निवडक अभंग संग्रह

निवडक अभंग संग्रह


निवडक अभंग संग्रह १४


*
मायबापें जरी सर्पीण की बोका । त्यांचे संगे सुखा न पवे बाळ ॥१॥
चंदनाचा शुळ सोनियाची बेडी । सुख नेदी फ़ोडी प्राण नाशी ॥२॥
तुका म्हणे नरकीं घाली अभिमान । जरी होय ज्ञान गर्व ताठा ॥३॥
*
एका बीजा केला नाश । मग भोगीलें कणीस ॥१॥
कळे सकळां हा भाव । लहान थोरांवरी जीवा ॥२॥
लाभ नाहीं फ़ुकासाठी । केल्यावीण जीवा साठी ॥३॥
तुका म्हणे रणीं । जीव देतां लाभ दुणी ॥४॥
*
सेवितों हा रस वाटितों आणिकां । घ्यारे होऊं नका रानभरी ॥१॥
विटेवरी ज्याची पाऊलें समान । तोचि एक दानशुर दाता ॥२॥
मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायीं ॥३॥
तुका म्हणे मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुखरुप ॥४॥
*
रंगी रंगे रे श्रीरंगे । काय भुललासी पतंगे ॥१॥
शरीर जायाचें ठेवणें । धरिसी अभिलास झणें ॥२॥
नव्हे तुझा हा परिवार । द्रव्य दारा क्षणभंगुर ॥३॥
अंतकाळींचा सोईरा । तुका म्हणॆ विठो धरा ॥४॥
*
आधळ्यासी जन अवघेचि आंधळे । आपणासी डोळे दृष्टी नाहीं ॥१॥
रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासी कारण चवी नाहीं ॥२॥
तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥
*
कांहीं नित्यनेमावीण । अन्न खाय तोचि श्र्वान । वाया मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥१॥
त्याचा होय भुमीभार । नेणें यातीचा आचार । झाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसी ॥२॥
अखंड अशुभ वाणी । खरें न बोलेचि स्वप्नीं । पापी तयाहूनि । आणिक नाहीं दुसरा ॥३॥
पोट पोसी एकला भुतीं दया नाहीं ज्याला । पाठीं लागे आल्या । अतीताचें दारासीं ॥४॥
नांही संतांचे पूजन । न घडे तीर्थांचें भ्रमण । यमाचा आंदण । सीण थोर पावेल ॥५॥
तुका म्हणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी । देवा विसरुनी । गेलीं म्हणतां मी माझें ॥६॥
*
गाढवाचें तानें । पालटतें क्षणक्षणें ॥१॥
तैसें अधमाचे गुण । एकविध नाहीं मन ॥२॥
उपजतां बरें दिसे । रुप वाढतां तें नासे ॥३॥
तुका म्हणे भुकंतेवेळें । वेळ अवेळ न कळे ॥४॥
*
सत्य संकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१॥
येथें अळंकार शोभती सकळ । भावबळें फ़ळ इच्छेचें तें ॥२॥
अंतरीचें बीज जाणॆं कळवळा । व्यापक सकळां ब्रह्यांडाचा ॥३॥
तुका म्हणे नाहीं चालत तांतडी । प्राप्त काळघडी आल्यावीण ॥४॥
*
घेऊनियां चक्र गदा । हाचि धंदा करितो ॥१॥
भक्तां राखे पायांपासीं । दुर्जनासी संहारी ॥२॥
अव्यक्त ते आकारलें । रुपा आलें गुणवंत ॥३॥
तुका म्हणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥४॥
*
साठविला हरि । जिहीं ह्रुदयमंदिरीं ॥१॥
त्यांची सरली येरझार । झाला सफ़ळ व्यापार ॥२॥
हरि आला हाता । मग कैची भय चिंता ॥३॥
तुका म्हणे हरि । कांहीं उरों नेदी उरी ॥४॥
*
म्हणऊनि शरण जावें । सर्वभावें देवासी ॥१॥
तो हा उतरील पार । भव दुस्तर नदीचा ॥२॥
बहु आहे करुणावंत । अनंत हें नाम ज्या ॥३॥
तुका म्हणे साक्षी आले । तरी केलें प्रगट ॥४॥
*
क्षणाक्षणा हाचि करावा विचार । तरावया पार भवसिधु ॥१॥
नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥२॥
संतसमागमीं धरावी आवडी । करावी तांतडी परमार्थी ॥३॥
तुका म्हणे इहलोकींच्या वेव्हारें । नये डोळे धुरें भरुनि राहो ॥४॥
*
शांतीपरतें नाही सुख । येर अवघेंचि दु :ख ॥१॥
म्हणऊनि शांति धरा । उतराल पैलतीरा ॥२॥
खवळलिया कामक्रोधी । अंगी भरतीं आधि व्याधि ॥३॥
तुका म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपेआप ॥४॥
*
भावें गावें गीत । शुद्ध करुनियां चित्त ॥१॥
तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ॥२॥
आणिकांचे कानीं । गुण दोष मना नाणीं ॥३॥
मस्तक ठेंगणा । करी संतांच्या चरणा ॥४॥
वेचीं तें वचन । जेणें राहे समाधान ॥५॥
तुका म्हणे फ़ार । थोडा तरी पर‍उपकार ॥६॥
*
आलिया भोगासी असावे सादर । देवावरी भार घालुनिया ॥१॥
मग तो कृपासिंधु निवारी साकडें । येर ते बापुडे काय रंक ॥२॥
भयाचिये पोटीं दु:खाचिया राशी । शरण देवासी जातां भलें ॥३॥
तुका म्हणे नव्हे काय त्या करितां । चिंतावा तो आतां विश्र्वंभर ॥४॥
*
तरीच जन्मा यावें । दास विठ्ठलाचे व्हावे ॥१॥
नाही तरी काय थोडीं । श्‍वान शुकरें बापुडीं ॥२॥
ज्याल्याचें तें फ़ळ । अंगीं लागों नेदी मळ ॥३॥
तुका म्हणॆ भले । ज्याच्या नांवें मानवलें ॥४॥