*
कृष्णा माझी माता कृष्णा माझा पिता । बहिणीबंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥
कृष्ण माझा गुरु कृष्ण माझें तारुं । उतरी पैल पारुं भवनदी ॥२॥
कृष्ण माझें मन कृष्ण माझे जन । सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥
तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥४॥
*
गाढवाचे घोडें । आम्ही करुं दृष्टीपुढें ॥१॥
चघळी वाहाणा । माघारिया बांडा सुना ॥२॥
सोंग संपादणी । तरी करुं शुद्ध वाणी ॥३॥
तुका म्हणे खळ । करुं समयी निर्मळ॥४॥
*
दिनरजनी हाचि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥१॥
संकल्पिला देह देवा । सकळ हेवा तये ठायीं ॥२॥
नाहीं अवसान घडी । सकळ जोडी इंद्रियां ॥३॥
किर्ती मुखें गर्जे तुका । करी लोकां सावध ॥४॥
*
धर्माचे पाळन । करणें पाखांड खंडण ॥१॥
हेंचि आम्हां करणें काम । बीज वाढवावें नाम ॥२॥
तीक्ष्ण उत्तरें । हातीं घेऊनि बाण फ़िरे ॥३॥
नाहीं भीड भार । तुका म्हणे साना थोर ॥४॥
*
धन्य देहु गांव पुण्यभूमि ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ॥१॥
धन्य क्षेत्रवासी लोक ते दैवाचे । उच्चारिती वाचे नामघोष ॥२॥
कर कटी उभा विश्वाचा जनिता । वामांगी ते माता रखुमादेवी ॥३॥
गरुडपारीं उभा जोडूनियां कर । अश्वत्थ समोर उत्तरामूख ॥४॥
दक्षिणे शंकर लिंग हरेश्वर । शोभे गंगा नीर इंद्रायणी ॥५॥
लक्ष्मीनारायण बल्लाळाचे बन । तेथें अधिष्ठान सिद्धेश्र्वर ॥६॥
विघ्नराज द्वारी बहिरव बाहेरी । हनुमंत शेजारी सहित दोघे ॥७॥
तेथें दास तुका करितो कीर्तन । ह्रुदयी चरण विठोबाचे ॥८॥
*
मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदू ऎसे ॥१॥
मेले जित असो निजलिया जागें । जो जो जें जें मागे तें तें देऊं ॥२॥
भले तरी देऊं गांडीची लंगोटी । नाठाळाचे काठी देऊं माथा ॥३॥
मायबापहूनि बहु मायावंत । करुं घातपात शत्रुहूनि ॥४॥
अमृत तें काय गोड आम्हांपुढे । विष तें बापुडें कडू किती ॥५॥
तुका म्हणे आम्ही अवघेचि गोड । जया परे कोड त्याचे परी ॥६॥
*
मागें बहुता जन्मी । हेंचि करीत आलों आम्ही । भवतापश्रमीं । श्रमले जे विनवूं त्या ॥१॥
गर्जो हरीचे पवाडे । मिळों वैष्णव बागडे । पाझर रोकडे । काढूं पाषाणामध्यें ॥२॥
भाव शुद्ध नामावळी । हर्षे नाचों पिटूं टाळी । घालुं पायातळी । कळिकाळ त्याबळें ॥३॥
काम क्रोध बंदीखानी । तुका म्हणे दिले दोन्ही । इंद्रियांचे धनी । आम्ही झालों गोसावी ॥४॥
*
वेद अनंत बोलिला । अर्थ इतकाचि साधिला ॥१॥
विठोबासी शरण जावें । निजनिष्ठे नाम गावे ॥२॥
सकळ शास्त्रांचा विचार । अंती इतुकाची निर्धार ॥३॥
अठरा पुराणीं सिद्धांत । तुका म्हणे हाचि हेत ॥४॥
*
न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥१॥
ऎसी माझी वाचा मज उपदेशी । आणिक लोकांसी हेंची सांगे ॥२॥
विटंबो शरीर होत कां विपत्ती । परि राहो चित्तीं नारायण ॥३॥
तुका म्हणे नाशिवंत हें सकळ । आठवे गोपाळ तेंचि हित ॥४॥
*
श्रीसंतांचिया माथा चरणावरी । साष्टांग हे करी दंडवत ॥१॥
विश्रांती पावलों साभाळा उत्तरी । वाढलें अंतरी प्रेमसुख ॥२॥
डौरली हे काया कृपेच्या वोरसें । नव्हे अनारिसें उद्धरलों ॥३॥
तुका म्हणे मज न घडतां सेवा । पूर्वपुण्यठेवा ऒढवला ॥४॥
*
अर्भकाचेसाठीं । पंतें हातीं धरिली पाटी ॥१॥
तैसें संत जगीं । क्रिया करुनी दाविती अंगी ॥२॥
बाळकाचे चाली । माता जाणूनि पाऊल घाली ॥३॥
तुका म्हणे नाव । जनासाठीं उदकीं ठाव ॥४॥
*
अवघा तो शकुन । ह्रुदयी देवाचे चरण ॥१॥
येथें नसतां वियोग । लाभा उणें काय मग ॥२॥
संग हरीच्या नामाचा । शुचिर्भुत सदा वाचा ॥३॥
तुका म्हणे हरीच्या दासा । शुभ काळ दाही दिशा ॥४॥