निवडक अभंग संग्रह

निवडक अभंग संग्रह


निवडक अभंग संग्रह ४


*
जोडोनियां जोडी जेणें हुंडारिली दुरी । भिकेची आवडी तया नावडे पंढरी ॥१॥
करंटे कपाळ ज्याचें नाम नये वाचे । सदैव साभाग्य तोचि हरिरंगी नाचे ॥२॥
आपण न करी यात्रा दुजियासि जावो नेदी । विषयाचा लंपट शिकवी कुविद्या कुबुद्धी ॥३॥
ऎसें जे जन्मोनी नर भोगिती अधोर । न करिती तीर्थयात्रा तया नरकी बिढार ॥४॥
पुंडलीकें भक्तें तारिलें विश्र्वजनां । वैकुंठीची मूर्ति आणिली पंढरपूर पाटणा ॥५॥
काया वाचा मनें जीवें सर्वस्वें उदार । बापरखुमादेविवरा विठ्ठलाचा वारिकर ॥६॥
*
वाजतसे बोंब कोणी नायकती कानीं । हरि हरि न म्हणती तया थोर झाली हानी ॥१॥
उठा उठा जागा पाठीं भय आलें मोठें । पंढरीवांचुनि दुजा ठाव नाहीं कोठें ॥२॥
तापत्रय अग्नीचा लागला वोणवा । कवण रिघे आड कवण करी सावाधावा ॥३॥
देखोनि ऎकोनि एक अंध बहिर झाले । विषयाचे लंपट बांधोनि यमपुरीस नेले ॥४॥
आजा मेला पणजा मेला बाप मसणा नेला । देखत देखत नातु पणतु तोही तैसा झाला ॥५॥
व्याघ्र लासी भूतें हीं लागताती पाठीं । हरि भजन न करितां सकळें घालूं पाहे पोटीं ॥६॥
संतसंग धरा तुम्ही हरिभजन करा । पाठी लागलासे काळ दांत खातो करकरां ॥७॥
बापरखुमादेविवरा विठ्ठला शरण । भावें न रिघतां न चुके जन्ममरण ॥८॥
*
हे नव्हे आजिकालिचें । युगें अठ्ठाविसांचें । मज निर्धारितां साचें । हा मृत्युलोकुचि नव्हे । हाचि मानी रे निर्धारु । येर सांडि रे विचारु । जरी तुं पाहासी पराप्तरु । तरी तुं जाये पंढरीये ॥१॥
बाप तीर्थ पंढरी । भूवैकुंठ महीवरी । भक्त पुंडलिकाचें द्वारीं । कर कटावरी राहिला ॥२॥
कशी अयोध्या अवंती । कांची मथुरा माया गोमती । ऎसीं तीर्थे इत्यादिके आहेती । परि सरी न पवती ये पंढरी ॥३॥
हाचि मानि रे विश्र्वासु । येर सांडी रे हव्यासु । जरि तूं पाहासी वैकुंठवासु । तरि तूं जाये पंढरिये ॥४॥
आड वाहे भीमा । तारावया देह आत्मा । पैलथडीये परमात्मा । मध्यें राहिला पुंडलीक ॥५॥
या तिहींचे दरुशन । प्राण्या नाहीं जन्ममरण । पुनरपि आगमन । येथें बोलिलेंचि नाही ॥६॥
पंढरी म्हणजे भूवैकुंठ । ब्रह्म तंव उभेचि दिसताहे नीट । या हरिदासांसी वाळवंट । जागरणासी दिधलें ॥७॥
म्हणोनि करा करा रे क्षीरापति । नटा नटा कीर्तनवृत्ति । ते नर मोक्षातें पावती । ऎसें बोलती सुरनर ॥८॥
हें चोविसा मूर्तीचें उद्धरण । शिवसहस्त्रनामासी गहन । हेंचि हरिहराचें चिंतन । विश्र्ववंद्य हे मूर्तीतें ॥९॥
तो हा देवाधिदेव बरवा । पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा । बापरखुमादेविवरु पंचविसावा । चोविसा मूर्ति वेगळा ॥१०॥
*
तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे । सगुण निर्गुण एकु गोविंदुरे ॥१॥
अनमाने ना अनुमाने ना । श्रृति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥२॥
तुज स्थुळ म्हणों कीं सुक्ष्म रे । स्थूळ सूक्ष्म एकु गोविंदु रे ॥३॥
तुज आकारु म्हणों कीं निराकारु रे । आकारु निराकारु एकु गोविंदु रे ॥४॥
तुज दृश्य म्हणों कीं अदृश्य रे । दृश्य अदृश्य एकु गोविंदु रे ॥५॥
निवृत्ति प्रसादे ज्ञानदेव बोले । बापरखुमादेविवरु विठ्ठलु रे ॥६॥
*
सत्यज्ञानानंत गगनाचें प्रावर्ण । नाहीं रुप वर्ण गुण जेथें ॥१॥
तो हा रें श्रीहरि पाहिला डोळेभरी । पाहते पाहणें दुरी सारोनियां ॥२॥
ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती । ती हे उभी मूर्ति विटेवरी ॥३॥
*
तुझी आण वाहीन गा देवराया । बहु आवडसि जिवांपासुनियां ॥१॥
कानडिया विठोबा कानडिया । बहु आवडसि जीवापासूनियां ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु राया । बहु आवडसि जीवांपासूनियां ॥३॥
*
तृप्ती भुकेली काय करूं माये । जीवनीं जीवन कैसे तान्हेजत आहे ॥१॥
मन धालें परी न धाये । पुढत पुढती राजा विठ्ठलु पाहे ॥२॥
निरंजनीं अंजन लेइजेत आहे । आपुलें निधान कैसें आपणचि पाहे ॥३॥
निवृत्ति गार्हस्थ मांडलें आहे । निष्काम अपत्य प्रसवत जाये ॥४॥
त्रिभुवनी आनंदु न माये गे माये । आपे आपु परमानंदु वोसंडतु आहे ॥५॥
बापरखुमादेविवरु विठ्ठल गे माये । देहभाव सांडुनि भोगिजत आहे ॥६॥
*
बरवा वो हरि बरवा वो। गोविंद गोपाळ गुण गरुवा वो ॥१॥
सांवळा वो हरि सांवळा वो । मदनमोहन कान्हो गोवळा वो ॥२॥
पाहतां वो परि पाहतां वो । ध्यान लागलें या चित्तां वो ॥३॥
पढिये वो हरि पढिये वो । बापरखुमादेविवरु घडिये वो ॥४॥
*
राम बरवा कृष्ण बरवा । सुंदर बरवा बाईयांनो॥१॥
केशव बरवा माधव बरवा । गोपाळ बरवा बाईयानों ॥२॥
बापररुमादेविवरु त्रिभुवनीं गरुवा । विठ्ठलु बरवा बाईयांनो ॥३॥
*
अष्टांगयोगें न सिणिजे । यम नेम विरोध न कीजे रया ॥१॥
वाचा गीत गाईजे वाचा गीत गाइजे । गातां गातां श्रीवणीं ऎकिजे रया ॥२॥
गीताछंदे अंग डोलिजे । लीला विनोदें संसार तरिजे रया ॥३॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु नामें । जोडे हा उपावो किजे रया ॥४॥
*
रसने वो रसु मातृके वो माये ॥धृ॥
रमणिये माये रमणिये । राम नामामृत रस पी जिव्हे ॥१॥
निवृत्तिदासाप्रिय । माय रमणिये माय रमणिये ॥२॥
*
सकळ धर्मांचें कारण । नामस्मरण हरिकीर्तन । दया क्षमा समाधान संतजन साधिती ॥१॥
निजधर्म हा -चोखडा । नाम उच्चारु घडघडां । भुक्ति मुक्तिचा संवगडा । हा भवसिंधुतारक ॥२॥
लावण्य मान्यता विद्यावंत । सखे स्वजन पुत्र कलत्र । विषयभोग वयसा व्यर्थ । देहासहित मरणांतीं ॥३॥
जें जें देखणें सकळ । तें हें स्वप्नींचें मृगजळ । म्हणोनि चिंती चरणकमळ । रखुमादेविवरा विठ्ठलाचें ॥४॥
*
माझ्या कान्हाचें तुम्ही नाव भरी घ्यावो । ह्रुदयीं धरोनि यासी खेळावया न्यावो ॥१॥
भक्तांकारणे येणें घेतलीसे आळी । दहा गर्भवास सोशी वनमाळी ॥२॥
कल्पनेविरहित भलतया मागे । अभिमान सांडूनि दीनापाठीं लागे ॥३॥
शोषिली पुतना येणें मोडियेले तरु । आळी न संडी बापरखुमादेविवरु ॥४॥
*
आपुलेनि रंगे येती होती ये साजणी । तवं एके वनवासीं आलंगिलें गे माये ॥१॥
बोलेना बोलों देईना । तेथें पाहणें तें अवघें पारुषलें गे माये ॥२॥
आपुलें केले कांहीं नचले वो आतां । बापरखुमादेविवरा विठ्ठलां देखतां ॥३॥
*
कानीं घालुनियां बोटें नाद जे पाहावे । न दिसतां जाणावें नऊ दिवस ॥१॥
भोंवया पाहतां न दिसे जाणा । आयुष्यासी गणना सात दिवस ॥२॥
डोळां घालुनियां बोटचक्र जें पाहवें । न दिसतां जाणावें पाच दिवस ॥३॥
नासाग्रीचें अग्र न दिसे नयनीं । तरी तेचि दिनीं म्हणा रामकृष्ण ॥४॥
ज्ञानदेव म्हणे हें साधूंचें लक्षण । अंतकाळीं आपण वेंगीं पाहा ॥५॥