हरिविजय

श्रीधरांसारखा भगवंताच्या भक्तिप्रेमात न्हाऊन गेलेला अजोड कवी, गोपालकृष्णाच्या अति गोड लीलांचे वर्णन करतो, तेव्हा काय बहार येते.


अध्याय १९

श्रीगणेशाय नमः ॥

जय जय श्रीकृष्ण आत्मयारामा ॥ उपाधिरहिता पूर्णब्रह्मा ॥ मंगलरुपा मंगलधामा ॥ पूर्णकामा सर्वेशां ॥१॥
अमंगल हे माझी काया ॥ मंगल नाम तुझें यदुराया ॥ तें नाम माझें हृदयीं लिहूनियां ॥ तूं स्वामियां पवित्र करीं ॥२॥
जैसा कागद खरकटा जाण ॥ त्यासी न शिवती सोवळे ब्राह्मण ॥ त्यावरी तुझें नाम करितां लेखन ॥ मग पूजन हृदयीं धरिती हो ॥३॥
तैसे हें अमंगल शरीर ॥ शुक्रशोणितमिश्रित अपवित्र ॥ अस्थि मांस मळ मूत्र ॥ येणेंकरुनि भरलेंसेम ॥४॥
अनंत जन्मींच्या पापें घोळिलें ॥ कामक्रोधलोभें खरकटलें ॥ श्लेष्मदुर्गंधीचें ओतिलें ॥ कृमीचें भरलें सदन हें ॥५॥
केवल अस्थींची मोळी ॥ शिरांनीं ठायीं ठायीं बांधिली ॥ मांसरक्तें वरीं लिंपिली ॥ त्यावरी मढविली त्वचेनें ॥६॥
जो रजस्वलेचा विटाळ ॥ सर्वांमाजी अमंगळ ॥ त्या विटाळाचें फळ ॥ वाढलें केवळ मळसूत्रें ॥७॥
ऐसें हें अमंगळ पाहीं ॥ जरी तुझें नाम लिहिलें हृदयीं ॥ मग यायेवढें पवित्र नाहीं ॥ तुझें भजनीं लावितां ॥८॥
ज्यावरी मुद्रा करी राजेंद्र ॥ तें पृथ्वीस वंद्य होय पवित्र ॥ तैसा माझें हृदयीं तूं यादवेंद्र ॥ राहोनि पावन करीं कां ॥९॥
कागद अत्यंत मोलें हीन ॥ परी मुद्रा उमटतां वंदिती जन ॥ तैसा मी अत्यंत दीन ॥ करीं पावन यदुवीरा ॥१०॥
मुक्तमाळेसंगें तंतु ॥ कंठीं घालिती भाग्यवंतु ॥ कीं सुमनासंगें मोल चढतु ॥ तैलास जैंसें विशेष पैं ॥११॥
राजा बैसे सिंहसनीं ॥ तो नमस्कारिजे थोरलहानीं ॥ माझी तनु चक्रपाणी ॥ करीं पावन तैसीच ॥१२॥
ब्रह्मानंदा यदुकुलतिका ॥ मी तुझ्या पायींच्या पादुका ॥ परी त्या वंद्य सकळिकां ॥ चरणप्रसादें तूझिया ॥१३॥
असो अठरावा अध्याय संपतां ॥ मथूरेसमीप कमलोद्भवपिता ॥ उपवनीं राहिला तत्त्वतां ॥ नंदगौळियांसमवेत ॥१४॥
यावरी अक्‍रुर चालिला तेथुन ॥ प्रवेशला हो राजभवन ॥ कंसरायास करुन नमन ॥ सर्व वर्तमान सांगतसे ॥१५॥
म्हणे घेऊनि आलों जगज्जीवन ॥ जो यादवकुळमुकुटरत्‍न ॥ जो कां नरवीरपंचानन ॥ विद्वज्जन वंदिती जया ॥१६॥
जो त्रिभुवनवंद्य सर्वांसी आर्य ॥ जो अज अजित अद्‌भुतवीर्य ॥ परमतेजस्वी प्रतापसूर्य ॥ तो यदुवर्य आणिला ॥१७॥
तमारिकन्येच्या जेणें र्‍हदजळीं ॥ कालिया रगडिला पायांतळीं ॥ जेणें क्षणमात्रें पूतना शोषिली ॥ तो वनमाळी आणिला ॥१८॥
तृणावर्त केशी अघ बक ॥ प्रलंब धेनुक वधिले सवेग ॥ जो निजभक्तहृदयारविंद्रभृंग ॥ तो श्रीरंग आणिला ॥१९॥
जो कमळनाथ कमळपत्राक्ष ॥ पद्मोद्भव आणि विरुपाक्ष ॥ ज्यासी ध्याती तो सर्वसाक्ष ॥ परमपुरुष आणिला ॥२०॥
आला ऐकोनि श्रीकृष्ण ॥ दचकलें कंसाचें अंतःकरण ॥ बुद्धि चित्त अहंकृति मन ॥ कृष्णरुप जाहलें ॥२१॥
कंसासी लागलें हरिपिसें ॥ पदार्थमात्र हरिरुप दिसे ॥ आपुलें अंतरीं श्रीकृष्ण भासे ॥ हांक आवेशें फोडिली ॥२२॥
कृष्णरुप आसन वसन ॥ कृष्णरुप दिसे भूषण ॥ भोंवते सेवक स्वजन ॥ दिसती कृष्णरुप ते ॥२३॥
स्नान करावया कंस ॥ पडदणी घेतां सर्वेश ॥ उदकीं दिसें हृषीकेश ॥ झालें मानस हरिरुप ॥२४॥
जेवावया बैसला अन्न ॥ तों अन्नांत दिसे मनमोहन ॥ कंसें हांक फोडिली दारुण ॥ मुष्टि बळोन बोलत ॥२५॥
बहुत भोगिसी पुरुषार्थ ॥ सोसीं एवढा मुष्टिघात ॥ आवेशें भोजनपात्र फोडीत ॥ अन्न विखुरत चहूंकडे ॥२६॥
रागें कंस फिरवी नयन ॥ म्हणे पाककर्त्यासी जीवें मारीन ॥ अन्नामाजी मेळवुनि कृष्ण ॥ माझा प्राण घेऊं पाहे ॥२७॥
प्राशनास आणिलें उदक ॥ तों उदकीं दिसे कमलानायक ॥ कंसें पात्र भिरकाविलें देख ॥ हांक फोडून तेधवाम ॥२८॥
हडपी देत विडिया करुनी ॥ कंस पाहे विडा उकलूनी ॥ म्हणे आंत मेळविला चक्रपाणी ॥ तुमचें मनीं मरावें म्यां ॥२९॥
पुढें दाविलें दर्पण ॥ आंत बिंबला नारायण ॥ आरसा दिधला भिरकावून ॥ सेवकजन हांसती ॥३०॥
भोंवते दैत्यांचे भार ॥ म्हणे हे अवघेच दावेदार ॥ आणा वेगीं म्हणे शस्त्र ॥ तों शस्त्र हरिरुप दिसे ॥३१॥
शस्त्र भिरकाविलें धाकें ॥ म्हणे कोठें माझें पाठिराखे ॥ मुष्टिकचाणूरादिक सखे ॥ कोठें गेले कळेना ॥३२॥
अंतःपुरामाजी प्रवेशला ॥ तों हरिरुप स्त्रियांचा मेळा ॥ हांक फोडूनि बाहेर आला ॥ भयें घाबरला पळतसे ॥३३॥
भू-आप-अनळ-अनिळ-निराळ ॥ अवघा व्यापिला घननीळ ॥ पदार्थमात्र जे ते सकळ ॥ दिसती गोपाळस्वरुप पैं ॥३४॥
ऐसें परम द्वेषेंकरुन ॥ लागलें कंसासी कृष्णध्यान ॥ असो इकडे उपवनीं जगज्जीवन ॥ काय करिता जाहला ॥३५॥
एक निद्रेंत क्रमिली रजनी ॥ सवेंचि उगवला वासरमणी ॥ नित्यनेम सारिला तेचि क्षणीं ॥ नंदादिकीं तेधवाम ॥३६॥
कृष्णें दृढ बांधिली वीरगुंठी ॥ पदकमुक्ताहार रुळती कंठीं ॥ दिव्य रत्‍नें झळकती मुकुटीं ॥ बाहुवटीं भूषणें ॥३७॥
वीरकंकणें मणगटीं ॥ दशांगुळी मुद्रिकांची दाटी ॥ बळिरामाहित जगजेठी ॥ रथावरी आरुढला ॥३८॥
मागें गौळियांचे भार ॥ लागला वाद्यांचा गजर ॥ मथुरेमाजी यादवेंद्र ॥ निजबळें प्रवेशला ॥३९॥
तों रंजक वस्त्रें धुवोनि ॥ राजगृहा जात घेऊनी ॥ त्यास म्हणे मोक्षदानी ॥ वस्त्रें देईं आम्हांतें ॥४०॥
तों त्याचा मृत्यु जवळी आला ॥ तदनुसार तो बोलिला ॥ म्हणे वस्त्रें कायसीं तुजला ॥ गोरसचोरा गौळिया ॥४१॥
तूं वनामध्यें गौळियांसीं ॥ बळकटपणें झोंबी घेसी ॥ तें तेथें न चले मथुरेसी ॥ जिवें जासी माझ्या हातें ॥४२॥
तुवां अन्याय बहुत केले ॥ म्हणोनि कंसरायें आणविलें ॥ ऐसें ऐकतां गोपाळें ॥ नवल केलें तेथेंचि ॥४३॥
कव घालोनि निजबळें ॥ रजकाचें शिर छेदिलें ॥ जैसें अरविंद खुडिलें ॥ नखाग्रेंचि अवलीळा ॥४४॥
वस्त्रें घेऊनि समस्त ॥ गौळियां वांटी कृष्णनाथ ॥ तों वाटेंत शिंपी भेटत ॥ तंतुवाय नाम तयाचें ॥४५॥
तेणें वस्त्रें आणूनि ते वेळां ॥ भावें पूजिला घनसांवळा ॥ म्हणे ब्रह्मानंदा दीनदयाळा ॥ कृपा करीं मजवरी ॥४६॥
तों कुब्जा कंसदासी ते वेळां ॥ दिव्य चंदन भरोनि कचोळा ॥ वाटे जातां देखे घनसांवळा ॥ केवळ पुतळा मदनाचा ॥४७॥
तों कुब्जा विद्रूप दिसे बापुडी ॥ कुरुप सर्वांगीं वांकुडी ॥ परी हरीरुपीं तिनें गोडी ॥ निजभावें धरिलीसे ॥४८॥
हेचि रामावतारींची मंथरा ॥ कैकयीची दासी द्वेषी रघुवीरा ॥ रामे शापिली ते अवसरा ॥ वक्र होईं सर्वांगीं ॥४९॥
मग ती लागली रामचरणीं ॥ म्हणे वर देईं चापपाणी ॥ राम म्हणे पुढें कंससदनीं ॥ दासी होसी कुरुप तूं ॥५०॥
मी कंसवधार्थ मथुरेसी येईन ॥ तेव्हां तुज वाटेस उद्धरीन ॥ असो तीस म्हणे जगज्जीवन ॥ देई चंदन आम्हांतें ॥५१॥
तो ती कुब्जा भावार्थें ॥ चंदन लावी आत्महस्तें ॥ अवलोकितां हरिमुखातें ॥ सद्गद चित्तीं जाहली ॥५२॥
अंगीं चर्चूनियां चंदन ॥ केलें हरीस साष्टांग नमन ॥ कृष्णें तीस हातीं धरुन ॥ लाविला चरण शरीरा ॥५३॥
जैसा परीस झगडतां लोहातें ॥ तत्काळ सुवर्ण होय तेथें ॥ तैसी पावली दिव्य शरीरातें ॥ अपांगपातें हरीच्या ॥५४॥
कीं उगवतां वासरमणी ॥ अंधकार पळे मुळींहूनी ॥ कीं कृष्णचंद्र उगवतां ते कुमुदिनी ॥ विकसली निजतेजें ॥५५॥
जैशा रंभा उर्वशी विलासिनी ॥ तैसीच कुब्जा दिव्य पद्मिनी ॥ हरिमुख न्याहाळीत नयनीं ॥ मंजुळवचनीं बोलत ॥५६॥
मीनकेतनमोहना मेघश्यामा ॥ हिमनगजामातमनविश्रामा ॥ चाल आतां माझिया धामा ॥ पूर्णकामा सर्वेशा ॥५७॥
हरि म्हणे कंस वधून ॥ मग मी पाहीन तुझें सदन ॥ ऐसें बोलतां नंदनंदन ॥ कुब्जा गेली निजसदना ॥५८॥
तों फुलोरी आला ते वेळां ॥ तेणें हरिकंठीं घातल्या माळा ॥ आवडीं नमीत पदकमळा ॥ मिलिंद जैसा प्रीतीनें ॥५९॥
हरि पुसे लोकांसी वाटे ॥ धनुर्याग दावा कोठें ॥ तो आधीं अवलोकूं मन नेटें ॥ जाऊं कंस मर्दावया ॥६०॥
गांवांत प्रवेशला श्रीपती ॥ गोपी मथुरेच्या श्रवणीं ऐकती ॥ सद्गद होऊनि धांवती ॥ यदुपति पाहावया ॥६१॥
कित्येक जेवीत होत्या नारी ॥ तैसाचि करींचा कवळ करीं ॥ वेगें धांवती सुंदरी ॥ पूतनारि पहावया ॥६२॥
एक होती नग्न नहात ॥ केशरकस्तूरीमिश्रित ॥ चोखणी शिरीं घांशीत ॥ तैसीच धांवें ती गजगमना ॥६३॥
एक गोपी जंव कांडीत ॥ ऊर्ध्व गेला मुसळासहित हस्त ॥ कानीं ऐकतांची मात ॥ धांवें त्वरित तैशीच ॥६४॥
एक दळीत होती सुंदर ॥ कानीं ऐके आला यदुवीर ॥ सांडूनि नाद घरघर ॥ जाय श्रीवर पहावया ॥६५॥
भुलविल्या कृष्णवेधकें ॥ पायीं घातलीं कर्णताटंकें ॥ चरणींचीं भूषणें सुरेखें ॥ कर्णीं एकी घालिती ॥६६॥
अनवट जोडवीं पोल्हारें ॥ कानीं बांधिलीं एकसरें ॥ कंठीं बांधिलीं नेपुरें ॥ वाळे पैंजण समस्त ॥६७॥
शिसफूल चंद्र बिजवरा ॥ गुडघां बांधिती सुंदरा ॥ घोंसबाळ्या परिकरा ॥ चरणांगुष्ठीं गोंविती ॥६८॥
मोतीयांची दिव्य जाळी ॥ नेसत एक वेल्हाळी ॥ नाकीचें मोतीं चरणकमळीं ॥ घोटियाजवळी बांधिती ॥६९॥
एक काजळ मुखीं घालिती ॥ कुंकुम डोळियांमाजी लेती ॥ जावडें मुखासी माखिती ॥ हरिद्रा लाविती पायांसी ॥७०॥
कर्पूरें सुपारी घोळिली ॥ एकीनें कर्णामाजी घातली ॥ वेणीस विडिया तत्काळीं ॥ एकी खोंविती त्वरेनें ॥७१॥
एक अर्धांगी लेत कंचुकी ॥ मुक्ताहार बांधी मस्तकीं ॥ नेसतें वस्त्र हस्तकीं ॥ धांवे एक घेऊनियां ॥७२॥
बाळकें ठेवूनि शिंक्यावरी ॥ कडिये घेतली घागरी ॥ एक षट्‌चक्राचे माडीवरी ॥ तेथूनि हरि लक्षीत ॥७३॥
एक भक्तीच्या चौबारा ॥ उभ्या राहिल्या सुंदरा ॥ एक साधनाच्या मंदिरा ॥ वरी चढे वेल्हाळी ॥७४॥
एक ध्यानाचें गवाक्षद्वार ॥ त्या वाटे लक्षिती यदुवीर ॥ एक लयलक्षाचें जाळंधर ॥ त्यांतूनि पाहे जगदात्मा ॥७५॥
क्षणिक जाणूनि अडाघडी ॥ वेगें लावी प्रेमाची शिडी ॥ वरी चढतां तांतडी ॥ पाहे आवडीं हरीतें ॥७६॥
ठायीं ठायीं गोपींचे भार ॥ वर्षती सुमनांचे संभार ॥ एक रत्‍नदीप घेऊनि सुंदर ॥ ओंवाळिती पुराणपुरुषा ॥७७॥
मदनमनोहर मेघश्याम ॥ देखतां गोपींस थोर संभ्रम ॥ एक म्हणती कोटिकाम ॥ ओंवाळावे यावरुनि ॥७८॥
एक म्हणती श्रीमुखावरुन ॥ सये जावें ओंवाळून ॥ एक कामें विव्हळ पूर्ण ॥ हरिवदन विलोकितां ॥७९॥
असो धनुर्यागमंडपासमीप ॥ चतुरास्याचा बाम ॥ जो मायानियंता चित्स्वरुप ॥ कर्ममोचक मोक्षदाता ॥८०॥
तों कंसें कुटिलें केलें बंड ॥ लोहधनुष्य ठेविलें प्रचंड ॥ जैसें पूर्वीं त्र्यंबककोदंड ॥ सीतावल्लभें भंगिलें ॥८१॥
तैसेंचि गजास्यतातमित्रें ॥ आकर्ण ओढूनि पंकजनेत्रें ॥ लोहधनुष्य मोडूनि क्षणमात्रें ॥ दोन शकलें केलीं पैं ॥८२॥
तेथें होते दैत्य रक्षक ॥ महाउन्मत्त मद्यप्राशक ॥ परमदुर्मती पिशितभक्षक ॥ सहस्त्र एक धांविन्नले ॥८३॥
राजाज्ञा न घेतां गोवळें ॥ बळेंचि लोहचाप मोडिलें ॥ म्हणोनि अवघेचि लोटले ॥ रामकृष्णांपरी पैं ॥८४॥
ऐसे देखोनि रामवनमाळी ॥ कोदंडखंडें हातीं घेतलीं ॥ दोघे उठले प्रतापबळी ॥ कोण आकळी तयांतें ॥८५॥
जैसे अजाचे उभे असतां भार ॥ निःशंक उठती दोघे व्याघ्र ॥ कीं देखोनि वारणचक्र ॥ जैसे मृगेंद्र चपेटती ॥८६॥
पूर्वीं निरालोद्भवसुत मित्रकुमर ॥ देखोनि पिशिताशनांचे भार ॥ धांविन्नले जैसे प्रलयरुद्र ॥ तैसेच दोघे उठावती ॥८७॥
रणभैरव दोघेजण ॥ दोन्ही धनुष्यखंडें घेऊन ॥ पाडिले दैत्यसमूह झोडून ॥ गतप्राण सर्व जाहले ॥८८॥
समाचार कळला कंसातें ॥ चाप मोडूनि झोडिलें दैत्यांतें ॥ परतोनि गेले मागुते ॥ उपवनीं रहावया ॥८९॥
कंडमंडप विध्वंसिला ॥ रक्षकांचा संहार केला ॥ रजक गौळियें मारिला ॥ कळिकाळा न भिती ते ॥९०॥
उपवनीं क्रमोनि रजनी ॥ सवेंचि उदयाद्रीवरी येतां तरणी ॥ नित्यनेम सारुनि ते क्षणीं ॥ सिद्ध जाहले सर्वही ॥९१॥
भोगींद्र आणि यादवेंद्र ॥ रथीं बैसले जैसे शशिदिनकर ॥ मागें गौळियांचा भार ॥ कृष्णबळें सबळ दिसे ॥९२॥
जैसा वृत्रासुरावरी पुरुहूत ॥ युद्धा निघे त्रिदशांसमवेत ॥ कीं मित्रकुलभूषण बंधूसहित ॥ निघे वैश्रवणबंधु वधावया ॥९३॥
कीं तारकासुरावरी कुमार ॥ अंधकासुरावरी अपर्णावर ॥ तैसाचि यदुकुलप्रतापदिनकर ॥ कंस वधावया चालिला ॥९४॥
प्रतापरुद्र दोघेजण ॥ चालिले राजबिदीवरुन ॥ कंसासी सांगती चार जाऊन ॥ येत कृष्ण तुझे भेटी ॥९५॥
कंस म्हणे कुवलयद्विप पाठवावा ॥ कृष्ण मार्गीं येतांचि कोंडावा ॥ सांदीमाजी रगडावा ॥ महानागें पायांतळीं ॥९६॥
ठायीं ठायीं दैत्यांचे थवे ॥ बिदोबिदीं उभे करावे ॥ आम्ही मुष्टिक चाणूरादिक आघवे ॥ रंगमंडपीं बैसतों ॥९७॥
कुवलय महाहस्ती थोर ॥ कृष्णास पाठविला समोर ॥ सांदींत कोंडिला यदुवीर ॥ गौळीभारासमवेत ॥९८॥
कुवलयावरी बैसला जो दैत्य ॥ तेणें गज लोटिला अकस्मात ॥ गौळी जाहले भयभीत ॥ म्हणती हस्ती हा नाटोपे ॥९९॥
कृष्ण म्हणे गजाकर्षकाते ॥ मूर्खा गज काढीं आणिका पंथें ॥ तो म्हणे तुज गजपदाखालतें ॥ घालोनियां रगडीन ॥१००॥
गुराखियां कपटबळें ॥ वनीं महादैत्य मारिले ॥ तैसें कुवलयाशीं न चले ॥ जवळी आलें मरण तुवां ॥१॥
तुवां पूतना शोषूनि मारिली ॥ तृणावर्त मारिला अंतराळीं ॥ गोवळ्या तुजलागूनि ये स्थळीं ॥ बळिरामासहित मारीन ॥२॥
कालिया आणि अघासुर ॥ किरडूं मारुनि जाहलासी थोर ॥ परी तुझा मृत्यू साचार ॥ जवळी आजी पातला ॥३॥
बकासुरपक्षी मारिला ॥ केशिया तो अश्व वधिला ॥ ऐसें ऐकतां सांवळा ॥ क्षोभला जैसा प्रलयरुद्र ॥४॥
म्हणे मशका तूं आणि हा गज ॥ मत्कुणप्राय दिससी मज ॥ आतांचि क्षण न लागतां तुज ॥ मृत्युपुरीसी धाडीन ॥५॥
अंडजप्रभुपुढें अळिका ॥ तैसा दिससी तूं कीटका ॥ कीं मृगेंद्रापुढें अजा देखा ॥ प्रताप बोले आपुला ॥६॥
जातवेदासी म्हणे पतंग ॥ तुज ग्रासीन मी समग्र ॥ कीं श्रोत्रियापुढें मांग ॥ आचार वर्णीं आपुला ॥७॥
विष्ठाभक्षक काक आपण ॥ राजहंसा दावी शहाणपण ॥ कीं निर्नासिक सौंदर्य पूर्ण ॥ रतिवरासी दावीत ॥८॥
कीं महाउरगापुढें जाण ॥ मूषक आला टंवकारुन ॥ कीं लवणपुतळा म्हणे संपूर्ण ॥ सिंधु प्राशीन क्षणमात्रें ॥९॥
शुष्कतृणाचा पुतळा ॥ कक्षे घालीन म्हणे वडवानळा ॥ त्याचे साहित्यासी कर्पूर आला ॥ तैल घृत घेऊनियां ॥११०॥
रासभें दटाविला व्याघ्र ॥ वृश्चिकें ताडिला खदिरांगार ॥ तैसा अल्पायुषी तूं पामर ॥ बहुत आगळें बोलसी ॥११॥
ऐसें बोलोनि सांवळा ॥ गज शुंडादंडीं धरिला ॥ दुजा हात कंठीं घातला ॥ पिळोनि पाडिला उताणा ॥१२॥
सवेंचि गज उठोनि ते वेळीं ॥ शुंडादंडें हरीस आंवळी ॥ चपळ उसळें वनमाळी ॥ पुच्छीं धरिलें गजातें ॥१३॥
गरगरां भोंवंडुनि ते वेळे ॥ कुवलयासी भिरकाविलें ॥ वरीत दैत्य आपटूनि चूर केले ॥ मृद्धटशकलें ज्यापरी ॥१४॥
मागुती गज सरसावूनियां ॥ लक्षूनि आला यादवराया ॥ दहा वेळां भिरकावूनियां ॥ कृष्णनाथें दीधला ॥१५॥
मग शेवटीं धरिला चरणीं ॥ निजबळें आफळिला मेदिनीं ॥ निःशेष गेला चूर होऊनी ॥ गतप्राण धरणीं पडियेला ॥१६॥
ऐसा मारिला कुवलयहस्त ॥ दोन्ही मोडूनि घेतले दंत ॥ लंबायमान सरळ दिसत ॥ लोहार्गळा ज्यापरी ॥१७॥
बळिरामें आणि गोपाळें ॥ दोन्ही दंत दोघीं घेतले ॥ विमानीं दैव बैसोनि आले ॥ कौतुक पहाती अंतरिक्षीं ॥१८॥
हस्तिदंत दोघे घेऊन ॥ पुढें चपेटती शेषनारायण ॥ ठायीं ठायीं झोडून ॥ दैत्यपाळें पाडिले ॥१९॥
परम ब्रीदायित मल्ल बळें ॥ बळिरामें बहुत आफळिले ॥ ठायीं ठायीं प्रेतपुंज पडिले ॥ रक्तें वाहती बिदोबिदीं ॥१२०॥
धडकत वाद्यांचा कल्लोळ ॥ बिदोबिदीं पळती कंसाचे मल्ल ॥ महाद्वारासी रामघननीळ ॥ कंसाचिया पातले ॥२१॥
तों द्वारपाळ घेऊनि येती शस्त्रें ॥ समोर देखिले नवपंकजनेत्रें ॥ हस्तिदंतघायें गात्रें ॥ चूर्ण केलीं तयांचीं ॥२२॥
हरिप्रताप पाहतां तये वेळां ॥ सकळ मल्लां पळ सूटला ॥ रंगमंडपासी पातला ॥ यादवराणा निजबळें ॥२३॥
कंस सभेसी बैसला आपण ॥ तों अकस्मात देखिले दोघेजण ॥ ते अद्‌भुत पंचानन ॥ कंसवारण शोधूं आले ॥२४॥
कीं ते कल्पांतसूर्य दोघेजण ॥ पाहती सभा अवलोकून ॥ कंसादिक खद्योत पूर्ण ॥ गेले झांकून तेधवां ॥२५॥
भोगींद्र सभा अवलोकी सकळिक ॥ दिसती जेवीं बैसले मूषक ॥ तों धांवले नगरलोक ॥ कृष्णमुख पहावया ॥२६॥
आकर्ण नेत्र तनु सुकुमार ॥ नीलजीमूतवर्ण सुंदर ॥ गरुडपांचूचे गर्भ परिकर ॥ काढूनि मूर्ति ओतिली ॥२७॥
जो पयोब्धिसुतेचा वर ॥ भक्तकैवारी त्रैलोक्यसुंदर ॥ नरवीर श्रेष्ठ श्रीवर ॥ कंससभेंत विराजे ॥२८॥
ब्रह्मानंद मुरोनि अवलीळा ॥ तो हा ओतिला कृष्णपुतळा ॥ दिव्य पदकें मुक्तमाळा ॥ डोलती गळां हरीच्या ॥२९॥
मुक्ताहार निर्मळ सुढाळ ॥ हरिकंठीं दिसती जैसे इंद्रनीळ ॥ सुहास्यवदन तमालनीळ ॥ कुंडलें ढाळ देताती ॥१३०॥
हरिमुख अवलोकिती डोळां ॥ परी हरि कोणासी कैसा भासला ॥ निजभक्तांसी वाटला ॥ कीं कैवारी आमुचा हा ॥३१॥
कंसासी वाटलें केवळ ॥ हा आपणासी न्यावया आला काळ ॥ मल्लांसी वाटला प्रळयकाळ ॥ हा तों आम्हांसी न सोडी ॥३२॥
गोपींसी कैसा दिसे मनमोहन ॥ कीं कोटिकंदर्प मुखावरुन ॥ सांडावे हरीच्या ओंवाळून ॥ पाहतां मन न धाये ॥३३॥
सजलजलदवर्ण तमालनीळ ॥ नंदादि गौळियां वाटे हा बाळ ॥ सवंगडे कृष्णाचे गोपाळ ॥ त्यांसी वाटे प्राणसखा ॥३४॥
संत जे केवळ ज्ञानार्क ॥ त्यांसी वाटे वस्तु हे जगद्‌व्यापक ॥ पूर्णब्रह्मानंद निष्कलंक ॥ तोचि यदुकुळीं अवतरला ॥३५॥
पृथ्वीचे जे नृप अभिमानी॥ त्यांसी शासनकर्ता वाटे चक्रपाणी ॥ यादवांसी कुलभूषणमणी ॥ जगद्वंद्य दिसतसे ॥३६॥
ऐसा अग्रजासमवेत अच्युत ॥ देखतां द्वेषी जाहले गर्वहत ॥ जैसा सभेंत देखतां पंडित ॥ मूर्ख समस्त दचकती ॥३७॥
कां जंबुक मिळोनि बहुत ॥ मागें पंचाननासी निंदीत ॥ तो मृगेंद्र उभा ठाके अकस्मात ॥ मग बोबडी वळत मुखीं त्यांच्या ॥३८॥
तैसे कंस चाणूर मुष्टिक ॥ भयभीत सभा सकळिक ॥ म्हणती दाटूनि आणिला पावक ॥ गृहा आपुल्या लावावया ॥३९॥
मुष्टिक चाणूर धैर्य धरुन ॥ श्रीरंगासी बोलती वचन ॥ तुम्ही बहु झोंबी घेतां म्हणोन ॥ आम्हीं कर्णीं ऐकिलें ॥१४०॥
तरी ये सभे बैसले सबळ मल्ल ॥ जो वाटेल तुम्हांसी समतोल ॥ त्यासीं भिडा सभा सकळ ॥ पाहील कौतुक तूमचें ॥४१॥
ऐकोनि हांसिजे जगन्नायकें ॥ तुम्ही अवघीं दिसतां मशकें ॥ ऐसें बोलोनि वैकुंठपालकें ॥ चाणूर धरोनि ओढिला ॥४२॥
चाणूर बोले ते वेळीं ॥ मजसीं भिडे हातोफळी ॥ ऐसा मल्ल उर्वीमंडळीं ॥ कोणी नाहीं देखिला ॥४३॥
मल्लयुद्ध मांडिलें निष्ठंक ॥ भिडती चाणूर आणि कमलानायक ॥ तों बळिरामें ओढिला मुष्टिक ॥ महाक्रोधें तेधवां ॥४४॥
भुजेसी भुजा आदळती ॥ करचरणग्रीवा पिळिती ॥ एक एका उलथोनि पाडिती ॥ एकमेकांसी तेधवां ॥४५॥
मुष्टिप्रहार प्रबळ वाजती ॥ सप्तपाताळें दणाणती ॥ वर्मठावो लक्षिती ॥ प्राण घ्यावया परस्परें ॥४६॥
मुष्टिकाचें हृदयीं ते वेळां ॥ बळिरामें मुष्टिघात दिधला ॥ सवेंचि उचलोनि अवलीला ॥ बळें आपटिला धरणीये ॥४७॥
जैसा पक्व फणस पडतां अवनीं ॥ निःशेष जाय चूर होऊनी ॥ तैसा मुष्टिक विदारोनी ॥ गतप्राण तो केला ॥४८॥
मुष्टिकाचा प्राण गेला ॥ ऐसें देखोनि घनसांवळा ॥ चाणूर धरणीवरी आपटिला ॥ प्राणासी मुकला तेचि वेळे ॥४९॥
उठोनि मल्ल अवघे पळती ॥ नगरदुर्गावरुनि उडया घेती ॥ एक ब्रीदें सोडूनि पळती ॥ शस्त्रें सांडती हातींचीं ॥१५०॥
तों शल आणि दुजा तोशल ॥ धांवले कंसाचे सबळ मल्ल ॥ ते कंसांतकें तात्काळ ॥ आपटूनियां मारिले ॥५१॥
आणिक आठजण ते वेळां ॥ धांवले जीत धरुं म्हणती सांवळा ॥ तें देखोनि बळिभद्र कोपला ॥ आडवा आला आठजणां ॥५२॥
मिळाले आठ वारण ॥ धरुं म्हणती रामपंचानन ॥ तितुक्यांसीं एक संकर्षण ॥ करी भांडण चपळत्वें ॥५३॥
जैसीं तुंबिनीचीं ओलीं फळें ॥ भूमीस आपटितां होती शकलें ॥ तैसे आठही आपटूनि मारिले ॥ शेषावतारें तेधवां ॥५४॥
कंसासी भय वाटे दारुण ॥ म्हणे म्यां हे दोघे बोलावून ॥ बळें जवळी आणिलें मरण ॥ दोघे प्रलययाग्न दीसती ॥५५॥
दाटूनि दंदशूक खवळविले ॥ निजले सिंह जागे केले ॥ तैसे हे दोघे पाचारिले ॥ आतां आटलें आयुष्यजळ ॥५६॥
तों वाद्यांचें घनचक्र ते वेळीं ॥ कर्कश वाजे रणधुमाळीं ॥ त्या छंदें रामवनमाळी ॥ नाचताती तेधवां ॥५७॥
ते दोघे रणपंडित ॥ जैसे काळ आणि कृतांत ॥ कीं मेरुमंदार निश्चित ॥ सबळ तैसे दीसती ॥५८॥
कीं समुद्र आणि अंबर ॥ कीं विष्णु आणि पिनाकधर ॥ कीं स्वामी आणि वीरभद्र ॥ वरदपुत्र शिवाचे ॥५९॥
किंवा अंगिरापुत्र आणि पुरुहूत ॥ किंवा भार्गव आणि भार्गवजित ॥ जरासंधाचा जाभात ॥ त्याप्रकारें लक्षी दोघां ॥१६०॥
ऐसा कंस भयभीत अंतरीं ॥ सेवकांसी झडकरी आज्ञा करी ॥ अरे या दोघांसी बाहेरी ॥ नेऊनि घाला आतांचि ॥६१॥
वसुदेव देवकी जिवें मारा ॥ गौळियांसमवेत नंद संहारा ॥ यादव तितुके आधीं धरा ॥ वध करा उग्रसेनाचा ॥६२॥
ऐसें ऐकतां जगज्जीवन ॥ जैसा चंडभैरव येत उडोन ॥ अकस्मात उचलीं वारण ॥ तैसा श्रीकृष्ण धांविन्नला ॥६३॥
उंचस्थळीं कंस बैसला ॥ त्यावरी हरि जाऊनि कोसळला ॥ हस्तचपेटें मुकुट पाडिला ॥ भूतळवटीं कंसाचा ॥६४॥
झोटी धरुनि ते क्षणीं ॥ बळें आसडूनि पाडिला धरणीं ॥ मुष्टिघात हृदयीं लक्षूनि ॥ सबळबळें ओपिला ॥६५॥
कंसें डोळे वटारुट ॥ तेथेंचि तात्काळ सोडिला प्राण ॥ अशुद्धाचे लोट पूर्ण ॥ मुखावाटे चालिले ॥६६॥
पूर्ण उदार पूर्ण आनंदकंद ॥ कंसांसी दिधलें निजपद ॥ भक्तां अभक्ताम मुकुंद ॥ एकच गति देतसे ॥६७॥
परिस पूजोनि लोह लाविलें ॥ तें तत्काळ सुवर्ण जाहलें ॥ एकें परिसासी मारिलें ॥ लोहघन घेऊनियां ॥६८॥
तोहि तत्काळ केला सुवर्ण ॥ तैसा भक्तां अभक्तां जगज्जीवन ॥ कोण्या प्रकारें तरी ध्यान ॥ हरीचें सदा लागावें ॥६९॥
जैसी भृंगी कीटकी आणीत ॥ ती ध्यानें तैसीच होत ॥ तैसा कंस तरला निश्चित ॥ हरिचिंतनेंकरुनियां ॥१७०॥
कामें तारिल्या गोपी समस्ता ॥ भयें तारिलें मागधजामाता ॥ वृंदावनींच्या पाषाणलता ॥ स्पर्शें उद्धरिल्या हरीनें ॥७१॥
परम बाळहत्यारी पूतना ॥ तीस तारिलें करुनि स्तनपाना ॥ ऐसा हा वैकुंठीचा राणा ॥ समसमान सर्वांसी ॥७२॥
असो ऐसा मारिला कंस ॥ अदितिकुमरां जाहला उल्हास ॥ धडकले दुंदुभींचे घोष ॥ नादें आकाश कोंदलें॥७३॥
दिव्य सुमनांचा वर्षाव ॥ वारंवार करिती देव ॥ मथुरेंतूनि दुष्ट सर्व ॥ उठोनियां पळाले ॥७४॥
जैसा हृदयीं ठसवतां बोध ॥ सहपरिवारें पळती कामक्रोध ॥ तैसा मथुरेसी येतां जगदंकुरकंद ॥ दैत्य अवघेचि पळाले ॥७५॥
सुटतां श्रीकृष्णप्रभंजन ॥ दैत्यजलदजाळ गेलें विरोन ॥ कीं हरि उगवतां चंडकिरण ॥ द्वेषतम निरसलें ॥७६॥
जैसे वेगळे निवडितां हरळ ॥ उरले शुद्ध तांदुळ ॥ खोटें निवडतांचि सकळ ॥ उरे केवळ खरें नाणें ॥७७॥
तैसे मथुरेंतूनि गेले दुर्जन ॥ उरलें ते निजभक्त सज्जन ॥ प्रजालोक मिळोन ॥ हरीसी शरण आले तेव्हां ॥७८॥
कंसाचें कलेवर ते वेळे ॥ उग्रसेनाचे प्रधानें आणिलें ॥ त्यांहीं अग्नींत घातलें ॥ संपादिलें उत्तरकर्म ॥७९॥
तत्काळ फोडिल्या बंदिशाळा ॥ सोडूनि गौरविलें सकळां ॥ उग्रसेनराजा आणिला ॥ तोडिली श्रृंखळा तयाची ॥१८०॥
मातृजनक उग्रसेन ॥ त्यासी कृष्णें करुनि नमन ॥ सिंहासनीं बैसवून ॥ छत्र धरिलें सुमुहूर्तीं ॥८१॥
झाला परम जयजयकार ॥ नगर आनंदलें समग्र ॥ यादवांचें उजळ वक्‍त्र ॥ केलें तेव्हां मुकुंदें ॥८२॥
मग शेष आणि नारायण ॥ सवें घेऊनि उग्रसेन ॥ समस्त प्रजा ब्राह्मण ॥ समागमें चालिले ॥८३॥
घेतलीं वस्त्रें अलंकार ॥ लागला वाद्यांचा गजर ॥ जेथें वसुदेवकी सुंदर ॥ तेथें सत्वर पातले ॥८४॥
शेष आणि यादवेंद्र ॥ दोघीं साष्टांग घातला नमस्कार ॥ वसुदेवदेवकीस गहिंवर ॥ प्रेमपूर दाटला ॥८५॥
देवकीचे दोन्ही चरण ॥ दृढ धरिती शेष जगज्जीवन॥ कृष्णासी हृदयीं धरुन ॥ स्फुंदस्फुंदोन रडे माया ॥८६॥
वनाहूनि आलिया सीतानाथ ॥ प्रेमें कौसल्या वोसंडत ॥ तैसीच देवकी हृदयीं धरीत ॥ वैकुंठपीठनिवासिया ॥८७॥
प्रेमपान्हा फुटला देवकीसी ॥ क्षणक्षणां विलोकी हरिमुखासी ॥ मागुती धरी हृदयासी ॥ उकसाबुकशीं स्फुंदत ॥८८॥
माता म्हणे नीलोत्पलदलवर्णा ॥ तुवां केलें नाहीं माझिया स्तनपाना ॥ तुज न्हाणिलें नाहीं जगज्जीवना ॥ करेंकरुनि आपुल्या ॥८९॥
तुज पाळणां नाहीं निजविलें ॥ नाहीं दुग्धपान करविलें ॥ जावळ नाहीं सरसाविलें ॥ व्यर्थ आलें जन्मासी मी ॥१९०॥
असो आलिंगूनि घनश्यामा ॥ माता भेटली बळिरामा ॥ वर्णितां तेथींच्या संभ्रमा ॥ शेष उपरमा पावेल हो ॥९१॥
भोगींद्र आणि यादवेंद्र ॥ करिती वसुदेवाशी नमस्कार ॥ त्यासी न सांवरे गहिंवर ॥ प्रेमपूर दाटला ॥९२॥
अवलोकितां दोघां पुत्रां ॥ धणी न पुरे वसुदेवाच्या नेत्रां ॥ हृदयीं आलिंगिलें घनश्यामगात्रा ॥ जो पंचवक्‍त्रा अगम्य ॥९३॥
वस्त्रें भूषणें अलंकार नाना ॥ कृष्णें लेवविले दोघांजणां ॥ आली वसुदेवाची दुजी अंगना ॥ गोकुळाहूनि रोहिणी ते ॥९४॥
उग्रसेन भेटे जामाता ॥ हृदयीं धरिली दृढ दुहिता ॥ नंदादिका गौळियां समस्तां ॥ वसुदेवदेवकी भेटती ॥९५॥
गजरें मिरविती समस्त ॥ देव पुष्पवर्षाव करीत ॥ तो सोहळा वर्णितां समस्त ॥ बहुत ग्रंथ वाढेल ॥९६॥
तों गर्गमुनि आला अकस्मात ॥ सवें घेतले ऋषि बहुत ॥ वसुदेवदेवकींसी म्हणत ॥ व्रतबंध आतां करावा ॥९७॥
शेष आणि नारायण ॥ दोघांचें आरंभिलें मौंजीबंधन ॥ परम हर्षें उग्रसेन ॥ फोडी भांडार तेधवां ॥९८॥
वस्त्रें द्रव्य अलंकार ॥ द्विजांसी वांटी नृपवर ॥ जो वेदशास्त्रां अगोचर ॥ त्यासी ब्रह्मसूत्र घातलें ॥९९॥
यथासांग सोहळा ॥ चारी दिवस पूर्ण जाहला ॥ मग नंद निघाला गोकुळा ॥ वसुदेवासी पुसोनियां ॥२००॥
हरीनें वंदिलें नंदातें ॥ म्हणे आतां जावें गोकुळातें ॥ इतुके दिवस पाळिलें मातें ॥ तें मी कदा विसरेना ॥१॥
आतां माझें स्मरण असों द्यावें ॥ सुख गोकुळीं नांदावें ॥ नंद सद्गदित प्रेमभावें ॥ काय बोले तेधवां ॥२॥
तुज टाकूनि घननीळा ॥ कैसा मी जाऊं गोकुळा ॥ तुवां गोकुळीं वैकुंठपाळा ॥ बहुत लीला दाविल्या कीं ॥३॥
काय काय आठवूं गुण ॥ कोणत्या उपकारा होऊं उत्तीर्ण ॥ आतां मी गोकुळासी जाऊन ॥ काय सांगूं लोकांतें ॥४॥
तुज टाकून जातां श्रीपती ॥ लोक मज काळमुख म्हणती ॥ काय सांगावें यशोदेप्रती ॥ ती प्राण देईल तुजविण ॥५॥
तुजविण गोकुळ सर्व ओस ॥ तुजविण घर भणभणीत उदास ॥ म्यां देहगेहाची सांडिली आस ॥ काय ग्रामास जाऊं आतां ॥६॥
जैसा कीटककोसला जाय पोळून ॥ तैसीं आम्ही होऊं दोघेंजण ॥ हरि तुजकारणें प्राण ॥ देऊं आम्ही जाण पां ॥७॥
हरि नंदासी म्हणे ते समयीं ॥ हा खेद न करावया तुम्हीं कांहीं ॥ मी असें तुमच्या हृदयीं ॥ वियोग नाहीं सर्वथा ॥८॥
होऊनि नंदाचें समाधान ॥ गौळियांसमवेत परतोन ॥ गोकुळासी चालिले अवघे जन ॥ वर्णिती गुण कृष्णाचे ॥९॥
नंद पावला गोकुळा ॥ गोपिकां गौळियां सकळां ॥ सांगे मथुरेचा सोळा ॥ जो जो झाला वृत्तांत ॥२१०॥
समाचार समस्त ऐकूनी ॥ तटस्थ झाल्या नितंबिनी ॥ म्हणती परमपुरुष कैवल्यदानी ॥ त्याची करणी कोणासी न कळे ॥११॥
माता यशोदा सुकुमारा ॥ मज टाकूनि गेलासी मथुरापुरा ॥ तूं परात्पर आणि सोयरा ॥ भक्तजनांचा पैं होसी ॥१२॥
हरिचरणीं ठेवूनि मन ॥ वर्तती गोकुळींचे जन ॥ असो मथुरेंत जगज्जीवन ॥ पाहतां जन सुखरुप ॥१३॥
अक्रूरें आपुल्या मंदिरा ॥ नेऊनि पूजिलें विश्वोद्धारा ॥ सकळ मथुरेच्या सुंदरा ॥ यादवेंद्रा न विसंबती ॥१४॥
तयांचे मनोरथ परिपूर्ण ॥ करीत वसुदेवनंदन ॥ घरोघरीं हरीचें पूजन ॥ करिती जन मथुरेचे ॥१५॥
कुब्जेनेंही अतिप्रीतीं ॥ मंदिरीं नेला जगत्पती ॥ तिची देखोनि प्रेमभक्ती ॥ भाळला श्रीपति तियेतें ॥१६॥
भक्तांचे पूर्ण मनोरथ ॥ कर्ता एक जगन्नाथ ॥ ज्याची जैसी आवडी देखत ॥ तैसाचि होत तयातें ॥१७॥
कोणी पूजिती धरुनि कामना ॥ कोणी अर्चिती जनार्दना ॥ कोणी शरण येती चरणा ॥ निजज्ञान मागावया ॥१८॥
उद्धव आणि अक्रूर ॥ हरीचे आवडते निरंतर ॥ यांसी क्षणभरी श्रीधर ॥ न विसंबेचि सर्वथा ॥१९॥
एका पंक्तीसी भोजन ॥ एकाचि मंदिरीं शयन ॥ एके ठायीं करिती क्रीडन ॥ दोघांविण कांहीं न करीच ॥२२०॥
संपलें ग्रंथाचें पूर्वार्ध ॥ जें समुद्राहून अगाध ॥ त्याहुन विशेष उत्तरार्थ ॥ बहुत गोड अवधारा ॥२१॥
संस्कृतइक्षुदंडरस अपार त्याची प्राकृत हे वळिली साखर ॥ सज्जनां गोड लागे निरंतर ॥ निंदकरोगिष्टां नावडेचि ॥२२॥
भागवत आणि हरिवंश ॥ पद्मपुराणींचें इतिहास ॥ मिळोनि ओतला सुरस ॥ हरिविजयग्रंथ हा ॥२३॥
हरिविजयग्रंथ पूर्ण ॥ हेंचि आंब्यांचें सदा फळलें वन ॥ पाडा आलें प्रेमेंकरुन ॥ भक्तजन सेविती हो ॥२४॥
यासी शुकमुख लागलें ॥ आवडीचे आढिये मुराले ॥ संतजन सेवितां धांले ॥ आनंदले परिपूर्ण ॥२५॥
निंदक अभक्त जे वायस ॥ मुखरोग आला त्यांचिया मुखास ॥ जें परम दोषाविष्ट आसमास ॥ सर्वदाही भक्षिती ॥२६॥
ऐसे जे अभागी अभक्त ॥ त्यांसी नावडे हरिविजयग्रंथ ॥ तेथें अमृतफळें यथार्थ ॥ नाना दृष्टांत जाणिजे ॥२७॥
श्रीब्रह्मानंदकृपाकल्लोळें ॥ हीं हातां आलीं अमृतफळें ॥ श्रीधर म्हणे बहुत रसाळें ॥ संतसज्जनीं सेविजे ॥२८॥
इति श्रीहरिविजय ग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ परिसोत चतुर श्रोते पंडित ॥ एकोणिसावा अध्याय गोड हा ॥२२९॥

श्रीकृष्णार्पणमस्तु॥अध्याय॥१९॥ओंव्या॥२२९॥

॥इति श्रीहरिविजय पूर्वार्ध समाप्त॥