निवडक अभंग संग्रह

निवडक अभंग संग्रह


निवडक अभंग संग्रह ३


*
अशौचिया जपो नये । आणिकतें ऎको नये । ऎसिया मंत्रातें जग बिहे । त्यांचे फ़ळ थोडें परि क्षोभणें बहु । ऎसा मंत्राराज नव्हेरे रे ॥१॥
नारायण नाम नारायण नाम । नारायण नाम म्हण कारे ॥२॥
बाह्य उभारावी त्यावरी काहाळ लावावी । गातिया ऎकातिया उणीव येवों नेदावी । उत्तमापासूनि अंत्यजवरी । मुक्तीची सेल मागाविरे रे ॥३॥
काय कराल यागें न सिणावें योगें हें तों व्यसनची वाउगें । नरहरि नरहरि उदंड वाचा म्हणाल तरि कळिकाळ राहेल उगेरे ॥४॥
चरणीं गंगा जन्मली अहिल्या उद्धरली नामें प्रतिष्ठा पावली गिरिजा । सकळिकां साधना वरिष्ठ हें नाम मा मनीं भाव न धरीं दुजारे रे ॥५॥
तीर्थी भजिजाल अमरीं पूजिजाल तुमचिया भावासारिखा देवो होईल । बापरखुमादेविवरु विठ्ठलु तुमचा ऋणवई म्हणता नलजरें रें ॥६॥
*
पांचासहित लयातीत झालियें वो । प्रेमभक्ति अनुसरलें काळ्या रुपासी ॥१॥
ठायींचाचि काळा अनादि बहु काळा । म्हणोनि वेदा चाळा लाविला गे माये ॥२॥
बापरखुमादेविवरें जन्मावेगळें केलें । म्हणोनि भाज झालें बाईये वो ॥३॥
*
आपुलेनि भारें श्रीरंगी डोलत गेलें । तंव अवचितें पांचारिलें पाठिमोरें ॥१॥
चैतन्य चोरलें माझे चैतन्य चोरिलें । अवघें पारुषलें दीन देहें ॥२॥
बापरखुमादेविवरु दीनानाथ भेटला । विठ्ठलीं विठ्ठल झाला देह माझा ॥३॥
*
निरखित निरखित गेलिये । पाहे तंव तन्मय झालिये ॥१॥
उन्मनीं मन निवालें । सांवळें परब्रह्म भासलें ॥२॥
रुप येवोनियां डोळां बैसलें । पाहे तंव परब्रह्म अवतरलें ॥३॥
बापरखुमादेविवरें विठ्ठलें । मुस ओतुनियां मेण सांडिलें ॥४॥
*
आजि संसार सुफ़ळ झाला गे माये । देखियेले पाय विठोबाचे ॥१॥
तो मज व्हावा तो मज व्हावा । वेळोवेळां व्हावा पांडुरंग ॥२॥
बापरखुमादेविवरु न विसंबे सर्वथा । निवृत्तीने तत्त्वतां सांगितलें ॥३॥
*
श्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी ॥१॥
राजयाची कांता काय भीक मागे । मनाचियां जोगे सिद्धी पावे ॥२॥
कल्पतरु तळवटीं जो कोणी बैसला । काय वाणी त्याला सांगिजो जी ॥३॥
ज्ञानदेव म्हणे तरलों तरलों । आतां उद्धरिलों गुरुकृपे ॥४॥
*
इवलेसें रोप लावियेलें द्वारी । त्याचा वेलु गेला गगनावरी ॥१॥
मोगरा फ़ुलला मोगरा फ़ुलला । फ़ुलें वेचितां अति भारु कळियासि आला ॥२॥
मनाचिये गुंतीं गुफ़ियेला शेला । बापरखुमादेविवरु विठ्ठलीं अर्पिला ॥३॥
*
माझ्या जीवींची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥१॥
पांडुरंगी मन रंगलें । गोविंदाचे गुणीं वेधिलें ॥२॥
जागृती स्वप्न सुषुप्ति नाठवे । पाहतां रुप आनंदी आनंद साठवे ॥३॥
बापरखुमादेविवरु सगुण निर्गुण । रुप विटेवरी दाविली खुण ॥४॥
*
तुझी सेवा करीन मनोभावें वो । माझें मन गोविंदी रंगलें वो ॥१॥
नवसिये नवसिये नवसिये वो । पंढरीचे दैवते विठ्ठले नवसिये वो ॥२॥
बापरखुमादेविवरे विठ्ठले वो । चित्त चैतन्य चोरुनि नेलें वो ॥३॥
*
तुं माझा स्वामी मी तुझा रंक । पाहतां न दिसे वेगळिक ॥१॥
मी तूं पण जाऊं दे दूरी । एकचि घोंगडें पाघरुं हरि ॥२॥
रखुमादेविवरा विठ्ठलराया । लागेन मी पायां वेळोवेळां ॥३॥
*
वाराणसी यात्रे जाईन । प्रयाग तीर्थ पाहीन । त्रिवेणीय स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥१॥
विठोबा पायींची वीट । मी कई बा होईन ॥२॥
गोदावरी यात्रे जाईन । बारा वरुषाचें फ़ळ लाहीन । अब्जक तीर्थी स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥३॥
मल्लिकार्जुन यात्रे जाईन । श्रीशैल्य शिखर पाहीन । पाताळगंगे स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥४॥
मातापुर यात्रे जाईन । सह्याद्री पर्वत पाहीन । गहनगंगे स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥५॥
कोल्हापुरीं यात्रे जाईन । महालक्ष्मी पाहीन । विशाळ तीर्थी स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥६॥
एका अंगुष्ठीं तप करीन । पृथ्वी पात्रचि लाहीन । देह कर्वतीं देईन । परी मी वीट नव्हेन ॥७॥
बहुता पुण्याच्या सायासीं । चरण जोडले विटेसी । निवृत्तिदासु म्हणे परियेसी । परी मी वीट नव्हेन ॥८॥