श्रीगणेशाय नमः ॥
जय जय गोवर्धनोद्धारणा ॥ हे कंसारे पूतनाप्राणहरणा ॥ मधुकैटभारे मुरमर्दना ॥ गोपीरंजना गोपते ॥१॥
तुझ्या ठायीं चित्त जडे ॥ तरी संसारदुःख समूळ झडे ॥ चिन्मयपद हाता चढे ॥ न पडे सांकडे कदाही ॥२॥
आपुलिया कार्यालागीं प्राणी ॥ सादर सदा दिनयामिनीं ॥ तैसी प्रीति धरील हरिभजनीं ॥ तरी बंधन मग कैंचें ॥३॥
धन इच्छा अंतरीं धरुनी ॥ भाग्यवंतांसी स्तविती जनीं ॥ तैसी गोडी लागे हरिचरणीं ॥ तरी बंधन मग कैंचें ॥४॥
राज्य भांडार कां वृत्ती ॥ जातां प्राणी सायास करिती ॥ तैसे हरिप्राप्तीसी झगटती ॥ तरी बंधन मग कैंचं ॥५॥
वाढावया वंशसंतान ॥ करिती लोक बहु अनुष्ठान ॥ तैसें कृष्णपायीं जडे मन ॥ तरी बंधन मग कैचें ॥६॥
खोळंबेल लग्नघडी ॥ म्हणोनि संकटी घालिती उडी ॥ तैसी कृष्णभजनीं धरितां गोडी ॥ तरी बंधन मग कैंचें ॥७॥
एकुलत्या पुत्रासी होतां व्यथा ॥ वैद्य शोधूं धांवती मातापिता ॥ तैसा हरिपदीं कळवळा जडतां ॥ तरी बंधन मग कैंचें ॥८॥
जैसा का तृषाक्रांत प्राणी ॥ उष्णकाळीं उदक धुंडी वनीं ॥ तैसा आवडे चक्रपाणी ॥ तरी बंधन मग कैंचें ॥९॥
कीं अबला कन्या ॥ परदेशीं दूरी ॥ परी तिचें मन सदा माहेरीं ॥ तैसी व्रजभूषणीं आवडी धरी ॥ तरी बंधन मग कैंचें ॥१०॥
असो षोडशोध्यायीं कथा ॥ ऋषिपत्न्यांनीं कृष्णनाथा ॥ अन्न अर्पूनियां तत्त्वतां ॥ आश्रमाप्रति पातल्या ॥११॥
याउपरी एके दिनीं ॥ वृंदा वनीं शारंगपाणी ॥ शरत्कालींची यामिनी ॥ निशामणि निर्मळ दिसे ॥१२॥
अंबर नीलवर्ण सोज्ज्वळ ॥ अणुमात्र न दिसे जलदपटल शोभायमान वन निर्मळ ॥ मलयानिल झळकतसे ॥१३॥
चूत कदंब लवंग वृक्ष थोर ॥ जाई जुई चंपक औदुंबर ॥ डाळिंबी पोफळी परिकर ॥ केळी नारळी डोलती ॥१४॥
फणस अंजीर रातांजन ॥ बकुळ मोगरे जांभळी कांचन ॥ सदा वृक्ष भेदीत गेले गगन ॥ आंत सूर्यकिरण न दिसे ॥१५॥
रावे साळ्या हंस मयूर ॥ चातकें बदकें जवादीमांजर ॥ कस्तूरीमृग सारसें सुंदर ॥ चक्रवाकें खेळती ॥१६॥
ऐसेया वनीं ॥ चांदणें यामिनीं ॥ पाहोनियां शारंगपाणी ॥ पांवा वाजवी कैवल्यदानी ॥ वृंदावनीं तेधवां ॥१७॥
श्रीकृष्ण परब्रह्म निर्मळ ॥ सगुणरुप अतिवेल्हाळ ॥ जो सजलजलदवर्ण तमालनीळ ॥ परममंगलदायक जो ॥१८॥
सांवळे सुहास्यवदन ॥ आकर्णविशाळ राजीवनयन ॥ मुरली वाजवी छंदेकरुन ॥ आनंदघन श्रीकृष्ण ॥१९॥
कोटयनुकोटी मीनकेतन ओंवाळिजे मुखचंद्रावरुन ॥ पूर्णकाम रमारमण ॥ मोहिलें मन गोपिकांचें ॥२०॥
ऐकोनि मुरलीचा ध्वनी ॥ वेधल्या गोकुळींच्या नितंबिनीं ॥ देह गेह सकळ विसरोनी ॥ निघती वनीं हरि पाहूं ॥२१॥
नाना शास्त्रांचें श्रवण ॥ हें एक करिती गोदोहन ॥ गोपी तें सकळ टाकून ॥ निघती मनमोहन पहावया ॥२२॥
सारासारविचारणा ॥ एकीनें आरंभिलें घुसळणा ॥ तें सांडूनि जनार्दना ॥ पहावया चालिली ॥२३॥
नाना इंद्रियांच्या वृत्ती ॥ हींच बाळें घरीं टाकिती ॥ हरिपद पहावया धांवती ॥ प्रेम चित्तीं न सांवरे ॥२४॥
नाना तीर्थपर्यटन ॥ एक सांडिती हें नाहण ॥ सांडिलें प्रपंचवसन ॥ शरीर नग्न नाठवे ॥२५॥
नाना व्रतें तपें चोखणी ॥ एक बैसली शिरीं लावुनी ॥ ऐकतांचि मुरलीध्वनी ॥ जात कामिनी तैसीच ॥२६॥
वायु धारण अष्टांगसाधन ॥ हेंचि करीत होती भोजन ॥ तें तैसेंचि सांडून ॥ खंजनाक्षी चालिली ॥२७॥
प्रवृत्तीचें अलंकार ॥ एक लेऊं विसरली सुंदर ॥ लज्जेची बुंथी परिकर ॥ सांडूनि सत्वर चालिली ॥२८॥
एक पडली कर्मजाळीं ॥ स्वयंपाक करिती सोंवळी ॥ मनीं आठवतां मूर्ति सांवळी ॥ जाय वेल्हाळी सत्वर ॥२९॥
एक समाधिशेजे निजतां कामिनी॥ तों ऐकिला मुरलीचा ध्वनी ॥ समाधीहूनी गोडी हरिचरणीं ॥ जात कामिनी सांडोनियां ॥३०॥
नाना साधनें दळणधंदा ॥ सांडोनि चालिली एक मुग्धा ॥ एक सांडोनिया वादप्रतिवादा ॥ ब्रह्मानंदा पाहों जाय ॥३१॥
ऐशा गोपी चालिल्या समस्त ॥ कृष्णचरणीं जाहल्या आसक्त ॥ वृंदावनीं पांवा वाजवीत ॥ ऐकोनि निश्चित धांवती ॥३२॥
असंख्य गोपींची मंडळी ॥ वेगें आली हरीजवळी ॥ भोंवता वेष्टिला वनमाळी ॥ गोपी सकळी मिळोनियां ॥३३॥
हरि म्हणे तयांतें ॥ सांडोनियां गृहधर्मातें ॥ टाकोनियां निजपतीतें ॥ किमर्थ येथें पातलां ॥३४॥
आपुला पति तो ईश्वर ॥ मानूनि भजावें निरंतर ॥ ऐसें ऐकतां कानीं उत्तर ॥ गोपी सद्गद जाहल्या ॥३५॥
अहा मंगळधामा श्रीकृष्णा ॥ आम्ही सांडूनि संसारतृष्णा ॥ शरण आलों तुझिया चरणा ॥ तूं या वचना बोलसी ॥३६॥
अद्वयदृष्टीनें पाहिलें जरी ॥ तूंचि अससी पतींचें अंतरीं ॥ येथेंही तूंचि मुरारी ॥ ऐकतां पूतनारि हांसतसे ॥३७॥
त्यांचा अंतरभाव जाणोनी ॥ वश जाहला मोक्षदानी ॥ रासमंडळ रचोनी ॥ चक्रपाणी खेळतसे ॥३८॥
जैसी कां ओंविली माळ ॥ सुवर्णमणि आणि इंद्रनीळ ॥ एक गोपी एक घननीळ ॥ हस्त धरिती परस्परें ॥३९॥
तप्तकांचनवर्ण गोपीबाळा ॥ मध्यें इंद्रनीळ घनसांवळा ॥ ह्या वेदश्रुती निर्मळा ॥ हरिरुपीं जडल्या हो ॥४०॥
एक गोपी एक कृष्ण ॥ परस्परें स्कंधीं हात ठेवून ॥ नृत्य करिती तें पाहतां तल्लीन ॥ अष्ट नायिका पैं होतीं ॥४१॥
गाती सुरस सुस्वर ॥ ऐकतां तटस्थ होती किन्नर ॥ जगद्वंद्य गात मधुर ॥ प्राणी चराचर विस्मित ॥४२॥
दिव्य मोतियांचे हार पूर्ण ॥ गोपींच्या गळां दिसती सुवर्णवर्ण ॥ तींच मोत्यें इंद्रनीळासमान ॥ हरीच्या गळां शोभती ॥४३॥
असंख्य रुपें धरुनि हरी ॥ नाचत गोपिकांमाझारी ॥ पाचूचीं पदकें हृदयावरी ॥ झळकताती सर्वांच्या ॥४४॥
षोडशकळी नक्षत्रनायक ॥ दिसे अत्यंत आल्हादकारक ॥ यमुनापुलिनभूमीवर देख ॥ राम सुरेख मांडिला ॥४५॥
शरत्काळ परमसुंदर ॥ कुमुदिनींवर रुणझुणती भ्रमर ॥ येत सुगंध मलयसमीर ॥ सकळ तरुवर फुलले हो ॥४६॥
जैसा विद्युल्लताभार गगनीं ॥ तैशा तळपती दिव्य कामिनी ॥ तेथींच्या दिव्य सुवासेंकरुनीं ॥ दाही दिशा दाटल्या ॥४७॥
जे ते गोपीसी वाटत ॥ कीं मजपाशीं असे भगवंत ॥ परी त्याचें रुपासी नाहीं अंत ॥ विश्वंभर जगदात्मां ॥४८॥
गौरवर्ण खंजरीटनयना ॥ मध्यें घननीळ वैकुंठराणा ॥ जे ते गोपीस वाटे जाणा ॥ कीं मीच कृष्ण भोगितें ॥४९॥
कृष्ण जलदवर्ण साजिरा ॥ माजी सौदामिनी त्या सुंदरा ॥ कीं त्या सुवर्णलतिका परिकारा ॥ सुकल्या कामानळेंचि ॥५०॥
त्यांचे पूर्ण काम पुरवीत ॥ श्रीरंग नीरद वर्षत ॥ कीं श्रीकृष्ण नक्षत्रनाथ ॥ गोपी उडुगण शोभती ॥५१॥
कीं श्रीकृष्ण वासरमणी ॥ भोंवतीं किरणें नितंबिनी ॥ प्रतिभास मित्रकन्याजीवनीं ॥ तैशाचि तेथें तळपती ॥५२॥
गोपींचीं कुंडलें आणि नयन ॥ हेचि प्रतिबिंबीं तळपती मीन ॥ गोपीकुच हेंचि तारक घेऊन ॥ मीनकेतन पोहतसे ॥५३॥
कीं त्या वनामाजी सुंदर ॥ अनंग हाचि नृपवर ॥ केशकुसुम वर्तुळाकार ॥ हेंचि छत्र तयाचें ॥५४॥
पाडळीपुष्पें परिकर ॥ हाचि माजी बांधिला तूणीर ॥ केतकीपुष्पांतील लघुपुत्र ॥ तोचि कुंत निजकरीं ॥५५॥
किं केतकीपत्रें थोर थोर ॥ हाचि कर्वत परम तीव्र ॥ मस्तकीं घालोनियां भार ॥ कर्वती विषयपरांसी ॥५६॥
असो नाचतां रासमंडळीं ॥ गोपीमुखां मुख लावी वनमाळी ॥ तांबूल घाली मुखकमळीं ॥ सुखी वेल्हाळी होती त्या ॥५७॥
जे जे कामिनीचें जैसें मन ॥ तैसाचि होय जगन्मोहन ॥ तिची अंतरकळा देखोन ॥ करुनि स्तवन सुखी करी ॥५८॥
चंदनें चर्चित हस्त ॥ गोपींच्या कुचयुगीं ठेवीत ॥ क्षणक्षणां चुंबन देत ॥ नाचत नाचत तयांतें ॥५९॥
ऐशा नाचतां भागल्या कामिनी ॥ हरिकंठीं मिठी घालोनी ॥ मग सुरतयुद्धालागोनी ॥ सुखशयनीं प्रवर्तल्या ॥६०॥
पूर्णकाम रमानाथ ॥ सर्वांचे पुरवी मनोरथ ॥ जे ते भावी मनांत ॥ सुख समस्त मीच भोगीं ॥६१॥
गोपीच्या वदनेंदूवरी ॥ श्रमबिंदु देखतांचि हरी ॥ पुसूनि आपुल्या पीतांबरीं ॥ मन हरी तयांचें ॥६२॥
गोपींचे कुच कुंकुम चर्चित ॥ हरिअंगीं त्या मुद्रा उमटत ॥ कस्तूरीमळवट पुसत ॥ मुख चुंबितां परस्परें ॥६३॥
हृदयग्रंथीं कंचुकीच्या ॥ हस्तें तुटल्या जगद्गुरुच्या ॥ निर्या फेडिल्या नारींच्या ॥ तारिल्या साच कामिनी ॥६४॥
सेवितां हरीचें अधरामृत ॥ गोपींचा काम दुणावत ॥ आंगींचा चंदन समस्त ॥ ठायीं ठायीं पुसतसे ॥६५॥
गोपींच्या नेत्रींची अंजनें ॥ हरुनि नेलीं निरंजनें ॥ कुचग्रहणें जगज्जीवन ॥ अधररंग हरियेला ॥६६॥
ऐशा क्रीडा करितां वनमाळी ॥ धर्म पातलिया वेल्हाळी ॥ मग रिघोनि यमुनाजळीं ॥ विचित्र खेळ खेळती ॥६७॥
तों एक बोलती कामिनी ॥ चला मागुती क्रीडों वनीं ॥ त्यांचें वचन मानी चक्रपाणी ॥ पूर्णकाम म्हणोनियां ॥६८॥
आनंदें गोपींशीं क्रीडतां ॥ श्रम न वाटेचि कृष्णनाथा ॥ जो महाराज ऊर्ध्वरेता ॥ ब्रह्मचारी निर्वाण ॥६९॥
अष्टवर्षांची मूर्ति ॥ वीर्यासी नाहीं अधोगति ॥ लीलाकौतुक यदुपति ॥ भक्तांलागी दावीतसे ॥७०॥
जे कां विषयपर जन ॥ न करिति लीला श्रवण ॥ त्यांसी श्रृंगाररस दावून ॥ वेधी मन आपणाकडे ॥७१॥
षण्मासांची करुनि राती ॥ उद्धरिल्या कामभोगे युवती ॥ त्या कथा वाचितां जन उद्धरती ॥ गोपी न तरती कैशा पां ॥७२॥
ज्यास ज्या रसाची प्रीती ॥ ते ते दावूनि उद्धरी श्रीपति ॥ नवरसलीला नवविध भक्ति ॥ दावी यदुपति तारावया ॥७३॥
गोपींशीं क्रीडला यादवेंद्र ॥ आपण तैसेंचि करुं पाहती जे नर ॥ ते केवळ अज्ञान पामर ॥ नरक घोर भोगिती ॥७४॥
कृष्णें केलें विषपान ॥ यांसी आणुमात्र न करवे सेवन॥ हरीनें उचलिला गोवर्धन यांसी ॥ जड पाषाण उचलेना ॥७५॥
कृष्णें महाअग्नि केला प्राशन ॥ यांवरी पडतां स्फुलिंग येऊन ॥ दुरी पळती भिऊन ॥ हरिसमान होऊं म्हणती ॥७६॥
हरि भोगूनि अनंत नारी ॥ शेखीं ऊर्ध्वरेता ब्रह्मचारी ॥ त्याची करुं पाहती जे सरी ॥ तेचि भवपूरीं बुडाले ॥७७॥
स्त्रीसमागमें इतर जन ॥ होती ते तेजहीन कुलक्षण ॥ ऊर्ध्वरेता जगन्मोहन ॥ सतेज पूर्ण सर्वदा ॥७८॥
कृष्णें केलें परद्वार ॥ परशुरामें उडविलें मातेचें शिर ॥ तैसेंचि करुं म्हणती जे नर ॥ तेचि पामर अभाग्य ॥७९॥
यालागीं हरिपदीं मन ठेवून ॥ करा रासक्रीडा श्रवण ॥ तेणें तोषोनि जगज्जीवन ॥ निर्विषय करी निजभक्तां ॥८०॥
असो आताम भगवान ॥ पुढती रासमंडळ रचोन ॥ जे जे गोपीचें जैसें मन ॥ तैसा आपण होतसे ॥८१॥
एकीस कडेवरी घेऊनी ॥ दूरी नेत एकांतस्थानीं ॥ एकी कृष्णअंकीं शिर ठेवूनी ॥ श्रमोनि कामिनी निजतसे ॥८२॥
एक रुसली हरीवरी ॥ तीस समजावीत मुरारी ॥ एकीचें वदन कुरवाळित करीं ॥ म्हणे तुज पळभरी न विसंबे ॥८३॥
एकीच्या अंगावर टाकोनि अंग ॥ प्रीतीनें निजतसे श्रीरंग ॥ असंख्य रुपेम धरुनि कोमलांग ॥ मनोभाव पुरवीतसे ॥८४॥
एकीच्या नयनीं अश्रु आले ॥ ते हरीनें निजकरीं पुशिले ॥ रमेहूनि भाग्य आगळें ॥ गोपिकांचें वाटतसे ॥८५॥
एकीस स्कंधी घेऊनी ॥ नेवोनि निजवी कीं शयनीं ॥ एकीचे मुखीं तांबूल घालूनी ॥ चक्रपाणी हरी मन ॥८६॥
असो ऐसा क्रीडतां जगज्जीवन ॥ गोपींनीं धरिला अभिमान ॥ म्हणती कृष्ण जाहला आम्हांआधीन ॥ बोलें आमुच्या वर्ततसे ॥८७॥
जो ब्रह्मादिकां न पडे दृष्टी ॥ आम्ही तो वश केला जगजेठी ॥ ज्यासी हृदयीं ध्यात धूर्जटी ॥ तो घाली मिठी आमुच्या गळां ॥८८॥
आम्ही सकळांमाजी थोर ॥ आमुचें वचन ऐके श्रीधर ॥ ऐसा अभिमान देखतां मुरहर ॥ केलें विचित्र तेधवां ॥८९॥
असंख्य रुपांसहित भगवान ॥ गुप्त जाहला न लागतां क्षण ॥ अभिमानच्छेदक मनमोहन ॥ त्यासी दुजेपण सोसेना ॥९०॥
गुप्त होतांचि भगवंत ॥ गोपी चमकल्या समस्त ॥ शोक करिती अद्भुत ॥ अहा कृष्णनाथ दिसेना ॥९१॥
षोडशकलायुक्त अत्रिसुत ॥ चांदणें पडिलें घवघवित ॥ वनें उपवनें गोपी शोधीत ॥ कृष्णप्राप्तीकारणें ॥९२॥
अघहारकें अतिउत्तमें ॥ घेऊनियां कृष्णनामें ॥ गोपी बाहती संभ्रमें ॥ ज्या पूर्णकामें मोहिल्या ॥९३॥
यादवकुळदीपका हरी ॥ आम्हांसी सांडूनि वनांतरीं ॥ गेलासी कोठें पूतनारी ॥ व्रजनारी टाकोनियां ॥९४॥
नाना वृक्ष लागले वनीं ॥ त्यांलागीं पुसती गजगामिनी ॥ तुम्ही देखिला चक्रपाणी ॥ सांगा आम्हांसी सत्वर ॥९५॥
जाई जुई चंपक ॥ वट जंबु पारिजातक ॥ त्यांसी पुसती वैकुंठनायक ॥ देखिला काय तुम्हीं सांगा ॥९६॥
अश्वत्थ बिल्व मांदार ॥ फणस चूत कदंब अंजीर ॥ तयांसी पुसती श्रीधर ॥ देखिला काय सांगा पां ॥९७॥
केळी नारिकेली पोफळी ॥ बकुळ रातांजनें रायआंवळी ॥ त्यांसी पुसती वनमाळी ॥ देखिला काय सांगा पां ॥९८॥
अगर तगर कांजन ॥ पाडळी देवदार अर्जुन ॥ तयांसी पुसती जगन्मोहन ॥ देखिला काय सांगा पां ॥९९॥
खर्जुरी डाळिंबी महाळुंग ॥ बदरी खिरणी मातुलिंग ॥ तयांसी पुसती श्रीरंग ॥ देखिला काय सांगा पां ॥१००॥
जपा शतपत्र मालती ॥ मोगरे करवीर शेवंती ॥ तयांसी पुसती जगत्पती ॥ देखिला काय सांग पां ॥१॥
तुलसीस पुसती सुंदरी ॥ तुजवरी प्रीति करी मुरारी ॥ सखे तुवां देखिला पूतनारी ॥ तरी सांग आम्हांतें ॥२॥
भ्रमरा तूं कृष्णवर्ण ॥ देखिला काय मनमोहन ॥ तो जगद्वंद्य आम्हांसी सांडून ॥ कोठें गेला नेणवे ॥३॥
मयूरासी पुसती नारी ॥ तुझीं पिच्छें खोविलीं शिरीं ॥ कोकिळ तुवां कंसारी ॥ देखिला काय सांग वो ॥४॥
वनीं क्रीडती राजहंस ॥ तयासी पुसती परमपुरुष ॥ चातकें चक्रवाकें सारस ॥ हृषीकेशाशी पुसती पैं ॥५॥
बक बदक काक रावया ॥ कस्तूरीमृग नकुळ साळया ॥ देखिलें काय सांवळिया ॥ विलासिया डोळसातें ॥६॥
ऐशा गोपी बहु शीणती ॥ दाही दिशा विलोकिती ॥ अनंतनामीं आळविती ॥ परी श्रीपती दिसेना ॥७॥
तों पदमुद्रा देखिल्या नयनीं ॥ कडेवरी घेऊनि गेला एक कामिनी ॥ तिची आपुल्या हातें घातली वेणी ॥ तींही चिन्हें दिसताती ॥८॥
तिणें तोडिलें पुष्पांतें ॥ टांचा उमटल्या नाहीं तेथें ॥ उंच होवोनि ऊर्ध्वहस्तें ॥ अरळ कळिका तोडिल्या ॥९॥
त्यांची शेज रचोनी ॥ वरी भोगिला चक्रपाणी ॥ देखतां क्षोभल्या कामिनी ॥ मत्सरें मनीं संतप्त ॥११०॥
तीस खांदीं घेवोनि ॥ पुढें गेला मोक्षदानी ॥ टांचा बळें रुतल्या धरणीं ॥ चिन्हें तेव्हां ओळखिलीं ॥११॥
तों तिणेंही गर्व केला ॥ तीसही हरि टाकूनि गेला ॥ तळमळीत बैसली बाला ॥ म्हणती गोपी तियेतें ॥१२॥
एकांतीं भोगूनि हरी ॥ शेखीं पडलीस वनांतरीं ॥ ऐशा अभिमानें गोपनारी ॥ हरिचरणा दुरावल्या ॥१३॥
अंतरीं असतां यादवेंद्र ॥ व्यर्थ शोधिती गिरिकंदर ॥ जवळी असे रत्न परिकर ॥ जन्मांधासी नेणवे ॥१४॥
नाभीसी असोनि कस्तूरी ॥ व्यर्थ मृग हिंडें वनांतरीं ॥ किंवा दरिद्रियांचे द्वारीं ॥ निधान असोनि न दिसे कीं ॥१५॥
कीं कोणी एक अबळा ॥ दिव्य मुक्त असे तिच्या गळां ॥ व्यर्थ लोकांच्या गळां वेल्हाळा ॥ पडे मुक्त गेलें म्हणोनि ॥१६॥
दोन तीन पांचां ठायीं ॥ कृष्ण न दिसे तेथें कांहीं ॥ शेखीं दहा अकरा पाहीं ॥ शोधिल्याही न सांपडे ॥१७॥
शोधिलीं पांच सतरा पंचवीस ॥ दृष्टीं न पडे रमाविलास ॥ शोधूनि पाहिलीं छत्तीस ॥ परमपुरुष न सांपडे ॥१८॥
श्रेष्ठ निवडिल्या चौघीजणी ॥ म्हणती आम्ही शोधूं चक्रपाणी ॥ तों त्या नेति नेति म्हणोनि ॥ लाजोनि जाहल्या तटस्थ ॥१९॥
आणिक एक सहाजणी कैशा ॥ धूंडूं म्हणती विश्वाधीशा ॥ बहुत तार्किका डोळसा ॥ लाजोनियां परतल्या ॥१२०॥
अठराजणी नवरसिका ॥ धुंडूं म्हणती रमानायका ॥ त्यांचाही सरला आवांका ॥ लाजोनि उग्या राहिल्या ॥२१॥
आणिक एक अठराजणी ॥ निराळ्या फुटल्या चौघीजणी ॥ शोधिती बारा सोळा कामिनी ॥ गदापाणी न सांपडे ॥२२॥
बारा सोळा चौदा नारी ॥ चौसष्टी दाविती कळाकुसरी ॥ त्यांहीवेगळा कंसारी ॥ नाढळे संसारीं लोकांतें ॥२३॥
एक म्हणती आम्ही धनवंता ॥ वश्य करुं कृष्णनाथा ॥ याचपरी अभिमानें तत्त्वतां ॥ नाडल्या बहुत कामिनी ॥२४॥
एक बलवंत म्हणविती ॥ एक विद्यामदें मुसमुसती ॥ हातींचा गेला श्रीपती ॥ तो निश्चितीं नेणवे ॥२५॥
एक दाविती नाना कळा ॥ कळा तितुक्या जाहल्या विकळा ॥ नेणती ब्रह्मानंदा निर्मळा ॥ कळा विकळा तितुक्याही ॥२६॥
नाना तपें घोर वनें ॥ एक करिती वातांबुपर्णाशनें ॥ एक दाविती पंचाग्निसाधनें ॥ परी जगज्जीवन दुरावला ॥२७॥
विधिनिषेध कर्मजाळ घोर ॥ एक चढती हाचि डोंगर ॥ शोधिती नग्न मौनी जटाधर ॥ परी श्रीधर दुरावला ॥२८॥
एक अष्टांगसाधनें दाविती ॥ षट्चक्रांचे कडे वेंधती ॥ पवनवेगें एक धुंडिती ॥ परी यदुपति दुरावला ॥२९॥
जों जों करिती साधन ॥ तों तों खवळे अभिमान ॥ दुरावला नारायण ॥ अबला खूण नेणती ॥१३०॥
मग सर्व गोपी होवोनि गोळा ॥ आठवोनि श्रीकृष्णलीळा ॥ दाविती नाना कौतुककळा ॥ अंगें आपुल्या करोनियां ॥३१॥
एकीं होय उखळ ॥ दुजी होय कृष्ण वेल्हाळ ॥ तिजी यशोदा होवोनि तत्काळ ॥ दांवें बांधी कृष्णातें ॥३२॥
दोघी यमलार्जुन होती वेगें ॥ एक माजी उखळ होऊनि एक रांगे ॥ एक कृष्ण होवोनि निघे ॥ घरोघरीं चोरीस ॥३३॥
एक यशोदा होवोनि बैसली ॥ एक गार्हाणें ते तिजजवळी ॥ आवरीं तुझा वनमाळी ॥ करितों कळी बहुसाल ॥३४॥
एकीने वस्त्रांचा गुंडाळा करुन ॥ नखीं धरिला म्हणे गोवर्धन ॥ एक पूतना होऊन ॥ करवी स्तनपान कृष्णातें ॥३५॥
सवेंचि शोषी म्हणोन ॥ भूमीवरी करी शयन ॥ एक वृंदावनीं वेणु घेऊन ॥ वाजवीत उभी राहे ॥३६॥
पेंधा सुदामा वडजा ज्या रीतीं ॥ ऐशा गोपी वेष दाविती ॥ गडियाचे कानीं लागे श्रीपती ॥ गडे हो गोष्टी एक ऐका ॥३७॥
चोरीस जाऊं एके सदनीं ॥ निजम्या अवघ्या गौळणी ॥ तुम्ही सरांटे घेऊनी ॥ पसरा पायथां तयांच्या ॥३८॥
जवळी असों द्या मृत्तिका ॥ जरी जाग्या जाहल्या गोपिका ॥ सरांटे पायीं लागती देखा ॥ तों तुम्ही मृत्तिका टाका नयनीं ॥३९॥
त्या चोळिती जंव नयन ॥ तंव तुम्ही पळा रे तेथून ॥ रात्रीं चोरीस गेलों जरी पूर्ण ॥ तरी खडे घेऊन प्रवेशावें ॥१४०॥
मौनेंचि द्यावे खडे टाकून ॥ शिंकीं खडखडती आपण ॥ मग भाले काठिया टोंचून ॥ छिद्र पाडून दूध पिऊं ॥४१॥
ऐसे बाळपणींचे भाव ॥ गोपी दाविती लीला सर्व ॥ एक काला कैसा करी माधव ॥ तोचि भाव दाविती ॥४२॥
कमळाकार सवंगडे ॥ मध्यें तमालनीळ रुपडें ॥ सन्मुख कृष्ण दृष्टी पडे ॥ चहूंकडे सकळांसी ॥४३॥
हरि सन्मुख देखती दृष्टीं ॥ कोणासी न दिसे कृष्णाची पाठी ॥ भक्तांसन्मुख जगजेठी ॥ समसमान सर्वदा ॥४४॥
ऐशा नाना लीला गोपिका ॥ अंगेंकरुनि दाविती देखा ॥ कालियामदनाचा भाव निका ॥ नाचोनि दाविती तैशाचि ॥४५॥
अघ बक केशी हरीनें मारिला ॥ त्या त्या आचरोनि दाविती लीला ॥ नंद सर्पमुखींहूनि सोडविला ॥ तैशीच रीती दाविती ॥४६॥
ऐशा बाळलीला स्मरोनी ॥ मागुती हरीस धुंडिती वर्नी ॥ अहा आत्मयारामा शारंगपाणी ॥ आम्हांसी वनीं टाकिलें कां ॥४७॥
तूं नंदगृहीं जन्मलासीं गोपाळा ॥ म्हणोनि येथें राहिली कमळा ॥ गोकुळीं सर्वांसी सुखसोहळा ॥ तरी दुःख ये वेळे आम्हांसी कां ॥४८॥
जगद्वंद्या ब्रह्मांडनायका ॥ दावीं तुझिया वदनशशांका ॥ कां तूं शिणविसी गोपिका ॥ सुखदायका श्रीरंगा ॥४९॥
तुज हुडकितां ये वनीं ॥ बहु श्रमलों चक्रपाणी ॥ तुझ्या बटकी आम्ही होवोनी ॥ मोलाविण राबतों ॥१५०॥
आम्हांसी देऊनि भोगदान ॥ गुप्त जाहलासी तूं मनमोहन ॥ सकळांसी आडामध्यें घालून ॥ दोर कापून गेलासी ॥५१॥
कालियासी तुवां मर्दिलें ॥ सकळ गोकुळ सुखीं राखिलें ॥ गोपिकांसी कां लोटूनि दिधलें ॥ संकटार्णवीं ये वेळे ॥५२॥
गोकुळ गिळीन म्हणे सगळें ॥ अघासुरें हें मनीं धरिलें ॥ त्यासी उभें चिरोनि आम्हांसी रक्षिलें ॥ आतां कां केलें कठिण मन ॥५३॥
इंद्र वर्षला शिळाधारीं ॥ तेथें उचलोनि तुवां गोवर्धनगिरी ॥ आतां कठिण चित्त मुरारी ॥ आम्हांवरी कां केलें ॥५४॥
लोकव्यवहारें निश्चित ॥ तूं म्हणविसी नंदसुत ॥ सकाळांतरीं तूं साक्षीभूत ॥ मायातीत अगम्य ॥५५॥
तूं क्षीरसागरीं असतां नारायण ॥ कमलोद्भव आणि पाकशासन ॥ हे तुज आले पूर्वीं शरण ॥ दैत्य माजले म्हणोनियां ॥५६॥
यालागींच यदुवंशीं ॥ जगदात्मया अवतरलासी ॥ दुष्ट मारुनि भक्त पाळिसी ॥ कां आम्हांसी उपेक्षिलें ॥५७॥
प्रकट होईं तूं झडकरी ॥ वरदहस्त तुझा कंसारी ॥ ठेवूनियां आमुचे शिरीं ॥ काम हरीं अंतरींचा ॥५८॥
क्षीराब्धीमाजी प्रकटली कमळा ॥ तिचा हस्त तू धरिसी गोपाळा ॥ त्याच हस्तें घननीळा ॥ आमुचा हस्त धरीं कां ॥५९॥
हरि तूं हांसतां बोलसी वचन ॥ आमुचें होय तेणें गर्वच्छेदन ॥ प्रभूनें अन्याय पाहोन ॥ दंड करावा तैसाचि ॥१६०॥
नख लागतां जे पडणार ॥ त्यासी कासया पाहिजे कुठार ॥ वातें कमळिणी कांपे थरथर ॥ तीवरी वज्र कासया ॥६१॥
भणगें बैसलीं पात्रांवरी ॥ ती समर्थें घातली जरी बाहेरी ॥ तरी त्या भणगांचें मुरारी ॥ काय चाले सांग पां ॥६२॥
सुखाची हे परम रजनी ॥ ऐसें आम्हीं भाविलें मनीं ॥ परी कर्मांची दुर्धर करणी ॥ सांडिले वनीं आम्हांते ॥६३॥
सुरभीची काढितां धार ॥ तों शेराचे चिकें भरलें पात्र ॥ तूं दुरावतां नवपंकजनेत्र ॥ कर्म विचित्र ओढवलें ॥६४॥
सुरतरुजवळी मागावया ॥ याचक आला धांवोनियां ॥ तों तेणें शुष्क काष्ठ घेवोनियां ॥ मग तया मारिलें ॥६५॥
गंगेसी ठाव नेदी समुद्र ॥ तरी पुढें काय त्याचा विचार ॥ जळचरांवरी कोपलें नीर ॥ तरी गति पुढें कायसी ॥६६॥
दुग्धमधुघृतकासारीं जाण ॥ जळचरें सोडितां त्यागिता प्राण ॥ त्यांसी गति नाहीं उदकाविण ॥ आम्ही शरण तैशा तुज ॥६७॥
माता बाळकासी पायें लोटी ॥ परी तें चरणींच घाली मिठी ॥ भुवनसुंदरा जगजेठी ॥ आम्ही तैशा तुजलागीं ॥६८॥
सुधारसाची आस धरितां ॥ विष केवळ ये हाता ॥ करुणासागरावरी तत्त्वतां ॥ लहरी क्रूर कां आली ॥६९॥
मातेनें तान्हया विष दिधलें ॥ पित्यानें पुत्रासी विकिलें ॥ तारकें कांसेनी लावोनि ओसंडिलें ॥ तरी शरण जावें कवणापासीं ॥१७०॥
राजयानें सर्वस्व हरिलें ॥ पाठिराख्यानें शिर छेदिलें ॥ गुप्त होवोनि घननीळें ॥ तैसें केलें आम्हांसी ॥७१॥
ब्रह्मांडपति यादवकुळदीपका ॥ दावीं तुझ्या वदनशशांका ॥ आम्ही अन्यायी दासी तुझ्या गोपिका ॥ व्रजनायका पाव वेगीं ॥७२॥
परम सुकुमार तुझे चरण ॥ वनीं खुपती कीं कठिण पाषाण ॥ यालागीं आमुचे प्राण ॥ कासावीस होताती ॥७३॥
ज्या चरणीं सिंधुकुमारी ॥ लुब्ध होवोनि झाली भ्रमरी ॥ तो चरण आमुचे हृदयावरी ॥ श्रीमुरारी ठेवी कां ॥७४॥
काम आमुच्या हृदयजीवनीं ॥ हाचि कालिया मर्दी चक्रपाणी ॥ निष्काम करुनि तुझे चरणीं ॥ ठेवीं आम्हांसी निरंतर ॥७५॥
वियोगानळें तापलों तत्त्वतां ॥ तुझें अधरामृत पाजी रमानाथा ॥ मधुरवचनीं आम्हांसी आतां ॥ बोलें त्वरित येवोनि ॥७६॥
तुझा वियोग होतांचि जाण ॥ तत्काळ जातो आमुचा प्राण ॥ परी तुझें कथामृत आठवून ॥ वांचलों जाण श्रीधर ॥७७॥
संसारतापें जे संतप्त ॥ तुझ्या कथामृतें ते सर्व निवत ॥ परी तुझी कथा आणि अमृत ॥ समान कदा न होती ॥७८॥
स्वर्गींचे राहणार देख ॥ ते म्हणती अमृत क्षणिक ॥ तुझ्या कथामृतीं आस्था सकळिक ॥ धरिती देव स्वर्गीचे ॥७९॥
जिव्हेवरी घालितां अमृत ॥ पळभरीच गोड लागत ॥ परी श्रवणनयनांसी तृप्त ॥ कदा न करी सर्वथा ॥१८०॥
तैसी नव्हे तुझी कथा ॥ वाचेसी गोड लागे गीत गातां ॥ श्रवणीं आवडे श्रवण करितां ॥ गोडी त्याहोनि विशेष ॥८१॥
नयनीं पाहतां तुझे ग्रंथ ॥ विशेष गोडी वाढत ॥ दाही करणांसमवेत ॥ अंतर तृप्त होतें पैं ॥८२॥
आपण तृप्त होऊनि अंतरीं ॥ इतरांसही आपणाऐसें करी ॥ ऐसी गोड कथा तुझी हरी ॥ तारी जनां समस्तांही ॥८३॥
जैसें लोहाचें कडियाळें ॥ ताजवीं घालूनि रत्न जोखिले ॥ तुळाभार समसमान आलें ॥ परी मोला आगळें रत्न कीं ॥८४॥
तैसीच कथा आणि अमृत ॥ उगाचि द्यावा दृष्टांत ॥ परी तुझी कथा अद्भुत ॥ सुधारस तुच्छ तेथें ॥८५॥
कांच आणि पाच निश्चित ॥ अजा आणि ऐरावत ॥ दीप आणि आदित्य ॥ समान कैसी होती पां ॥८६॥
भक्त आणि निंदक ॥ श्रोत्रिय आणि हिंसक ॥ तैसें अमृत आणि कथा सुरेख ॥ समान नव्हे सर्वथा ॥८७॥
त्याच कथामृतेकरुनी ॥ आम्ही वांचलों गोपकामिनी ॥ मनमोहन चक्रपाणी ॥ भेटें येऊनि सत्वर ॥८८॥
त्वरित येवोनि चक्रपाणी ॥ चरण लावीं आमुचे स्तनीं ॥ अधरीं वेणु वाजविसी धरुनी ॥ तोचि अधर सदैव वाटतो ॥८९॥
अखंड अधरामृत सेवी ॥ अवघ्यांहुनि थोर त्याची पदवी ॥ एकदां तुझे चरण दावीं ॥ ज्यांसी महाकवि वर्णिती ॥१९०॥
हरि तुझे चरण न पडतां दृष्टी ॥ युगासमान जाती त्रुटी ॥ सुंदरा डोळसा जगजेठी ॥ आम्ही हिंपुटी तुजलागीं ॥९१॥
तुझें मुख पाहतां नयनीं ॥ पापण्या लवती क्षणक्षणीं ॥ त्या नावडती आम्हांलागुनी ॥ विक्षेप ध्यानीं करिती ज्या ॥९२॥
तुझें लक्षितां श्रीमुख ॥ हरे सकळ संसारदुःख ॥ तेथें पापण्या विक्षेपकारक ॥ पापिणी निश्चिती त्या होती ॥९३॥
पापण्या विघ्न परम ध्याना ॥ मग आम्ही निंदितों चतुरानना ॥ अहा रे विधातया शाहण्या ॥ व्यर्थ पापण्या त्वां केल्या ॥९४॥
टाकूनि पति सुत बंधु जनका ॥ तुज पावलों कमलानायका ॥ हरि तूं परम कपटी नाटक्या ॥ जवळी असतां न दिसती ॥९५॥
अहा श्रीरंग आत्मयारामा ॥ निजभक्तकामकल्पद्रुमा ॥ पुराणपुरुषा पूर्णब्रह्मा ॥ भेटोनि कामना पुरवी तूं ॥९६॥
हरि तुझें देखतां वक्षःस्थळ ॥ मनीं काम होय उतावेळ ॥ तूं कोमलांग घननीळ ॥ भेटतां सकळ काम पुरे ॥९७॥
आमुचे स्तन परम कठिण ॥ अति कोमळ तुझे चरण ॥ तुझें करितां चरणसंवाहन ॥ आमुचें मन भीतसे ॥९८॥
ऐसें पद तुझें कोमल श्रीहरी ॥ हिंडसीं कोणे वनांतरीं ॥ म्हणोनि गोपिका सुस्वरीं ॥ रडती हरीकारणें ॥९९॥
गळाला सकळ अभिमान ॥ अंतरीं दृढ ठसावलें ध्यान ॥ ऐसें जाणोनि श्रीकृष्ण ॥ एकाएकीं प्रगटला ॥२००॥
किरीट कुंडलें वनमाळा ॥ आजानुबाहु कांसे पीतांबर कसिला ॥ गोपींस वाटे प्राण आला ॥ मग धांविन्नल्या न सांवरतां ॥१॥
एक लागती हरिचरणीं ॥ एक गळां दृढ मिठी घालुनी ॥ एक मुख लक्षिती नयनीं ॥ एक कामेंकरुनि विव्हळ ॥२॥
मागुती रासमंडळ रचोनी ॥ सकळांचा काम पुरवोनी ॥ तों उगवला दिनमणी ॥ गेल्या नितंबिनी गोकुळा ॥३॥
षण्मासांची करुनि राती ॥ भोगिल्या गोकुळींच्या युवती ॥ परी वीर्यासी नाहीं अधोगती ॥ उर्ध्वरेता श्रीकृष्ण ॥४॥
ज्या ज्या गौळियांच्या सुंदरी ॥ तितुक्याही होत्या निजमंदिरीं ॥ कृष्णें भोगिल्या बहुरात्रीं ॥ हेंच नवल पैं जाणा ॥५॥
तरी त्या वेदश्रुती सकळा ॥ निर्गुणरुप वर्णितां शिणल्या ॥ परी स्वरुपीं नाहीं ऐक्य जाहल्या ॥ मग अवतरल्या गोकुळीं ॥६॥
प्रवेश नोहे निर्गुणीं ॥ म्हणोनि ये वेळे जडल्या सगुणीं ॥ येर्हवीं गोकुळींच्या कामिनी ॥ पतिशयनीं होत्या त्या ॥७॥
इतुक्या गोपी भोगिल्या देखा ॥ परी हरीवरी रुसली राधिका ॥ तिचें समाधान करावया भक्तसखा ॥ कुंजवनीं प्रवेशला ॥८॥
तें श्रीजयदेव पद्मावतीरमण ॥ तेणें केलें समूळ कथन ॥ राधा हे शचीचा अवतार पूर्ण ॥ अष्टमाध्यायीं सांगितलें ॥९॥
तिचें सांगावें समूळ चरित्र ॥ तरी विशेष वाढेल हा ग्रंथ ॥ हें पद्मपुराणींचें संमत ॥ कथिलें असे जयदेवें ॥२१०॥
दशम आणि हरिवंश ॥ पद्मपुराणींच्या कथा विशेष ॥ हरिविजयीं लिहिल्या निर्दोष ॥ शब्द न ठेविजे ग्रंथातें ॥११॥
मूळावेगळी सर्वथा ॥ प्रसिद्ध नव्हेचि कदा कथा ॥ आणि या ग्रंथाचा मी कर्ता ॥ ऐसें म्हणतां दोष लागे ॥१२॥
वरदायक रुक्मिणीकांत ॥ तेणें लिहिला हरिविजय ग्रंथ ॥ त्याचें तो जाणे समर्थ ॥ मज कांहीं न कळे हें ॥१३॥
येर्हवीं मी दीन पामर ॥ तेणें माझें नाम ठेविलें श्रीधर ॥ मूर्खाहातीं हा ग्रंथ थोर ॥ कां करविला तो जाणे ॥१४॥
गोकुळींचें बाळक्रीडाकथन ॥ संपूर्ण जाहलें येथून ॥ पुढें आतां अक्रूरागमन ॥ बहु निरुपण रसाळ ॥१५॥
श्रीकृष्ण मथुरेसी जाईल ॥ प्रेमाचा सागर उचंबळेल ॥ ते कथा ऐकतां हृदय उलेल ॥ प्रेमळ सद्भाविकांचें ॥१६॥
हरिविजयग्रंथ श्रेष्ठ ॥ हें केवळ वैकुंठपीठ ॥ इंदिरानाथा त्रिभुवनवरिष्ठ ॥ तोचि प्रकट येथें दिसे ॥१७॥
वैकुंठीं अवघे समसमान ॥ चतुर्भुज घनश्यामवर्ण ॥ येथें जे सद्भावें करिती श्रवण ॥ हरिरुप पूर्ण ते होती ॥१८॥
यालागीं जें वैकुंठीं सुख पाहतां ॥ तें सुख हरिविजयश्रवणें येत हाता ॥ अनुमान न धरावा श्रोतां ॥ केवळ कविता हे नोहे ॥१९॥
ब्रह्मानंदा श्रीधरवरा ॥ श्रीमद्भीमातटविहारा ॥ पुराणपुरुषा निर्विकारा ॥ रुक्मिणीवरा श्रीविठ्ठला ॥२२०॥
इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ परिसोत सद्भक्त पंडित ॥ सप्तदशाध्याय गोड हा ॥२२१॥
अध्याय॥१७॥ओंव्या॥२२१॥
हरिविजय
श्रीधरांसारखा भगवंताच्या भक्तिप्रेमात न्हाऊन गेलेला अजोड कवी, गोपालकृष्णाच्या अति गोड लीलांचे वर्णन करतो, तेव्हा काय बहार येते.