॥श्रीगणेशाय नमः॥
जय जय वृंदावनविलासिया ॥ निर्विकल्पवृक्षा करुणालया ॥ अहंकारविषधर कालिया ॥ पायांतळीं रगडिला ॥१॥
परम दुर्धर दुर्वासना ॥ हेचि जीवें शोषिली तुवां पूतना ॥ आपरसंसारभ्रममोचना ॥ व्रजभूषणा सुखाब्धे ॥२॥
अघ बक केशीं शटकासर ॥ हेचि काम क्रोध मद मत्सर ॥ मर्दिले दैत्य दुर्धर ॥ श्रीमनोहर विजयी तूं ॥३॥
नानाविकारभेदभंजना ॥ अक्षया अपरिमिता निरंजना ॥ गोपीजनमानसरंजना ॥ सनातना प्रतापिया ॥४॥
कमलपत्राक्षा कमलनयना ॥ निंदक दुर्जनवनभंजना ॥ अभेद प्रेमळ भक्तरक्षणा ॥ हरि निर्गुणा निरुपाधिका ॥५॥
मधुकैटभारि पुंडलीकवरदा ॥ सत्यज्ञाना परमानंदा ॥ प्रमाणरहिता अक्षयसुखदा ॥ क्रीडसी मुकुंदा गोकुळीं ॥६॥
चतुर्दशाध्यायाचे अंतीं ॥ गोवर्धनीं असतां श्रीपती ॥ अग्नि लाविला कंसदूतीं ॥ कृष्णें निश्चितीं गिळिला तो ॥७॥
यावरी एकदां श्रावणमासीं ॥ पितृतिथि अमावास्येसी ॥ माता पूजिती पुत्रांसी ॥ वाणें देती आदरें ॥८॥
संकर्षणाची पूजा करोनी ॥ ते दिनीं वाण देत रोहिणी ॥ श्रीरंगासी नंदराणी ॥ प्रीतीं अर्चूनि वाण देत ॥९॥
तों मथुरेंत बंदिशाळे ॥ वसुदेव देवकी ते वेळे ॥ आठवूनि श्रीकृष्णरुप सांवळें ॥ दुःख केलें अपार ॥१०॥
माय बोले ते क्षणीं ॥ मी वांड सप्त पुत्र विऊनी ॥ आठवा जाहला चक्रपाणी ॥ तोही मज अंतरला ॥११॥
कंसें परम चांडाळें ॥ अवघीं मारिलीं माझें बाळें ॥ एकही नाहीं उरलें ॥ आजी वाण द्यावया ॥१२॥
अहा डोळसा आठव्या हृषीकेशी ॥ मज तुवां केलें परदेशी ॥ आजी मी वाण देऊं कवणासी ॥ बा वेगेंसीं धांवें कां ॥१३॥
अहा माझें पूर्वकर्म ओढवलें ॥ घोर पाप कैसें फळासी आलें ॥ अहा गाईवत्सासी विघडिलें ॥ कीं मृगीचें तोडिले पाडस ॥१४॥
किंव मोडिला हरिकीर्तनरंग ॥ कीं ऋषींचा केला मानभंग ॥ मातापितासद्गुरुंस व्यंग ॥ शब्द बोलिलें मीं पूर्वीं ॥१५॥
धांव लौकरी वैकुंठनाथा ॥ माझें बाळ भेटवीं मज आतां ॥ हे बंदिशाळेची व्यथा ॥ किती दिवस भोगविसी ॥१६॥
ऐसी देवकी धांवा करी ॥ तों गोकुळीं खेळतां श्रीहरी ॥ करुणाशब्द ते अवसरीं ॥ हरिश्रवणीं पडियेला ॥१७॥
गडियांत खेळतां सावळा ॥ मायेचा धांवा ऐकिला ॥ सद्गदित कंठ झाला ॥ तैसाचि चालिला गुप्तरुपें ॥१८॥
अनंत ब्रह्मांडींचा समाचार ॥ सर्व जाणे श्रीहृत्पद्मभ्रमर ॥ तो न लागतां क्षणमात्र ॥ बंदिशाळे पावला ॥१९॥
पद्मिनीमित्रकुलभूषण ॥ चतुर्दश वर्षें सेवूनि विपिन ॥ निजमायेसी भेटे येऊन ॥ तेवीं मनमोहन पावला ॥२०॥
तंव देवकी विस्तारुनि वाण ॥ करीत श्रीकृष्णाचें चिंतन ॥ म्हणे जेथें असेल बाळ सगुण ॥ त्यासी वाण पावो हें ॥२१॥
तंव अकस्मात मातेचे पाठीशीं ॥ उभा राहिला हृषीकेशी ॥ जो पयःसागरहृदयविलासी ॥ वेदशास्त्रांसी अगोचर ॥२२॥
मायेचें उचलून वाण ॥ सहज बोले अतीत कोण ॥ तों अकस्मात बोले जगन्मोहन ॥ सर्वातीत मीच असें ॥२३॥
जीवशिवांसी जो अतीत ॥ पिंडब्रह्मांडाविरहित ॥ तोचि मी झालों तुझा सुत ॥ वाण निश्चित मज देईं ॥२४॥
देवकी जों परतोनि पाहे ॥ तों सांवळी मूर्ति उभी आहे ॥ विस्मयें परम तटस्थ होये ॥ बोले काय देवकी ॥२५॥
कोणाचा रे तूं बाळा ॥ दिसतोसी बरवा वेल्हाळा ॥ माझाही कृष्ण सांवळा ॥ तुज येवढाच असेल ॥२६॥
हांसोनि बोले जगज्जीवन ॥ माते तोचि मी तुझा नंदन ॥ माझेंचि नाम जाण कृष्ण ॥ बरवी खूण ओळखी ॥२७॥
ऐकतांचि ऐशिया वचना ॥ स्तनीं तात्काळ फुटला पान्हा ॥ पोटासीं धरिलें कमलनयना ॥ तें सुख कोणा न वर्णवे ॥२८॥
स्फुंदस्फुंदोनि रडे माया ॥ आडवें घेतलें यादवराया ॥ हरिमुखीं स्तन घालूनियां ॥ पयःपान करवीत ॥२९॥
वसुदेव जवळी येऊन ॥ म्हणे कोणासी करविसी स्तनपान ॥ देवकी म्हणे जी माझाचि कृष्ण ॥ पावला हो मजलागीं ॥३०॥
गोकुळीं करितो नाना चरित्रें ॥ तीं ऐकत होतों आपण श्रोत्रें ॥ ती आजि राजीवनेत्रें ॥ खरीं करुनि दाविलीं ॥३१॥
मग वसुदेवें आलिंगिलें मुरहरा ॥ नयनीं वाहती विमलांबुधारा ॥ बा रे माझिया श्यामसुंदरा ॥ कैसा येथें आलासी ॥३२॥
हरि म्हणे अविद्यामय प्राणी ॥ जे गेले देहबुद्धीनें वेष्टूनी ॥ मी न दिसें तयांचे नयनीं ॥ भक्त ज्ञानी जाणती ॥३३॥
हरि म्हणे आतां शोक करुं नका ॥ तुमची सत्वर होईल सुटका ॥ ऐसें बोलोनि निजजनसखा ॥ गोकुळा गेला सत्वर ॥३४॥
कंससभेसी आला ब्रह्मपुत्र ॥ म्हणे तुज कळला कीं समाचार ॥ कृष्ण येऊनि गेला सत्वर ॥ मातापितयांसी भेटोनि ॥३५॥
ऐकोनियां कंस कोपला ॥ दूत बोलाविले ते वेळां ॥ वसुदेवदेवकी उभयतांला ॥ धरोनि आणवी सभेसी ॥३६॥
उभीं असती दीनवदन ॥ कंस म्हणे टाका शिरें छेदून ॥ त्यांचे पाठीं उग्रसेन ॥ तोही वधून टाकावा ॥३७॥
शस्त्रें घेऊनि लखलखित ॥ भोंवते उभे ठाकले दूत ॥ देवकी थरथरां कांपत ॥ धांवा करीत हरीचा ॥३८॥
चाल चाल बा वेगें हरी ॥ कंस आम्हांसी जिवें मारी ॥ तुजविण ये अवसरीं ॥ कोण आम्हां रक्षी पां ॥३९॥
आमुच्या ऐशा होती आपदा ॥ काय पाहसी तूं मुकुंदा ॥ भक्तकैवारिया गोविंदा ॥ धांव धांव सत्वर ॥४०॥
ते करुणाशब्द ते वेळीं ॥ कृष्णें ऐकिले गोकुळीं ॥ खेळतांची बाळांचिये मेळीं ॥ तो वनमाळी काय करी ॥४१॥
मुखांतूनि काढिलें सुदर्शन ॥ मथुरेकडे अवलोकून ॥ दिधलें तेव्हां भिरकावून ॥ गुप्तपंथें सत्वर ॥४२॥
चक्र येवोनियां त्वरित ॥ दोघांभोंवतें असे रक्षित ॥ जों डोळियाचें पातें लवत ॥ तों शतावर्तनें चक्र करी ॥४३॥
भोंवतें होतें दैत्यचक्र ॥ त्याचा तत्क्षणीं केला संहार ॥ झाला एकचि हाहाकार ॥ राशी पडल्या शिरांच्या ॥४४॥
विस्मित पाहे कंसासुर ॥ म्हणे कोण करितो संहार ॥ अमर्याद पडले चरणकर ॥ तुटोनियां वीरांचे ॥४५॥
भयभीत कंस मानसीं ॥ म्हणे ईश्वर रक्षितो यांसी ॥ कंस म्हणे वसुदेवासी ॥ बंदिशाळे तुम्हीं जावें ॥४६॥
तुम्हांसी मी कदा न मारीं ॥ निर्भय असावें अंतरीं ॥ वसुदेव देवकी झडकरी ॥ जाति जाहलीं बंदिशाळे ॥४७॥
पाठीं असतां भगवंत ॥ कृतांतही करुं न शके घात ॥ अपाय तो उपाय होत ॥ विघ्नें निरसती सर्वही ॥४८॥
असो ऐसी करणी करुन ॥ निजस्थाना गेलें सुदर्शन ॥ भक्तकैवारी नारायण ॥ ब्रीद साच केलें हो ॥४९॥
याउपरी एके दिनीं ॥ हरि खेळतां वृंदावनीं ॥ गोरस विकावया गौळणी ॥ मथुराप्रति चालल्या ॥५०॥
तयां मध्यभागीं राधा ॥ जिच्या स्वरुपासी नाहीं मर्यादा ॥ जे अत्यंत प्रिय गोविंदा ॥ ते आनंदकंदा न विसरे ॥५१॥
हावभाव राधा दावीत ॥ पैंजण पायीं झणत्कारत ॥ खंजरीटनयना विलोकीत ॥ चहूंकडे चपलत्वें ॥५२॥
आकर्ण राधेचे नयन ॥ सोगयाचें शोभे अंजन ॥ वदनचंद्र शोभायमान ॥ स्वरुपलावण्य न वर्णवे ॥५३॥
भोंवता गौळणींचा मेळा ॥ त्यांत तळपे राधा चपळा ॥ दुरोनि देखोनि सांवळा ॥ वडजाप्रति बोलतसे ॥५४॥
या वृक्षावरी चढोनी ॥ पाहें कोण जाताती गौळणी ॥ वडजा तरुवरी ओळंघोनी ॥ हरीप्रति बोलतसे ॥५५॥
मथुरेप्रति जाती नितंबिनी ॥ परी त्यांत एक सुंदर कामिनी ॥ जैसा उडुगणांमाजी निशामणी ॥ तैसीच दुरोनि दिसताहे ॥५६॥
घडोघडी तुजकडे पाहे ॥ तीस हरि तूं धरीं लवलाहें ॥ दान तिजला मागें स्वयें ॥ आतांचि देईं म्हणोनियां ॥५७॥
गडियांसमवेत धांवे वनमाळी ॥ पदरीं राधा दृढ धरिली ॥ नेत्रसंकेतें ती ते वेळीं ॥ खूण जाणवीत हरीतें ॥५८॥
भलतें बोलूं नको आतां ॥ हरि म्हणे आमुचें दान न देतां ॥ कां गे शून्यमार्गें जातां ॥ मज अनंता टाकूनि ॥५९॥
राधा म्हणे मनमोहना ॥ मजसीं लावूं नको तनाना ॥ तूं पुढें पुढें शहाणा ॥ बहुत होसील वाटतसे ॥६०॥
उगाचि मध्यें वाट पाडिसी ॥ चाल वेगें रे चावडीसी ॥ पुसों मग दिवाणासी ॥ दान मागसीं कैसें तें ॥६१॥
हरि म्हणे नितंबिनी ॥ चावडीची आवडी धरिसी मनीं ॥ मी दान घेतल्यावांचूनी ॥ तुजलागीं सोडीना ॥६२॥
राधा म्हणे आतां दान घेसी ॥ हरि म्हणे नाचतचि देसी ॥ नाहीं तरी चाल कुंजवनासी ॥ आडमार्गासी सांडोनियां ॥६३॥
राधा म्हणे जगज्जीवना ॥ बहु बरळे तुझी रसना ॥ परी तुज ठकवूनि मनमोहना ॥ जाईन आतां येथूनियां ॥६४॥
हरि म्हणे गळीं गुंतला मीन ॥ तो जाईल मग कोठूनि ॥ राधा म्हणे हें वर्तमान ॥ कंसालागीं जरी कळे ॥६५॥
मग तुज नांदावया गोकुळीं ॥ ठाव नुरेचि वनमाळी ॥ तूं बहुत करितोसी कळी ॥ परी हें बरवें नव्हेचि ॥६६॥
हरि म्हणे कंसालागून ॥ क्षणमात्रें मीच मारीन ॥ चाणूर मुष्टिक आपटीन ॥ एक पळ न लागतां ॥६७॥
इतुकें आम्हीं केलियावरी ॥ तूंच आमुची होय नोवरी ॥ ऐसें बोलतां श्रीहरी ॥ इतर सुंदरी हांसती ॥६८॥
राधा म्हणे तुझा पुरुषार्थ ॥ मज ठाउका आहे समस्त ॥ तुज बायकांनीं निश्चित ॥ धरोनि बांधिला उखळासी ॥६९॥
तुवां कांखेसी घोंगडी घेऊनी ॥ गाई चाराव्या वृंदावनीं॥ पांवा वाजवीं मधुरध्वनी ॥ हमामा घालीं गोवळ्यांसीं ॥७०॥
तुवां काय वधावा कंस ॥ ऐकतां क्रोध आला पेंधियास ॥ राधेसी म्हणे कृष्ण परमपुरुष ॥ याचा महिमा नेणसी तूं ॥७१॥
हे शेषनारायण दोघेजण ॥ अवतरले देवकार्यालागून ॥ हें पूर्णब्रह्म सनातन ॥ तुज महिमान नेणवे ॥७२॥
पूतना आणि शकट केशी ॥ तृणावर्ताअघबकांसी ॥ कालिया मर्दिला यमुनेसी ॥ तो तुवां नेत्रीं देखिला ॥७३॥
द्वादश गांवें गिळिला अग्न ॥ केलें गोवर्धनोद्धारण ॥ चतुर्मुख सहस्त्रनयन ॥ आले शरण श्रीरंगा ॥७४॥
नंद बुडाला यमुनाजळीं ॥ घेऊनि आला वनमाळी ॥ सर्पमुखींहूनि शक्तिस्थळीं ॥ पिता सोडविला श्रीकृष्णें ॥७५॥
ऐसे अगाध हरीचे गुण ॥ नेणे पंचास्य सहस्त्रवदन ॥ त्या हरीस शब्ददूषण ॥ मूर्खे गौळणी ठेविसी ॥७६॥
तों राधेची सखी चंद्रकळा ॥ हरीसी बोले ते वेळां ॥ म्हणे क्षमा करीं गोपाळा ॥ अन्याय आमुचे समस्त ॥७७॥
चोरी करोनियां गोकुळीं ॥ तुझें पोट न भरे वनमाळी ॥ तरी मागोनि घेईं आम्हांजवळी ॥ गोरस तुज भक्षावया ॥७८॥
परी आम्हां वाटेसी कां पीडिसी ॥ नसतेंचि दान मानसी ॥ सोड जाऊं दे राधेसी ॥ म्हणोनि चरणासी लागली ॥७९॥
राधा म्हणे चंद्रकळे ॥ हा ऐसाच पीडितो भलते वेळे ॥ येणें संसारासी घातलें ॥ पाणी माझ्या सर्वस्वें ॥८०॥
हा राखितो माझ्या गाई ॥ त्यालागीं मी न बोलेंचि कांहीं ॥ येर्हवीं याचे कान ये समयीं ॥ पिळूनि देतें हातींच ॥८१॥
राधेसी म्हणे शेषशायी ॥ म्यां तुझ्या बापाचें खादलें काई ॥ आजिपासूनि तुझ्या गाई ॥ न राखें मी सर्वथा ॥८२॥
ऐसें बोलतां गोविंदा ॥ सद्गदित जाहली राधा ॥ म्हणे पुराणपुरुषा आनंदकंदा ॥ तुज शरण मी असें ॥८३॥
तूं परमात्मा जगदुद्धार ॥ मायानियंता निर्विकार ॥ तूं आमुचा करिसी उद्धार ॥ अवतार धरोनियां ॥८४॥
तूं आमुचा निजप्राण ॥ आम्ही तुझ्या वचनाधीन ॥ तुजविण एक क्षण ॥ न गमे आम्हां कदापि ॥८५॥
तूं जगन्मोहन वेधकमूर्ती ॥ क्षण एक जरी न देखों यदुपती ॥ तरी नेत्र उन्मळती ॥ वियोगें तुझ्या दयाळा ॥८६॥
तुझें न करितां नामस्मरण ॥ इतर जें प्रपंचभाषण ॥ व्यर्थ काय जिव्हा श्रमवून ॥ तुझे गुण न वर्णितां ॥८७॥
देखोनि राधेचा प्रेमा ॥ कृपा आली पुरुषोत्तमा ॥ म्हणे तुमचा भावगोरस आम्हां ॥ नित्यकाळ समर्पणें ॥८८॥
मान्य करोनि हरिवचन ॥ गोपी गेल्या मथुरेलागून ॥ आठविती श्रीरंगाचे गुण ॥ प्रपंचकारण करितांही ॥८९॥
राधेसमवेत गौळणी ॥ मथुरेमाजी गोरस विकूनी ॥ आल्या गोकुळा परतोनी ॥ गात वदनीं हरिलीला ॥९०॥
याउपरी एकदां यमुनातीरीं ॥ गाई चारितां मधुकैटभारी ॥ तों गौळियांच्या कुमारी ॥ पूजिती गौरी स्वानंदें ॥९१॥
कृष्णसंग इच्छूनि मनीं ॥ पूजिती देवी कात्यायनी ॥ जे सौभाग्यदायक मंगलखाणी ॥ ज्ञानकळा हरीची जे ॥९२॥
ज्ञानकळेसी न भजतां ॥ हरिप्राप्ति नव्हेचि तत्त्वतां ॥ यालागीं सुंदरी समस्ता ॥ आचरती व्रत आदरें ॥९३॥
तंव तो काळ हेमंतऋतु ॥ मार्गशीर्ष मास विख्यातु ॥ जो आपुलें स्वरुप जगन्नाथु ॥ द्वादश मासांत म्हणवी पैं ॥९४॥
अलंकारांत मुकुट सुंदर ॥ कीं नवग्रहांमाजी दिनकर ॥ तैसा मासांमाजी मार्गशिर ॥ हरिस्वरुप जाणिजे ॥९५॥
कीं भोगियांमाजी भूधर ॥ कीं अंडजांमाजी खगेंद्र ॥ तैसा मासांमाजी मार्गशिर ॥ हरिस्वरुप जाणिजे ॥९६॥
वृंदारकांमाजी शचीवर ॥ कीं धनाढयांमाजी कुबेर ॥ तैसा मासांमाजी मार्गशिर ॥ हरिस्वरुप जाणिजे ॥९७॥
कवींमाजी सत्यवतीकुमर ॥ कीं मानवांत श्रेष्ठ नृपवर ॥ तैसा मासांमाजी मार्गशीर ॥ हरिस्वरुप जाणिजे ॥९८॥
या मासांत करितां दान ॥ गो भू हिरण्य ब्राह्मणपूजन ॥ हरिकीर्तन अन्नसंतर्पण ॥ तेणें नारायण संतोषें ॥९९॥
असो गोपी हविष्यान्न भक्षिती ॥ गोमयलिप्त भूमीसी निजती ॥ बहुत नेम चालविती ॥ हरिसुख प्राप्त व्हावया ॥१००॥
अरुणोदयीं स्नान करुनी ॥ सवेंचि उगवतां वासरमणी ॥ मग पूजिती कात्यायनी ॥ सिकतामूर्ति करुनियां ॥१॥
मनीं धरुनि राजीवनेत्र ॥ जपती देवीपुढें मंत्र ॥ तों गोपांमाजी स्मरारिमित्र ॥ खेळत असे स्वानंदें ॥२॥
त्यांच्या व्रताचें फळ ॥ पूर्ण करावया घननीळ ॥ एकलाचि निघोनि व्रजपाळ ॥ तयांपासीं पातला ॥३॥
अवघ्या वस्त्रें ठेवूनि तीरीं ॥ पोहती कृतांत भगिनीनीरीं ॥ तों सकळांचीं वस्त्रें पूतनारी घेऊनि तरुवरी चढियेला ॥४॥
कदंबावरी हरि चढतां ॥ एकीनें देखिला अवचितां ॥ मग सांगे समस्तां ॥ वस्त्रें नेलीं कीं आमुची हो ॥५॥
मग लाजोनियां सकळीं ॥ आकंठ लपती यमुनाजळीं ॥ म्हणती कमलपत्राक्षा वनमाळी ॥ लाज घेतली सर्वांची ॥६॥
एक गोपी कांपे थरथरां ॥ म्हणे वस्त्रें देईं भुवनसुंदरा ॥ तुवां साधिला डाव खरा ॥ एकांत बरा पाहोनि ॥७॥
बहुत भला तूं कृष्णनाथा ॥ आमुचीं वस्त्रें देईं आतां ॥ बहुत शीत वाजतें अनंता ॥ दांतखिळ्या बैसल्या ॥८॥
ऐशा ऊर्ध्ववदनें गोपिका ॥ विनविती सरसिजोद्भवजनका ॥ हांसतसे निजभक्तासखा ॥ तयांकडे पाहोनियां ॥९॥
हरि म्हणे हे सूर्यकन्या ॥ परमपवित्र सर्वमान्या ॥ तुम्ही नग्न होऊनि ललना ॥ कैशा आंत संचरला ॥११०॥
तुम्हीं मंदिरा जावें याउपरी ॥ वस्त्रे आणूनि देईन झडकरी ॥ तुमच्या वडिलांसी निर्धारीं ॥ गति तुमच्या सांगेन मी ॥११॥
त्या एकीकडे एक पाहती ॥ हाव भाव दावूनि हांसती ॥ म्हणती येणें तों निश्चिती ॥ निर्वाण मांडिलें साच पैं ॥१२॥
एक म्हणती आम्ही दीन ॥ तूं उदार करीं वस्त्रदान ॥ एक म्हणती देऊं प्राण ॥ तुजवरी जाण श्रीरंगा ॥१३॥
पाषाण उचलोन गोपी एक ॥ म्हणे याजवरी फोडीन मस्तक ॥ कदंबावरी जगन्नायक ॥ हांसे शब्द ऐकूनियां ॥१४॥
एक बोलती साकांक्षा ॥ वस्त्रें देई वारिजदलाक्षा ॥ आत्मयारामा सर्वसाक्षा ॥ कालियाशिक्षाकारका ॥१५॥
एक म्हणती येऊं बाहेरी ॥ चढूं आतां कदंबावरी ॥ तुज धरोनि पूतनारी ॥ शिक्षा बरी लावूं पैं ॥१६॥
वस्त्रें जरी न देसी टाकून ॥ तरी तुज नंदयशोदेंची आण ॥ एक म्हणती चोरें नागविलें पूर्ण ॥ सांगों चला चावडिये ॥१७॥
एक म्हणती हरि पाहीं ॥ तुज बहुत देऊं दूध दहीं ॥ आमुचा वस्त्रें आतां देईं ॥ भुवनसुंदरा श्रीहरी ॥१८॥
एक म्हणती सुंदरी ॥ गोकुळांत करिसी चोरी ॥ गाई चारितां वनातरीं ॥ येथेंही मुरारी नाडिसी ॥१९॥
तूं वत्सावांचोनि गाई ॥ वनीं दुहितोसी सर्वही ॥ तुझा हस्त लागतां पाहीं ॥ पान्हा फुटे तयांतें ॥१२०॥
तुझा हस्त लागतां नारायणा ॥ वांझ्या गाईस फुटे पान्हा ॥ विश्वव्यापका मुरमर्दना ॥ जनार्दना वस्त्रें देईं ॥२१॥
ऐशा नानापरी विनविती ॥ मग काय बोले जगत्पती ॥ बाहेर येवोनि शीघ्रगती ॥ यमपितयासी नमावें ॥२२॥
यमुनेमाजी समस्त ॥ जलक्रीडा तुम्हीं केल्या सत्य ॥ त्याचेंचि प्रायश्चित हें त्वरित ॥ तमांतका नमस्कारा ॥२३॥
लज्जा सांडोनियां निश्चित ॥ सर्वी करावे ऊर्ध्वहस्त ॥ तरीच वस्त्रें त्वरित ॥ हाता येतील तुमच्या पैं ॥२४॥
कदंबातळीं क्षणभरी ॥ नाचा पाहीन डोळेभरी ॥ मग हांसती व्रजसुंदरी ॥ कैसी परी करावी ॥२५॥
एक म्हणे याची गोष्टी ॥ न ऐकतां करील कष्टी ॥ ऐशा हांसत ऊर्ध्वदृष्टी ॥ गोपी पाहती हरीकडे ॥२६॥
मग वृक्षातळीं येऊनि रामा ॥ म्हणती वस्त्रें देईं मेघश्यामा ॥ अनंगदहनमनविश्रामा ॥ पूर्णकामासर्वेशा ॥२७॥
हरी म्हणे ऊर्ध्व हस्त करोनी ॥ आधीं नमस्कारावा वासरमणी ॥ मग एक हस्त ठेविती कामनिकेतनीं ॥ नमस्कारिती एक हस्तें ॥२८॥
हरि म्हणे एका हस्तें ॥ जे नमस्कारिती सद्गुरुदेवसंतांतें ॥ त्यांचा हस्त छेदावा तेथें ॥ शास्त्राज्ञा ऐसी असे ही ॥२९॥
एका हस्तें करितां नमस्कार ॥ पुढें पहावे जन्मांतर ॥ नचुके सहसा येरझार ॥ हें निर्धार जाणिजे ॥१३०॥
एक हस्त कामसदनीं ॥ एका हस्तें नमितां दिनमणी ॥ प्रपंचाकडे चित्त ठेवोनी ॥ लटिका परमार्थ दाविला ॥३१॥
कामावरी ठेविलें चित्त ॥ तरी दुरी गेला भगवंत ॥ यालागीं जोडोनि दोन्ही हस्त ॥ श्रीआदित्य नमस्कारा ॥३२॥
मग हांसती खंजरीटनयना ॥ हस्तद्वय जोडोनियां जाणा ॥ नमस्कारितां सूर्यनारायणा ॥ तोषला राणा वैकुंठींचा ॥३३॥
मय तयांचीं समस्त वस्त्रें ॥ दिधली नवपंकजनेत्र ॥ भक्तपालकें स्कंदतातमित्रें ॥ नवलीला दाविली ॥३४॥
गोपी समस्त नेसल्या चीरा ॥ म्हणती जलदवर्णा पीतचीरा ॥ आमुचा काम भुवनसुंदरा ॥ संगें तुझ्या शांत करों ॥३५॥
तुझा होतांचि समागम ॥ हरि आम्ही होऊं निष्काम ॥ मग काय बोले आत्माराम ॥ सकळकामातीत जो ॥३६॥
हरि म्हणे हो शरदृतु ॥ चांदणी यामिनी शोभिवंतु ॥ होतां वृंदावनीं मुरलीसंकेतु ॥ यावें तुम्हीं समस्त तेथें ॥३७॥
होईल तुमच्या व्रताचें फळ ॥ मग कामना पुरती सकळ ॥ ऐसें बोलतां वैकुंठपाळ ॥ गोपी गेल्या घरासी ॥३८॥
हरिविजय दक्षिणसागर ॥ श्रीकृष्ण तेथें रामेश्वर ॥ येथींचे यात्रे भाविक नर ॥ अत्यादरें धांवती ॥३९॥
करुनि आवडीच्या कावडी ॥ या रामेश्वरीं येतीं भाविक कापडी ॥ क्षणिक आयुष्य जाणोनि तांतडी ॥ आडाआडी पावले ॥१४०॥
प्रेम हेंचि जान्हवीनीर ॥ प्रीतीं अभिषेकिला रामेश्वर ॥ ते तरले संसारसागर ॥ सत्य साचार जाणिजे ॥४१॥
ब्रह्मानंदस्वामी यतीश्वर ॥ त्याच्या पायींच्या पादुकाधर ॥ आवडीं जाहलों म्हणे श्रीधर ॥ साचार तेणेंचि ॥४२॥
इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ चतुर परिसोत भक्तसंत ॥ पंचदशाध्याय गोड हा ॥१४३॥
अध्याय॥१५॥ओंव्या॥१४३॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥
हरिविजय
श्रीधरांसारखा भगवंताच्या भक्तिप्रेमात न्हाऊन गेलेला अजोड कवी, गोपालकृष्णाच्या अति गोड लीलांचे वर्णन करतो, तेव्हा काय बहार येते.