ॥१४॥
तंव गौळी मिळाले असंख्यात ॥ नंद त्यांसीं विचार करीत ॥ म्हणती पूजावा शचीनाथ ॥ मेघ समस्त त्याहातीं ॥१५॥
करावा जी महायज्ञ ॥ तें ऐकूनि जगन्मोहन ॥ नंदास पुसे नारायण ॥ हास्यवदन करुनियां ॥१६॥
कासयाचा करितां विचार ॥ पूजासामग्री मेळविली अपार ॥ नंद म्हणे सहस्त्रनेत्र ॥ प्रतिवर्षीं पूजितसों ॥१७॥
तो मेघवृष्टि करी धरणीं ॥ तेणें वांचती सर्व प्राणी ॥ तृण जीवन गाईंलागुनी ॥ यथेष्ट अवनीं होतसे ॥१८॥
अष्टादश धान्यें षड्रस ॥ तेणेंचि होती बहुवस ॥ इंद्राहूनि विशेष ॥ श्रेष्ठ नसे दूसरा ॥१९॥
पुराणपुरुष गोकुळीं अवतरला ॥ तंव पाकशासनें गर्व केला ॥ अहंपणेंचि व्यापिला ॥ दंभअहंकारेंकरुनियां ॥२०॥
पांचवें वर्षीं वत्सहरण ॥ करी कमलोद्भव येऊन ॥ केलें त्याचें गर्वच्छेदन ॥ रुपें अपार दावूनियां ॥२१॥
सहावें वर्षीं कालियामर्दन ॥ सातव्यांत गोवर्धनोध्दारण ॥ सहस्त्राक्षाचें गर्वहरण ॥ याच मिषें मांडिलें ॥२२॥
असो नंदास म्हणे व्रजभूषण ॥ काय आहे इंद्राधीन ॥ आपुलाल्या कर्मेंकरुन ॥ प्राणी वर्तती संसारीं ॥२३॥
ज्यांचें पूर्वकर्म उत्तम नाहीं ॥ त्यांस आखंडल करील कायी ॥ विपरीत नव्हे कदाही ॥ ब्रह्मादिकां कर्म तें ॥२४॥
उत्तम कर्में उत्तम फळ प्राप्त ॥ तें शक्रासी नव्हे विपरीत ॥ आपुले सत्कर्म पूर्वकृत ॥ देव सत्य तोची पैं ॥२५॥
आपुलें जें दुष्कर्म ॥ त्याचेंचि नांव काळ यम ॥ सुखदुःखफळें परम ॥ कर्माकर्म भोगवी ॥२६॥
आपण जें केलें बीजारोपण ॥ तोचि अंकुर येत तरतरोन ॥ तैसें आपुलाल्या कर्मेकरुन ॥ जन्ममरण प्राणियां ॥२७॥
आपुल्याचि पूर्वकर्मेंकरुनी ॥ इंद्र आरुढला राज्यासनीं ॥ कर्म ब्रह्मादिकांलागोनी ॥ न सुटेचि निर्धारें ॥२८॥
तरी एक ऐका सत्य वचन ॥ पूजा गाई आणि ब्राह्मण ॥ हेचि सामग्री नेऊन ॥ अर्चा गोवर्धन प्रीतीनें ॥२९॥
आमुच्या गाई तेथें चरती ॥ तरी तो पर्वत पूजावा निश्चितीं ॥ बुध्दीचा चालक श्रीपती ॥ मानलें चित्तीं सर्वांच्या ॥३०॥
कुटुंबासहित गौळी निघाले ॥ लक्षानुलक्ष गाडे भरिले ॥ नंदराणी तये वेळे ॥ निघे सकळ स्त्रियांसह ॥३१॥
वत्सांसमवेत गोभार ॥ त्याचि पंथें जाती समग्र ॥ नंद निघाला सत्वर ॥ करीत गजर वाद्यांचा ॥३२॥
पुढें जाती गोभार ॥ मागें गोपाळांसमवेत श्रीधर ॥ त्यामागें शकट समग्र ॥ वरी बैसल्या गौळिणी ॥३३॥
कीं त्या उतरल्या देवांगना ॥ किंवा आल्या नागकन्या ॥ तैशा त्या खंजरीटनयना ॥ मिरवत जाती उल्हासें ॥३४॥
दधि घृत नवनीत ॥ अन्नांचे गाडे भरले समस्त ॥ तों मूर्तिमंत गोवर्धन दिसत ॥ कृष्ण दावीत सर्वांसी ॥३५॥
सकळांनीं गोवर्धन पूजिला ॥ अन्नांचा पर्वत पुढें केला ॥ आपुल्या हातें ते वेळां ॥ गोवर्धन जेवीतसे ॥३६॥
विशाळ पुरुष बैसला ॥ गौळियां विस्मय वाटला ॥ कोणास न कळे हरिलीला ॥ आपणचि नटला स्वरुप तें ॥३७॥
सर्वांसी म्हणे मनमोहन ॥ पहा कैसा जेवी गोवर्धन ॥ तुम्ही उगेंचि अन्नें जाळून ॥ व्यर्थ यज्ञ करीतसां ॥३८॥
याउपरी गाईंची पूजा करिती ॥ सकळ जन भोजनें सारिती ॥ सुगंध चंदन चर्चिती ॥ गौळी एकमेकांतें ॥३९॥
किंचित उरला दिनमणी ॥ मग बोले चक्रपाणी ॥ आतां गोवर्धनासी प्रदक्षिणा करुनी ॥ मग गोकुळा चलावे ॥४०॥
सिद्ध झाले सकळ जन ॥ शकटावरी आरोहण करुन ॥ गोपाळ गाई आदिकरुन ॥ करिती प्रदक्षिणा समग्र ॥४१॥
कृष्णास मध्यें वेष्टून ॥ गोप करिताती कीर्तन ॥ तो उत्साह देखोन ॥ मनीं क्षोभला सहस्त्राक्ष ॥४२॥
प्रळयमेघांच्या तोडिल्या श्रृंखळा ॥ तयांसी आज्ञा देत ते वेळां ॥ म्हणे वर्षोनियां चंडशिळा ॥ सर्वही मारा व्रजवासी ॥४३॥
गौळी माजले समस्त ॥ मज न लेखिती उन्मत्त ॥ करावा समस्तांचा घात ॥ कृष्णासमवेत आतांचि ॥४४॥
तामसगुणें इंद्र वेष्टिला ॥ हरीचा प्रताप नेणवेचि त्याला ॥ असंभाव्य मेघ वोळला ॥ एकाएकीं चहूंकडे ॥४५॥
हस्तिशुंडेऐशा धारा ॥ नभींहूनि सुटल्या सैरावैरा ॥ त्यांत वर्षों लागल्या चंडधारा ॥ पडती अनिवारा सौदामिनी ॥४६॥
चहूंकडोनि पूर चालिले तुंबळ ॥ बुडालें न दिसे कोठें गोकुळ ॥ जैसे समुद्रांत पडले ढेकूळ ॥ मग ते कोठें पहावें ॥४७॥
थरथरां कांपती सर्व जन ॥ गारा मस्तकावरी पडती येऊन ॥ गौळिणी बाळांसी पोटीं धरुन ॥ आक्रंदती तेधवां ॥४८॥
कडकडोनि वर्षती चपला ॥ महाप्रळय गौळियां ओढवला ॥ मग दीन वदनें ते वेळां ॥ धांवा मांडिला सकळांनीं ॥४९॥
आक्रोशें एक फोडिती हांका ॥ हे दीनबंधो वैकुंठपालका ॥ हे अनाथनाथा जगदुद्धारका ॥ ब्रीदें आपुलीं सांभाळीं ॥५०॥
इंद्रें मांडिला प्रळय फार ॥ तूं जरी न धांवसी श्रीकरधर ॥ तुझे कृपेचें निकेतन थोर ॥ करुनि आम्हां रक्षीं कां ॥५१॥
कोठें ठाव नाहीं लपावया ॥ धांव धांव भक्तकैवारिया ॥ गाईंच्या कांसे रिघोनियां ॥ वत्सें लपती पोटांतळीं ॥५२॥
नंद यशोदा गौळिणी सवेग ॥ वरी टाकूनि आपुलें अंग ॥ तळीं आच्छादिती श्रीरंग ॥ रक्षिती भवभंग जगद्गुरु ॥५३॥
अनंत ब्रह्मांडांचें पांघरुण ॥ जो मायाचक्रचाळक निरंजन ॥ त्यास निजांगाखालीं घालून ॥ गौळीजन झांकिती ॥५४॥
यशोदा करी रुदना ॥ कैसे वांचवूं जगज्जीवना ॥ मग तो वैकुंठीचा राणा ॥ काय करिता जाहला ॥५५॥
जो इंद्राचा इंद्र तत्त्वतां ॥ जो हरविधींसी निर्माणकर्ता ॥ जो प्रळयकाळीं शास्ता ॥ तो गौळियां नौंभीं म्हणतसे ॥५६॥
निजभक्तकैवारें ते वेळां ॥ धांवोनि गोवर्धन उचलिला ॥ गौळियांसी म्हणे सांवळा ॥ तळीं या रे सर्वही ॥५७॥
गोवर्धनाखालीं समग्र ॥ आले नरनारी गोभार ॥ पर्वत रुंदावला थोर ॥ जीव समग्र झांकिले ॥५८॥
अद्भुत हरीची करणी ॥ जीवनावरी धरिली धरणी ॥ शेषकूर्मादिकांलागोनि ॥ चक्रपाणी आधार ॥५९॥
उभाविला ब्रह्मांडाचा डेरा ॥ स्तंभ न तेचि अंबरा ॥ उडुगण मित्र रोहिणीवरा ॥ वायुचक्री चालवी ॥६०॥
भू आप अनल अनिल निराळ ॥ यांसी परस्पर वैर केवळ ॥ ते मित्रत्वें वर्तत्वें वर्तती सकळ ॥ श्रीघननीळप्रतापें ॥६१॥
सप्तावरण हें ब्रह्मांड ॥ माजीं सांठवले सकळ पिंड ॥ ऐशा ब्रह्मांडभरी उदंड ॥ रची प्रचंड माया याची ॥६२॥
द्वादश गांवें अग्नि गिळिला ॥ महाविखार कालिया मर्दिला ॥ पूतना शोषिली अवलीला ॥ तेणें उचलिला गोवर्धन ॥६३॥
गोवर्धनाखालीं सकळ लोक ॥ निवांत राहिले पावले सुख ॥ मग तो निजजनप्राणरक्षक ॥ वचन काय बोलिला ॥६४॥
म्हणे भार बहुत मज झाला ॥ अवघे मिळोनि पर्वत ॥ तंव धांविन्नला गौळियांचा मेळा ॥ स्थळीं स्थळीं उचलिती ॥६५॥
एक मस्तकें उचलोनि देती ॥ एक डांगा मुसळे उभारिती ॥ मध्यें सप्त वर्षांची मूर्ति ॥ अगाध कीर्ति जयाची ॥६६॥
गौळी बळें बहु उचलिती ॥ स्वेदपूर सर्वांगें जाती ॥ कष्टें श्वासोच्छ्वास टाकिती ॥ हरीस बोलती तेधवां ॥६७॥
आम्ही उचलिलें चंड पर्वता ॥ तुवां करांगुळी लाविली वृथा ॥ आम्ही कासावीस समस्त होतां ॥ तूं हांसतोसी गदगदां ॥६८॥
तुझी घाई जाणूं आम्ही वनमाळी ॥ लटकीचि लाविली त्वां करांगुळी ॥ चोरी करुनि आळी ॥ अम्हांवरी घालिसी ॥६९॥
शिदोर्या आमुच्या चोरुनि खासी ॥ पर्वत उचलावया कां भितोसी ॥ नवनीताचे गोळे तूंचि गिळिसी ॥ आतां कां होसी माघारा ॥७०॥
वत्सें वळावया धाडिसी आम्हां ॥ मागें शिदोर्या भक्षिसी पुरुषोत्तमा ॥ व्यर्थ करांगुळी मेघश्यामा ॥ कासया त्वां लाविली ॥७१॥
मग बोले वनमाळी ॥ मी काढूं काय अंगुळी ॥ महिमा नेणोनि गौळी ॥ काढीं काढीं म्हणती आतां ॥७२॥
दाखवावया चमत्कार ॥ अंगुळी ढिलाविली अणुमात्र ॥ तंव तो पर्वत समग्र ॥ एकाएकीं करकरिला ॥७३॥
दडपतांचि गोवर्धन ॥ हांक फोडिती गौळीजन ॥ हरि उचलीं वेगेंकरुन ॥ आम्ही दीन तुझे पैं ॥७४॥
पर्वत उचलीं रे दयाळा ॥ भक्तवरदायका तमालनीळा ॥ ब्रह्मानंदा अतिनिर्मळा ॥ उचलीं ये वेळा पर्वत ॥७५॥
अद्भुत न कळे तुझी करणी ॥ लिहितां न पुरे मेदिनी ॥ वेदशास्त्री पुराणीं ॥ नव जाय कीर्ति वर्णितां ॥७६॥
आम्ही म्हणों नंदाचा किशोर ॥ परी करणी ब्रह्मांडाहूनि थोर ॥ तूं जगदात्मा निर्विकार ॥ प्रत्यया आलासी आम्हांतें ॥७७॥
द्वादश गांवें गिळिला अग्न ॥ मूर्ख आम्ही नेणों महिमान ॥ इंद्रादि देव समस्त गण ॥ आज्ञाधारक तुझे पैं ॥७८॥
ऐसें वदती गौळीजन ॥ ऐकोनि संतोषे पद्माक्षीरमण ॥ सव्य करांगुलीकरुन ॥ गोवर्धन उचलिला ॥७९॥
उचलोनि दिधली अंगुळी ॥ कृष्ण म्हणे तुम्ही रहावें सकळीं ॥ अवघेचि बैसोनि भूतळीं ॥ ऊर्ध्ववदनें विलोकावें ॥८०॥
सहस्त्रशीर्षाचिये शक्ती ॥ सर्षपप्राय वाटे क्षिती ॥ क्षितिधरशयनें तेचि रीतीं ॥ क्षितिधर धरियेला ॥८१॥
कीं पूर्वीं निरालोद्भवनंदन ॥ करतळीं धरुनि आणी द्रोण ॥ व्रजभूषणें तेंचि रीतीं जाण ॥ नगोत्तम धरिलासे ॥८२॥
कीं अंडजप्रभु सुधारसघट नेतां ॥ क्लेश न मानीच तत्त्वतां ॥ कीं लीलाकमळ हातीं धरितां ॥ खेद चित्ता न वाटे ॥८३॥
जो सप्त धातूंविरहित ॥ जो सप्तवर्षी जगन्नाथ ॥ तो सप्तस दिन सप्त रात्रपर्यंत ॥ उभा तिष्ठत भक्तकाजा ॥८४॥
मूर्ति पाहतां दिसे लहान ॥ पुरुषार्थें भरलें त्रिभुवन ॥ चिमणाच दिसे चंडकिरण ॥ परी प्रभा पूर्ण चराचरीं ॥८५॥
घटीं जन्मला अगस्ती ॥ पाहतां धाकुटी दिसे आकृती ॥ आचमन करुनि अपांपती ॥ हृदयामाजी सांठविला ॥८६॥
वामनरुप चिमणें भासलें ॥ परी दोन पाद ब्रह्मांड केलें ॥ तेवीं नंदात्मजें आजी केलें ॥ गोवर्धन उचलोनि ॥८७॥
असो अद्भुत प्रताप देखोनी ॥ अश्रु वाहती गौळियांचे नयनीं ॥ उर्ध्व वदनें करुनी ॥ कृष्णवदन विलोकिती ॥८८॥
अद्भुत प्रताप देखोन ॥ यशोदा आली धांवोन ॥ कंठीं मिठी घालोन ॥ कृष्णवदन पाहतसे ॥८९॥
बा रे तुजवरुन ओंवाळूनियां ॥ सांडीन आतां माझी काया ॥ मी तुझी म्हणवितें माया ॥ लाज वाटे सर्वेशा ॥९०॥
तूं माझी जनकजननी ॥ मी उद्धरलें तुझे गुणीं ॥ अश्रु वाहती नंदाचे नयनीं ॥ म्हणे त्रिभुवनीं धन्य मी ॥९१॥
यशोदा आणि रोहिणी ॥ निंबलोण उतरिती हरीवरुनी ॥ सकळ गोपिका लागती चरणीं ॥ धन्य करणी दाविली ॥९२॥
आपुल्या कुरळ केशेंकरुन ॥ झाडिती श्रीहरीचे चरण ॥ एकीं चरणीं भाळ ठेवून ॥ आंसुवें पाय धुतले ॥९३॥
असो सात दिवस अखंडगती ॥ जलद शिलावृष्टि करिती ॥ मनीं भावित निर्जरपती ॥ गौळी निश्चितीं सर्व मेले ॥९४॥
अमरेंद्र म्हणे मेघांतें ॥ पुरे करा रे आतां वृष्टीतें ॥ तत्काळ उघडलें तेथें ॥ शुद्ध जाहलें नभोमंडल ॥९५॥
कीं गुरुकृपें प्रकटतां ज्ञान ॥ तेव्हांचि अज्ञान जाय निरसोन ॥ तैसाचि उगवला सहस्त्रकिरण ॥ गौळीजन सुखावती ॥९६॥
सकळांसी म्हणे कैटभारी ॥ निघा आतां वेगें बाहेरी ॥ क्षण न लागतां ते अवसरीं ॥ व्रजजन सर्व निघाले ॥९७॥
खालीं ठेवूनि गोवर्धन ॥ सकळांसी भेटे जगज्जीवन ॥ गौळी सद्गद प्रेमेकरुन ॥ म्हणती ब्रह्म हेंचि खरें ॥९८॥
श्रीकृष्णाची स्तुति करीत ॥ गोकुळा आले जन समस्त ॥ तंव गोकुळ तैसेंचि संचलेम स्वस्थ ॥ नाहीं विपरीत कोठेंही ॥९९॥
विमानीं पाहे पुरंदर ॥ तों गोकुळ गजबजिलें समग्र ॥ गाई गोपाळ सर्वत्र ॥ अतिआनंदें क्रीडती ॥१००॥
आपण जे अपाय केले ॥ ते सर्वही व्यर्थ गेले ॥ जैसे उदकातें घुसळिले ॥ तक्र ना नवनीत कांहींच ॥१॥
मनीं विचारी वज्रधर ॥ म्हणे श्रीकृष्ण पूर्णब्रह्मावतार ॥ पडलें मजपासून अंतर ॥ जगद्गुरु क्षोभविला ॥२॥
असंख्य ब्रह्मांडें असंख्य शक्र ॥ क्षणें निर्मील मायाचक्र ॥ तो क्षोभला जगदुद्धार ॥ कैसा विचार करुं आतां ॥३॥
ज्या श्रीहरीचें म्यां करावें पूजन ॥ त्यावरी उचलोनि घातले पाषाण ॥ बुडालों अभिमान धरोन ॥ आतां शरण जाईन त्यातें ॥४॥
दिव्य सुमनें पूजिजे गोपाळा ॥ त्यावरी धाडिल्या प्रलयचपळा ॥ तनुमनधनेंसीं या वेळा ॥ शरण घननीळा जाईन ॥५॥
अहंकारें बहु माजलों ॥ चित्स्वरुपासी अंतरलों ॥ विपरीतज्ञानें उन्मत्त झालों ॥ विसरलों जगदात्भया ॥६॥
दिसती नाना विकार भेद ॥ तेणें अंतरला ब्रह्मानंद ॥ हृदयीं ठसावेना बोध ॥ न लागे वेध हरिपायीं ॥७॥
वित्तआशा न सोडी चित्त ॥ योषितांसंगें सदा उन्मत्त ॥ हा खेद कांहीं न वाटे मनांत ॥ तरी अनंत अंतरला ॥८॥
जैसें कां पिशाच श्वान ॥ तैसें चित्त गेलें भ्रमोन ॥ न धरी क्षमा दया मौन ॥ द्वेषेंकरुन वेष्टिलें ॥९॥
धरितां योग्यता अभिमान ॥ सत्संग नावडे मनांतून ॥ चित्त उठे कुतर्क घेऊन ॥ तरी हरिचरण अंतरले ॥११०॥
चित्त न बैसे सदा भक्तीं ॥ कैंची तितिक्षा उपरति विरक्ती ॥ ऐसा अनुतापें अमरपती ॥ सद्गद चित्तीं जाहला ॥११॥
ब्रह्मा ऋषि भृगु देवगण ॥ तुंबर मरुद्गण ॥ संगें घेऊनि शचीरमण ॥ चालिला शरण श्रीकृष्णा ॥१२॥
अष्टवसु अष्टविनायका ॥ किन्नर गंधर्व गाती देखा ॥ वाजत वाद्यांचा धडाका ॥ चतुर्विध प्रकारें ॥१३॥
जाहली विमानांची दाटी ॥ व्रजासमीप उतरे भूतळवटीं ॥ तों गाई चारीत जगजेठी ॥ गोपांसमवेत आनंदें ॥१४॥
देखोनियां पुराणपुरुषा ॥ कनकदंड पडे जैसा ॥ साष्टांग पृथ्वीवरी तैसा ॥ इंद्रें घातला नमस्कार ॥१५॥
इंद्र आला कृष्णासी शरण ॥ पाहावया धांवती गोकुळीं जन ॥ म्हणती हें पूर्णब्रह्म सनातन ॥ नेणों आम्ही कांहींच ॥१६॥
रत्नजडित मुकुट इंद्राचा पाहीं ॥ रुळत श्रीकृष्णाचे पायीं ॥ मग हरि बोले ते समयीं ॥ उठीं त्रिदशेश्वरा ॥१७॥
व्यर्थ पेटलासी अभिमाना ॥ कासया तूं शचीरमणा ॥ तुज हे आठवण दिधली जाणा ॥ सावध येथूनि वर्तावें ॥१८॥
स्वरुपी होऊनि सावधान ॥ करावें सृष्टिकार्य संपूर्ण ॥ क्रोध दुष्टांवरी चढवोन॥ साधुजन पाळावे ॥१९॥
संतांचा न करावा मानभंग ॥ हरि भजनीं झिजवावें अंग ॥ सांडोनि सकळ कुमार्ग ॥ सन्मार्गेंचि वर्तावें ॥१२०॥
ऋषींचे आशीर्वाद घ्यावे ॥ वर्म कोणाचें न बोलावेम ॥ विश्व हें अवघें पाहावें ॥ आत्मरुपी केवळ ॥२१॥
सत्संग धरावा आधीं ॥ न ऐकावी दुर्जनांची बुद्धी ॥ कामक्रोधादिक वादी ॥ दमवावे निजपराक्रमें ॥२२॥
मी जाहलों सज्ञान ॥ हा न धरावा अभिमान ॥ विनोदेंही परछळण ॥ न करावें कधींही ॥२३॥
शमदमादि साधनें ॥ दृढ करावीं साधकानें ॥ जन जाती जे आडवाटेनें ॥ सुमार्ग त्यांस दाविजे ॥२४॥
क्षणिक जाणोनि संसार ॥ सांडावा विषयांवरील आदर ॥ असावें गुरुवचनीं सादर ॥ चित्त सदा ठेवूनि ॥२५॥
ऐसें बोलतांचि श्रीधर ॥ उभा राहोनियां अमरेंद्र ॥ स्तवन करीत अपार ॥ सकलदेवांसमवेत ॥२६॥
हे अनंतकोटिब्रह्मांडपालका ॥ हे विश्वकारणा विश्वरक्षका ॥ हे देवाधिदेवा जगन्नायका ॥ मायातीता अगम्यां ॥२७॥
तूं क्षीरसागरविलासी ॥ अवतरलासी यादववंशीं ॥ ब्रह्मानंद अविनाशी ॥ कर्माकर्मासी वेगळां तूं ॥२८॥
अवतरलासी ज्याचें सदनीं ॥ धन्य तो नंद आणि यशोदा जननी ॥ आम्हांलागीं चक्रपाणी ॥ अवतार तुवां धरियेला ॥२९॥
चहूं मुखीं स्तवी ब्रह्मदेव ॥ पंचमुखीं वर्णी सदाशिव ॥ बृहस्पति नारदादि ऋषी सर्व ॥ अपार स्तोत्रें करिताती ॥१३०॥
शक्रें कामधेनु आणविली ते वेळे ॥ कांसेखालीं कृष्णासी बैसविलें ॥ पूर्णब्रह्म घनसांवळें ॥ सप्तवर्षी मूर्ति पैं ॥३१॥
कामधेनूच्या दुग्धधारा ॥ श्रीहरिवरी सुटल्या सैरा ॥ गोविंदनामाचा घोष अंबरा ॥ गाजविला सुरवरीं ॥३२॥
गोविंद गोविंद हें नाम ॥ सकळ नामांमाजी उत्तम ॥ देव बहुत संभ्रम ॥ या नामाचा करिताती ॥३३॥
कल्पपर्यंत प्रयागवासी ॥ मख अयुत मेरुसम सुवर्णराशी ॥ पुण्य आचरतां गोविंदनामासीं ॥ तरी तुलना नाहीं सर्वथा ॥३४॥
ऋषी वेदघोषें गर्जती ॥ किन्नर गंधर्व आनंदें गाती ॥ अष्टविनायका नृत्य करिती ॥ प्रेमें डुल्लती भक्तजन ॥३५॥
दुग्धाभिषिकें ते वेळे ॥ पाहतां सकळांचे नेत्र निवाले ॥ धन्य धन्य तेचि जाहले ॥ हरिमुख पाहिलें जयांनीं ॥३६॥
उदार सुहास्य मुख चांगलें ॥ वरी दुग्धाभिषेकें कैसें शोभलें ॥ जैसें इंद्रनीळावरी घातलें ॥ काश्मीराचें कवच पैं ॥३७॥
किंवा मित्रतनयेवरी ॥ लोटे जैसी जन्हुकुमारी ॥ दुग्धाभिषेकें ते अवसरीं ॥ पूतनारी तैसा दिसे ॥३८॥
मंदाकिनीचें उदक त्वरित ॥ घेऊनि आला ऐरावत ॥ शुध्दोदकें स्नान निश्चित ॥ इंद्र घालीत निजकरें ॥३९॥
जें पूर्ण परब्रह्म निर्मळ ॥ त्याचें अंगीं कैंचा मळ ॥ परी भक्तीनें भुलला गोपाळ ॥ साकारला म्हणोनियां ॥१४०॥
दिव्य अलंकार दिव्य वस्त्रें ॥ हरीस वाहिलीं तेव्हां शक्रें ॥ अर्चूनियां षोडशोपचारें ॥ रमावर तोषविला ॥४१॥
ऐसा करोनियां सोहळा ॥ प्रदक्षिणा करीत घननीळा ॥ इंद्र आज्ञा मागोनि ते वेळां ॥ जाता जाहला निजपदा ॥४२॥
हें गोवर्धनोद्धारण ऐकतां ॥ हरे सकळ संकट दुःखवार्ता ॥ ब्रह्मानंदपद ये हाता ॥ श्रवण करितां भावार्थें ॥४३॥
असो गोकुळीं झाला आनंद ॥ उत्साह करिती परमानंद ॥ विलोकितां गोविंदवदनारविंद ॥ तृप्ति नव्हे कोणातें ॥४४॥
असो एके दिवशीं मुरारी ॥ गाई चारीत यमुनातीरीं ॥ तों वर्तली एक नवलपरी ॥ ते चतुरीं परिसिजे ॥४५॥
मयासुराचा एक पुत्र ॥ त्याचेम नांव व्योमासुर ॥ तो दुरात्मा निर्दय क्रूर ॥ कंसासुर धाडी तया ॥४६॥
व्योमासुरासी म्हणे ते अवसरीं ॥ थोर जाहला आमुचा वैरी ॥ गाई चारावया यमुनातीरीं ॥ नित्याकाळ येतसे ॥४७॥
तरी तुवां सत्वर जाऊनी ॥ वधावा तो प्रयत्न करोनी ॥ तेणें वचन शिरीं वंदोनी ॥ वृंदावना पातला ॥४८॥
तेणें गोपाळरुप धरोनी मिळाला कृष्णदासांत येऊनी जैसा दांभिक आचार दावूनी ॥ मैंद माना मोडीत ॥४९॥
कीं कडुवृंदावन जैसें ॥ वरीवरी शोभिवंत दिसे ॥ कीं बिडालक शांत बैसे ॥ मूषकालागीं जपतचि ॥१५०॥
असुर हरीस म्हणे ते समयीं ॥ गोप वांटूनि दों ठायीं ॥ वाघमेंढी लवळाहीं ॥ खेळूं म्हणे कृष्णातें ॥५१॥
आपण वाघ जाहला ते वेळे ॥ गोपाळांसी घेऊनि पळे ॥ पर्वतीं घोर विवर कोरिलें ॥ त्यांत गोपाळ कोंडी पैं ॥५२॥
परम कपटी दुराचार ॥ गोप एक एक नेले समग्र ॥ गाईवत्सांचेही भार ॥ कोंडी विपरीं दुरात्मा ॥५३॥
गाई गोवळे नेले समस्त ॥ एकलाचि राहिला रमानाथ ॥ तटस्थ चहूंकडे विलोकित ॥ म्हणे विपरीत केलें येणें पैं ॥५४॥
भक्तांकारणें चक्रपाणी ॥ चहूंकडे हिंडे रानोरानीं ॥ महापर्वतदरीं ते क्षणीं ॥ मोक्षदानी पाहतसे ॥५५॥
मग मुरलीस्वरें वनमाळी ॥ गाई पाचारीत तये वेळीं ॥ गंगे जान्हवी भीमरथी सकळी ॥ या गे वेगीं धांवोनियां ॥५६॥
धांव गे तुंगभद्रे वैतरणी ॥ वेणी पिनाकी पयोष्णी ॥ नर्मदे सरस्वती यमुने कृष्णे वेणी ॥ गोदे मंदाकिनी या वेगें ॥५७॥
रेवा तापी भोगावती ॥ प्रवरे चंद्रभागे पूर्णावती ॥ कावेरी प्रतीची सावित्री सती ॥ या गे वेगें सत्वर ॥५८॥
सुवर्णमुखी ताम्रपर्णी ॥ क्रतुमाले शिशुमाले पयोष्णी ॥ तुंगभद्रे सुवर्णोदके यक्षिणी ॥ धांव आतां सत्वर ॥५९॥
तंव त्या पर्वताचे अंतरीं ॥ गाई आक्रंदतीं एकसरीं ॥ धांवें धांवें कां मुरारी ॥ सोडवीं झडकरी येथूनियां ॥१६०॥
मुरलीस्वरें गोपाळां ॥ आळवीतसे सांवळा ॥ या रे या रे म्हणे सकळां ॥ मांडूं काला आतांचि ॥६१॥
वडज्या सुदाम्या वांकुडया ॥ दोंदिल्या सुंदर रोकडया ॥ वाल्या कोल्या बोबडया ॥ वेडया बागडया संवगडे तुम्ही ॥६२॥
खुज्या मोठया रोडक्या कान्ह्या ॥ चपळचपळा वेधकारण्या ॥ प्रेमळ चतुरा सगुण ज्ञान्या ॥ प्राणसखे हो या वेगीं ॥६३॥
तंव पर्वताअंतरीं गोपाळ ॥ आक्रंदती करिती कोल्हाळ ॥ श्रीकृष्णनाम तें वेल्हाळ ॥ घेवोनि बाहती एकदांचि ॥६४॥
धांव आनंदकंदा गोविंदा ॥ हे कमळपत्राक्षा उदारा मुकुंदा ॥ सगुणनिर्गुणब्रह्मानंदा ॥ स्वानंदबोधा अद्वया ॥६५॥
कोंडिलों संसारपर्वतीं ॥ पडिलों जन्ममरणविषयावर्ती ॥ सांपडलों अहंकारदैत्याचे हातीं ॥ म्हणवूनि बाहतों कृष्णा तूतें ॥६६॥
मग तो भक्तकैवारी श्रीधर ॥ मुखावाटे काढूनि चक्र ॥ पर्वत फोडिला सत्वर ॥ गोगोपवत्सें सोडविलीं ॥६७॥
तंव प्रळयहांक देऊनी ॥ व्योमासुर धांवे तत्क्षणीं ॥ अतिविशाळ मुख पसरोनी ॥ ग्रासीन म्हणे हरीतें ॥६८॥
परमपुरुषें भक्तवत्सलें ॥ चक्रें कंठनाळ छेदिलें ॥ व्योमपंथें उडविलें ॥ व्योमासुराचें शिर पैं ॥६९॥
ऐसा करोनि पुरुषार्थ ॥ गाईगोपाळांसमवेत ॥ पूर्वस्थळा आले समस्त ॥ काला करिती ते क्षणीं ॥१७०॥
कळला कंसासी समाचार॥ व्योमासुर पावला परत्र ॥ धगधगलें कंसाचें अंतर ॥ म्हणे विचार कैसा करुं ॥७१॥
तंव अकरा सहस्त्र दैत्य ॥ उभे होते अविचारी उन्मत्त ॥ त्यांस कंस तेव्हां सांगत ॥ जा रे धांवत वृंदावना ॥७२॥
एक गोरा एक सांवळा ॥ दोघां धरुनि आणा ये वेळां ॥ ऐसें ऐकतां दैत्यमेळा ॥ वेगें चालिला वनातें ॥७३॥
पिशाचवत धांवती ते वेळां ॥ गोपाळांभोवता वेढा घातला ॥ पुसती बळिराम सांवळा ॥ कोठें आहेत सांगा रे ॥७४॥
ऐसें देखोनि ते अवसरीं ॥ भयभीत गोप अंतरीं ॥ म्हणती कृष्णा लपें त्वरीं ॥ घोंगडी तुजवरी घालितों ॥७५॥
तुजला हे धरोनि नेती ॥ आम्हीं कैसें जावें गोकुळाप्रती ॥ हरि म्हणे रे कांहीं चित्तीं ॥ भिऊं नका सर्वथा ॥७६॥
मग श्रीकृष्ण म्हणे तयांतें ॥ कोण्या पुरुषें धाडिलें तुम्हांतें ॥ ते म्हणती कंसें उभयांतें ॥ धरुं तुम्हांसी पाठविले ॥७७॥
ऐसें ऐकोनि ते वेळे ॥ गदगदां हांसिजे गोपाळें ॥ म्हणे कंसें मूर्खत्व केलें ॥ इतुके पाठविले कासया ॥७८॥
आम्हां दोघांसी दोघे जण ॥ नेतील कडेवर घेऊन ॥ व्यर्थ आलेती इतुके धांवोन ॥ जा परतोन सर्वही ॥७९॥
दोघे जणें येथें रहावें ॥ आम्ही जेवूनि येतों तयांसवें ॥ ऐसें बोलतां केशवें ॥ तें मानलें तयांसी ॥१८०॥
म्हणती कंस मूर्ख साचार ॥ कां व्यर्थ पाठविले अकरा सहस्त्र ॥ मग दोघांसी ठेवूनि समग्र ॥ मथुरापंथें परतले ॥८१॥
ऐसा क्षण एक जाहलियावरी ॥ विचार करिती बळिराम मुरारी ॥ म्हणती या दोघांसी ये अवसरीं ॥ पूजा बरवी समर्पावी ॥८२॥
जन्मपर्यंत न विसरती ॥ ऐसी पूजा करावी निगुती॥ तंव ते दोघे हरीस म्हणती ॥ त्वरितगती चला आतां ॥८३॥
जरी तुम्ही न याल ये क्षणीं ॥ तरी नेऊं दोघांस उचलोनी ॥ ऐसें ऐकतांचि कर्णीं ॥ शेषावतार क्षोभला ॥८४॥
बळिभद्रें आपुल्या हातेंकरुन ॥ दोघांस केलें बहुत ताडण ॥ भोंवते गोवळे मिळोन ॥ डांगांखालीं मारिती ॥८५॥
दोघे काकुळती करिती बहुवस ॥ आम्ही न येऊं म्हणती सोडा आम्हांस ॥ बहुत झालों कासावीस ॥ सोडा हृषीकेश म्हणे तयां
॥८६॥
श्रीकृष्ण म्हणे दोघांसी ॥ जाऊनि सांगा कंसापाशीं ॥ जीवदान दिल्हें आम्हांसी ॥ बळिराम आणि श्रीकृष्णें ॥८७॥
दोघे मथुरापंथे पळती ॥ असंख्य गोपाळ पाठीं लागती ॥ वाटे अडखळोनि पडती ॥ मग राम वारीत गोपाळां ॥८८॥
दोघांचें अंग झालें चूर ॥ जवळी केलें मथुरापुर ॥ पुढें जात होते अकरा सहस्त्र ॥ मागें परतोनि पाहाती ॥८९॥
तंव कुंथतचि दोघे येती ॥ समस्त पुसती तयांप्रती ॥ कां रे आलेत रिक्तहस्तीं ॥ राम श्रीपती कोठें दोघे ॥१९०॥
तंव ते बोलती दोघेजण ॥ आम्हांसी तिहीं घातलें भोजन ॥ जन्मवरी हें अन्न ॥ नाहीं जाणा जेविलों ॥९१॥
तडस भरोनि येती तिडका ॥ मोदक बहु चारिले देखा ॥ जेविताम आमुचा आवांका ॥ गलित झाला तेधवां ॥९२॥
आम्ही बहुत आलों काकुळती ॥ पुरे म्हणूं तरी न सोडिती ॥ अवघेचि आग्रह करिती ॥ घ्या घ्या म्हणोनि एकदां ॥९३॥
बळिभद्रेंचि स्वहस्तें ॥ बहुत वाढिलें आम्हांतें ॥ पुरे पुरे म्हणतां नंदसुतें ॥ तरी कदा सोडीच ना ॥९४॥
सांवळा उगाचि पाहत होता ॥ तो जरी वाढावया उठता ॥ मग आमुचा अंत न उरता ॥ तेणें पुरे म्हणतां राहविलें ॥९५॥
त्यांहीं आम्हांस ऐसें जेवूं घालावें ॥ मग त्यांस कैसें धरावें ॥ ऐसें ऐकतांचि आघवे ॥ अकर सहस्त्र बोलती ॥९६॥
परम नीच दैत्यजाती ॥ अन्नाकारणें लाळ घोंटिती ॥ म्हणती सांगा रे त्वरितगती ॥ भोजन देती आम्हां काय ॥९७॥
अन्न त्यांजवळी आहे कीं नाहीं ॥ सांगा आम्ही जातों लवलाहीं ॥ तंव ते दोघे तये समयीं ॥ बोलती काय ऐका तें ॥९८॥
म्हणती अन्न कदा न सरे ॥ तुम्हांसी पुरोनि तुमच्या पितरांस उरे ॥ तुमच्या देवांचें पोट भरे ॥ जा माघारे आतांचि ॥९९॥
आतां यावें तुमचे सांगातीं ॥ तरी आणीक आग्रह करिती ॥ जुनी ओळख काढिती ॥ मग न सोडिती आम्हांतें ॥२००॥
एक भोजनें झालें अजीर्ण ॥ दुसरें त्यावरी होय प्राणोत्क्रमण ॥ ऐसें ऐकतां अवघेजण ॥ आले सत्वर हरीजवळी ॥१॥
देखिला दैत्यभार सकळ ॥ भयभीत जाहले गोपाळ ॥ म्हणती कृष्णें अनर्थ प्रबळ ॥ येथें आतां मांडिला ॥२॥
हरि म्हणे सखे हो ऐका ॥ काळत्रयीं भिऊं नका ॥ पाठीसी मी असतां शंका ॥ धरुं नका मनांत ॥३॥
ऐसें बोलोनि जगन्नाथें ॥ मग विलोकिलें ऊर्ध्वपंथें ॥ तंव अकस्मात गंधर्व तेथे ॥ एकादश सहस्त्र उतरले ॥४॥
त्यांत मुख्य गंधर्व चित्रसेन ॥ तेणें वंदिला जगद्भूषण ॥ पुढें ठाकला कर जोडून ॥ म्हणे आज्ञा द्यावी मज ॥५॥
श्रीकृष्ण म्हणे सकळां ॥ या दैत्यांसी भोजन घाला ॥ तंव गंधर्व धांवले ते वेळां ॥ प्रळय मांडिला दैत्यांसी ॥६॥
गंधर्व तोडिती नाककान ॥ हस्तपाय टाकिती मोडून ॥ कितीकांच्या ग्रीवा पिळून ॥ गतप्राण ते केले ॥७॥
ज्यांचे कां उरले प्राण ॥ तिंहीं समर्पून नासिका कर्ण ॥ मथुरेमाजी आले पळून ॥ शंख करिती एकदां ॥८॥
वाहती रक्ताचे पूर ॥ हडबडिलें मथुरानगर ॥ लोक घाबरले समग्र ॥ चाळवती तेव्हां भलतेंचि ॥९॥
म्हणती आणा रे वेगें घोडे ॥ त्यांवरी सत्वर जुंपा गाडे ॥ मांजरें आणि माकडें ॥ रथीं जुंपा सत्वर ॥२१०॥
उचला उखळें झडकरी ॥ चुली बांधा घोडयावरी ॥ कोथळ्या आणि आड विहिरी ॥ घेऊनि शिरीं चला रे ॥११॥
नेसा वेगीं दृढ मुसळें ॥ डोईस गुंडाळा रे पाळें ॥ चाटू आणिक चौपाळें ॥ पांघरुनियां पळा वेगीं ॥१२॥
म्हैशी बांधा वांसरांवरी ॥ गाई बांधा कुतर्याशिरीं ॥ नेसतीं वसनें झडकरी ॥ सांडोनिया पळा रे ॥१३॥
स्त्रियांस म्हणती तेच क्षणीं ॥ वोंटीस घ्या हो केरसुणी ॥ पळा सत्वर येथूनी ॥ नासिक कर्ण सांभाळा ॥१४॥
असो लोक जाहले भयभीत ॥ गंधर्व परतले समस्त ॥ श्रीकृष्णासी वंदोनि त्वरित ॥ आज्ञा मागती जावया ॥१५॥
म्हणती जय जय पुराणपुरुषोत्तमा ॥ अज अजित मेघश्यामा सच्चिदानंदा पूर्णब्रह्मा ॥ न कळे सीमा वेदांसी ॥१६॥
तूंचि सूत्रधारी सत्य होसी ॥ आम्हां बाहुलियां नाचविसी ॥ इंद्र विधि सकळ हृषीकेशी ॥ शरण चरणांसीं पैं आले ॥१७॥
ऐसें स्तवोनि पूतनाप्राणहरणा ॥ गंधर्व गेले निजस्थाना ॥ असो इकडे घायाळ कंससदना ॥ बरळतचि पळताती ॥१८॥
म्हणती कंसराज्य बुडालें ॥ तुमचें मरण जवळ आलें ॥ चित्त कंसाचें घाबरलें ॥ धगधगलें हृदयांत ॥१९॥
कंसास सांगाती घायाल ॥ ते दोघे प्रतापसूर्य केवळ ॥ नखाग्रीं हा ब्रह्मांडगोळ ॥ चालविती क्षणमात्रें ॥२२०॥
एक सांवळा एक गौर ॥ दोन्ही परब्रह्म निर्विकार ॥ ते मनुष्यवेषें निर्धार ॥ शेषविष्णु अवतरले ॥२१॥
कंस टाकी श्वासोच्छ्वास ॥ आतां काय करणें तयांस ॥ असो गोकुळीं नंदास ॥ श्रुत जाहलें तेधवां ॥२२॥
कीं अकरा सहस्त्र वीर येऊनी ॥ गेले रामकृष्णांस घेऊनी ॥ नंद गौळी यशोदा रोहिणी ॥ धांवती वनीं आक्रंदत ॥२३॥
यशोदा पिटी वक्षःस्थळ ॥ नंद वाटेसी पडे विकळ ॥ तंव अकस्मात तमालनीळ ॥ गाई घेऊनि परतला ॥२४॥
पुढें गाईंचे येती भार ॥ मागें हलधर आणि श्रीधर ॥ भोंवते गोप करती गजर ॥ नाना वाद्यांचे तेधवां ॥२५॥
तें देखोनियां यशोदा नंद ॥ हृदयीं उचंबळला आनंद ॥ ते समयीं जो जाहला ब्रह्मानंद ॥ तो कवण वर्णूं शके पैं ॥२६॥
मंदिरा आला इंदिरावर ॥ नंदें समारंभ केला थोर ॥ मेळवूनियां धरामर ॥ दानें अपार दिधलीं ॥२७॥
उत्तम हरिविजयग्रंथ ॥ हाचि जाणिजे शेषाद्रिपर्वत ॥ श्रीव्यंकटेश श्रीभूसहित ॥ परब्रह्म वसे तेथें ॥२८॥
श्रवणीं आवडी विशेष ॥ भावार्थ हाचि आश्विनमास ॥ सुप्रेम हे विजयादशमीस ॥ भक्त येती धांवोनियां ॥२९॥
विजयादशामी विजयदिवस ॥ हरिविजय पाहतां सावकाश ॥ शेषाद्रिवासी तो रमाविलास ॥ निजदासांतें रक्षीतसे ॥२३०॥
ब्रह्मानंदकृपा पूर्ण ॥ तेंचि निर्मळ निकेतन ॥ जेथें नलगे द्वैत वात उष्ण ॥ श्रीधर अभंग सेवीतसे ॥३१॥
इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ संत श्रोते परिसोत ॥ द्वादशाध्याय गोड हा ॥२३२॥
अध्याय॥१२॥ओंव्या॥२३२॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥
हरिविजय
श्रीधरांसारखा भगवंताच्या भक्तिप्रेमात न्हाऊन गेलेला अजोड कवी, गोपालकृष्णाच्या अति गोड लीलांचे वर्णन करतो, तेव्हा काय बहार येते.