हरिविजय

श्रीधरांसारखा भगवंताच्या भक्तिप्रेमात न्हाऊन गेलेला अजोड कवी, गोपालकृष्णाच्या अति गोड लीलांचे वर्णन करतो, तेव्हा काय बहार येते.


अध्याय २४

श्रीगणेशाय नमः ॥

ज्याचा पार नेणती मुनी ॥ जो कां वर्णिजे वेदपुराणीं ॥ तो पुराणपुरुष चक्रपाणी ॥ घेऊनि रुक्मिणी गेला हो ॥१॥

जो आपरसंसारभयमोचन ॥ जो कां सुरकार्यालागीं सगुण ॥ करावया भूमार हरण ॥ पूर्णब्रह्म अवतरला ॥२॥

तेविसावे अध्यायीं कथा शेवटीं ॥ रुक्मिणी घेऊनि गेला जगजेठी ॥ वीर सावध पाहती दृष्टीं ॥ तंव तेथें रुक्मिणी दिसेना ॥३॥

जैसा शरीर सांडूनि जाय प्राण ॥ परी नेणती भोंवतें जन ॥ तैसी श्रीकृष्णें रुक्मिण ॥ नेली सर्वांदेखतां ॥४॥

घाबरले वीर ते क्षणीं ॥ सख्यांसी पुसती कोठें रुक्मिणी ॥ त्या गदगदां हांसती नितंबिनी ॥ हिणवोनियां बोलती ॥५॥

इतुके तुम्ही रक्षितां वीर ॥ शस्त्रें नग्न करोनि समग्र ॥ नोवरी घेऊनि गेला एक वीर ॥ ऐका चिन्हें तयाचीं ॥६॥

एक पुरुष आला घनश्यामवर्ण ॥ मित्रप्रभेसारिखा ज्याचा स्यंदन ॥ वरी फडके गरुडध्वज पूर्ण ॥ कल्पांतचपळेसारिखा ॥७॥

निमासुर वदन सुंदर ॥ कांसे पिवळा असे पीतांबर ॥ कंठीं वैजयंती मनोहर ॥ तेणें सुंदरी नेली आतां ॥८॥

मुकुट कुंडलें सरळ नासिक ॥ कपाळीं मृगमदाचा टिळक ॥ सर्वानंदसदन ज्याचें मुख ॥ तेणें सुंदरी नेली आतां ॥९॥

शंख चक्र गदा पद्म ॥ चारी आयुधे उत्तमोत्तम ॥ ज्यावरुनि ओंवाळावे कोटि काम ॥ तेणें रुक्मिणी नेली आतां ॥१०॥

ऐसें ऐकतांचि उत्तर ॥ जाहला एकचि हाहाकार ॥ म्हणती राजकन्या सुंदर ॥ गोरक्षक घेऊनि पळाला ॥११॥

जैसा फुटे कल्पांतींचा समुद्र ॥ तैसे उठावले मागधवीर ॥ रणतुरें खाखाइलीं अपार ॥ उभे म्हणती परवीरां ॥१२॥

सिंहनादें गर्जती वीर ॥ ऐकतां मुरडले यादवभार ॥ हलधर आणि श्रीकरधर ॥ रथ मुरडिती सवेग ॥१३॥

पायदळावरी पायदळ ॥ मिसळतां जाहला हलकल्लोळ ॥ उसणे घाईं वीर सकळ ॥ हाणिताती परस्परें ॥१४॥

सुपर्णासमान चपळ घोडे ॥ राऊत मिसळले वेगाढे ॥ असिलता झळकती विजूचेनि पाडें ॥ वाहिले मेढे महावीरीं ॥१५॥

घायें हाणिती महावीर ॥ वीरें वीर पडती सत्वर ॥ न विचारिती आपपर ॥ करीत संहार चालिले ॥१६॥

हस्तीवरी हस्ती लोटती ॥ रथाशीं रथ झगटती ॥ जैशा जलदधारा वर्षती ॥ तैसे येती बाण वेगें ॥१७॥

जाहलें एकचि घनचक्र ॥ रणधुमाळी माजली थोर ॥ उल्हाटयंत्रांचे भडिमार ॥ धराधर गजबजिला ॥१८॥

रक्तगंगा चालिल्या महापूरें ॥ वाहती रथ गजकलेवरें॥ यादववीर महाघोरें ॥ दाटले तिंहीं क्षणभरीं ॥१९॥

ऐसें देखोनि बळिभद्रें ॥ रथ पुढें लोटिला बळसागरें ॥ यादव भिडती परमनिकरें ॥ शिरें परवीरांचीं उडविती ॥२०॥

कंदुकाऐसीं शिरें उडती ॥ मुखें घ्या घ्या हेंचि बोलती ॥ रणीं कबंध नाचती ॥ शस्त्रें घेऊनि सैरावैरा ॥२१॥

नांगर मुसळ घेऊनि हातीं ॥ कृष्णाग्रज उडी घाली रथाखालती ॥ श्रृगालांमाजी भद्रजाती ॥ रेवतीपति तैसा दिसे ॥२२॥

देखोनि चैद्य धांविन्नले सवेग ॥ नांवें अंग वंग कलिंग ॥ वकृदंत शाल्व पौंड्रक ॥ निजभारेंसीं लोटले ॥२३॥

केशिक कारुष विदूरथ ॥ जरासंध निजभारेंसीं लोटत ॥ बाणांची वाकुडी वर्षत ॥ मंडप दिसत अंतराळीं ॥२४॥

श्रीकृष्णदळीं बळिये वीर ॥ सारण सात्यकी अक्रूर ॥ कृतवर्मा उद्धव कंकवीर ॥ निजभारेंसीं मिसळले ॥२५॥

गद आणि बळोद्यत ॥ ठायीं ठायीं युद्ध होत ॥ पौंड्रक कृतवर्मा अद्‌भुत ॥ युद्ध करिती निजबळें ॥२६॥

वक्रदंतावरी सात्यकी वीर ॥ रथीं बैसोनि सोडीत शर ॥ आणिक यादववीर अपार ॥ जरसंधावरी येती ॥२७॥

जरासंधाच्या वीरांप्रती ॥ यादव गर्जोनि बोलती ॥ मागुती मुख दावावया आलेती ॥ सत्रा वेळां पळोनियां ॥२८॥

बळिरामें तुमचा जरासंध ॥ सत्रा वेळां रथीं बांधिला सुबद्ध ॥ ती लाज विसरुनि सुखें युद्ध ॥ पुन्हां करुं आलेती ॥२९॥

शिशुपाळाची पाठी राखावया ॥ आलेती निर्लज्ज मिळोनियां ॥ तरी आतां तुमची जर्जर काया ॥ बळिराम करील निर्धारें ॥३०॥

विझवावया वडवानळा ॥ धांविन्नला शुष्कतृणाचा पुतळा ॥ लाक्षादंड हातीं घेतला ॥ ओडण खांदीं चंद्रुसाचें ॥३१॥

त्याच्या साहित्यासी धांविन्नले वीर ॥ कार्पास आणि दुजा कर्पूर ॥ घृतनवनीतांचे पायभार ॥ पुढील तोंडीं भांडती ॥३२॥

वडवानळापुढें अवघेंचि भस्म ॥ तैसें तुम्हांसी करील मेघश्याम ॥ मागध म्हणती तुम्ही पुरुषार्थी परम ॥ मागेंचि आम्हां

कळलेती ॥३३॥

काळयवनाच्या भेणें तुमचा हरी ॥ पळोनि दडे मुचुकुंदविवरीं ॥ आम्हां भेणें समुद्राभीतरीं ॥ द्वारकापट्टण रचियेलें ॥३४॥

म्हणवितां पुरुषार्थी बळी ॥ तरी कां मथुरा ओस केली ॥ तुम्हीं चोरुनि रुक्मिणी नेली ॥ ते हिरोनि घेऊं आतां ॥३५॥

ऐसें बोलोनि परस्परें ॥ सबळ घाये हाणिती निकरें ॥ यादव वीर माघारे ॥ लोटिले बळे मागधांनीं ॥३६॥

वैरियांचें बल ते क्षणीं ॥ अधिक देखोनि रुक्मिणी ॥ परम घाबरली मनीं ॥ रण नयनीं देखोनियां ॥३७॥

म्हणे इकडे सासर तिकडे माहेर ॥ दोहींकडे आप्तचि समग्र ॥ रणीं पडतील जरी बंधु दीर ॥ तरी दोहीं पक्षीं हानीच ॥३८॥

थोर अरिष्ट मांडलें ॥ मग श्रीहरिमुख विलोकिलें ॥ श्रीकृष्णासी अंतरीं कळलें ॥ हृदयीं धरिलें रुक्मिणीसी ॥३९॥

म्हणे भय न धरीं वेल्हाळे ॥ यादव मारीत उठावले ॥ चैद्य आणि मागधदळें ॥ संहारुनि टाकिती ॥४०॥

असो बळिभद्र ते अवसरी ॥ नांगर मुसळ घेऊनि करीं ॥ लक्षानुलक्ष वीर संहारी ॥ न उरे उरी कांहींच ॥४१॥

जैसा पाकशासन घेऊनि वज्र ॥ करी सपक्षनगांचा चूर ॥ तैसाचि बलसमुद्र बळिभद्र ॥ करीत संहार वीरांचा ॥४२॥

अनिवार बळिभद्राचा मार ॥ माघदचैद्यांचे पळती भार ॥ म्हणती यापुढें कोण वीर ॥ उभा ठाकेल समरांगणीं ॥४३॥

अशुद्धें डवरला बळिभद्र ॥ दिसे जैसा कल्पांतरुद्र ॥ हातीं घेऊनि नांगर मुसळ थोर ॥ नाचे निर्भर रणांगणीं ॥४४॥

गजमस्तकीं घालितां नांगर ॥ मुक्तें उसळोनि पडती बाहेर ॥ मुसळघायें रथांचे चूर ॥ करुनियां पाडीतसे ॥४५॥

नांगरें ओढी वीरांचे भार ॥ सव्यहस्तें मुसळाचा मार ॥ चूर्ण होती शिरें समग्र ॥ मृत्तिकाघट फूटे जेवीं ॥४६॥

पळतां गज पायीं धरोनी ॥ वरल्यासकट आपटी मेदिनीं ॥ मृत गज बळें फिरवूनी ॥ स्वारावरी आपटीत ॥४७॥

चपळ चौताळतां रथ ॥ नांगरघायें चूर्ण करीत ॥ वीर म्हणती कल्पांत ॥ आजि काय जाहला ॥४८॥

येणें शस्त्रें सांडूनि समग्र ॥ आम्हांभोंवता आणिला नांगर ॥ हा नांगरील पृथ्वी समग्र ॥ धराभार उतरील पैं ॥४९॥

अनिवार बळिभद्राचा मार ॥ पळों लागले राजे समग्र ॥ विजयी झाले यादववीर ॥ सिंहनादें गर्जती ॥५०॥

जरासंध वेगें परतला ॥ तों शिशुपाळ नोवरा उठिला ॥ अर्धांगी बैसली अवकळा ॥ अपेशमाळा गळां घातली ॥५१॥

नगराबाहेर शिशुपाळ येत ॥ तों प्रेतें भेटलीं असंख्यात ॥ एक घायाळ येती हूंबत ॥ चैद्यनाथ दचकला ॥५२॥

जरासंध म्हणे शिशुपाळा ॥ तूं उगाचि परतें ये वेळां ॥ आजि जयकाळ नाहीं अपुला ॥ व्यर्थचि काय खटपट ॥५३॥

विचित्र आहे ईश्वरी सूत्र ॥ न कळे मायालाघव साचार ॥ जय पराजय समग्र ॥ त्याचे हातीं असती पैं ॥५४॥

या मायाचक्राभीतरी ॥ जीव पडिले अनादि अघोरीं ॥ येथींचीं सुखदुःखें नानापरीं ॥ भोगिल्याविण न सुटती ॥५५॥

परम दुःखित शिशुपाळ ॥ दळेंसीं परतला तत्काळ ॥ जरसंधादि राजे सकळ ॥ नगरा गेले आपुल्या ॥५६॥

ऐसा देखोनि वृत्तांति ॥ रुक्मिया वेगें रथीं बैसत ॥ निजभारेंसीं धांवत ॥ पवनवेगेंकरोनियां ॥५७॥

रणीं जिंकूनि चक्रपाणी ॥ जरी हिरोनि आणीन माझी भगिनी ॥ तरी गुरुनिंदा करिती जे प्राणी ॥ माझ्या माथां तो दोष ॥५८॥

माता पिता पूज्य संसारीं ॥ आणि पुत्र त्यांसी जिवें मारी ॥ तीं पापें मजचि निर्धारीं ॥ जरी सुंदरी आणीं ना ॥५९॥

रणीं न जिंकितां गोरसचोरा ॥ परतोनि न ये या नगरा ॥ मुख न दाखवीं मातापितरां ॥ हाचि नेम निर्धारीं ॥६०॥

निजभारेंसीं रुक्मिया धांवत ॥ सिंहनादें कृष्णासी पाचारीत ॥ म्हणे गोरक्षका माघारा परत ॥ नेसी वस्तु चोरोनियां ॥६१॥

रुक्मिणी सांडोनि गोवळ्या पळें ॥ तुज जीवदान आजि दिधलें ॥ त्वां गोकुळ जैसें चौढाळिलें ॥ तैसें न चले ये स्थळीं ॥६२॥

चोरी करिसी गोकुळीं ॥ म्हणोनि गौळणी बांधिती उखळीं ॥ ऐसें ऐकतां वनमाळी ॥ निजभारेंसीं मुरडला ॥६३॥

शारंगधनुष्य चढविलें ॥ असंख्यात बाण सोडिले ॥ रुक्मियानें बाणजाळ घातलें ॥ अंबर झांकिन्नलें ते वेळीं ॥६४॥

जें जें शस्त्र रुक्मिया सोडी ॥ तें तें श्रीकृष्ण सवेंचि तोडी ॥ रुक्मिया शूरत्व कडोविकडी ॥ बहुसाल दावी तेधवां ॥६५॥

कृष्णें दिव्य सहा बाण सोडिले ॥ चहूंनीं चारी वारु छेदिले ॥ एकें सारथियाचें शिर उडविलें ॥ एकें तोडिलें ध्वजासि ॥६६॥

हातींचें धनुष्य छेदिलें ते वेळां ॥ शिरींचा मुकुट खंडविखंड केला ॥ बाणभाता तोडिला ॥ विरथ केला रुक्मिया तेव्हां ॥६७॥

मग हातीं घेऊनि असिलता ॥ रुक्मिया तळपे रथाभोंवता ॥ हा रथ छेदीन आतां ॥ म्हणोनि खालता पिलंगत ॥६८॥

ऐसें देखोनियां गोपाळें ॥ अकस्मात धनुष्य गळां घातलें ॥ बळें ओढूनि ते वेळें ॥ केश धरिले निजहस्तें ॥६९॥

शिर छेदावया दिव्य शस्त्र ॥ वेगें काढी जलजनेत्र ॥ रुक्मिणी पाहे हरीचें वक्त्र ॥ भयभीत होवोनियां ॥७०॥

वाचेसी शब्द न फुटे साचार ॥ हरिचरणीं ठेविलें शिर ॥ नेत्रोदकें ते सुंदर ॥ कृष्णचरण क्षालीतसे ॥७१॥

मग म्हणे वनमाळी ॥ ऊठ वेगें भीमकबाळी ॥ याचें शिर छेदीन ये काळीं ॥ बहुत केली निंदा येणें ॥७२॥

निकर देखोनि पद्मनयना ॥ न सोडीच कृष्णचरणां ॥ म्हणे जगद्वंद्या जगज्जीवना ॥ यासी सोडूनि देइंजे ॥७३॥

याची जे अहंदेहबुद्धि ॥ तेचि छेदीं कां कृपानिधि ॥ जीवदशा आविद्याउपाधि ॥ वेगें छेदीं श्रीरंगा ॥७४॥

धरिलिया श्रीकृष्णचरण ॥ द्यावें दोन्ही पक्षीं समाधान ॥ समविषम भेदभान ॥ दोहींकडे नसावें ॥७५॥

सासरीं आणि माहेरीं ॥ तूं व्यापक अवघा मुरारी ॥ प्रपंच परमार्थ समसरी ॥ होय श्रीहरी कृपें तुझ्या ॥७६॥

ऐकोनि रुक्मिणीच्या वचना ॥ कृपा आली जगन्मोहना ॥ प्रीतीनें हृदयीं धरिली पद्मनयना ॥ अश्रु पुसिले पीतांबरें ॥७७॥

करें मुख कुरवाळिलें ॥ म्हणे तुझ्या बोलें यासी सोडिलें ॥ मग रुक्मियासी रथीं बांधिलें ॥ शिरीं काढिले पांच पाट ॥७८॥

अर्धदाढी अर्धमिशी ॥ बोडूनि काजळ माखिलें मुखासी ॥ कृष्ण म्हणे रुक्मियासी ॥ आरती बंधूसी करीं आतां ॥७९॥

बहु उजळ दिसे याचें वदन ॥ वेगें करीं निंबलोण ॥ रुक्मियाची ऐसी दशा देखोन ॥ पळे सैन्य चहूंकडे ॥८०॥

वीर पळती परमतांतडीं ॥ म्हणती वांचली आजि मिशीदाढी ॥ इतुकीच आम्हांसी जाहली जोडी ॥ ऐसें बोलती धांवतां ॥८१॥

असो बळिराम हरीजवळी आला ॥ तों रुक्मियासी रथीं बांधिला ॥ दीनवदन रामें देखिला ॥ काय बोलिला बळिभद्र ॥८२॥

हा सोयरा कीं आमुचा हृषीकेशी ॥ बोलावूं आला रुक्मिणीसी ॥ तुम्हीं गौरव दिधला बरवा यासी ॥ बोलतां रामासी हंसें आलें ॥८३॥

राम रुक्मिणीकडे पाहे ते वेळां ॥ तों मुखमृगांक अति उतरला ॥ खेद पावली ते वेल्हाळा ॥ जाणोनि बोले बळिभद्र ॥८४॥

म्हने ऐक रुक्मिणी सती ॥ ज्ञान अज्ञान दोन्ही वृत्ती ॥ अज्ञानसंगें जीव भ्रमती ॥ आत्मस्थिती नेणोनियां ॥८५॥

जेथें ठसावलें पूर्णज्ञान ॥ तेथेंही प्रपंचसहित अज्ञान ॥ नानाविकार भेदभान ॥ कैंचें मग उरेल वो ॥८६॥

तरी तूं हरीची ज्ञानकळा केवळ ॥ हा आकार अवघा तुझा खेळ ॥ जैसे सागरावरी कल्लोळ ॥ नानापरींचे ऊठती ॥८७॥

तुझें तुज ठाऊक असतां ॥ मग खेद कां करावा आतां ॥ बळिभद्र म्हणे कृष्णनाथा ॥ अनुचित केलें एवढें ॥८८॥

वीर सांपडला जरी रणीं ॥ तरी त्यासी वस्त्रें भूषणें देऊनी ॥ पाठवावें गौरवूनी ॥ ऐसी करणी करुं नये ॥८९॥

जय अथवा पराजय ॥ हा अवघ्यांसी पडतां समय ॥ वीरांसी कदा विटंबूं नये ॥ हें अनुचित तुवां केलें ॥९०॥

बळिभद्रें आपुल्या हातें सोडून ॥ केलें रुक्मियाचें समाधान ॥ वस्त्रें भूषणें देऊन ॥ पाठविला माघारा ॥९१॥

रुक्मिया खेद पावला अंतरीं ॥ म्हणें आतां कैसा जाऊं कौंडिण्यपुरीं ॥ मग भोजकटनगर ते अवसरीं ॥ रचोनि राहिला तेथेंचि ॥९२॥

असो यादवदळेंसीं यादवेंद्र ॥ द्वारकेसी चालला श्रीकरधर ॥ लागला जयवाद्यांचा गजर ॥ नादें अंबर कोंदलें ॥९३॥

सोरटीसोमनाथाजवळी ॥ मूळमाघवीं राहिला वनमाळी ॥ असो भीमकरायासी श्रुत जाहली ॥ वार्ता सकळ वर्तली जे ॥९४॥

परम आनंदला नृपवर ॥ म्हणे धन्य माझे पुण्याचे गिरिवर ॥ पूर्वीं केले साचार ॥ जांवई यदुवीर जोडला ॥९५॥

निजभारेंसीं भीमक निघाला ॥ सत्वर मूळमाधवासी आला ॥ साष्टांग नमस्कार घातला ॥ श्रीकृष्णासी तेधवां ॥९६॥

राजा म्हणे सर्वेश्वर ॥ आतां माघारें चलावें कौंडिण्यपुरा ॥ विधियुक्त विवाह बरा ॥ चारी दिवस संपादिंजे ॥९७॥

मग बळिराम म्हणे ते वेळां ॥ येचि स्थळीं करुं लग्नसोहळा ॥ भीमकासी विचार मानला ॥ आनंदला अंतरीं ॥९८॥

नगरासी पत्रें पाठवी नृपति ॥ आणविली सकळ संपत्ति ॥ अपार लोकांशीं शुद्धमति मूळमाधवा पातली ॥९९॥

कनकमय दिव्य शिबिरें ॥ उभीं करविलीं हो नृपवरें ॥ त्याहुनि श्रीकृष्णें परिकरें ॥ वस्त्रमंदिरें दधिली ॥१००॥

द्वारकेसी पाठविलें मूळ ॥ वर्‍हाडी सिद्ध जाहले सकळ ॥ वाद्यें वाजती तुंबळ ॥ हर्ष सकळ लोकांसी ॥१॥

उग्रसेन आणि वसुदेव ॥ सिद्ध जाहले वर्‍हाडी सर्व ॥ दिव्य वाहनीं यादव ॥ बैसोनियां चालले ॥२॥

देवकी बैसली सुखासनीं ॥ सुभद्रा कृष्णाची भगिनी ॥ परमसुंदर लावण्यखाणी ॥ द्वारकाभुवनीं उपजली ते ॥३॥

चवरडोल गजस्कंधावरी ॥ त्यांत बैसली सुभद्रा सुंदरी ॥ बळिभद्राची अंतुरी ॥ पालखीमाजी आरुढे ॥४॥

पहावया श्रीकृष्णाचें लग्न ॥ सकल दैवतें निघालीं सांवरोन ॥ नवकोटी चामुंडा संपूर्ण ॥ चालती वेगें तेधवां ॥५॥

छप्पन्न कोटी कात्यायनी ॥ निघाल्या वृश्चिकावरी वळंघोनी ॥ नाना भ्यासुर रुपें धरुनी ॥ पाहतां हांसें येतसे ॥६॥

अवघ्यांपुढें निघाला गजवदन ॥ विशाल दोंदिल सिंदूर अर्चून ॥ मूषकावरी बैसोन ॥ पुढे निर्विघ्न चालिला ॥७॥

नेटका वर्‍हाडी पुढें चालिला ॥ वर्‍हाडणी हांसती सकळा ॥ हा पोट घेऊनि कोठें चालिला ॥ उंदिरावरी बैसोनियां ॥८॥

चामुंडा सवें वर्‍हाडिणी ॥ या मातृका वृश्चिकासनी ॥ ऐशा वर्‍हाडिणी देखोनी ॥ व्याही विहिणी हांसती ॥९॥

वर्‍हाडिणी ज्या सुंदरा ॥ त्याचि आधी पुढें करा ॥ ऐसें ऐकतां त्या अवसरा ॥ सकळ दैवतें क्षोभलीं ॥११०॥

हिंव ज्वर आणि तरळा ॥ ओकिती वर्‍हाडिणी सकळा ॥ एकींस हगवणी लागल्या ॥ शूळ उठिले पोटांत ॥११॥

पाणी पाणी करिती वर्‍हाडिणी ॥ तो समाचार कळला चक्रपाणी ॥ श्रीकृष्णें सकळ दैवतें सन्मानूनी ॥ मंडपासी आणिलीं ॥१२॥

मग तेणें जाहलें निर्विघ्न ॥ आनंदें वर्‍हाडी आले संपूर्ण ॥ दोहीं मंडपीं देवकस्थान ॥ करिते जाहले तेधवां ॥१३॥

आपुल्या शिबिरालागोनी ॥ भीमकें नेली रुक्मिणी ॥ देव बैसोनि विमानीं ॥ तो सोहळा अवलोकिती ॥१४॥

हळदी लाविली रुक्मिणी ॥ मग ते शेष पाठविली चक्रपाणी ॥ लागली मंगळवाद्यांची ध्वनी ॥ लग्नघटिका प्रतिष्ठिली ॥१५॥

गोभूहिरण्यरत्‍नदानें ॥ भीमकें विप्रां दिधलीं प्रीतीनें ॥ रुखवत शुद्धमतीनें ॥ सिद्ध करुनि चालिली ॥१६॥

आनकदुंदुभि आपुलें मंदिरीं ॥ यथायुक्त दानें तेव्हां करी ॥ तों रुखवत आलें गजरीं ॥ वाद्यें वाजती तेधवां ॥१७॥

यादवांसहित श्रीकृष्ण ॥ भोजना बैसला जगन्मोहन ॥ शुद्धमति निघाली देखोन ॥ जीवें निंबलोण करुं पाहे ॥१८॥

रत्‍नजडित दीप ठेविले जवळी ॥ जडित आडण्या त्यातळीं ॥ त्यावरी ताटें मांडिलीं ॥ मृगांकमंडलातुल्य जीं ॥१९॥

सात्त्विक राजस तामसें ॥ अन्नें वाढिलीं विशेषें ॥ प्रीतीनें जेविजे हृषीकेशें ॥ निजगोडी घेऊनियां ॥१२०॥

समस्तांचीं भोजनें झालीं ॥ हस्त प्रक्षाळीत वनमाळी ॥ उच्छिष्टपात्रीं टाकिली ॥ मुद्रा हातींची तेधवां ॥२१॥

नमस्कार करुनि श्रीपती ॥ उच्छिष्टपात्रें घेऊनी हातीं ॥ वेगें निघाली शुद्धमती ॥ मंडपासी आपुल्या ॥२२॥

कृष्णमुद्रा ते वेळीं ॥ भीमकीचे हातीं दिधली ॥ तिणें देखतांचि मस्तकीं वंदिली ॥ मग घातली कुरांगुळीं ॥२३॥

परात्परउपरी त्वरित ॥ वेगें चढूनि सद्‌गुरुनाथ ॥ सर्वांसी समाधान म्हणत ॥ ऐसा मुहूर्त सांपडेना ॥२४॥

सद्‌गुरु म्हणे सावधान ॥ आळसी लोक निद्रार्णवीं निमग्न ॥ वरी श्रीकृष्णभक्त अनुदिन ॥ सावध पूर्ण सर्वदा ॥२५॥

तों निजगजरेंसीं फळ ॥ यादव घेऊनि आले तात्काळ ॥ मंडपीं बैसले वर्‍हाडी सकळ ॥ भीमकें तेव्हां पूजियेले ॥२६॥

बाहेर आणिली रुक्मिणी ॥ वसुदेव उठोनि ते क्षणीं ॥ वस्त्रें भूषणें फळें समर्पूनी ॥ जगज्जननी अर्चिली ॥२७॥

पुरोहित म्हणे भीमकातें ॥ मूळ सत्वर पाठवा वरातें ॥ यादव गेले निजमंडपातें ॥ भीमकीचें रुप वर्णित ॥२८॥

भीमक हांकारी वर्‍हाडिणी ॥ शांति दया क्षमा उन्मनी ॥ उपरति तितिक्षा मुमुक्षा कामिनी ॥ समाधी आणि सुलीनता ॥२९॥

विवेक वैराग्य परमार्थ ॥ अक्रोध निष्काम निरहंकृत ॥ स्वानंद अभेद वर्‍हाडी सत्य ॥ वर आणावया चालिले ॥१३०॥

ऐशा गजरेंसीं जातां नृपवर ॥ श्रीकृष्ण मंडपासी आला सत्वर ॥ तों सोमकांताचा चौरंग सुंदर ॥ त्यावरी श्रीधर बैसलासे ॥३१॥

शुभ्रवर्ण खालीं चौरंग ॥ त्यावरी घनश्यामवर्ण श्रीरंग ॥ जैसा कैलासावरी नवमेघ ॥ क्षेम द्यावया उतरला ॥३२॥

असो अर्पूनि वस्त्रें अलंकार ॥ तुरंगीं बैसविला श्रीकरधर ॥ पुढें वाद्यांचा गजर ॥ भडिभार नळ्यांचे ॥३३॥

त्याचे मागें चंद्रज्योती ॥ चंद्रासमान प्रकाशती ॥ हवया गगनातें भेदिती ॥ देव पाहती विमानीं ॥३४॥

उग्रसेन वसुदेव बळिभद्र ॥ येती पाठीसीं यादवभार ॥ प्रवेशले मंडपद्वार ॥ तों दासी समोर पातल्या ॥३५॥

माथां कलश भरिले पूर्ण ॥ त्यांसी इच्छिलें देत श्रीकृष्ण ॥ मग प्रवेशले अंतःसदन ॥ वरासनीं कृष्ण बैसविला ॥३६॥

सिद्ध जाहला मधुपर्क देखा ॥ पिष्टर दिधला जगन्नायका ॥ कृष्णचरणक्षाळणीं भीमका ॥ अतिउल्हास वाटतसे ॥३७॥

शुद्धमति घाली जीवन ॥ राजा प्रक्षाली चरण ॥ सकळ तीर्थे आलीं धांवोन ॥ तळीं माथा ओडविती ॥३८॥

मूळमाधवीं कदंबतीर्ध ॥ अद्यापि असे देखती भक्त ॥ वृक्ष तेथींचे समस्त ॥ मंडपाकार असती पैं ॥३९॥

वेदांचा जनिता कृष्णनाथ ॥ त्यासी घालिती यज्ञोपवीत ॥ शुद्धमति आचमन घालीत ॥ आनंदभरित अंतरीं ॥१४०॥

षोडशोपचारीं पूजा करुनी ॥ वस्त्रें अळंकार भावें अर्पूनी ॥ हस्तमुद्रा कर्णमुद्रिकेसी मणी ॥ श्रीरंगासी अर्पिले ॥४१॥

दधि मधु करोनि एक ॥ हरिकरीं देख ॥ मेहुणे हांसती सकळिक ॥ म्हणती भीड धरुं नका ॥४२॥

गोकुळीचे चोरुनि दहीं खावें ॥ आम्हीं अर्पितां कां न सेवावें ॥ लोक भोंवते आघवे ॥ अत्यंत कौतुकें हांसती ॥४३॥

संतजन आश्चर्यं करिती ॥ निर्गुणासी गुण लावती ॥ असो मधुपर्क सेवूनि श्रीपती ॥ करक्षालन पैं केलें ॥४४॥

आचार्य सावधान म्हणत ॥ शेवटींची घडी आली भरत ॥ अंतःपट धरिला त्वरित ॥ मायामय लटिकाचि ॥४५॥

देशिक म्हणे सावधान ॥ वादविवादीं न घालावें मन ॥ प्रकृतिपुरुषांचें ऐक्यलग्न ॥ मौन्येंचि पूर्ण विलोका ॥४६॥

प्रपंच आणि परमार्थ जाण ॥ उभयपक्षीं सावधान ॥ अनादि कुळदैवत स्मरोन ॥ करावें चिंतन एकत्वें ॥४७॥

ॐपुण्याहं वचनें ते वेळां ॥ आचार्य बौलतां अंतःपट फिटला ॥ वाद्यांचा गजर जाहला ॥ तो सोहळा अद्‌भुत ॥४८॥

भीमकीच्या माथा अक्षतां देख ॥ घाली जलजोद्भवाचा जनक ॥ तेव्हांचि मस्तकीं ठेविला हस्तक ॥ जन्मसार्थक जाहलें ॥४९॥

मग बांधिलें ऐक्यकंकण ॥ बाह्यापालवा गांठीं देऊन ॥ आतां नोवरी कडिये घेऊन ॥ चला म्हणती बहुल्यावरी ॥१५०॥

ऐकोनि हांसे हृषीकेश ॥ मेहुणे म्हणती हा अभ्यास ॥ पूर्वींच आहे कीं तुम्हांस ॥ खेळतां बहु रास यमुनातटीं ॥५१॥

श्रीकृष्ण विदेही चैतन्यघन ॥ अलिप्त परी नवरी उचलोन ॥ बहुल्यावरी बैसवून ॥ विधिविधान सर्व केलें ॥५२॥

अपार वरदक्षिणा जाण ॥ भीमक करी कृष्णार्पण ॥ उभा ठाकला हस्त जोडून ॥ म्हणे चतुर्थहोम येथें कीजे ॥५३॥

शुद्धमतीनें जाऊनियां ॥ देवकी आणिली सूनमुख पहावया ॥ हळदीउटणें करावया ॥ आरंभ केला सवेंचि ॥५४॥

हळदीउटणें पहावयासी ॥ सर्व यादव आले वेगेंसी ॥ वार्‍हाडिणी म्हणती भीमकीसी ॥ नांव घेऊनि पाय मागें ॥५५॥

भीमकी पाहे खालतें ॥ नामरुप नाहीं यातें ॥ अनामासी नाम केउतें ॥ ठेवूं आतां मध्येंचि ॥५६॥

मग म्हणे हा सर्वात्मक ॥ गोइंद्रियांचा चाळक ॥ तेंचि नाम घेऊनि सम्यक ॥ पाय मागे निजभावें ॥५७॥

मग म्हणे गोरक्षका गोपाळा ॥ हळदी लावूं द्या चरणकमळा ॥ हांसे आलें जनां सकळां ॥ एकचि टाळी पिटली पैं ॥५८॥

कृष्णचरणीं माथा ठेवून ॥ हळदी लावी स्वयेंकरुन ॥ तों मळी न निघे कदा जाण ॥ निर्मळ पूर्ण श्रीकृष्ण ॥५९॥

तों सुभद्रा आणि रेवती ॥ म्हणती आतां कैसें श्रीपती ॥ नमस्कार भीमकीप्रती ॥ करावा लागेल आतांचि ॥१६०॥

भीमकीच्या कंचुकीची गांठी ॥ एक हस्तें सोडी जगजेठी ॥ नाहीं तरी नमस्कार उठाउठी ॥ करावा जी नोवरीतें ॥६१॥

मेहूणे म्हणती जगज्जीवना ॥ कंचुकी सोडावयाच्या खुणा ॥ हा पूर्वींच अभ्यास आपणा ॥ असेल ऐसें वाटतें ॥६२॥

यादव म्हणती श्रीपती ॥ चौघे मेहुणे तुम्हांवरी रुसती ॥ जो मान दिधला रुक्मियाप्रती ॥ तोचि मागती आपणांतें ॥६३॥

हांसें आलें रमाधवा ॥ दिव्य वस्त्रें भूषणें तेव्हां ॥ दिधली शालकां सर्वां ॥ श्रीकृष्ननाथें ते वेळीं ॥६४॥

रेवती म्हणे कृष्णनाथा ॥ कंचुकीची गांठी सोडावी आतां ॥ बळिभद्र म्हणे अच्युता ॥ भीड कासया धरावी ॥६५॥

कृपादृष्टीं पाहे वनमाळी ॥ तों आपणचि गांठी सुटली ॥ अद्‌भुत लीला हरीनें दाविली ॥ आश्चर्य वाटले सकळिकां ॥६६॥

सुभद्रा म्हणे माधवा ॥ नांव घेऊनि हळदी लावा ॥ हांसें आलें केशवा ॥ काय तेव्हां बोलत ॥६७॥

मजहूनि विशेषगुणीं ॥ रुक्मिणी तूं सगुण शहाणी ॥ ऐकोनि हांसिजे थोरलहानीं ॥ खूण सज्जनीं जाणिजे ॥६८॥

हळदी घेऊनि कृष्णनाथ ॥ रुक्मिणीचीं अष्टांगें निववित ॥ रेवती म्हणे हळूच लावा जी निश्चित ॥ मल्ल मस्त मर्दिले करें ॥६९॥

असो ऐसे चारी दिवस ॥ सोहळा जाहला विशेष ॥ तो वर्णावया शेषास ॥ शक्ति नव्हे सर्वथा ॥१७०॥

यथासांग साडे जाहले देख ॥ समस्तांसी वस्त्रें देत भीमक ॥ न्यून पदार्थ कांहीं एक ॥ पडला नाहीं तेथें पैं ॥७१॥

धेंडा नाचविला निश्चित ॥ तों दळ सिद्ध जाहलें समस्त ॥ शुद्धमतीनें भीमकी त्वरित ॥ वोसंगा घातली देवकीच्या ॥७२॥

इतुके दिवस आम्हीं पाळून ॥ आतां केली कृष्णार्पण ॥ भीमक शुद्धमति गहिंवरोन ॥ रुक्मिणीसी निरविती ॥७३॥

लागला वाद्यांचा गजर ॥ द्वारकेसी चालिला यादवेंद्र ॥ आज्ञा घेऊनि भीमक नृपवर ॥ कौंडिण्यपुरा पातला ॥७४॥

द्वारकेसी आला गोविंद ॥ घरोघरी लोकांसी आनंदानंद ॥ रुक्मिणीसहित परमानंद ॥ गृहप्रवेश पैं केला ॥७५॥

षोडशोपचारेंकरुन ॥ भीमकी करी लक्ष्मीपूजन ॥ उग्रसेनें भांडार फोडोन ॥ याचकजन सुखी केले ॥७६॥

रुक्मिणीसहित श्रीकृष्णनाथ ॥ द्वारकाभुवनीं सुखें वर्तत ॥ शुक परीक्षितीप्रति सांगत ॥ जाहला गृहस्थ गोपाळ ॥७७॥

हरिविजयग्रंथ भांडार ॥ त्यांत दिव्यरत्‍न हें रुक्मिणीस्वयंवर ॥ ते दोन्ही अध्याय साचार ॥ तेविसावा आणि चोवीसावा ॥७८॥

आतां श्रोतीं व्हावें सादर ॥ पुढें जांबवतीचें स्वयंवर ॥ ते कथा परम नागर ॥ ऐकती चतुर पंडित पैं ॥७९॥

हा हरिविजयग्रंथ सुरेख ॥ हाचि अरुवार शेषमंचक ॥ यावरी पहुडे वैकुंठनायक ॥ रुक्मिणीसहित सर्वदा ॥१८०॥

ब्रह्मानंदा जगदुद्धारा ॥ पंढरीनिवासा श्रीधरवरा ॥ पुराणपुरुषा रुक्मिणीप्रियकरा ॥ सप्रेम भजन देईं तुझें ॥८१॥

इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ सदा परिसोत भाविक भक्त ॥ चतुर्विंशतितमाध्याय गोड हा ॥१८२॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥अध्याय॥२४॥ओंव्या॥१८२॥श्रीगोपीवल्लभार्पणमस्तु॥